मुंबईची आद्यदेवता - मुंबादेवी

विवेक मराठी    19-Apr-2022   
Total Views |
  
mumba devi
 
मुंबईचा आदिकाल आणि त्यानंतर तिची झालेली जडणघडण पाहताना आपल्याला दिसते ते तिचे आजचे वैभव. पण हे वैभव कोणी निर्माण केले? मुंबई म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे फिरंगी. लाल डगलेवाले इंग्रज. पोर्तुगीज. पारशी समाजसुद्धा. मग इथला स्थानिक हिंदू कुठे गेला? या मुंबईच्या जडणघडणीत हिंदूंचे काहीच योगदान नाही का? पोर्तुगीजांनी भारतातल्या किनारी भागांवर हुकमत गाजवण्यास सुरुवात केली होती. वसईच्या किल्ल्यावरून राज्य करताना मुंबईतील बेटेही त्यांनी आपल्या घशात घातली. ही बेटे त्यांनी ब्रिटनच्या राजकुमाराला लग्नात आंदण म्हणून दिली, हे सर्वज्ञात आहेच. इंग्रजांचा वावर मुंबईत सुरू झाला आणि मुंबईतून हिंदू दूर गेला. हिंदूंच्या मुंबईतील वास्तव्यातील खाणाखुणा मात्र ही पुरातन मंदिरे जपून आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुंबादेवीच्या मंदिरावरून मुंबईचे नाव रूढ झाले, ते मंदिर आज ज्या ठिकाणी आहे ते मंदिराचे मूळ स्थान नाही. मग या मंदिराला इथून का हलवले गेले?
आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक जिथे आहे, त्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17वर मुंबादेवीचे मूळ मंदिर होते. त्यानंतर ते धोबी घाट येथे हलवण्यात आले व त्यानंतर पुन्हा मंदिराची जागा बदलली गेली नाही. मंदिराची स्थापना केव्हा झाली, याचा उल्लेख इतिहासात सापडत नाही, यावरून त्याचे प्राचीनत्व सिद्ध होते. मंदिरांच्या अस्तित्वावरून तेथे स्थायिक असलेल्या हिंदूंचे वास्तव्य अधोरेखित होते. गुजराती भाषेत ’बा’ म्हणजे आई. पण फक्त मुंबा म्हणून कसे चालेल? इथल्या स्थानिक कोळी बांधवांनी तिचे नामकरण केले मुंबा आई. हेच नाव रूढार्थाने मुंबई म्हणून वापरले जाऊ लागले. ब्रिटिशांच्या काळात दक्षिण मुंबईतून हिंदूंचे विस्थापन झाले. ब्रिटिशांचा किल्ला होता. किल्ल्याच्या भिंतीसमोर गाव होते. दुसरीकडे वसईच्या किल्ल्यावर निशाण फडकवण्याचे चिमाजी अप्पांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. मराठी माणूस अतिशय देवभोळा. वाटेत येणार्‍या प्रत्येक देवस्थानाला नवस बोलला जात असे. वसईचा किल्ला जिंकता येत नाही म्हटल्यावर कित्येकांनी आप्पांना 1736 साली माझगावच्या गावदेवीला नवस करण्यास सांगितले. तेव्हा एक स्वार वसईतून दौडत येऊन देवीला नारळ वाढवून निघून गेला. त्या वेळी मुंबईत ब्रिटिशांचे राज्य होते. बाँबे किल्ल्यातील अधिकारी तेव्हा घाबरले. ही मराठ्यांची भुते केव्हा आपल्या किल्ल्याच्या तटबंदीशी भिडतील याचा नेम नाही. त्यांनी आपल्या तटबंदीवर तोफा आणून बसवल्या आणि समोरच्या गावात राहणार्‍या रहिवाशांना सांगितले, तोफेच्या मार्‍याने तुमची गावे उद्ध्वस्त होणार, त्यापेक्षा तुम्ही कुठल्याही इतर ठिकाणी जाऊन राहा. तुमची सगळी व्यवस्था होईल. तेव्हा रहिवाशांनी आपली गावे हलवली व त्याबरोबरच मंदिरही हलवले गेले. आताच्या जागेवर हे मंदिर साधारण 1736 ते 1739 या काळात हलवले गेले.
 
तेव्हापासून गेली 300 वर्षे ही मुंबाई इथे निवास करून आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
 
 
(राष्ट्रीय इतिहास संकलन समितीचे सचिव मल्हार गोखले यांच्या मुलाखतीतून.)

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.