असत्याची कास धरली..

विवेक मराठी    19-Jul-2022   
Total Views |
असंगाशी संग केला की त्याचे परिणाम असे भोगावे लागतात. गोड फळे देणार्‍या झाडाच्या भोवती कडू रस देणारी भरपूर झाडे लावली तर गोड फळे देणारे झाडाचे फळदेखील आंबट आणि कडवट होते. तसे उद्धवजींचे झाले. शरद पवार यांच्यावर भारतातील कोणताही राजकारणी विश्वास ठेवत नाही. ते कधी समाजवादी असतात, कधी राष्ट्रवादी असतात, कधी फुले-आंबेडकरवादी असतात, तर कधी गोल टोपीवाले असतात. संगतीला त्यांना कुणीही चालते...
 
shivsena
असत्याची कास धरली
घराण्याची रया गेली,
असंगाशी संग केला
परिणामी राजमुकुट गेला

चुकता विवेक बसतो फटका
कोण आपला कोण परका
याचा शोध करावा नेटका
मार्ग यशाचा हाच नेमका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आताची स्थिती पाहता ती वर लिहिल्याप्रमाणे झाली आहे, असे समजायला हरकत नाही. 2019 साली शिवसेना आणि भाजपा यांनी युती केली. एकत्रित निवडणुका लढविल्या. जनतेने युतीला बहुमत दिले. सत्तेवर बसण्याचा अधिकार दिला. उद्धव ठाकरे यांनी जनतेचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी आघाडी केली. महाविकास आघाडी असे तिला नाव दिले. महाविकास आघाडीची सत्ता आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
 
 
जनतेचा आदेश ठोकरून लावून तीन घराण्यांची सत्ता महाराष्ट्रात आली. सोनिया गांधी घराणे, पवार घराणे आणि ठाकरे घराणे अशी ही घराणेशाही आहे. गांधी घराण्यातील महाराष्ट्रात कुणी नसल्यामुळे त्यांना कुणाला मंत्रिपद मिळाले नाही. पण ठाकरे आणि पवार घराण्यातील मंत्री झाले. उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय कामाचा काही अनुभव नाही. पुत्र यांनादेखील काही अनुभव नाही. आणि उद्धवजींनी मातोश्रीवर बसून फेसबुक लाइव्हच्या साहाय्याने मंत्रीमंडळ बैठका आणि पक्षसंवाद सुरू केला. ही महाविकास आघाडी विचित्र वैचारिक पायावर उभी होती. घराणेशाही हा एक मुद्दा सोडला, तर आघाडीतील तिन्ही पक्षांत कसलेही साम्य नव्हते. काँग्रेसचा विचार हा अल्पसंख्य तुष्टीकरणवादी आहे आणि राष्ट्रवादीचा विचार येनकेन प्रकारे सत्तास्थानी राहण्याचा आहे. राष्ट्रवादी म्हणजे कोणताही विचार नसलेला ‘पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलावे वैसा’ असा हा पक्ष आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष हिंदू विचारधारेचे कट्टर विरोधी पक्ष आहेत. आणि शिवसेना स्वत:ला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवते. कट्टरवादी आणि कट्टरविरोधी यांची ही अनैसर्गिक युती झाली.
 
 
भाजपाला सत्तेवर येऊ न देणे हा या आघाडीचा एकमेव उद्देश होता. लोकशाही हा आकड्यांचा खेळ असतो. त्यांनी बहुमताचा आकडा जमविला आणि ते सत्तास्थानी आले. उद्धवजींनी भाजपाचा विश्वासघात केला आणि त्याहून मोठा विश्वासघात मतदारांचा केला. या मतदारांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनेक आमदारांना पडला. उद्धवजींचे ठीक आहे, त्यांना मातोश्रीत बसून फक्त फेसबुक लाइव्ह व्हायचे होतेे. परंतु आमदारांना जनतेनेला उत्तरे द्यावी लागतात. त्यांनी विश्वासघात केला नाही, पक्षनेतृत्वाने केला. हे खरे असले, तरी कोणताही आमदार मतदारासंघात जाऊन असे बोलू शकत नाही. तो असे बोलू शकत नाही की, विश्वासघात मी नाही केला, आमच्या नेत्यांनी केला.
 
 
या आमदारांची घुसमट व्हायला लागली. राष्ट्रवादी त्यांच्या मतदारसंघात हातपाय पसरू लागले. विकासाचा निधी राष्ट्रवादीने आपल्याकडे वळविला. शिवसेनेच्या आमदारांना योग्य वेळी पुरेसा निधी मिळणार नाही, हे त्यांनी बघितले. आमदारांनी त्याच्या तक्रारी केल्या, पण उद्धवजी मुख्यमंत्र्याच्या राजमुकुटात रमले. मी पक्षप्रमुख आहे आणि शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे सर्वांनी माझ्या हुकमाचे पालन केले पाहिजे, अशी त्यांची वागणूक राहिली. मुख्यमंत्रिपदावर बसल्यापासून त्यांनी जी भाषणे केली आहेत, पत्रकार परिषदा घेतल्या आहेत, त्यातील भाषा ही परिपक्व राजकीय नेत्याची नाही. ही भाषा एकत्र कुटुंब चालविणार्‍या एखाद्या कुटुंबप्रमुखाची भाषा आहे. विरोधकांना तुच्छतेने लेखणे आणि उलटी बोंबाबोंब करणे की शिवसेनेचा विश्वासघात भाजपाने केला, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केले होते, तो शब्द त्यांनी फिरविला.. माणसाने असत्याची कास धरली की, मग तो किती खोटे बोलेल याला सीमा नसते. जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री की भाजपाचा मुख्यमंत्री यापेक्षा हिंदुत्वाची म्हणजे राष्ट्रहिताची चिंता करणारी सत्ता हवी होती. उद्धव ठाकरे ती देण्यात अयशस्वी झाले.
 
 
शिवसेनेतील असंतुष्ट आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. त्याचा सर्व तपशील आपल्या सर्वांना माहीत आहे. असे बंड करणार आहे, याची साधी कुणकुण उद्धव ठाकरे यांना लागली नाही, ते गाफील राहिले, घमेंडीत राहिले, मला कोण हात लावणार या गुर्मीत राहिले. एका क्षणात त्यांच्या गर्वाचा फुगा फुटला. प्रथम वर्षा बंगला सोडवा लागला, नंतर मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. हे इतके अचानक घडले की, ते घडेपर्यंत उद्धव ठाकरे यांना काहीच समजले नाही.
 
 
असंगाशी संग केला की त्याचे परिणाम असे भोगावे लागतात. गोड फळे देणार्‍या झाडाच्या भोवती कडू रस देणारी भरपूर झाडे लावली तर गोड फळे देणारे झाडाचे फळदेखील आंबट आणि कडवट होते. तसे उद्धवजींचे झाले. शरद पवार यांच्यावर भारतातील कोणताही राजकारणी विश्वास ठेवत नाही. ते कधी समाजवादी असतात, कधी राष्ट्रवादी असतात, कधी फुले-आंबेडकरवादी असतात, तर कधी गोल टोपीवाले असतात. संगतीला त्यांना कुणीही चालते, फक्त त्याची निवडून येण्याची क्षमता पाहिजे, त्याच्याकडे विपुल पैसा पाहिजे आणि गुंडशक्ती पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी याच्याविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी कधीही शरद पवारांशी हातमिळवणी केली नाही, काँग्रेसशीही केली नाही. हा असंगाशी संग केला तर महागात पडेल, हे राजमुकुटाच्या मोहापायी उद्धवजींच्या लक्षात आले नाही. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले आणि आज ते मुख्यमंत्री आहेत.
 
 
त्यांना मुख्यमंत्रिपदावर बसवून देवेंद्र फडणवीस यांनी आणि भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कल्पना करता येणार नाही असा धक्का दिलेला आहे. हा संघर्ष आता महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात, एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून भविष्यात शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची, हा संघर्षाचा नवीन अध्याय सुरू झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अस्तित्वाच्या रक्षणाचा संघर्ष स्वत:वर ओढवून घेतलेला आहे. तो कुणीही त्यांच्यावर लादलेला नाही. महाराष्ट्राची सत्ता मिळवायची हा प्रश्न आता दुय्यम झाला, आताचा प्रश्न शिवसेना कशी टिकवून ठेवायची, हा झाला आहे. ठाकरे घराण्याची ठेवायची की ठाकरे घराण्याबाहेरील एखाद्याची ठेवायची, हा संघर्षाचा मुख्य मुद्दा झाला आहे.
 
 
शिवसेना टिकवून ठेवण्याचे आव्हान हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर आघाडी टिकवून ठेवण्यापेक्षा अधिक कठीण आहे. उद्धव ठाकरे आता 62 वर्षांचे झाले आहेत. नुकत्याच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्यांच्या शारीरिक हालचालींना मर्यादा आहेत. पक्ष टिकवून ठेवायचा असेल, तर पक्षसंघटन भक्कम ठेवावे लागते. त्यासाठी सतत प्रवास करावा लागतो. भाजपात हे काम पक्षाचा संघटनमंत्री करतो. जिल्हा स्तरावर पूर्णवेळ संघटन सचिव असतात, यातील अनेक जण संघ प्रचारक असतात. ते कधीही सत्तापदाच्या शर्यतीत उतरत नाहीत. त्यामुळे पक्षात त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण झालेले असते. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पद्धतीने आणि शिवसेनेच्या शैलीने पक्षसंघटन बांधावे लागेल. पक्षसंघटनेसाठी माझे म्हणणे ऐकणारा एक स्थान आहे, असा विश्वास पक्षकार्यकर्त्यांमध्ये भरावा लागतो. पक्षसंघटन मजबूत राहिले तर पाच-दहा आमदार इकडेतिकडे गेले तर काही फरक पडत नाही, पक्ष त्यांच्याबरोबर जात नाही. एकनाथ शिंदे यांचे आव्हान आमदार इकडेतिकडे नेण्याचे नसून सर्व पक्ष आपल्याकडे वळविण्याचे आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याणमधील पक्षसंघटन आज त्यांच्या बाजूने झाले आहे. ते मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांचा काळ पूर्ण करणार आहेत. या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील पक्षसंघटना उभी फूट पडल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तसे झाल्यास उद्धव ठाकरे यांच्यापुढे ते अतिमोठे आव्हान म्हणून उभे राहील.
 
 
त्यांचा पुत्र आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे परिवाराची ठेवण्यात यशस्वी होईल का, याचे उत्तर काळ देईल. परंतु आजपर्यंतची त्यांची वाटचाल आहे, ती आदित्य ठाकरे म्हणून कमी आणि बाळासाहेबांचा नातू म्हणून अधिक, उद्धवजींचा पुत्र म्हणून अधिक आहे. घराण्याच्या पुण्याईवर आदर मिळतो, पण सत्ता मिळतेच असे नाही. ती स्वकर्तृत्वाने मिळवावी लागते. आदित्य ठाकरे यांना स्वकर्तृत्वाचा विश्वास आपल्या अनुयायांना द्यावा लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचे नेतृत्व कसोटीला लागेल.
 
 
 
या सत्तानाट्यात देवेंद्र फडणवीस हे महानायक ठरलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. अत्यंत सावधपणे त्यांनी पाऊल उचलले, कोणतीही घाई केली नाही. परंतु राजकारणामध्ये आणीबाणीच्या प्रसंगी निर्णय फार त्वरेने घ्यावे लागतात. एक दिवस जरी चुकला तरी होत्याचे नव्हते होते. एकनाथ शिंदे यांच्या गटात चाळीस आमदार झाल्यानंतर नंतरच्या सगळ्या घटना जर बघितल्या, तर देवेंद्र फडणवीस यांची निर्णयक्षमता, परिस्थितीचे आकलन, कायद्याची उत्तम माहिती अशा गुणांचे दर्शन होते. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे हा निर्णय त्यांचा की पक्षाचा हे आता सांगणे अवघड असले, तरीही हा निर्णय आताच्या राजकीय परिस्थितील मास्टर स्ट्रोक समजला जातो. या एकाच निर्णयाने उद्धवजींच्या रथाचे चाक केवळ जमिनीवर आले आहे असे नसून जमिनीत रुतले आहे. पवारांची स्वप्ने भंग पावली आहेत आणि काँग्रेसला हे काय घडले, हा प्रश्न पडला आहे. राजकीय प्रथेप्रमाणे हे नेते आता म्हणतात की, शिंदेचे सरकार फार काळ टिकणार नाही. असे म्हणण्याशिवाय त्यांच्यापुढे काही पर्याय नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांचे पूर्ण मनोमिलन झालेले आहे. म्हणून वैचारिक आधारावर हे सरकार पडणार नाही. अन्य कुठली कारणे निर्माण झाली असता सांगता येणार नाही. परंतु काही झाले तरीही उद्धवजी यांचे पक्षप्रमुख म्हणून जे स्थान होते ते स्थान आता इथून पुढे राहणार नाही. सम्राट नेपोलियन यांचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. युद्धात पराभव झाल्यानंतर त्याला एलबा बेटावर कैदेत जावे लागले. ही त्याची पहिली कैद. तोपर्यंत तो अजेय होता. तो म्हणाला, “एबल वॉज आय एर आय सॉ एलबा” - एलबा पाहण्यापूर्वी मी समर्थ होतो, आता नाही. उद्धवजी या वाक्याचा अनुभव सध्या घेत आहेत.
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.