जीव आणि धारणाही महत्त्वाची

विवेक मराठी    07-Jul-2022
Total Views |
जुलैच्या सुरुवातीला ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजमाध्यम ढवळून निघाले. कॅनडात ‘टोरंटो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी’ने आयोजित केलेल्या ‘अंडर द टेंट’ या प्रकल्पामध्ये ‘काली’ या माहितीपटाचा समावेश होता. तो माहितीपट कॅनडातील आगाखान संग्रहालयात प्रदर्शित झाला. त्याच्या आक्षेपार्ह पोस्टरने जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या कालीमातेच्या रूपातल्या महिलेच्या तोंडात सिगारेट आणि एका हातात समलैंगिक समुदायाची ओळख असलेला ध्वज होता. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर जाणीवपूर्वक आणि संधी मिळेल तेव्हा आघात करण्याचे आणि त्याविषयी ‘ना खंत, ना खेद’ अशी मानसिकता असल्याचे हे अगदी ताजे उदाहरण.
 

sam 
 
अनिवासी भारतीय असलेल्या लीना मणिमेकलाई या ह्या माहितीपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक आणि त्यातील एक कलावंतही. आता कॅनडास्थित असल्या, तरी त्या मूळच्या तामिळनाडूतल्या मदुराईच्या. त्यांनी माहितीपटासाठी विषय निवडला तो कालीचा - जी केवळ भारतीयच नाही, तर जगभरातल्या कोट्यवधी हिंदूंसाठी अपार श्रद्धेचा विषय आहे. या विषयावरच्या माहितीपटाची निर्मिती भारताबाहेर, तीही ज्या देशात पारंपरिक हिंदूविरोधी, भारतविरोधी गट सक्रिय आहे अशा कॅनडामध्ये हेतुपुरस्सर करण्यात आली, हेही लक्षात घेतले पाहिजे. अशा ठिकाणी या माहितीपटाच्या प्रदर्शनात काही अडचण येणार नाही, अशी त्यांची अटकळ असावी. त्यातूनच माहितीपटाचे असे आक्षेपार्ह पोस्टर करण्याचे धाडस झाले असावे.
 
 
मात्र त्यांच्या दुर्दैवाने त्यांना अपेक्षित असे घडले नाही. भारतासह जगभरातल्या हिंदूंनी समाजमाध्यमांमधून या पोस्टरचा तीव्र शब्दांत निषेध केला. भारत सरकारच्या कॅनडा येथील उच्चायुक्तालयानेही आयोजकांकडे नाराजी व्यक्त केली. नाराजीची आणि विरोधाची तीव्रता लक्षात घेत शेवटी या माहितीपटाचे यापुढे प्रदर्शन न करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. जाहीर माफी मागावी लागली. यापुढे हिंदूंच्या धर्मभावनांची खिल्ली उडवण्याचा, अवमान करण्याचा प्रयत्न झाला तर त्याविरोधात हिंदू जनमत एकवटू शकते, हे आता हिंदुद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यावे. यापुढे, कलेच्या नावाखाली हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणार्‍यांना आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:चा बचाव करून घेणार्‍यांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली मर्यादा आणि झालेले उल्लंघन लक्षात आणून दिले जाईल.
 
 
याआधी काहीच दिवस एका खाजगी वृत्तवाहिनीवर ज्ञानवापीसंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान, अन्य सहभागींनी हेतुत: हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अवमानकारक उद्गार काढल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी हादिसमधील पैगंबरविषयक विधानाचा दाखला देत वक्तव्य केले, तेव्हा त्यावर मुस्लिमांमधील कट्टरपंथीयांनी धर्मभावना दुखावली गेल्याचे सांगत ‘मातम’ केला. जगभरातल्या मुस्लीमधार्जिण्यांनी या घटनेवरून मोदी सरकारला कानपिचक्या देत भारताविषयी काळजी व्यक्त केली. बेगडी डाव्यांच्या दावणीला बांधलेल्या प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. त्यानंतर नूपुर शर्मांच्या वक्तव्याला समाजमाध्यमांवर समर्थन देणारे दोन हिंदू मुस्लीम दहशतवादाचे बळी ठरले. त्यांना हलाल पद्धतीने मारण्यात आले, तेव्हा हिंदूधर्मीय खडबडून जागे झाले आणि ‘हिंदू लाइव्ह्ज मॅटर’ म्हणत ठिकठिकाणी निदर्शने झाली. यावर टाइम मॅगझीनसारख्या हिंदुद्वेष्ट्या प्रसारमाध्यमाने आक्षेप घेतला. हे संतापजनक आणि खेदजनकही. समाजमाध्यमातून याविरोधात जोरदार आवाजही उठवण्यात आला. या सगळ्याची गांभीर्याने दखल घेत, गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दोन्ही हत्यांचा तपास सोपवला. यामागे असलेला पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग आता समोर येतो आहे.
 
 
तरीही भारतीय वृत्तवाहिन्या, तथाकथित डावे मात्र मुस्लिमांचा अंधानुनय करत आहेत वा अगदीच शक्य नसेल तेव्हा सोयीने मौन धारण करत आहेत. स्वत:चा जीव वाचवण्याच्या इच्छेतून येणारी अगतिकता किती नेभळट आणि बुद्धिभ्रष्ट करते, याची उदाहरणे म्हणजे ही प्रसारमाध्यमे. यातूनच सहिष्णू हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर सातत्याने होणार्‍या हल्ल्यांचे समर्थन करण्याची बुद्धी होते. अशा घटनांमध्येे केवळ हिंदूंच्या धर्मभावनाच नव्हे, तर त्यांचे जीवही पायदळी तुडवले जाऊ लागल्यावरही त्याविषयी चकार शब्द काढण्याची हिंमत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍या यापैकी एकाकडेही नाही.
 
 
एकाच कालावधीतील घडलेल्या - नूपुर शर्मा आणि लीना मणिमेलकाई - या दोन्ही घटनांचे या वृत्तवाहिन्यांनी केलेले वार्तांकन, त्यावर घडवून आणलेल्या चर्चांचा धांडोळा घेतला तरी ही बाब ठळकपणे जाणवेल.
 
 
तेव्हा काली माहितीपटाच्या प्रदर्शनाला झालेला विरोध हे जाग्या झालेल्या हिंदू मनाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचा जप करत स्वैराचार करायचा, हिंदूंच्या धर्मभावना दुखवायच्या हे आता चालणार नाही. प्रत्येक हिंदूचा जीवही महत्त्वाचा आहे आणि त्याच्या धर्मविषयक धारणाही. म्हणून हे समूहमन आणि समूहभान यापुढील काळातही राहायला हवे. सरकारच्या बरोबरीने जबाबदार नागरिकांनी आपला विरोध ठामपणे, निर्भीडपणे व्यक्त करायला हवा.
 
 
 
प्रश्न केवळ म्हातारी मरण्याचा नाही, तर त्यामुळे सोकावत चाललेल्या काळाची पावले ओळखून योग्य भूमिका घेण्याचा, ती निभावण्याचा आहे.