गोल्ड मॅन नीरज चोप्रा

विवेक मराठी    06-Jun-2022   
Total Views |

niraj
नीरज चोप्राने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे आणि त्यासाठीच विद्यमान केंद्र सरकारने त्याची दखल घेत त्यांना पद्मश्री बहाल केली. यावेळी पद्म गौरव लेखमालेत आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
 
नीरज चोप्रा हे नाव आज सुवर्णाक्षरात नोंदविले गेले आहे. वयाच्या 25व्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले एकमेवाद्वितीय असे हे व्यक्तिमत्त्व आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने कुणीही जग जिंकू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नीरज चोप्रा. टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने ज्या प्रकारे 87.58 मीटर अंतर कापून भालाफेक केली, त्यासाठी त्यांचे कितीही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नीरज चोप्रा यांनी भारताची 100 वर्षांची प्रतीक्षा यावर्षी संपवली आहे. बालपणी 80 किलो वजन उचलल्यामुळे घरच्यांचा ओरडा खाल्लेल्या नीरजसाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे नीरज चोप्रा आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी आपली यशोगाथा लिहिली आहे.
 
 
आपल्या कामगिरीने देशाचा गौरव वाढवणार्‍या नीरज चोप्रा यांचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणातील पानिपत येथे गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पानिपत येथून पूर्ण केल्यानंतर चंदीगडमधील बीबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नीरज चोप्रा लहानपणी खूप लठ्ठ होते. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचे वजन सुमारे 80 किलो होते. त्यामुळे गावातील इतर मुले त्यांची चेष्टा करत असत. त्यांच्या लठ्ठपणामुळे त्यांचे कुटुंबातील सदस्य कायम बोलत होते, त्यामुळे त्यांच्या काकांनी त्यांना वयाच्या 13व्या वर्षापासून धावण्यासाठी पानिपतमधील मैदानावर नेण्यास सुरुवात केली. पण यानंतरही त्यांचे मन शर्यतीत लागले नाही. मैदानात जाताना इतर खेळाडूंना तिथे भाला फेकताना ते पाहत असत, आपणही भालाफेक करायला हवं असं त्यांना सारखे वाटत होते. त्यासाठी ते बारीक निरीक्षणही करीत आणि इथूनच त्यांचं आयुष्य बदललं.
 
 
एक काळ असा होता की नीरज चोप्रा यांना भालाफेक या खेळासाठी प्रशिक्षक मिळत नव्हता. नीरज यांनी हार मानली नाही. परिस्थितीवर स्वतः तोडगा शोधला आणि यूट्यूबवरील व्हिडिओ बघून भाला फेकण्याचे बारकावे त्यांनी आत्मसात केले. लहानपणापासून पोहण्याची आवडही होती. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने लहानपणी पाहिजे तसा भाला विकत घेता आला नाही, पण कोणतीही निराशा न ठेवता त्यांनी स्वस्त भाला घेऊन सराव सुरू केला. नीरज चोप्रा यांची चिकाटी पाहून पहिल्यांदा पानिपतचे प्रशिक्षक जयवीर सिंग यांनी भाला फेकण्याची कला त्यांना शिकवली. त्यानंतर 2011 ते 2016पर्यंत पंचकुलामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेताना केवळ भालाफेकच केली नाही, तर लांब पल्ल्याच्या धावपटूंसोबत धावण्याचा सरावही केला. अभ्यासासोबतच भाला फेकण्याचा सराव सुरू ठेवला, यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली. पोलंडमध्ये 2016च्या खअअऋ वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर भालाफेक करून त्यात सुवर्णपदक जिंकले. यावर खूश होऊन लष्कराने त्यांची राजपुताना रेजिमेंटमध्ये कनिष्ठ आयोग अधिकारी म्हणून ’नायब सुभेदार’ म्हणून नियुक्ती केली. खेळाडूंना सैन्यात अधिकारी म्हणून क्वचितच नियुक्त केले जाते, परंतु नीरज यांना स्वतःच्या कौशल्यामुळे थेट अधिकारी बनवण्यात आले.
 
 
niraj 
 
दरम्यानच्या काळात खांद्याच्या दुखापतीमुळे काही काळ त्यांना मैदानाबाहेर राहावे लागले. नीरज यांना भाल्याशिवाय राहवत नव्हते. दुखापतीतून बरे झाल्यावर ते पुन्हा मैदानात परतले. कोरोनामुळे अनेक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पण त्यांनी सराव सतत सुरू ठेवला आणि मुख्य म्हणजे ते हिंमत हरले नाहीत. पुढे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र झाले. त्यांनी त्यात भालाफेकचे एकमेव लक्ष्य केले. 2018मध्ये जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी 88.06 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे नीरज चोप्रा पहिले भारतीय ठरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भालाफेकमध्ये भारताने आतापर्यंत केवळ दोन पदके जिंकली आहेत. नीरजच्या आधी गुरतेज सिंगने 1982 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
 
 
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकाची गरज होती. 7 ऑगस्ट 2021 याच दिवशी नीरज चोप्रा यांनी ते पदक खेचून आणले. 2008 नंतर, भारताकडून वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे नीरज चोप्रा हे दुसरे भारतीय खेळाडू ठरले आहे. यापूर्वी नेमबाज अभिनव बिंद्राने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नीरज चोप्रा यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक पदके जिंकली आहेत. जागतिक चॅम्पियनशिप वगळता सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 86.65 मीटर फेक केल्यावर नीरज यांच्या प्रतिभेचा अंदाज लावता येतो. त्याच वेळी अंतिम सामन्यात, त्यांनी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक केली होती. त्यामुळे भारताकडून सुवर्ण जिंकणारे ते एकमेव खेळाडू ठरले आहे. भालाफेक या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या नीरज चोप्रा यांना विद्यमान सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली आहे. नीरज चोप्रा यांच्यावर कवी वाहिद अली वाहिद यांनी लिहिलेल्या या ओळी तंतोतंत लागू होतात,
 
 
दर्द कहाँ तक पाला जाए,
युद्ध कहाँ तक टाला जाए,
नीरज भी है राणा का वंशज,
फेंक जहाँ तक भाला जाए
 
 

श्री सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक ,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक,तरुण भारत नागपूर येथे २ वर्ष स्तंभ लेखन केले आहे. मुंबई तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स,पुण्यनगरी या वृत्तपत्रासाठी विविध विषयांवर लेखन सुरू असते. मध्य प्रदेश येथील इंदोर येथून एक पाक्षिक निघतं मराठी गौरवयात ही अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. प्रज्ञालोक ह्या त्रैमासिकात ही लेखन सुरू आहे. आणि प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय आहे. मुंबई तरुण भारताने "कालजयी सावरकर" या नावाने सावरकर विशेषांक प्रसिद्ध केला त्यात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' ह्या विषयावर लेख प्रकाशित झाला आहे. अनेक दिवाळी अंकांसाठी लेखन सुरू असते. साप्ताहिक विवेक साठी लिहितांना कायमच आनंद मिळत असतो. विवेकचा वाचक लेखकांना समृद्ध करणारा आहे.