‘जिहाद’ संकल्पनेचा इतिहास उलगडणारे पुस्तक

विवेक मराठी    01-Apr-2022   
Total Views |
इस्लाममधील ‘जिहाद’ हा शब्द आपल्याला परिचित असतो. याचे विध्वंसक परिणामही संपूर्ण जग अनुभवत असते. पण ही संकल्पना नक्की आहे तरी काय? कुराण आणि हदीसमध्ये त्याचे कशा प्रकारे वर्णन केले आहे, याबाबत सविस्तर विवेचन करणारे हे पुस्तक आहे.

book
 
नि:शस्त्र शत्रूवर वार न करणे, शरण आलेल्या शत्रूला अभय देणे, शस्त्र खाली ठेवून पळून गेलेल्या शत्रूचा पाठलाग न करणे, धार्मिक स्थानांचा पावित्र्यभंग न करणे ही हिंदूंची लढण्याची रीत होती. पण इस्लाम ह्याविषयी काय सांगतो, ह्याचा हिंदूंनी कधी फारसा अभ्यास केलेला नाही. इस्लाममधील ‘जिहाद’ ही संकल्पना काय आहे, ह्याची सर्वसामान्य हिंदूंना फारशी कल्पनाच नाही. ‘जिहाद’ ह्याच संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून लिहिलेले हे पुस्तक म्हणूनच खूप उपयुक्त ठरते.

‘जिहाद’ म्हणजे नेमके काय, ‘धर्मयुद्ध’ ह्या हिंदूंच्या संकल्पनेपेक्षा तो कसा वेगळा आहे, ह्याचे सविस्तर विवेचन ह्या पुस्तकात केलेले आहे. ‘जिहाद’ ह्या इस्लामी संकल्पनेविषयी सध्या समाजात अनेक मतप्रवाह आढळतात. सत्य जाणून घेण्याच्या दृष्टीने ह्या पुस्तकाचे उपयुक्तता मूल्य फार मोठे आहे. कुराण आणि हदीसमध्ये नक्की ज्या जिहादचे वर्णन केलेले आहे, त्याची माहिती ह्यात मिळते. ह्या पुस्तकात ‘घनीमह’, ‘जिझिया’, ‘झिम्मी’, ‘उम्मा’, ‘सुन्नाह’ ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ सोप्या मराठीत स्पष्ट केलेले आहेत. ‘घनीमह’ म्हणजे लूट ह्याविषयी कुराणमध्ये आणि हदीसमध्ये काय सांगितलेले आहे, ह्यावर स्वतंत्र प्रकरणे आहेत. ‘सुन्नाह’ म्हणजेच प्रेषितांच्या आचरणाचे एकत्रित संकलन, त्याविषयी ह्या पुस्तकात सखोल विवेचन आहे. जिहादमध्ये श्रद्धाहीनांचा संहार, धार्मिक दंगा, बिगरमुस्लिमांची हकालपट्टी अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे. मूर्तिपूजकांविषयी इस्लामचे नेमके काय धोरण आहे हेसुद्धा ह्यातून समजते. विशेष म्हणजे अतिशय संयमित भाषेत, कुणाचाही शाब्दिक अवमान होऊ न देता ‘सत्य निवेदन’ हा हेतू ठेवून हे पुस्तक लिहिलेले आहे. उपयुक्त संदर्भग्रंथांची यादी ह्यात आहे. सर्व पुस्तक यथोचित संदर्भ देऊन लिहिलेले आहे.

ह्यात सर्वसाधारण पारिभाषिक इस्लामी शब्द आणि मराठीतील त्याचा नेमका अर्थ ह्यांची सूची दिलेली आहे.
मूळ बंगाली भाषेतील हे पुस्तक शरद मेहेंदळे आणि डॉ. श्रीरंग गोडबोले ह्यांनी मराठीमध्ये अनुवादित केल्यामुळे मराठी वाचकांना ह्यातील ज्ञानाचा मोठा लाभ होत आहे. मूळ ग्रंथाला सीताराम गोयल ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना ह्यात मराठीत समाविष्ट केलेली आहे. ह्या अनुवादित पुस्तकाला ब.ना. जोग ह्यांची प्रस्तावना लाभलेली आहे.

सध्याच्या काळात जगात काही इस्लामी धर्मांध दहशतवादी संघटना आपला प्रभाव वाढवत आहेत. त्या आपल्या कृत्याच्या समर्थनासाठी बहुतांश वेळा ‘जिहाद’ हा शब्द वापरतात. त्यांच्या ह्या तत्त्वज्ञानाचा नेमका आधार जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या वाचकांना मूळ संदर्भासह ‘जिहाद’विषयी जाणून घ्यायचे आहे, त्या वाचक-अभ्यासकांनी हे पुस्तक अवश्य संग्रही ठेवावे.
पुस्तकाचे नाव - जिहाद - निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत

लेखक - सुहास मजुमदार

अनुवाद - शरद मेहेंदळे, डॉ. श्रीरंग गोडबोले

प्रकाशक - भारतीय विचार साधना, पुणे

दूरध्वनी - 020-24487225

रुपाली कुळकर्णी - भुसारी

 एम. फिल-  पुण्यातील स्त्रियांचे राजकिय सामाजिकरण आणि पत्रकारीता जनसंज्ञापनाचा   डिप्लोमा .
२००६ ला हैदराबादला ई टि व्ही मराठी न्युज विभागात पत्रकार / कॉपी एडीटर म्हणून अनुभव.
२००५ ते आता पर्यंत राज्यशास्राची अभ्यागत अधिव्याख्याता म्हणुन पुण्यात विविध महाविद्यालयांमध्ये शिकवते आहे. सध्या गरवारे महाविद्यलयात पत्रकारिताच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी शिकवतात .
 
 ' आत्मघातकी दहशतवाद ' हे संशोधनात्मक पुस्तक याचवर्षी मार्चमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
दहशतवाद, (माओवाद, भारतातील फुटिरतावादी संघटना सुद्धा )
इस्त्रायल आणि मध्यपूर्व हे  संशोधनाचे विषय आहेत.
 
२००६ पासून मी मुक्त पत्रकार म्हणुन अनेक साप्ताहिके मासिके ह्यात लिखाण.....