जैवविविधता नोंदवही व्हावी महालोकचळवळ!

विवेक मराठी    28-May-2022   
Total Views |
रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणसुरे (ता. राजापूर) या गावाने केलेल्या लोकजैवविविधता संकेतस्थळाचे दि. 22 मे या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च (आयसर - IISER)), पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात उद्घाटन झाले. संकेतस्थळाच्या रूपात लोकजैवविविधता नोंदवही तयार करणारे अणसुरे हे भारतातले पहिले गाव ठरले आहे. या निमित्ताने 2002चा जैविक विविधता कायदा आणि त्याअंतर्गत असलेली ’लोकजैवविविधता नोंदवही’ या संकल्पनेची तोंडओळख करून देणारा हा लेख.

tulpule
 
रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणसुरे (ता. राजापूर) या गावाने केलेल्या लोकजैवविविधता संकेतस्थळाचे दि. 22 मे या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च (आयसर -IISER)) - पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात उद्घाटन झाले. संकेतस्थळाच्या रूपात लोकजैवविविधता नोंदवही तयार करणारे अणसुरे हे भारतातले पहिले गाव ठरले आहे. आजच्या काळात डिजिटल मीडियाचा समाजावर असलेला प्रभाव ओळखून गेल्या वर्षी याच सुमारास गावाच्या जैवविविधतेची वेबसाईट तयार करायचे ठरले. ग्रामपंचायतीने ही कल्पना उचलून धरली आणि कामाला सुरुवात झाली. गावाचा कानाकोपरा फिरून वनस्पती-प्राण्यांचे फोटो घेणे, तज्ज्ञांकडून त्यांची नावे विचारून घेणे, गावातल्या लोकांशी बोलून त्यांना त्या वनस्पतींबद्दल काय परंपरागत ज्ञान आहे ते टिपून घेणे, वेबसाइट डिझाइन करणे, त्यावर छायाचित्रांसहित मजकूर अपलोड करणे हा सगळा उद्योग सुरू झाला. आज एक वर्षानंतर ही वेबसाइट बर्‍यापैकी आकाराला आली आहे.
 
 
 
गूगलवर www.ansurebmc.in असे सर्च केल्यानंतर ही वेबसाइट ओपन होते. अणसुरे गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अरबी समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे साडेसात चौ.कि.मी. असून गावाचा विस्तार पूर्व-पश्चिम आहे. गावाच्या पश्चिम टोकाला एक पीर आहे व पूर्व टोकाला एक दुर्गादेवीचे देवस्थान आहे. ही गावाची पारंपरिक सांस्कृतिक आणि भौगोलिक हद्द असल्यामुळे वेबसाइटचे शीर्षक ’दर्यापीरापासून दुर्गादेवीपर्यंत’ असे ठेवलेय. मुखपृष्ठावर गावाच्या जैवविविधतेचे बारा प्रकार दिसतात - जंगली झाडे, वेलवर्गीय व अन्य वनस्पती, प्राणी, पक्षी, मासे, कांदळवन प्रजाती, बांबू प्रजाती, शेती पिके, बागायती पिके, अळंबी प्रजाती, परसबाग वनस्पती आणि अस्थानिक वनस्पती. यापैकी कुठल्याही प्रकारावर क्लिक केल्यावर त्या प्रकारातल्या प्रजातींची फोटो व नावांसहित यादी ओपन होते. यापैकी कुठल्याही प्रजातीवर क्लिक केल्यावर त्या प्रजातीची थोडक्यात माहिती असणारे पान उघडते. ही सगळी माहिती ’स्थानिक’ आहे. यामध्ये त्या प्रजातीचा लोकजीवनाशी कसा संबंध आहे हे प्राधान्याने दिलेले आहे. ’लोकजैवविविधता नोंदवही’ म्हणजे नुसती गावातल्या वनस्पती-प्राण्यांच्या प्रजातींची नोंद करत जाणे नव्हे, तर लोकजीवनाचा आणि जैवविविधतेचा संबंध काय आहे याची नोंद करणे इथे महत्त्वाचे आहे. उंडिलापासून कडुतेल काढण्याचा घाणा, पांगार्‍याचे लाकूड तळाशी घालून बांधलेली 60 वर्षे जुनी विहीर, निवडुंगाचा खत म्हणून केला जाणारा उपयोग, असे स्थानिक ज्ञानाचे संकलन या वेबसाइटवर केलेले आहे आणि अधिक माहितीसाठी उपयुक्त संदर्भलिंक्स दिल्या आहेत. एखाद्या झाडाबद्दल मराठी विश्वकोशात अथवा अन्य कुठल्या वेबसाइटवर माहिती असेल तर त्याची लिंक तेथे दिलेली आहे, जेणेकरून वाचक त्या वनस्पतीबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. ’प्राणी प्रजाती’, ’अळंबी प्रजाती’ आणि ‘परसबाग वनस्पती’ येथे फक्त फोटोंचा संग्रह केला आहे. त्यांतल्या प्रजातींची माहिती अशी दिलेली नाही. जसजसा अभ्यास वाढत जाईल, तसतशी माहितीदखील नोंदवली जाईल.
 

tulpule 
 
 
’अणसुरेविषयी’ या पेजवर गावाची सर्वसाधारण माहिती दिली आहे. रत्नागिरीचे भूगोलाचे अभ्यासक श्रीवल्लभ साठे यांनी गावाचा एक पद्धतशीर नकाशा तयार करून दिला. गूगल मॅप्सवर दाखवलेला गावाचा नकाशा चुकीचा आहे. वेबसाइटवर प्रकाशित केलेला नकाशा हा ’गूगल अर्थ प्रो’, ’क्यूजीआयएस’ अशी सॉफ्टवेअर्स वापरून तयार केलेला आहे. यामध्ये गावातले मुख्य रस्ते, जलप्रवाह, शेती क्षेत्र, कांदळवन पट्टा, सड्यांचे क्षेत्र, खाडी क्षेत्र अशी सगळी भूरूपे वेगवेगळ्या रंगांनी दाखवलेली आहेत. गावात शेतमळ्यांचे क्षेत्र किती आहे, ते एकूण गावाच्या किती टक्के आहे, असे अभ्यास या नकाशावरून करता येतात.


गप्पा निसर्गाच्या

बदलते हवामान, बांबू लागवड, जंगल कायदा, गवताळ प्रदेश, गावरान बीजसंवर्धन, गोव्यातील जंगले आणि खाण प्रश्न, पर्यावरणस्नेही कापडनिर्मिती आणि घरबांधणी.

पर्यावरणाशी निगडित 25 तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह.

  
या वेबसाइटवरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ’विशेष नोंदी’. वनस्पती-प्राण्यांच्या प्रजाती जवळच्या गावांमध्ये, किंवा एका जैवभौगोलिक प्रदेशात सारख्याच असतील. पण मग गावाच्या संदर्भातल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी काय आहेत, त्या सगळ्याची नोंद या भागात केली आहे. ’आखेर्‍यातला गिमवस’, ’कुसुंबाची राई’, गावातील पारंपरिक पाणवठे, गावाची पर्जन्यदैनंदिनी, वाकीचा वहाळ अशा गावातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती या विशेष नोंदींमध्ये दिली आहे. अशा प्रकारे हे लोकजैवविविधता संकेतस्थळ माहितीने समृद्ध होतेय आणि यापुढे होत राहील. ज्यांना आपल्या गावात हे काम सुरू करायचे आहे, त्यांना ही वेबसाइट एक संदर्भ म्हणून नक्की उपयोगी पडेल.
 
 
tulpule
 
2002 साली भारतात जैविक विविधता कायदा करण्यात आला. या कायद्याला पार्श्वभूमी होती 1992 साली रिओ दि जानिरो येथे भरलेल्या कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी (CBD)ची. ‘लोकजैवविविधता नोंदवही’ (People's Biodiversity Register - PBR) ही या कायद्यातून तयार झालेली संकल्पना आहे. या नोंदवहीत गावातल्या वनस्पती-प्राण्यांच्या प्रजाती, त्यांच्याबद्दल लोकांना असलेले पारंपरिक ज्ञान, लोकजीवन आणि जैवविविधता यांचा संबंध, गावातल्या महत्त्वाच्या परिसंस्था आणि अधिवास यांची पद्धतशीरपणे नोंद करणे अपेक्षित आहे. परंपरागत ज्ञानाला कायदेशीर संरक्षण मिळावे आणि जैवविविधता संरक्षण-संवर्धनाच्या योजना गाव पातळीवर तयार करता याव्यात, या उद्देशाने ही संकल्पना आणली गेली. खरे तर कायदा येण्यापूर्वीच ही संकल्पना community registerशी अथवा अशा वेगवेगळ्या नावांनी अनौपचारिकरित्या अस्तित्वात होती. 2002च्या कायद्याने याला एक औपचारिक रूप आले. भारतातल्या वेगवेगळ्या समाजांकडे परंपरेने चालत आलेला ज्ञानाचा समृद्ध असा एक खजिना आहे. प्रत्येक गावात वैद्य असायचे, ज्यांना झाडपाल्याच्या गावठी औषधांची भरपूर माहिती असायची. शेतकर्‍यांना पारंपरिक शेती पद्धतींबद्दल, पीकवाणांबाबत प्रचंड ज्ञान होते. मात्र हे सगळे ज्ञान मौखिक परंपरेने चालत आलेले होते. त्याच्या पद्धतशीर लिखित नोंदी फारशा कुठे झाल्या नाहीत. त्याचे दोन परिणाम झाले - एक म्हणजे पुढच्या पिढीत व्यवसायाचे स्वरूप जसे बदलले, तसे हे ज्ञान मोठ्या प्रमाणावर लोप पावले. दुसरे म्हणजे या ज्ञानाची छुप्या मार्गाने चोरी व्हायला लागली. एखादा विद्यार्थी लोकांकडचे ज्ञान वापरून स्वतःचा पीएचडी प्रबंध लिहितो, किंवा एखादी कंपनी लोकांकडचे पारंपरिक ज्ञान वापरून एखादे उत्पादन करते आणि त्याचं पेटंट घेते, असे प्रकार वाढायला लागले. याला आळा बसायला हवा, म्हणून 1992ची कन्व्हेन्शन व बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ही परिषद झाली व त्यात लोकांच्या जैवविविधतेविषयक परंपरागत ज्ञानावर त्या त्या देशाचा व त्या त्या समाजांचा हक्क असेल हे मान्य करण्यात आले. त्याची पुढची पायरी म्हणजे भारतात 2002 साली भारतात आलेला ’जैविक विविधता कायदा’. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ’राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण’, ’राज्य जैवविविधता मंडळ’ आणि गावस्तरावर ’जैवविविधता व्यवस्थापन समिती’ अशी त्रिस्तरीय रचना तयार करण्यात आली. लोकजैवविविधता नोंदवहीचे काम हे जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी मिळून करणे अपेक्षित आहे. परंपरागत ज्ञान लोकजैवविविधता नोंदवहीमध्ये नोंदवले गेले, की त्या ज्ञानाचा वापर करून बाहेरची कोणी कंपनी व्यवसाय करत असेल, तर व्यवसायातून मिळणार्‍या फायद्यातला काही वाटा त्या गावाला देणे बंधनकारक आहे.
 
 
हा कायदा आल्यापासून काही गावांमध्ये याची चांगली अंमलबजावणी झाली आहे. केरळमध्ये लोकजैवविविधता नोंदवहीमुळे तिथल्या ’कानी’ आदिवासींना वनौषधींचे पेटंट मिळाले. महाराष्ट्रात पाराळा (जि. औरंगाबाद), चिचोली (जि. गडचिरोली); ईशान्य भारतात सुखाई, गखई, किविकू या गावांच्या लोकजैवविविधता नोंदवह्या चांगल्या प्रकारे तयार केल्या गेल्या आहेत. मात्र ही उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. अनेक गावांपर्यंत हा विषय पोहोचलेलाच नाही. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रीय हरित लवादाने ’सगळ्या गावांच्या जैवविविधता नोंदवह्या अमुक अमुक तारखेपर्यंत तयार करून द्याव्यात’ असा आदेश काढल्यामुळे एका संस्थेला कंत्राट देऊन भराभर पीबीआरचे रकाने भरून टाकणे, इतर गावांची पीबीआर कॉपी करणे असे प्रकार वाढले. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार भारतात एकूण 2,66,135 लोकजैवविविधता नोंदवह्या तयार झाल्या आहेत, तर महाराष्ट्रात त्या 28,649 आहेत. मात्र यातली ’खरी किती’ आणि ’खोटी किती’ हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
 
 

tulpule
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर अणसुरे (ता. राजापूर) या गावाने केलेला ’लोकजैवविविधता संकेतस्थळ’ हा एक आगळावेगळा प्रयोग विशेष उल्लेखनीय ठरतो. आज या वेबसाइटमुळे गावातले शे-पाचशे लोक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून गावाच्या जैवविविधतेशी जोडले गेले आहेत. आपल्या परिसरात काय असते हे बरेचदा आपल्यालाच माहीत नसते. ते जेव्हा माहीत होते, तेव्हा होणारा आनंद विलक्षण असतो. आज सगळे गावकरी हा आनंद उपभोगत आहेत. स्वतःहोऊन काही नवीन माहिती देत आहेत. कुठल्याही विषयात काही धोरणात्मक काम व्हायला हवे असेल, तर त्यासाठी आवश्यक असणारे
social capital 
या माध्यमातून तयार होतेय. अणसुरे गावाचे लोकजैवविविधता संकेतस्थळ सर्व गावांसाठी एक संदर्भ म्हणून उपयोगी पडेल. सर्वच गावांनी हा विषय मनावर घेणे गरजेचे आहे. बरे, लोकजैवविविधता नोंदवही तयार करून पुढे काय करायचे? तर आपापल्या गावाचा ’जैवविविधता नियोजन आराखडा’ (Biodiversity Management Plan) तयार करायचा आणि राबवायचा. त्यात, आपल्या गावातल्या महत्त्वाच्या परिसंस्थांचे, अधिवासांचे संरक्षण-संवर्धन कसे होईल, गावातल्या आर्थिक उपयोगितेच्या संसाधनांचे ’शाश्वत संकलन’ (Sustainable harvesting) कसे होईल, पारंपरिक ज्ञानाचा सुयोग्य वापर कसा होईल, उपलब्ध जमिनीमध्ये शास्त्रीय वृक्षलागवड करून जंगलनिर्मिती कशी करता येईल, इ. इ. बाबींचा समावेश होतो.
 

tulpule
 
 
भारतात महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा थोर लोकांनी ’ग्राममाहात्म्य’ सांगितले आहे. कुठलेही लोकोपयोगी धोरण ठरवण्यासाठी ’गाव’ हे सर्वोत्तम एकक असते, कारण त्या गावात एक ’सामाजिक भांडवल’ (Social Capital) तयार झालेले असते. प्रत्येक गाव यावर गांभीर्याने काम करेल, तेव्हा व्यापक बदल घडू शकेल. अशा प्रकारे लोकजैवविविधता नोंदवही ही एक ’महालोकचळवळ’ व्हावी!
 
 
संदर्भ
 
1) जैविक विविधता कायदा 2002 -
http://nbaindia.org/uploaded/act/pdf/marathi.pdf
2) लोकजैवविविधता नोंदवही नमुना -
http://nbaindia.org/uploaded/pdf/PBR Format 2013.pdf
3) अणसुरे लोकजैवविविधता संकेतस्थळ
www.ansurebmc.in

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड.