‘राष्ट्रवादी’ विस्तारवाद?

विवेक मराठी    15-Apr-2022   
Total Views |
सोव्हिएत युक्रेनने सर्वच इतिहासावर बोळा फिरवायचा प्रयत्न केला. त्यातून तावूनसुलाखून निघालेल्या आणि देश म्हणून उभे राहण्याच्या युक्रेनचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या प्रयत्नांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मूठमाती दिली. विस्तारवादाला राष्ट्रवादाची झालर चढवायचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे, हे दुर्दैव!

UKREN
रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, ही गोष्ट नाकबूल करण्यात अर्थ नाही. ते केले तेव्हापासून दोन्ही बाजूचे असंख्य नागरिक त्या युद्धात बळी गेले आणि आणखीही काहींचे बळी त्यात जाणार आहेत. आपल्या सैन्याला या युद्धात ओढले जावे लागू नये, असे अमेरिकेसह युक्रेनच्या बाजूने असलेल्या नाटो देशांना वाटते आहे. युरोपियन देशांनी तर, ‘आम्ही तुम्हाला वाटेल तेवढी शस्त्रे देऊ, पण आम्ही आमचे सैन्य तुमच्या बाजूने युद्धात उतरवणार नाही’ असे एकदा नव्हे, अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी आधी सैन्याला सैन्य भिडेल, अशी भाषा वापरली होती. युक्रेन आणि रशिया यांचा वाद ज्या भूभागाविषयी आहे, तिथे चेचेनमधले ‘इस्लामिक स्टेट’चे असंख्य दहशतवादी युक्रेनच्या बाजूने रशियाच्या विरोधात लढण्यासाठी तयारीत असल्याचे युरोपियन पार्लमेंटमध्ये 27 जुलै 2015च्या प्रश्नोत्तरात सांगण्यात आले. रशियाला कमकुवत झाल्याचे पाहण्यात आपल्याला समाधान वाटणार आहे, असाही दावा तेव्हा ‘इस्लामिक स्टेट’वाल्यांनी केला होता. याउलट अगदी ताज्या माहितीनुसार रशियाने अनेक देशांमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या बाजूने लढलेल्या काही माजी (!) दहशतवाद्यांना युक्रेनविरोधात उतरवले असल्याचे काही रशियन अधिकार्‍यांनी मान्य केले. रशियन अधिकारीच जर हे सांगत असतील, तर ते खोटे आहे असे म्हणणे धाडसाचे ठरावे.

आता आपण थोडे मागे जाऊन घटनाचक्र पाहू या. रशियाचा पूर्वसुरी असणार्‍या कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनने 1989मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर सोव्हिएत फौजांच्या विरोधात लढणारे ‘मुजाहिदीन’ होते, त्यांचेच पुढे तालिबान बनले. याच तालिबानांना अमेरिकेने सोव्हिएत युनियनविरोधात लढण्यासाठी शस्त्रे आणि पैसा पुरवला. पाकिस्तान त्यांच्या दिमतीला होता. याच सुमारास ‘अल काईदा’ (काईदात अल जिहाद)ची निर्मिती झाली. त्यांनी अरब दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात अमेरिकेविरुद्ध लढायला पाठवले. याच ‘अल काईदा’पेक्षा आपले उद्दिष्ट वेगळे असल्याचे सांगणारी ‘इस्लामिक स्टेट’ ही दहशतवादी संघटना त्यानंतर दहा वर्षांनी, म्हणजेच 1999मध्ये तयार झाली. म्हणजे एका युद्धातून अमीबाप्रमाणे नवनव्या दहशतवादी संघटना उदयास आल्या. तालिबानांना अमेरिकेने जसे मोठे केले, तसे अल काईदालाही अमेरिकेनेच ताकद दिली. हा भस्मासूर अमेरिकेवर उलटला आणि अमेरिकेवर त्याने 11 सप्टेंबर 2001 रोजी हल्ला केला. मग सोव्हिएत युनियनला मागे हटवण्यासाठी ज्या अमेरिकेने शर्थीचे प्रयत्न केले, त्या अमेरिकेला तालिबानांचा नायनाट करण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला करणे भाग पडले. सोव्हिएत युनियनचे सैन्य अफगाणिस्तानात असताना अमेरिका दूरवरून सर्व सूत्रे हलवत होती, पण प्रत्यक्ष युद्धात तिने भाग घेतला नव्हता. आता अफगाणिस्तानात अमेरिका उतरली, तेव्हा मोडकळीस आलेल्या सोव्हिएत युनियनने अमेरिकेविरोधात आपले सैन्य उतरवले नाही. ज्या पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये उतरलेल्या सोव्हिएत सैन्याच्या विरोधात आकांडतांडव केले आणि अमेरिकेची मदत पदरात पाडून घेतली, त्याच पाकिस्तानचे पंतप्रधान (तेव्हाचे) इम्रान खान युक्रेनवरच्या हल्ल्याच्याच काळात मॉस्कोत जातात आणि रशियाला पाठिंबा देऊन मोकळे होतात. त्यांचे लष्करप्रमुख कंवर जावेद बाज्वा यांनी मात्र रशियाने तातडीने सैन्य मागे घेऊन युक्रेनच्या स्वायत्ततेचा मान राखावा, असे जाहीर केले. हे सर्व सांगण्याचे कारण युद्धात आणि प्रेमात सर्व वर्ज्य आहे असे जे म्हटले जाते, ते कसे प्रत्यक्षात आणले गेले आहे हे कळावे. आपल्या बळावर आपण जग जिंकू असे मानणारे परकीय दहशतवाद्यांचे बळ कसे वापरतात, तेही यातून स्पष्ट होते.

मुळात रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध आताचे नाही. 2014च्या फेब्रुवारी महिन्यात युक्रेनचे रशियावादी अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांची एका उठावाद्वारे हकालपट्टी केल्यावर युक्रेनच्या काही भागात रशियावादी असंतोष माजला. त्याची परिणती युक्रेनच्या काही भागावर रशियन सैन्याने कब्जा मिळवण्यात झाली. रशियन सैन्याने क्रिमियन संसदेवर आणि क्रिमियाच्या काही भागांवर ताबा मिळवला. रशियाने धसमुसळेपणाने या भागामध्ये सार्वमत घेऊन आपला विजय घोषित केला. म्हणजेच क्रिमियाला रशियाशी या सार्वमताद्वारे जोडून घेण्यात आले. त्यानंतर डॉनबस या युक्रेनच्या भागात रशियन फुटीरतावादी आणि युक्रेनियन फौजा यांच्यात चकमकी झडल्या आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊन डॉनेत्सक आणि लुहान्स्क हे दोन नवे प्रजासत्ताक देश ‘घोषित’ झाले. रशियन फौजांनी नंतर ऑगस्ट 2014मध्ये रशियन फौजा आणि युक्रेनियन सैनिक यांच्यात जबरदस्त संघर्ष पेटला. दरम्यान 2015मध्ये मिन्स्कमध्ये करार होऊन युद्ध थांबले, पण रशियाची युक्रेनवरची नजर हटली नाही. युक्रेनच्या 7 टक्के प्रदेशाला ‘युक्रेनने तात्पुरता बळकावलेला प्रदेश’ असे रशियाने 2019मध्ये जाहीर केले. अशा स्थितीत युक्रेनने ‘नाटो’शी म्हणजेच ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’शी संधान बांधण्याचे ठरवले असेल, तर त्याचा दोष युक्रेनकडे जात नाही. युक्रेनला आपल्या शेजारच्या बलाढ्य शत्रूशी लढा द्यायचा होता. अमेरिकेची बांधिलकी मानणार्‍या देशांचे सैन्य आपल्या दाराशी उभे राहणार असेल, तर ते रशियाला पसंत पडणे अशक्य होते. दोघांचाही राष्ट्रवाद इथे एका अर्थाने धारातीर्थी पडला, कारण तिथे समंजसपणाची हानी झाली होती.

पहिल्या महायुद्धानंतर युक्रेनला सोव्हिएत युनियनने आपल्या प्रदेशाला जोडून घेतले. म्हणजे पहिली चूक तत्कालीन सोव्हिएत युनियनची आहे, हे उघड आहे. विस्तारवादाचा उगम तिथे होतो. त्यानंतर बर्‍याच घडामोडी घडल्या. युक्रेनने सोव्हिएत युनियनचे वर्चस्व नाइलाजास्तव मान्य केले. 1991मध्ये सोव्हिएत युनियनची शकले उडाल्यावर युक्रेनला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळाले. रशियाचा राष्ट्रवाद म्हणजे साम्राज्यवादाचा वेगळा नमुना आहे आणि व्लादिमीर पुतीन हा अलीकडच्या काळात त्याचा खरा चेहरा आहे असे मानले जाऊ लागले. जगाच्या या दृष्टीकोनाने पुतीन यांना मात्र काहीही फरक पडणार नव्हता. ‘केजीबी’ या सोव्हिएतकालीन गुप्तचर संस्थेचा माजी संचालक असा हार मानणारा नाही, हेच त्यांनी दाखवून दिले. 1991मध्ये निर्माण झालेल्या रशियाने तिथल्या कम्युनिस्टांना जरी नामशेष केले, तरी कम्युनिस्टांची दांडगाई आपल्या शरीररचनेतून दूर केली नाही. डॉनेत्सक आणि लुहान्स्क या दोन प्रदेशांमध्ये रशियाचे नवनाझी अवतरल्याची ती नांदी होती.

युक्रेनवर रशियाने हल्ला चढवला, तेव्हा रशियन फौजा फार आतपर्यंत शिरणार नाहीत किंवा ते पोकळ धमकी देऊन परततील असे आंतरराष्ट्रीय घटनांचे अभ्यासक म्हणत होते, प्रत्यक्षात त्यांनी कीव्हपर्यंत मजल मारली. असंख्य युक्रेनियन रस्त्यांवर उतरले आणि रणगाड्यांसमोर जाऊन उभे राहिले. रशियनांना त्यांचे काय? ते त्यांना चिरडून पुढे गेले. काही वर्षांपूर्वी (1989) बीजिंगमध्ये तिएनआनमेन चौकात जेव्हा विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी चिनी नेत्यांनी रणगाडे पाठवले, तेव्हाही असेच विद्यार्थी नेते त्या रणगाड्यांपुढे हात आडवे करून उभे होते. त्यांनाही चिरडण्यात आले होते. सांगायचा मुद्दा हा की, हुकूमशाही देशांमध्ये कोणाला कसे चिरडायचे याचे प्रशिक्षणच दिले जाते. रशियाला युक्रेनबद्दल काय वाटते ते पाहिले, तर त्यांना अमेरिकेखालोखाल युक्रेन हा देश रशियाचा द्वेष्टा वाटतो. युक्रेनच्या नागरिकांना रशियाबद्दल किंवा पुतीन यांच्याविषयी काय वाटते ते पाहिले तर लक्षात येते की, पुतीन यांना ते स्टॅलिनची बरोबरी करणारे नेते वाटतात. युक्रेनला त्याची राष्ट्रीय प्रतिमा लाभू नये, यासाठी रशियाने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे इतिहासावर नजर टाकली असता लक्षात येते. हे आताच चालू आहे असे नाही. युक्रेनला झारच्या काळातही दुय्यम मानले जात होते. 1863मध्ये एकूण 32 युक्रेनियन प्रकाशने अस्तित्वात होती, पैकी एकच प्रकाशन जगले, हा इतिहास आहे. त्यानंतरच्या काळात, म्हणजे कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या काळात स्टालिनने युक्रेनलाच नव्हे, तर युक्रेनियन भाषेलाही नेस्तनाबूत करण्याचा विडा उचललेला होता. झारच्या काळात युक्रेनियन भाषेच्या सर्व प्रकाशनांवर बंदी घातलेली होती. तिथल्या सर्व धार्मिक प्रकाशनांवरच काय, व्याकरणाच्या पुस्तकांवरही बंदी घालण्यात आलेली होती. सामान्य माणसांसाठी आणि बुद्धिजीवी समाजासाठी लिहिल्या जाणार्‍या सर्व पुस्तकांवर बंदी घालण्यात आलेली होती. सर्व नाटके, गाणी, कविता आणि सर्व तर्‍हेचे संगीत यांना बंदी घालण्यात आली होती. युक्रेनच्या भाषेला स्वतंत्र अस्तित्वच नाही, असा प्रचार नंतरच्या काळात रशियात केला जात असे. युक्रेनियन भाषा ही रशियाची एक बोली भाषा आहे असे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली. वेगळ्या तर्‍हेची तालिबानी संस्कृतीच तेव्हा रशियात अस्तित्वात होती. रशियन कवी पावेल कोगन याने सोव्हिएत युनियनच्या काळात दुसर्‍या महायुद्धात केलेल्या एका काव्यामुळे त्या देशात तेव्हा कोणती विचारसरणी अस्तित्वात होती, तेच पाहायला मिळते. हा कवी लिहितो,

‘देशभक्त मी, प्रेम करतो रशियावर,

रशियन माती, रशियन हवा मला बहुत प्रिय,

तरीही गंगेपर्यंत आमची मजल,

आम्ही मरू लढता लढता,
 
आमच्या मरणाने ही जन्मभूमी

बनेल पवित्र आणि भरारी आमुचि


जपानपासून इंग्लंडपर्यंत.’ (स्वैर अनुवाद)

सांगायचा मुद्दा हा की, रशिया असो की त्याची पूर्वसुरी सोव्हिएत युनियन, त्यांना हे प्रशिक्षण दिले जात असतेच. रशियन राष्ट्रवाद हा विस्तारवादी म्हणजेच साम्राज्यवादी राष्ट्रवाद आहे, हेही गेल्या दोन शतकांच्या काळात स्पष्ट झालेले आहे. युक्रेनचा राष्ट्रवाद हा साम्राज्यवादी म्हणता येणार नाही. युक्रेनने आपला बचाव कसा करायचा हेच आपल्या धोरणात्मक रूपरेषेत निश्चित केलेले होते. थोडक्यात त्यांचा राष्ट्रवाद बचावात्मक स्वरूपाचाच राहिला आहे. रशिया आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, हे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच सर्वप्रथम युक्रेनने स्पष्ट केले होते. युक्रेनने युरोपीय महासंघात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि नाटो संघटनेतही प्रवेश करायचे निश्चित केले. त्याने रशिया दुखावला, पण जरी युक्रेनने तसे केले नसते, तरी पुतीन यांनी युक्रेनला धडा शिकवला असताच. नाटो राष्ट्रांनी आणि युरोपियन महासंघाने मात्र युक्रेनच्या इशार्‍याची दखल घेतली नाही. अगदी आक्रमण झाले तेव्हाही त्यांनी शस्त्रे ओतली, पण ‘तुम्ही लढा, आम्ही फार तर तुमचे कपडे सांभाळतो’ असा पवित्रा घेतला. युक्रेनचे वैशिष्ट्य असे की असंख्य युक्रेनियन्स शेजारच्या देशांमध्ये पळून गेले, पण जे पळून जाऊ शकत नव्हते, त्या म्हातार्‍याकोतार्‍यांनीही कोपर्‍याकोपर्‍यावर रशियनांना विरोध करून मरण पत्करले. राष्ट्रवादाचा हा खरा हुंकार म्हणावा लागेल. या संघर्षात किमान पाच लाख लोकांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. आपल्याकडे त्या मानाने या अशा तर्‍हेच्या बातम्यांना फार स्थान मिळाले नाही, हा दुर्दैवाचा भाग आहे. युक्रेन खूपच दूर आहे असे आपल्याकडे माध्यमांना वाटत असल्याने कदाचित तसे घडले असावे. पण रशिया असो की युक्रेन, हे देश तसे दूर नाहीत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले वीस हजार भारतीय असतील, तर कोणत्या अर्थाने तो देश दूर आहे असे म्हणणार? सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या सल्लागारांशी त्या विषयावर चर्चा केली होती आणि संभाव्य हल्ल्यात काय करता येईल त्यावरही विचार केला होता. हे असे करावे लागतेच.

युक्रेनच्या बाबतीत लिहायचे, तर त्या देशात असलेली लोकशाही ही त्यांची मानववंशीय ओळख आहे. पंधराव्या शतकापासून ती तिथे अस्तित्वात आहे. युक्रेनियन राष्ट्रवादी व्यक्तिमत्त्व असा ज्यांचा उल्लेख केला जातो, ते हेत्मन इव्हान माझेपा (1639-1709) यांनी युक्रेनची संस्कृती आणि इतिहास यांची जपणूक व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावर संपत्ती दान केल्याचे इतिहास सांगतो. कीव्हमध्ये असलेल्या सेंट सोफिया कॅथेड्रलची पुनर्बांधणी आणि कीव्ह मोहायला कॉलेजियमची कीव्ह मोहायला अकादमीमध्ये स्थापना यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. हे त्यांनी 1694मध्ये केले. मोहायला यांना राजकीयदृष्ट्या शेतकरीवर्गाने समजून घेतले नाही आणि युक्रेनच्या राष्ट्रवादाची बरीच उलथापालथ झाली. सोव्हिएत युक्रेनने सर्वच इतिहासावर बोळा फिरवायचा प्रयत्न केला. त्यातून तावूनसुलाखून निघालेल्या आणि देश म्हणून उभे राहण्याच्या युक्रेनचे सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या प्रयत्नांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मूठमाती दिली. विस्तारवादाला राष्ट्रवादाची झालर चढवायचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे, हे दुर्दैव!