सोशल मीडियावरून पैसे कमावण्यासाठी अ‍ॅफिलिएट मार्केटिंग

विवेक मराठी    12-Apr-2022   
Total Views |
ग्राहक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून खरेदी करतात. याचा अर्थ तुम्ही ग्राहक आणि कंपनी यांच्यातला दुवा बनून कंपनीला फायदा करून देता. वस्तू चांगली असेल तर ग्राहक तुम्हाला धन्यवाद म्हणेल. पण यातून तुमचा आर्थिक फायदा काय होतो? पण समजा, या बदल्यात कंपनीची विक्री वाढवून दिली, म्हणून कंपनीने तुम्हाला आकर्षक कमिशन दिले, तर? हेच अ‍ॅफिलिएट मार्केटिंग आहे.

Affiliate Marketing
 
घरी बसून किंवा आपले नेहमीचे काम करत करत ऑनलाइन माध्यमातून अधिक कमाई करायची आहे? तर त्यासाठी अ‍ॅफिलिएट मार्केटिंग हा छान पर्याय आहे. डिजिटल मार्केटिंगचे जे विविध प्रकार आहेत, त्यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे Affiliate Marketing  (अ‍ॅफिलिएट मार्केटिंग).
अ‍ॅफिलिएट मार्केटिंग घरबसल्या भरपूर पैसे कमावण्याचे उत्तम साधन आहे. हा प्रकार अत्यंत सोपा आहे आणि हे मार्केटिंग करायला जास्त रिस्कसुद्धा नाही. कल्पना करा, तुम्ही रात्री झोपताना एक पोस्ट टाकून झोपला आहात आणि सकाळी उठल्यावर नोटिफिकेशनमध्ये तुमच्या बँक खात्यावर हजारो रुपये जमा झाल्याचा संदेश दिसतोय. कसं वाटेल? पण हे काही स्वप्नरंजन नाही. असे खरोखरच होते. कसं, ते जाणून घेऊ या.
अ‍ॅफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?
तसे पाहता ही संकल्पना जुनीच आहे. तुम्ही एखादी वस्तू किंवा सर्व्हिस इतरांना घेण्यासाठी सांगता, त्याचे कौतुक करता आणि लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून खरेदी करतात. याचा अर्थ तुम्ही ग्राहक आणि कंपनी यांच्यातला दुवा बनून कंपनीला फायदा करून देता. वस्तू चांगली असेल तर ग्राहक तुम्हाला धन्यवाद म्हणेल. पण यातून तुमचा आर्थिक फायदा काय होतो? पण समजा, या बदल्यात कंपनीची विक्री वाढवून दिली, म्हणून कंपनीने तुम्हाला आकर्षक कमिशन दिले, तर? हेच अ‍ॅफिलिएट मार्केटिंग आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म वापरायचा आहे.
एखाद्या कंपनीचे उत्पादन किंवा सेवा प्रमोट करणे आणि त्याबदल्यात कमिशन प्राप्त करणे म्हणजे अ‍ॅफिलिएट मार्केटिंग.
कंपनी तुम्हाला कमिशन का देते? तर प्रत्येक कंपनीचा उद्देश असतो की आपल्या उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री व्हावी. यातून कंपनीला जो नफा मिळतो, त्यातला थोडासा हिस्सा तुम्ही ते उत्पादन विकून दिले म्हणून कंपनी तुम्हाला देते. हा पैसे कमावण्याचा अधिकृत मार्ग आहे. तसेच जो ग्राहक तुम्ही कंपनीला जोडून दिला, तो परत परत त्या कंपनीकडून खरेदी करणार असतो, हाही कंपनीला फायदा होतो.
आता हे अ‍ॅफिलिएट मार्केटिंग करायचे कसे?
अ‍ॅफिलिएट मार्केटिंगची कार्यप्रणाली मर्चंटच्या वेबसाइटवर असणार्‍या अ‍ॅफिलिएट सॉफ्टवेअर प्रोग्रॅमवर आधारित असते. शब्द मोठे मोठे वाटत असले, ही प्रणाली वापरण्यासाठी फारच सोपी आहे. टप्प्याटप्प्याने पाहू या.
1. अ‍ॅफिलिएटने (म्हणजे आपण) मर्चंटच्या वेबसाइटवर जाऊन अ‍ॅफिलिएट प्रोग्रॅमसाठी नोंदणी करणे गरजेचे असते. तिथे आपली माहिती भरून साइन अप केल्यानंतर आपल्याला एक युनिक र्ीीश्र म्हणजे लिंक मिळते. ही लिंक आपण उत्पादनाला प्रमोट करण्यासाठी वापरू शकतो.
2. ही लिंक विविध सोशल मीडिया चॅनल्सवर आपण उत्पादनाच्या माहितीसह शेअर करायची असते. तुम्ही ब्लॉगवर उत्पादनाचा रिव्ह्यू लिहून त्याखाली लिंक टाकू शकता. फेसबुकवर किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर टाकू शकता किंवा यूट्यूबवर उत्पादनाच्या माहितीचा व्हिडिओ बनवून त्याच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक देऊ शकता.
3. जेव्हा कुणी त्या लिंकवर क्लिक करून मर्चंटच्या वेबसाइटला भेट देईल, तेव्हा तो कुणाच्यामार्फत आला आहे ते लिंकवरून अ‍ॅफिलिएट प्रोग्रॅमला आपोआप समजते. कारण लिंक युनिक असते आणि ती फक्त आपल्यालाच दिलेली असते.
4. जेव्हा लिंकवर क्लिक करून वेबसाइटवर गेलेला ग्राहक उत्पादन खरेदी करतो, तेव्हा अ‍ॅफिलिएट प्रोग्रॅम आपल्यामार्फत खरेदी झाल्याची नोंद ठेवतो. किती जणांनी किती किमतीचे किती उत्पादन तुमच्या लिंकवरून खरेदी केले, याचा संपूर्ण डेटा मेंटेन केला जातो.
5. सुनिश्चित केलेल्या वेळी मर्चंटकडून या सर्वांचे एकत्रित कमिशन आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
आहे ना मस्त प्रकार? यात तुम्ही कुठेही न जाता बसल्या बसल्या डिजिटली पैसे कमावलेले असतात. एक यशस्वी अ‍ॅफिलिएट मार्केटर बनण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा -
 
• भारंभार उत्पादनांना प्रमोट करण्यापेक्षा मोजक्या आणि चांगल्या उत्पादनाला प्रमोट करा. असे उत्पादन निवडा, जे तुम्ही वापरले असेल, तुमच्या चांगल्या परिचयाचे असेल आणि त्याच्या दर्जाबाबत तुम्हाला खात्री असेल. जर तुम्ही अयोग्य उत्पादनाचे प्रमोशन केले, तर ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आणि भविष्यात तुम्हाला दुर्लक्षित केले जाऊ शकते.
• नुसतीच लिंक इथे-तिथे शेअर करण्यापेक्षा त्याबरोबर आकर्षक शब्दात त्याची माहिती लिहा. ते उत्पादन कसे चांगले आहे याचा रिव्ह्यू तुमच्या शब्दात लिहा.
लिंक अशा ठिकाणी शेअर करा, जिथे तिचा उपयोग होऊ शकतो. उदा., तुम्ही मोबाइलला प्रमोट करणार असाल, तर तरुणवर्ग जास्त असतो तिथे लिंक टाकल्यास जास्त फायदा होतो. महिलांसाठीचे उत्पादन महिलांच्या ग्रूपमध्ये प्रमोट करा. ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी पडणारे उत्पादन ज्येष्ठ नागरिक जिथे जास्त आहेत तिथे प्रमोट करा.
• आपण लिंक शेअर करून त्याबदल्यात कमिशन घेणार आहोत हे कधीही लपवू नका. ते आज ना उद्या लोकांना समजणार असते. नंतर त्यामुळे तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे पारदर्शक व्यवहार केलेला केव्हाही चांगलाच. दुसरे म्हणजे एकदा ग्राहकाने तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून उत्पादन खरेदी केले की नंतर तुमचा संबंध असत नाही. ’आफ्टर सेल्स सर्व्हिस’ देणे ही कंपनीची जबाबदारी असते, याची कल्पनाही ग्राहकांना नक्की द्या. आता अ‍ॅफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे तर समजले, पण त्यासाठी नोंदणी कुठे करायची?
 
 
गूगल सुरू करा. त्यात कोणत्या कंपनी अ‍ॅफिलिएट प्रोग्रॅम ऑफर करतात हे शोधा. नवीन व्यक्तीला सुरुवात करण्यासाठी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाइट्स उत्तम आहेत. या दोन्ही साइट्सवर जाऊन अ‍ॅफिलिएट प्रोग्रॅमसंबंधी सर्व माहिती वाचून घ्या. घाई न करता एक एक सेक्शन वाचून माहिती घ्या. कुठल्या उत्पादनाला किती कमिशन मिळते हेही बघा. त्यातून आपल्याला जे योग्य वाटते ते उत्पादन निवडा. उत्पादनांची भरपूर मोठी रेंज आहे. आपले नाव या प्रोग्रॅममध्ये नोंदवण्यासाठी आपली माहिती आणि बँक डिटेल्स लागतात, तेसुद्धा तयार ठेवा.

अनुप कुलकर्णी

काही काळ बँकेत नोकरी केल्यानंतर राजीनामा देऊन स्वतःचा 'स्मार्ट मीडिया सोल्युशन्स' हा व्यवसाय सुरुवात केला. गेल्या आठ वर्षांपासून पूर्णवेळ सोशल मीडिया मॅनेजर आणि कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सोशल मीडियाचा सर्वांगीण अभ्यास व त्याचा उपयोग व्यावसायिकांना व्हावा याची अखंड धडपड. अनेक वृत्तपत्र, साप्ताहिके, मासिके आणि पोर्टल्सवर विविध विषयांवर लेख प्रकाशित.