संंजय राऊत : काय चुकले?

विवेक मराठी    01-Aug-2022   
Total Views |

संजय राऊत हे धडाडीचे आणि आक्रमक राजकारणी आहेत. परंतु राजकारणाचे काही नियम त्यांनी पायदळी तुडविले. सत्तेच्या राजकारणातील पहिला नियम असा असतो की, कुणाशीही शत्रुत्व करू नये. विरोध आणि शत्रुत्व यामध्ये एक अदृश्य सीमारेखा असते. शत्रू कधी आपला होत नाही, विरोधक मित्र होऊ शकतात, हे भान त्यांनी ठेवले नाही.

shivsena

अखेर शेवटी संजय राऊत यांना अटक झाली. ही अटक आज ना उद्या होणार, याचा अंदाज सर्वांना होता. त्यांना अटक झाल्यामुळे अनेकांना आनंद झाला. पण खरं सांगायच तर मला काही आनंद झाला नाही. त्यांच्या अटकेबद्दल आनंद व्यक्त करणारी वक्तव्ये दूरदर्शनवरून सर्वांना दाखविली गेली. संजय राऊत यांच्यामुळे जे जे दुखावले ते आनंदीत होणे स्वाभाविक आहे. हा एक प्रकारचा आसुरी आनंद असतो. तुम्ही आम्हाला सतावले, आता भोगा आपल्या कर्माची फळे, हा एक प्रकारचा सूडबुद्धीचा आनंद असतो. या आनंदात सर्वांना सहभागी होता येत नाही. त्यातील मी एक आहे.

संजय राऊत हे शिवसेना नेते आहेत. सत्तेवर येण्यासाठी त्यांनी काही गणिते मांडली. भाजपा बरोबरची युती तोडली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. या सर्व कामाचा दोन बाजूने विचार करता येतो. पहिली बाजू राजकीय नितिमत्ता संजय राऊत आणि शिवसेना यांनी सोडली आणि असंगाशी संग केला. मतदारांचा विश्वासघात केला. त्याची शिक्षा त्यांना एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहयोगी आमदार यांनी दिलेली आहे. दुसरी बाजू अशी की, राजकारण सत्ताप्राप्तीसाठी करायचे असते. सत्तेच्या राजकारणाचा गुणधर्म निती, अनितीचा, टोकाचा विचार न करण्याचा आहे. म्हणून सत्ता मिळविण्यासाठी भाजपाला सोडणे, ही गोष्ट सत्तेच्या राजकारणाच्या नितीनियमात बसविता येते.

संजय राऊत अटक होईतोपर्यंत तरी निष्ठांवत आणि प्रामाणिक शिवसैनिक राहिले. ईडीची चौकशी चालू असताना आणि अटकेसाठी ईडी कार्यालयात जात असताना त्यांची देहबोली आवेश कौतुकास्पद होता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाचारी नव्हती, अथवा भितीची छाया चेहर्‍यावर नव्हती. भुजबळ जेव्हा तुरूंगात गेले तेव्हा त्यांचा चेहरा आणि देहबोली तशी नव्हती. त्या तुलनेत संजय राऊत हे सरस ठरतात.
 
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ते अडकले आहेत. ती संपत्तीदेखील खूप मोठी आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला का? पैशाचा अपव्यवहार केला का? तो केला असल्यास किती कोटीचा केला आहे? हे सर्व निर्णय न्यायालयाला करायचे आहेत. आणि जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरील सर्व आरोप शाबित झालेले आहेत, असे म्हणता येणार नाही.

संजय राऊत हे धडाडीचे आणि आक्रमक राजकारणी आहेत. परंतु राजकारणाचे काही नियम त्यांनी पायदळी तुडविले. सत्तेच्या राजकारणातील पहिला नियम असा असतो की, कुणाशीही शत्रुत्व करू नये. विरोध आणि शत्रुत्व यामध्ये एक अदृश्य सीमारेखा असते. शत्रू कधी आपला होत नाही, विरोधक मित्र होऊ शकतात, हे भान त्यांनी ठेवले नाही. भाजपाविषयी त्यांनी वापरलेली भाषा शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मराठी माणूस स्पष्टवक्ता, परखड बोलणारा असतो. राजकारणी मराठी माणसाला जीभेवर संयम ठेवण्याची कला शिकावी लागते.

सत्तेच्या राजकारणातील दुसरा नियम असा की, मित्र जोडावे लागतात. आपल्याच पक्षातील लोकांना तुच्छ लेखून चालत नाही. त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. याबाबतीत संजय राऊत अपयशी ठरले. एकेकाळी त्यांच्याबरोबर असणारे शिवसेनेचे नेते आज त्यांच्याविषयी म्हणतात की, शिवसेना फोडण्याचे काम संजय राऊत यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांनी दोस्ती केली, परंतु त्यांच्या घरावर धाड पडली असता एकही राष्ट्रवादी नेता किंवा कार्यकर्ते त्यांना नैतिक समर्थन देण्यासाठी आले नाहीत. आपले खरे मित्र कोण आणि स्वार्थासाठी झालेले मित्र कोण, हे संजय राऊत यांना समजलेच नाही.

संजय राऊत यांच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली नाही, की सत्तेचा अमरपट्टा कुणालाही मिळालेला नसतो. म्हणून कुशल राजकारणी सत्तेत असतानाच उद्या सत्तेत नसल्यानंतर आपली स्थिती कोणती असेल याचा गंभीरपणे विचार करतो, बोलण्यात तशी सावधगिरी बाळगतो, परतीचे सर्व मार्ग बंद करीत नाही. संजय राऊत आज एकाकी आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्टेटमेंट करण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. सामान्य शिवसैनिक रस्त्यावर उतरायला तयार नाही. अटकेच्या वेळी बंगल्याभोवती गोळा झालेली गर्दी ही शिवसेनेची तरूणाई नव्हती.

यामुळे एक झुंजार राजकीय नेता आपल्या अनेक घोडचुकांमुळे अटकेत गेला. तसे झाले नसते तर बरे झाले असते. परंतु शेवटी कर्मफळ हे प्रत्येकाला भोगावेच लागते. जे विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नाहीत, त्यांच्याशी मैत्री केली आणि विश्वास ठेवण्याच्या गुणवत्तेच्या लोकांशी विद्रोह केला. असे घडले नसते तर बरे झाले असते. राष्ट्रवादी काँग्रेसचा जातवाद आणि काँग्रेसचा सांप्रदायिक वाद या डबक्यात महाराष्ट्राचे राजकारण गटांगळ्या खात असताना मतदारांनी त्यातून बाहेर पडणयाचा जनादेश दिला. संजय राऊतांनी तो मानला नाही, याचेही दुःख झाल्याशिवाय राहवत नाही. शेवटी संजय राऊत यांचे उद्याचे राजकीय भविष्य काय असेल, हे सांगणे अवघड असले तरी आता तो पूर्वीचा तोरा आणि बोलण्यातील गुर्मी ही राहणार नाही, हे मात्र खरे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.