अधोगतीचा नीचांक

विवेक मराठी    05-May-2022
Total Views |
समाधीच्या जीर्णोद्धारातून, तसेच शिवजयंतीसारख्या उत्सवाच्या माध्यमातून एतद्देशीयांच्या मनात स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा जागृत करणार्‍या लोकमान्यांचे हे ऋण कधीही न फिटण्याजोगे. ते नाकारण्याचा प्रमाद करणार्‍यांना खडे बोल न सुनावता, मिठाची गुळणी धरून बसलेल्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यांचा निषेध करावा तितका कमीच. यातून माध्यमांची विश्वासार्हता लयाला जाते आहे, याचे भानही त्यांना राहिलेले नाही. 
 
tilak
 
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्याचा होम करणार्‍या आणि त्यासाठी प्रबोधनाचे माध्यम म्हणून पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या लोकमान्य टिळकांचे पत्रकारितेच्या क्षेत्रावरही न फिटण्याजोगे ऋण आहे. मात्र याची जाणीव (की ते कबूल करण्याची हिंमत?) स्वत:ला ‘मेन स्ट्रीम मीडियाचे’ सर्वेसर्वा समजणार्‍यांपैकी एकातही नाही, हे अलीकडच्या घटनेने दाखवून दिले. भ्रष्टवादी राजकारण्यांनी चालवलेल्या टिळकांवरील निरर्गल टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी, टिळकांची चाललेली विटंबना थांबवण्यासाठी यापैकी एकालाही पुढे यावेसे वाटले नाही, ही या क्षेत्राची आजची शोकांतिका आहे. पत्रकारितेतला हा तथाकथित मुख्य प्रवाह मूळ उद्दिष्टापासून किती दूर गेला आहे, किती स्वार्थांध झाला आहे याचे हे ताजे उदाहरण.

बिनबुडाचे आणि बेछूट आरोप करणे, इतिहासाची बिनदिक्कत मोडतोड करणे, वास्तवाकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करणे...रेटून खोटे बोलत जनतेत संभ्रमाचे वातावरण तयार करणे, समाजातील दुही वाढण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणे ही स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणार्‍या पक्षाची वैशिष्ट्ये. ती पक्ष संस्थापकांसह सर्वांमध्ये मुरलेली. केवळ जातीच्या आधारावर एखाद्या मोठ्या व्यक्तीचे लहान-मोठेपण ठरवणे यात तर त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. यांच्याच मेहरबानीवर पोसलेल्या संस्था/संघटना त्यांची री ओढायला तत्पर असतात आणि यांच्या छत्रछायेखाली हयात घालवणारे पत्रकारही बक्कळ असल्याने साथीच्या रोगासारखी यांची वक्तव्ये सर्वदूर पसरतात. लेखणीशी आणि मूळ उद्दिष्टाशी बेईमानी करत चाललेली ही लाचार पत्रकारिता हे खरे दु:ख आहे.

कोणाच्या ना कोणाच्या दरबारी रुजू झालेल्या या तथाकथित पत्रकारांच्या लेखणीत टिळकांची विटंबना करणार्‍यांवर आसूड ओढायची ताकद नाही. ते सामर्थ्य तिने कधीच गमावले आहे. पाश्चात्त्य पत्रकारितेचे गोडवे गाताना न थकणारे हे भाट, भारतीय पत्रकारितेतला मानबिंदू असणार्‍या टिळकांच्या चालू असलेल्या अवमानाबद्दल मात्र चकार शब्दही काढत नाहीत, हे दु:खद आहे, दुर्दैवी आहे आणि संतापजनकही.


शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळकांनी पाहिलेली स्वप्नं आणि आजचा भारत या विषयी चिकित्सक लेखांचा संग्रह असलेला शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक पुस्तक आहे.

https://www.vivekprakashan.in/books/book-on-lokmanya-tilak/?fbclid=IwAR3DqYzxLqnFRnu0qpgsquf1hIZVxvnpE9GXZsrsLxRFMrtDjMeKldqzhP4

लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा निर्मितीपासूनचा - म्हणजे 1885पासूनचा इतिहास, त्या मंडळाची उद्दिष्टे, त्याबरहुकूम झालेले कार्य, इथवरची वाटचाल या विषयीचे कागदोपत्री पुरावे अगदी सर्वसामान्य माणसालाही सहज उपलब्ध आहेत. असे असताना, राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेतील या संदर्भातील विधान खोडून काढत जेव्हा आव्हाड प्रभृती, ‘टिळकांचा समाधी स्मारक निर्मितीशी काही संबंध नाही’ असे धडधडीत खोटे विधान - तेही जाहीरपणे करतात, तेव्हा त्यांना साधार खोडून काढणे हा पत्रकारांचा अग्रक्रम असायला हवा. मात्र तसे काही न करता, ‘या विषयावर मतमतांतरे आहेत’ असे बोटचेपे विधान आणि त्याला साजेशा बातम्या देत ही माध्यमे तटस्थतेचा बुरखा पांघरतात.

 
या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमागे आणखीही एक हेतू निश्चितच असणार, तो म्हणजे मुस्लिमांच्या लांगूलचालनात हयात घालवलेल्या या लाचार नेत्यांना मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून सर्वसामान्यांचे लक्ष हटवायचे असावे.
 
 
रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लोकमान्यांनी स्थापना न्यायमूर्ती रानडे, रावबहादुर जोशी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती कुंटे या तत्कालीन समाजधुरीणांना बरोबर घेऊन 1885 साली श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची केली. या संदर्भात एक शिष्टमंडळ घेऊन टिळकांनी छत्रपती शाहू महाराजांचीही भेट घेतली होती. त्या वेळी, ‘रायगडावरील छत्रीसाठी पैशाची व्यवस्था करू’ असे शाहू महाराजांनी त्यांना आश्वासन दिले. या कामासाठी जमत असलेल्या लोकनिधीतील पै न् पैचा हिशोब लोकमान्य केसरीतून प्रकाशित करत होते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या मंडळाची स्थापना केवळ समाधीच्या जीर्णोद्धारासाठी झालेली नव्हती, तर शिवजन्मोत्सव, शिवपुण्यतिथी साजरी करणे आणि शिवचरित्राचा प्रसार-प्रचार... अशा सर्व उपक्रमांमधून तत्कालीन जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणे हा प्रमुख उद्देश होता. शिवभक्तांनी दिलेला निधी मंडळाने ज्या डेक्कन बँकेमध्ये ठेवला होता, ती बँक डबघाईला येऊन बुडाली. परिणामी सर्व निधीही गेला. मात्र या आर्थिक संकटाने न डगमगता, आपल्या इतर राजकीय व्यग्रतेतून वेळ काढत, प्रकृतिअस्वास्थ्याची पर्वा न करता लोकमान्यांनी पुन्हा निधी उभारला. छत्रपती शिवरायांवरील त्यांच्या अविचल निष्ठेचे हे प्रतीक म्हणावे लागेल. मात्र मंडळाने पूर्ण केलेले जीर्णोद्धाराचे काम पाहायला लोकमान्य हयात नव्हते.

समाधीच्या जीर्णोद्धारातून, तसेच शिवजयंतीसारख्या उत्सवाच्या माध्यमातून एतद्देशीयांच्या मनात स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा जागृत करणार्‍या लोकमान्यांचे हे ऋण कधीही न फिटण्याजोगे. ते नाकारण्याचा प्रमाद करणार्‍यांना खडे बोल न सुनावता, मिठाची गुळणी धरून बसलेल्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यांचा निषेध करावा तितका कमीच. यातून माध्यमांची विश्वासार्हता लयाला जाते आहे, याचे भानही त्यांना राहिलेले नाही.