हिंदुत्व : आरोप-प्रत्यारोप पण अर्थाचे काय?

विवेक मराठी    24-Jun-2022   
Total Views |
आजची परिस्थिती वेगळी आहे. आज शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजपाने जबरदस्त टीका करणे सुरू केले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. हिंदुत्वाचा कट्टर विरोध करणारी काँग्रेस आणि ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाला जन्म देणारे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना सत्तेत बसली आहे. आपले हिंदुत्व प्रकट करण्यासाठी शिवसेनेने घोषणा दिली की, ‘खर्‍या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे.’ अशा प्रकारे तुम्ही खरे हिंदुत्ववादी की आम्ही खरे हिंदुत्ववादी अशी चर्चा काल चालू होती, आज चालू आहे आणि उद्याही चालू राहणार आहे.

hindu
देश स्वतंत्र झाल्यानंतर राजनैतिक वर्तुळात समाजवाद आणि सेक्युलॅरिझम हे दोन शब्द परवलीचे शब्द झाले. पं. नेहरू समाजवादी होते. अवाडीच्या काँग्रेसच्या अधिवेशनात ‘समाजवादी समाजरचना’ हे काँग्रेसने आपले धोरण ठेवले. देशातील सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस होता. त्यामुळे इतर सर्व लहान-सहान पक्षांत आम्हीही समाजवादी आहोत आणि काँग्रेसपेक्षाही कडवे समाजवादी आहोत हे दाखविण्याची चुरस निर्माण झाली. स्वत:ला शुद्ध समाजवादी समजणारे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली. नंतर प्रजा समाजवादी पक्षाचे नेत्यांप्रमाणे तुकडे होत गेले. समाजवादी पार्टी, संयुक्त समाजवादी दल असे पक्ष निर्माण होत गेले. काँग्रेसमधून बाहेर पडणार्‍यांनी आपले नामकरण ‘समाजवादी काँग्रेस’ असे केले.
 
समाजवादी म्हणजे काय? यावर इमारत भरेल एवढे लेखन तेव्हा लोकांनी केले. गमतीने काही जण म्हणत, “समाजवाद ही अशी टोपी आहे, जी कुणाच्याही डोक्यावर फिट (तंतोतंत) बसते.” समाजवादाचा हा बोलबाला 1984पर्यंत चालू राहिला. 1984 साली इंदिरा गांधी गेल्या, त्यांच्या मागोमाग समाजवादही गेला. आज हा शब्द राज्यघटनेच्या उद्देशिकेत राहिला आहे आणि मुलायमसिंहांच्या ‘यादव जाती’च्या पार्टीच्या नावात (समाजवादी पार्टी) राहिला आहे. समाजवाद म्हणजे एका जातीची पार्टी असे समीकरण उत्तर प्रदेशपुरते झालेले आहे.

नंतर ‘सेक्युलॅरिझम‘ या शब्दाचे दिवस आले. सेक्युलॅरिझम या शब्दाला चांगले दिवस येण्याचे कारण रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन. या आंदोलनाने खरे सेक्युलॅरिझम आणि बेगडी सेक्युलॅरिझम यांचे 1986 ते 1998पर्यंत घमासान वैचारिक युद्ध चालू राहिले. तेव्हा प्रत्येक पक्ष म्हणू लागला की, आम्ही सेक्युलर आहोत, खरे सेक्युलर आहोत, इतर सगळे पक्ष ढोंगी सेक्युलरवादी आहेत. व्यवहारात सेक्युलॅरिझमचा अर्थ झाला मुस्लीम मुल्ला-मौलवींच्या दाढ्या कुरवाळण्याचा, त्यांचे तुष्टीकरण करण्याचा.

अटलबिहारी वाजपेयी यांचे शासन आल्यानंतर ‘हिंदुत्व‘ या शब्दाला चांगले दिवस आले. त्या शब्दाची चर्चा सुरू झाली. भाजपाचे हिंदुत्व सांप्रदायिक आहे आणि देशाचे सनातन हिंदुत्व हे उदारमतवादी आहे. उदारमतवादी हिंदुत्व गांधीजींचे होते. संकुचित हिंदुत्ववाद हा देशाचा घात करील आणि लोकशाही धोक्यात आणील, याची चर्चा सुरू झाली, ती आजही चालू आहे. असा एक-एक शब्द स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत राजनैतिक पटलावर चर्चेसाठी येत गेला. काही काळ त्या शब्दाचे साम्राज्य निर्माण झाले, नंतर तो मागे पडत गेला.

महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या राजकारणात हिंदुत्वाचा विषय प्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी आणला. विलेपार्ल्यातील निवडणुकीचे शिवेसेनेचे उमेदवार होते डॉ. रमेश प्रभू. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी निवडणूक लढविली, म्हणून 1995 साली निवडणूक रद्द करण्यात आली. प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वावर निकाल देताना ‘हिंदू ही जीवनपद्धती आहे, एक विशिष्ट धर्म नव्हे’ असा निर्णय दिला. यानंतर हिंदुत्व हा विषय निवडणूक राजकारणाचा विषय झाला. रामजन्मभूमी मुक्तिआंदोलनाचा लाभ उठविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतली. देशातील वातावरण हिंदूंच्या राजनैतिक जागृतीचे असल्यामुळे शिवसेनेला त्याचा जबरदस्त फायदा झाला. हिंदू समाजाचा राजनैतिक आवाज व्यक्त करण्याची गरज होती, ती शिवसेनेने भागविली.

आजची परिस्थिती वेगळी आहे. आज शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाजपाने जबरदस्त टीका करणे सुरू केले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. रामजन्मभूमी मुक्तिआंदोलनात शिवसेना कुठेच नव्हती. 6 डिसेंबर 1992च्या बाबरी पतनातही शिवसैनिक नव्हते. यांचे हिंदुत्व फक्त तोंडदेखले आहे. हिंदुत्वाचा कट्टर विरोध करणारी काँग्रेस आणि ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाला जन्म देणारे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना सत्तेत बसली आहे. त्यावर शिवसेनेचे उत्तर असते की, आमचेच हिंदुत्व खरे आहे, आम्ही गदाधारी हिंदू आहोत, तर तुम्ही घंटाधारी हिंदू आहात. तुमचे हिंदुत्व हिंदू समाजाची मते मागण्यापुरतेच आहे. आपले हिंदुत्व प्रकट करण्यासाठी शिवसेनेने मुंबईत बीकेसी ग्राउंडवर आणि औरंगाबाद येथे टोलेजंग सभा घेतल्या. घोषणा दिली की, ‘खर्‍या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे.’ अशा प्रकारे तुम्ही खरे हिंदुत्ववादी की आम्ही खरे हिंदुत्ववादी अशी चर्चा काल चालू होती, आज चालू आहे आणि उद्याही चालू राहणार आहे.


hindu
 
यासाठी राजनैतिक हिंदुत्व म्हणजे काय? याचा अल्पसा विचार केला पाहिजे. हिंदुत्वाचा विचार जीवनपद्धतीच्या अंगाने अतिशय विस्तृतपणे मांडता येतो. डॉ. राधाकृष्णन यांचे त्यावरील ‘हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ’ हे अप्रतिम पुस्तक आहे. शशी थरूर यांचे ‘व्हाय आय एम हिंदू?’ हेेदेखील एक उत्तम पुस्तक आहे. आम्ही अस्सल हिंदू, तुम्ही नकली हिंदू म्हणणार्‍यांनी ही पुस्तके वाचली असतील, असे समजू या. हिंदू म्हणजे काय, याचा धार्मिक अंगानेसुद्धा विचार करता येतो. त्यासाठी ज्ञानेश्वरी किंवा लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ पुरेसे आहे. बेगडी आणि शुद्ध हिंदुत्ववाद्यांनी त्याचेही अवलोकन केले असेल असे समजू या.

परंतु आपल्याला वरील दोन्ही अंगांनी हिंदुत्वाचा विचार करायचा नसून केवळ राजनैतिक अंगाने विचार करायचा आहे आणि तो विचार राज्यघटनेच्या माध्यमातून करायचा आहे. राज्यघटनेच्या उद्देशिकेतील शब्द असे आहेत - ‘त्याच्या सर्व नागरिकांस, सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय... प्राप्त करून द्यायचा आहे.’ हिंदुत्वाचा राजनैतिक विचार राज्यघटनेच्या शब्दात सांगायचा तर हिंदुत्व म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय. न्यायाचा हा त्रिवेणी संगम आहे. राजनैतिक पक्षांना सत्ता मिळवायची असते आणि सत्ता राबवायची असते. ती राबविण्यामागे हिंदुत्वाचा विचार आहे असे म्हणायचे असेल, तर राजनैतिक सत्तेच्या माध्यमातून सर्व प्रजेला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय प्राप्त करून देता आला पाहिजे.

आपल्या उद्देशिकेत हे शब्द क्रमश: सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक अशा पद्धतीने आलेले आहेत. त्यांचा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. प्रथम राजनैतिक शब्द आलेला नाही किंवा आर्थिक आलेला नाही, तर प्रथम सामाजिक विषय आलेला आहे. काय होतो सामाजिक न्यायाचा अर्थ? सामाजिक न्याय म्हणजे समाजाची जातीप्रमाणे पतवारी न करता सर्वांना समान वागणूक द्यायची. निवडणुकांच्या राजकारणात समान वागणूक देण्यासाठी मागासवर्गीयांना काही जागा आरक्षित ठेवल्या गेल्या. त्या, महाराष्ट्रात न्यायालयाने तांत्रिक मुद्दे उपस्थित करून नाकारल्या, त्याची पूर्तता शासनाने करायला पाहिजे. हे हिंदुत्वाचे राजकारण आहे. हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे सामाजिक न्यायाचे राजकारण. शासकीय सेवेतील आरक्षित जागा किती रिक्त आहेत, त्या का भरल्या जात नाहीत, त्या भरल्या जात नसतील तर हे हिंदुत्वाचे राजकारण नव्हे. या प्रकारे याचा विस्तार आपण आणखी करू शकतो.

दुसरा विषय येतो आर्थिक न्यायाचा. आर्थिक न्याय म्हणजे एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन असले पाहिजे. मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला. त्यांची मागणी होती, शासनात विलीनीकरणाची. ती मान्य झाली नाही. त्यामागचा विषय असा आहे की, एसटीचे कर्मचारी जनसेवेचे काम करतात. सरकारी कर्मचारीदेखील तेच काम करतात. त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या रूपाने जबरदस्त पगार मिळतात. हेच सेवेचे काम करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना हा आर्थिक न्याय का नाही? वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये सफाई कामगार असतात. महापालिकेतील सफाई कामगाराला जे वेतन मिळते, त्याच्या एक चतुर्थांश वेतनदेखील या सफाई कामगारांना मिळत नाही, त्यांचा विचार कुणी करायचा? सिग्नलला गाडी थांबली की वेगवेगळ्या वस्तू विकायला मुले, मुली, स्त्रिया, पुरुष येतात. कायद्याने बालमजुरीला बंदी आहे. जी मुले शाळेत दिसायला पाहिजेत, ती मुले छोट्या-मोठ्या वस्तू विकताना दिसतात. याची चिंता नसेल तर हे हिंदुत्वाचे राजकारण नाही. हिंदुत्वाचे बुडबुडे फोडण्याचे राजकारण करण्यात काही अर्थ नाही.

हिंदुत्व म्हणजे राजनैतिक न्याय. समाज अनेक वर्गांत विभागलेला असतो. या वर्गांचे समूह असतात. त्यांना आपण जाती असेदेखील म्हणतो. त्यांचे प्रतिनिधित्व राजनैतिक सत्तेत दिसायला पाहिजे. हिंदुत्वाची भाषा करणार्‍या पक्षात महत्त्वाच्या पदांवर किंवा सत्तेच्या पदांवर वाल्मिकी, मातंग, चर्मकार, ढोर, पारधी, वंजारी, गोंधळी, लिंगायत अशा तळागाळातील समाजातील किती लोक आहेत? त्यांना प्रतिनिधित्व देणे म्हणजे राजनैतिक न्याय निर्माण करणे होय. मशिदीचे भोंगे काढा, बुरखा नको, किंवा प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांविषयी नको ते बोलणे हेच जर हिंदुत्व असेल, तर अशा हिंदुत्वाने हिंदू समाजाचे काही भले होणार नाही.
सर्वसमावेशकता, सर्वांचा सहभाग, सर्वांना न्यायाची वागणूक, सर्वांचा उत्कर्ष, सर्वांच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता, सर्वांना शिक्षण, सर्वांचे आरोग्य राजसत्तेच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करणे याचा दुसरा अर्थ हिंदुत्वाचे राजकारण करणे असा आहे. हिंदुत्वाचे महान भाष्यकार म्हणून स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, महात्मा गांधी, श्रीगुरुजी अशी अनेकांची नावे घेता येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भक्तांनी त्यांना हिंदुत्वविरोधी ठरवून टाकले आहे. माझ्यासारख्या आंबेडकरांच्या अभ्यासकाला हे मान्य नाही. हिंदू कोड बिल निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे झिजविली, अशा महान विभूतीस हिंदुत्वविरोधी कसे म्हणायचे? त्यांच्याही विचारांना आपल्या कवेत घेऊन पुढे जाणे म्हणजे हिंदुत्व आहे. एवढ्या व्यापक परिभाषेत हिंदुत्वाची चर्चा करणारे राजनेते बोलतात का? उत्तर तुम्हीच शोधा.
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.