“प्रभुणेकाकांच्या संस्थेतून खर्‍या भारतीय गुरुकुलाचे दर्शन घडते” - नितीन सावंत

विवेक मराठी    15-Jul-2022   
Total Views |
“ध्येयवेडा माणूस काय करू शकतो, याचे उदात्त उदाहरण म्हणजे पद्मश्री गिरीश प्रभुणे. गिरीश प्रभुणेंच्या अनेक मुलाखती, पुस्तके चाळली तर त्यातून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सामाजिक भान आणि त्याविषयी ठोस कार्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती. अनेक ठिकाणी मान्यवर म्हणून चार शब्द बोलण्याची संधी मला मिळत गेली, परंतु काकांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वापुढे आपण किती ठेंगणे आहोत, याची आज जाणीव झाली. प्रभुणेकाकांच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलममधील शिक्षण हे खर्‍या भारतीय गुरुकुलाचे दर्शन घडविणारे आहे आणि त्यापुढे आपण जी शिक्षणपद्धती अवलंबिली आहे, त्याआधारे आपण ‘मॅकॉलेक्षित’ आहोत, हेच खरे. आपल्याकडे फक्त डिग्री आहे, परंतु ज्ञान शून्य समजावे असेच.” असे नितीन सावंत यांनी प्रतिपादन केले. ‘परिसांचा संग’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
 
 
book
 
मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, अमृत प्रेरणा आणि सा. विवेक पुस्तक प्रकाशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रकट मुलाखत शनिवार 9 जुलै रोजी नवी मुंबईतील साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर 6, वाशी येथे झाली. सा. विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी मुलाखत घेतली. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या चित्रफितीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा. पं. संजीव चिम्मलगी, मा. शैलजाताई शेवडे, मा. अस्मिता पांडे, मा. नितीन सावंत, रा.स्व. संघ नवी मुंबईचे मा. संघचालक कमलेशजी पटेल, मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाला श्रोतृवर्गाचाही उदंड प्रतिसाद लाभला.
 
 
भटके-विमुक्तांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे. भटके विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, एवढेच नाही, तर त्यांच्यात असलेल्या उपजत ज्ञानाला योग्य दिशा-मार्गदर्शन देऊन त्यांच्या ज्ञानाचे योग्य तेे सादरीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून सन्मानाचे आयुष्य देणे हा ध्यास घेणारे गिरीश प्रभुणे. अशा समाजाचे काम करायचे असेल, तर या समाजाचे आयुष्य समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांच्यासोबतच राहून त्यांचे आयुष्य जाणून घेतले पाहिजे. या समाजाविषयी असलेला त्यांचा कारुण्यभावच त्यांच्या कामाची ऊर्जा बनली. चाकोरीबद्ध आयुष्य जगणारे, पण संघाच्या मुशीत घडलेले स्वयंसेवक, समाजाविषयीची अतीव कणव असल्यामुळेच त्यांच्या हातून ग्रामायण, यमगरवाडी, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अशी समाजाप्रती भरीव कार्ये पार पडली.
 

book
 
 

याच त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेणारी विस्तृत मुलाखत सा. विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी घेतली. 
 
 
मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनी मंडळातील अनेक उपक्रमांची माहिती सांगितली. विवेक पुस्तक विभाग प्रमुख शीतल खोत यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सा. विवेकची वाटचाल आणि विवेकचे आयाम याविषयी माहिती दिली. अ‍ॅड. महेंद्र शिंगाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर महेश शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 
- पूनम पवार

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.