शिशिर - वसंतातला रंगोत्सव

विवेक मराठी    26-Mar-2022   
Total Views |
निसर्गात रंगोत्सव सतत सुरू असतो. पावसाळ्यात सड्यावरची रानफुलं, छोटी झुडपं, वेली विविध रंगांच्या फुलांनी बहरतात. पावसाळ्यात निसर्गातल्या रंगांचा आनंद घ्यायला मान खाली घालावी लागते, याउलट उन्हाळ्यातला रंगोत्सव पाहण्यासाठी माना वर कराव्या लागतात. कारण या दिवसांत उंच वाढणारे वृक्ष विविधरंगी फुलांनी बहरतात.

Winter-Spring Festival



दि. 20 मार्च 2022. ज्याची टक लावून वाट बघत होतो, तो या वर्षातला सुवर्णदिन अखेर उजाडला. करमाळीचं झाड फुललं! सकाळी उठल्यावर निरशा दुधाच्या चहाचा कप घेऊन खळ्यात पाऊल टाकल्यावर समोर सुमारे 30 फूट उंचीचं करमाळीचं झाड खालपासून वरपर्यंत पिवळ्याधमक पंचपाकळीयुक्त सुगंधी फुलांनी लगडलेलं नजरेस पडलं आणि आपण पडद्यावर चित्रपटातला एखादा सीन पाहतो आहोत की काय, असा भास झाला. अवर्णनीय सौंदर्य! किमान लाखभर तरी मधमाश्या फुलांवर अधाशासारखा तुटून पडल्या होत्या. 200 मीटरवरही ऐकायला जाईल असा त्यांचा गुंजारव होता. करमाळी फुलण्याचा दिवस म्हणजे एक महापर्वणी असते, कारण हा अद्भुत नजारा वर्षातून फक्त एकच दिवस बघायला मिळतो. दुसर्‍या दिवशी सगळी फुलं गायब. त्यानंतर हा पुष्पोत्सव अनुभवायला एक वर्ष वाट बघावी लागते.


करमाळी - - Dillenia Pentagynaसूपर हा पश्चिम घाटातला दुर्मीळ होत चाललेला एक वृक्ष. याला ‘छोटा करमळ’, ‘करवळ’, ‘रानकरमळ’ अशी विविध नावं आहेत. याची पानं केळीसारखी लांब-रुंद असतात. फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास पानं पूर्ण झडतात आणि बारीक बारीक कळ्या येतात. कधीतरी अचानक सर्व कळ्या एकदम फुलतात आणि अख्खं झाड, झाडाची प्रत्येक फांदी न फांदी पिवळ्या फुलांनी लगडते. फुलं छोट्या आकाराची, सुगंधी असतात. फुलांना पाच पाकळ्या असतात, म्हणून याचं नामकरण ‘शिपींरसूपर’ असं केलेलं आहे, असं एका ठिकाणी वाचलं. काही आदिवासी भागांमध्ये फुलांची भाजी करतात. वसंत ऋतू सुरू व्हायच्या सुमारास निसर्गात रंगांची उधळण करणार्‍या झाडांमध्ये अव्वल असलेलं हे करमाळीचं झाड आमच्या गावात एकच आहे. घराजवळ हा नजारा बघायला मिळणं हे भाग्य!
 

Winter-Spring Festival

दि. 22 मार्च 2022. रंगपंचमीचा दिवस. आज निसर्गात काय रंगपंचमी चालली ते बघायला सकाळीच सकाळीच आमच्या गावातल्या गिरेश्वर मंदिराच्या टेकडीच्या मागच्या बाजूच्या घनदाट अरण्यात गेलो. इतकी वर्षं गावात राहूनही त्या जंगलात मी प्रथमच जात होतो. जंगलात शिरताना दूरवर गुलबट लाल पानं असलेली काही झाडं नजरेस पडली. अरे हा तर कुसुंब नव्हे ना? असं पटकन मनात आलं. म्हणून पुढे जाऊन बघितलं तर खरोखर कुसुंबाची झाडं होती! कोकणात इतरत्र फार क्वचित दिसणारं कुसुंबाचं झाड आपल्याच गावात आहे, हे त्या दिवशी पहिल्यांदा कळलं. कितीशी झाडं आहेत हे बघायला थोडा पुढे गेलो, तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! त्या टेकडीच्या उताराचा सुमारे तीन-चार एकरांचा परिसर कुसुंबाच्या झाडांनी लालेलाल झालेला होता! पालवी फुटलेली कुसुंबाची शंभरपेक्षा जास्त मोठी झाडं एकाच नजरेच्या पट्ट्यात बघायला मिळणं ही पर्वणी होती. त्या दिवशी खर्‍या अर्थाने रंगपंचमी साजरी झाली.


Winter-Spring Festival

कुसुंब - डलहश्रशळलहशीर ेश्रशेीर - भारतीय उपखंडातला एक सुंदर वृक्ष. वसंत ऋतूत जेव्हा याला लालेलाल पालवी येते, तेव्हा याचं सौंदर्य शतगुणित होतं. नुसतं बघतच राहावं असं. मध्य प्रदेश आणि दख्खनच्या पठारावर कुसुंबाची भरपूर झाडं आहेत. याचं लाकूड अत्यंत कठीण असतं. बियांपासून तेल काढलं जातं. मध्य प्रदेशात या झाडांपासून लाखेचं उत्पादन घेतलं जातं. संस्कृत भाषेत याला ‘मुकुलक’, ‘रक्ताम्र’, ‘लाक्षावृक्ष’ अशी नावं आहेत. पावसाळ्यात या वृक्षाला बारीक पिवळी फुलं येतात. डिसेंबरच्या सुमारास याची पूर्ण पानगळ होते आणि मार्चमध्ये येणारी पालवी निसर्गात तांबड्या रंगाची उधळण करते.
निसर्गात रंगोत्सव सतत सुरू असतो. पावसाळ्यात सड्यावरची रानफुलं, छोटी झुडपं, वेली विविध रंगांच्या फुलांनी बहरतात. पावसाळ्यात निसर्गातल्या रंगांचा आनंद घ्यायला मान खाली घालावी लागते, याउलट उन्हाळ्यातला रंगोत्सव पाहण्यासाठी माना वर कराव्या लागतात. कारण या दिवसांत उंच वाढणारे वृक्ष विविधरंगी फुलांनी बहरतात. शिशिर ऋतू, म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारीचा काळ हा निसर्ग लालभडक होण्याचा काळ. पळसाच्या झाडाला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हटलं जातं, कारण पोपटाच्या चोचीसारख्या लालभडक फुलांनी बहरलेला पळस आगीच्या ज्वाळांसारखा दिसतो. परंतु वास्तविक अनेक झाडं ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणण्यासारखी लालभडक झालेली दिसतात. त्यात शेवर आणि पांगारा ही मुख्य. काटेरी खोडाची काटेसावर (शेवर) उन्हाळ्यात गोल, रुंद अशा लालभडक फुलांनी बहरते. पोपट, मैना, कोतवाल अशा अनेक पक्ष्यांसाठी शेवर फुलणं म्हणजे पर्वणी असते. शेवरीच्या झाडावर मधुप्राशनासाठी आलेल्या पक्ष्यांची चिवचिव वेगळीच ऊर्जा देते. शेवरीला संस्कृतात ‘शाल्मली’ म्हणतात. काटेरी खोडांमुळे कोकणात वय (बागेचं कुंपण) करताना शेवरीचे खूट सररास लावतात. उन्हाळ्यात फळं तडकून बाहेर उडणारा कापूस (ज्याला आपण गमतीने ‘म्हातारी’ म्हणतो) भारतातून ‘सिमल’ या नावाने निर्यात केला जातो. खाली पडलेली फुलं गुरांकडून आणि इतर वन्य प्राण्यांकडून खाल्ली जातात. काटेसावरीची फुलं औषधीही आहेत.


Winter-Spring Festival


Winter-Spring Festival
 

Winter-Spring Festival


शेवरीबरोबरच पांगारा फुलतो. ‘भडक तांबड्या रंगाचं झाडावर उगवणारं कमळ’ असं पांगार्‍याच्या फुलाचं वर्णन करता येईल. पांगार्‍याची झाडं प्रामुख्याने समुद्रकिनार्‍याच्या भागात आढळतात. पांगार्‍याचं लाकूड हलकं असल्यामुळे इमारती बांधकामाला उपयोगी येत नाही; मात्र ते पाण्यात कुजत नाही, म्हणून विहीर बांधताना तळाशी पांगार्‍याचं लाकूड घालतात, अशी माहिती मला गावातल्या काही लोकांकडून कळली. शेवराचं आणि पांगार्‍याचं वैशिष्ट्य म्हणजे झाडांची फुलं अनेक दिवस टिकतात. त्यामुळे दोन-तीन महिने इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत ही झाडं निसर्गात लाल रंगाची उधळण करत राहतात.
 
 
निसर्गात लालभडक छटा उमटवण्यात किंजळीच्या फळांचं योगदानही मोठं आहे. पावसाळा संपताना किंजळीला पांढरा मोहोर येतो. त्यानंतर पंख्यासारख्या बारीक फुलांचे मोठाले घोस किंजळीला लालेलाल करून टाकतात. लांबून बघितल्यावर असं वाटतं की ही किंजळीची फुलं की काय! पण ती फळं असतात. किंजळीच्या फळांची लाली महिनाभर टिकते. नंतर ती तपकिरी होतात. ग्रामीण लोकजीवनात किंजळीच्या झाडाला फार महत्त्व आहे. मजबूत लाकडामुळे घराचे वासे, बडोद, इंद्राटी, आडं, बारं, रिपा, पोटसर, दरवाजाच्या चौकटी इ. बनवण्यासाठी किंजळीचं लाकूड सर्वोत्तम!
 
 
 
शेवर-पांगार्‍याच्या थोडंसं मागाहून फुलणारं, पण त्यांच्यासारखंच लालेलाल दिसणारं एक झाड म्हणजे कौशी (Schleichera oleosa). कौशीची सुरमळीसारखी पुंजक्याने खालच्या दिशेला लटकलेली तांबडी फुलं सुंदर दिसतात. फुलाच्या देठावर गोडसर पाण्यासारखा थोडा द्रव पदार्थ असतो. हा द्रव पिण्यासाठी पक्षी व फूलपाखरं फुलांभोवती गर्दी करतात. कौशीची आंबटसर फळं आवडीने खाल्ली जातात.

 
Winter-Spring Festival
तांबड्याप्रमाणेच काही झाडं निसर्गात पिवळी रंगछटा उमटवतात. तांबडा पळस जसा असतो, तसा पिवळ्या रंगाचा पळसही काही ठिकाणी आढळतो. तांबड्या काटेसावरीप्रमाणे पिवळी ‘सोनसावर’ अप्रतिम नजारा निर्माण करते. एकच दिवस फुलून पिवळ्याधमक रंगाने न्हाऊन निघणार्‍या करमाळीचा उल्लेख सुरुवातीला आलाच आहे. निसर्ग पिवळा करणार्‍या आणखी झाडांमध्ये शिवणीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. जानेवारीनंतर शिवणी पिवळ्या फुलांनी बहरायला लागतात. शिवणीची फुलं आणि फळं हे गुरांचं आवडतं खाद्य. इमारती बांधकामात शिवणीचं लाकूड सगळीकडे सररास वापरलं जातं. पण वेड लागेल असं पिवळं सौंदर्य असतं ते बहाव्याचं! बहावा फुललेला दिसणं हा आयुष्यातला एक सुवर्णदिन असतो. बहाव्याच्या फुलांचे पिवळेधमक घोस बघणार्‍याला घायाळ करणारे असतात. बहाव्याची फुलं अनेक दिवस टिकतात, त्यामुळे दोन-तीन महिने हा रंगोत्सव सुरू राहतो. बहावा फुलला की 45 दिवसांनी पाऊस येणार, असा एक ठोकताळा आहे.


Winter-Spring Festival

मध्ये मध्ये जर पांढरा रंग असेल, तर कुठलीही रंगसंगती उठून दिसते. शिशिर-वसंतात तांबड्या-पिवळ्या झालेल्या हिरव्या निसर्गात पांढरा रंग भरण्याचं काम खुरी, कुसर (रानमोगरा), करवंद, सुरंगी, कुडा, चाफा या वनस्पती करतात. जानेवारीत खुरी फुलते व तिच्या काट्यासारख्या असलेल्या फुलांचा घमघमाट सर्वत्र पसरतो. खुरीच्या मागोमाग सर्वांच्या अत्यंत लाडक्या असलेल्या सुरंगीचा नंबर लागतो. सुरंगीची पांढरी फुलं गर्द हिरव्या पानांखाली दडली जातात, पण जवळ गेल्यावर डोळ्यांना आणि नाकाला आनंद देऊन जातात. सुरंगीच्या कळ्यांचे वळेसर स्त्रीसौंदर्य द्विगुणित करतात. ‘कुसर’ किंवा ‘रानजाई’ (गरीाळर्पीा ारश्ररलरीळर्लीा) ही कोकणात सड्यांवर आढळणारी वेलवर्गीय वनस्पती. उन्हाळ्यात ही पांढर्‍या नाजूक फुलांनी बहरते. फुलांना मंद सुवास असतो. फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान करवंदाच्या जाळ्या टिकलीएवढ्या पांढर्‍या सुगंधी फुलांनी बहरतात. सड्यावर सर्वत्र माजलेली ‘उक्षी’ पांढरट-पोपटी फुलांनी लगडते. पाठोपाठ कुडे फुलतात. करंज, वारस, अशा काही वृक्षांची फुलं पांढर्‍या रंगात भर घालतात.



Winter-Spring Festival
 
वरील वर्णन वाचून प्रश्न पडेल, की यात निळा रंग कुठेच कसा नाही? शिशिर-वसंतात निळ्या रंगाचं फुलणारं झाड कुठलं नाही का? आहे. जरा एप्रिलपर्यंत वाट बघावी आणि कोकणातल्या सड्यांवर जावं. निळ्या-जांभळ्या फुलांच्या पुंजक्यांनी फुललेली अंजनाची झुडूपं मन प्रफुल्लित करतात. कोकणात स्थानिक भाषेत त्यांना ‘आंजणी’ असं म्हणतात. ‘अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा’ हे राम गणेश गडकरी लिखित महाराष्ट्रगीत लोकप्रिय आहेच. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष असलेला ‘तामण’ एप्रिल-मेच्या सुमारास फुलतो आणि गुलबट-जांभळी छटा उमटवतो. जांभळाची आणि करवंदाची फळं रिकाम्या जागी गडद जांभळी ‘शेड’ देतात!

 
असा असतो हा शिशिर-वसंतातला रंगोत्सव. पावसाळ्याच्या तोंडावर हा रंगोत्सव संपतो आणि निसर्ग पावसाळ्यातल्या एका आगळ्यावेगळ्या रंगोत्सवासाठी सज्ज होतो!

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड.