डॉ. हेडगेवारांचा ‘सर्जनशील राष्ट्रवादाचा’ संघ प्रयोग

विवेक मराठी    12-Aug-2022   
Total Views |
2014 साली जे राजकीय परिवर्तन झाले, त्याची बीजे 1925 सालीच पेरली गेली होती. त्यावेळी जे परिवर्तन झाले त्याचा थेट संबंध डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. डॉक्टरांचे वैशिष्ट्य असे की, भारताच्या उज्ज्वल भविष्यकाळाचे असे चित्र रेखाटतानाच सर्वसामान्य हिंदू समाजातील व्यक्तीमध्येही ते चित्र साकारण्याचे सामर्थ्य येईल, अशी राष्ट्रप्रेमाधिष्ठीत कार्यपद्धती त्यांनी विकसित केली. त्याच्या यशाची प्रचीती आपण घेत आहोत.

RSS
1925 साली रा.स्व. संघाची स्थापना झाली, तेव्हा युरोपमधील सर्व देशांत राष्ट्रीय भावनेने शिखर गाठले होते. त्याआधी अडीच-तीन शतके सर्व देशात राष्ट्र भावनेचा विकास होत होता. आधुनिक राष्ट्रभावनेचे तीन प्रमुख घटक आहेत. समाजात एकात्म भाव निर्माण करणे, आपल्या राष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक अधिष्ठानावर समाजाचे परिवर्तन घडविणे व त्यातून निर्माण होणार्‍या एकात्म मानसिक चैतन्यभावावर राष्ट्रीय अस्मिता व कर्तृत्वाचे जागरण करणे. याच काळात औद्योगिक क्रांतीतून या देशांचा जे यांत्रिक व आर्थिक सामर्थ्य निर्माण झाले होते, त्यातून या राष्ट्रवादाला आपले आर्थिक हितसंबंध वाढविण्यासाठी विस्तारवादाची गरज निर्माण झाली. यातच अठराव्या, एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील आर्थिक साम्राज्यवादाची बीजे होती. तत्पूर्वी जगावर मुस्लीम धार्मिक साम्राज्यवादाचा प्रभाव होता. युरोपीयन आर्थिक साम्राज्यवादाने मुस्लीम धार्मिक साम्राज्यवादाला पराभूत करून युरोपीयन संस्कृतीचा जगभर प्रभाव निर्माण केला. त्यामुळे मार्क्सने आपल्या सैद्धांतिक मांडणीत राष्ट्रवादाची सांगड साम्राज्यवादाशी घातली. गेल्या शतकात या साम्राज्यवादातून दोन महायुद्धे झाली व त्यातून मार्क्सच्या या सिद्धांताला प्रत्यक्ष व्यवहाराच्या पुराव्याचे बळ मिळाले. आक्रमक राष्ट्रवादावर आधारित नाझी, फॅसिस्ट विचारसरणींमुळे राष्ट्रवादाच्या सर्जक शक्तीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जगभराच्या वैचारिक क्षेत्रावर प्रथम समाजवाद व नंतर जागतिकीकरण या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवूनच चर्चा होऊ लागली व राष्ट्रवादाकडे तुच्छ भावनेने पाहिले जाऊ लागले. काही वर्षांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी राष्ट्रवाद व देशभक्ती यांच्यात भेद आहे असे सांगत देशभक्तीची भावना सकारात्मक व चांगली असून राष्ट्रवादाची भावना विघातक व मानवतेच्या विरोधी असल्याचे विवेचन केले. या मागची भावना ही आधी वर्णन केलेल्या विस्तारवादी व साम्राज्यवादी राष्ट्रवादाची होती.
 
 
1857 च्या युद्धातील विजयानंतर भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल झाली. त्यानंतर विद्यापीठांतील शिक्षणातून शिक्षित झालेल्या तरुणांनी आपल्या देशाच्या अवनतीच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच युरोपीयन व विशेषत: इंग्लंडमधील राष्ट्रवाद या संकल्पनेशी त्यांचा परिचय झाला. नव्या भारताची उभारणी करायची असेल तर ती राष्ट्रभावनेच्या आधारावरच करता येईल याची त्यांना जाणीव झाली. याच भावनेतून भारताच्या राष्ट्रभावनेच्या प्रेरणा व त्या भावनेचे स्वरूप यावर विचारमंथन सुरू झाले. या राष्ट्रवादाच्या व्याख्येत भारताच्या भौगोलिक क्षेत्रात रहाणार्‍या सर्वांचा समावेश झाला पाहिजे ही त्या व्याख्येची पूर्वअट बनली. परंतु राष्ट्रवादाच्या व्याख्या कोर्‍या मनाच्या पाटीवर लिहिल्या जात नाहीत. त्यावर इतिहासाने केलेले संस्कार असतात व त्या संस्कारांचा विचार न करता केलेल्या व्याख्या व्यवहारात टिकत नाहीत. भारतात हिंदू व मुस्लीम या दोन समाजांची मोठी संख्या होती व त्यांचे संबंध परस्पर संघर्षांचे होते. भारतावर इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी आपण या देशावर राज्य करीत होतो व त्यामुळे इंग्रजानंतर भारतावर राज्य करण्याचा आपल्यालाच अधिकार आहे असे मुसलमान समाज मानत असे. याउलट मुस्लिमांच्या राजवटीतील अत्याचाराच्या अत्यंत कटू आठवणी हिंदू समाजमनात होत्या. त्यामुळे हिंदू व मुस्लीम समाजाचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधात होते. पण याचा विचार न करता काँग्रेसने हिंदी राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून हिंदू व मुस्लीम समाजाची एकत्र होडी बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रत्यक्ष व्यवहारात अयशस्वी ठरत होता.
 
 
RSS

डॅाक्टर हेडगेवार हे सर्व प्रयत्न पहात होते व त्यांनी आपल्या निरीक्षणातून पाच महत्त्वाचे निष्कर्ष काढले. जर भारताला स्वातंत्र्य मिळायचे असेल व ते जर भविष्यात टिकवायचे असेल तर ते केवळ आधुनिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर आधारित सामाजात एकात्मभाव निर्माण करूनच टिकविता येईल हा पहिला. हिंदू समाज हाच या देशातील एकमेव राष्ट्रीय समाज आहे. अन्य समाज एकतर आक्रमक आहेत किंवा आश्रयार्थी आहेत, त्यामुळे हे राष्ट्र हे हिंदूंचे राष्ट्र आहे. त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे असे गृहित धरूनच त्यांनी नव्या राष्ट्रवादाची मांडणी केली पाहिजे हा दुसरा. गेल्या अनेक शतकांच्या गुलामगिरीमुळे हिंदू समाजाचे मानसिक खच्चीकरण झाले आहे व तो आत्मविस्मृत झाला आहे. त्यामुळे संघटित शक्तीची उपासना करण्याचा संस्कार त्याच्यावर करणे गरजेचे आहे हा तिसरा. हिंदूंची मानसिकता ही व्यक्तिनिष्ठ, मोक्षवादी, जातीच्या परिघाने मर्यादित झालेली, स्वत:च्या किंवा समाजाच्या सामूहिक कर्तृत्वापेक्षा येणार्‍या अवतारावर विश्वास ठेवणारी अशी होती. ती बदलून ती तत्वनिष्ठेला महत्त्व देणारी, ऐहिक सामर्थ्याची उपासना करणारी, हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाला बंधू मानून समरस समाज निर्माण करणारी व कोणीतरी अवतार येऊन आपला उद्धार करेल अशी प्रार्थना करण्याऐवजी समाजाच्या सामूहिक कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी बनण्याकरिता, हिंदू समाजाला एका अनुशासनात बनण्याकरिता अखिल भारतीय हिंदूंची संघटना निर्माण केली पाहिजे हा चौथा. ही सर्व समर्थ व संघटित हिंदू समाजाची मांडणी करीत असतानाच ही शक्ती पाशवी होऊ नये म्हणून संयमाचाही संस्कार केला पाहिजे हा पाचवा. त्यामुळे संघटित व सामर्थ्यवान हिंदू समाजाची मांडणी करीत असताना त्यांनी स्पष्ट केले की आम्हाला जगातील कोणतीही शक्ती हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहू शकेल एवढा सामर्थ्यवान बनवायचा असला तरी इतर समाज हिंदू समाजाचा आदर व सन्मान करून रहात असतील हिंदू समाजही त्यांच्याशी सन्मानानेच व्यवहार करेल व हिंदू समाजाला जसा एक समर्थ व स्वाभिमानी राष्ट्र म्हणून रहाण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार अन्य राष्ट्रांनाही आहे असे आम्ही मानतो. त्यामुळे संघप्रणित राष्ट्रवादाचे स्वरुप हे मानवताधिष्ठित व सहअस्तित्त्वाची जोपासना करणारे आहे. शंभर वर्षांपूर्वी डॅाक्टरांनी जे विचारमंथन केले त्याची पूर्ती संघाच्या निर्मितीत झाली.

‘अखंड भारत का आणि कसा?

पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?

त्याची संकल्पना काय?
अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.
https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/

 
 
 
या पार्श्वभूमीवर गेल्या शंभर वर्षातील देशभरातील घटनाक्रम व संघ कार्याचा विस्तार याची सांगड घातली तर काही गोष्टी स्पष्टपणे होतात. डॅाक्टरांनी जेव्हा रा.स्व. संघाची स्थापना केली तेव्हा त्यांनी पाहिलेले स्वाभिमानी, अनुशासित, समरस, सामर्थ्यसंपन्न, आत्मनिर्भर हिंदू समाजाचे स्वप्न हिंदू समाजाच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे होते. याचे कारण हिंदू समाजाने भारतावरचे आपले राजकीय प्रभुत्व गमावले होते व त्यामुळे हिंदू समाजात न्यूनगंडाची, मानसिक गुलामगिरीची अवस्था निर्माण झाली होती. हिंदू समूहमनावर झालेल्या या संस्कारांची बीजे एवढ्या खोलवर रूजली होती की ती बीजे केवळ भाषणांनी, अधिवेशने घेऊन, एखाद्या चळवळीच्या किंवा आंदोलनाच्या द्वारे नष्ट होणारी नव्हती. त्यासाठी सर्वसामान्य हिंदूंची विचार करण्याची पद्धत बदलण्याची आवश्यकता होती. ‘ विचार बदला तर तुमचे भविष्य बदलेल ‘ असे म्हटले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. केवळ व्यक्तीचेच नव्हे तर सर्व समाजाचा विचार बदलून त्याचे भविष्य कसे बदलता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ संघाने उत्पन्न केला आहे.
 
 
डॅाक्टर हेडगेवारांचे वैशिष्टय हे की ते कृतीशील चिंतक होते. त्यामुळे ते केवळ विचार करून थांबले नाहीत तर ते चिंतन प्रत्यक्षात आणण्यासाठी एका संघटनेची स्थापना केली व ती करत असताना आपल्या चिंतनातील प्रत्येक पैलू प्रत्यक्षात येईल अशी त्या संघटनेची रचना केली. संघाची कार्यपद्धती अगदी सोपी, कोणतेही भांडवल किंवा शिक्षणाची आवश्यकता नसणारी, शहरी, ग्रामीण भागात चालू शकणारी अशी होती. डॅाक्टरांना एकात्म व समरस, आपल्या आत्मकर्तृत्वावर विश्वास असलेला व अनुशासित हिंदू समाज निर्माण करायचा होता. त्यासाठी हिंदू समाजावर शारीरिक, मानसिक व बौद्धिक संस्कार करणारी लष्करी धर्तीची कार्यपद्धती डॅाक्टरांनी संघासाठी स्वीकारली. लष्कराव्यतिरिक्त इतर ठिकाणी हिंदू समाजाला अपरिचित अशी ही कार्यपद्धती होती. शिबिरे, घोष, संचलन आदी माध्यमांमुळे प्रत्येक स्वयंसेवकावर सामूहिक शक्तीचा संस्कार होई, अनुशासनाची सवय लागे व लष्करात जी सर्वांना समान वागणूक मिळे त्याचाही संस्कार समाजमनावर होई. लष्करात केवळ राष्ट्रप्रेमाचा विचार केला जातो व जात, भाषा, प्रांत हे भेद विसरले जातात. संघाचा कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध व वेळेवर झाला पाहिजे या संस्कारातून हिंदूंचे सामाजिक उत्सव म्हणजे गोंधळ, अव्यवस्था हे चित्र बदलू लागले. संघगीते, बौद्धिक वर्ग यांच्या माध्यमातून ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार होऊ लागला. आज सर्वच क्षेत्रात प्रशिक्षणाला महत्त्व दिले जाते. शंभर वर्षांपूर्वी कोणत्याही सामाजिक संस्थेने याची कल्पनाही केली नसेल. डॅाक्टर हेडगेवारांनी संघ शिक्षा वर्गाला संघाच्या कार्यपद्धतीत केंद्रवर्ती स्थान दिले. या सर्व माध्यमातून सर्वसाधारण व्यक्तींनी संघाची असाधारण शक्ती निर्माण केली.
 
 
 
हिंदू समाजाला समर्थ राजकीय नेतृत्व मिळाले नाही म्हणून इतिहास काळात हिंदू समाजाची दुरवस्था झाली हा डॅाक्टर हेडगेवारांच्या चिंतनातील एक महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे त्यांनी संघासमोर व्यक्ती म्हणून कोणाचाही आदर्श ठेवला नसला, तरी त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद केला. लो. टिळकांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली होती. परंतु डॅाक्टर हेडगेवारांनी त्यांच्या राज्याभिषेकाला महत्त्व देऊन ‘हिंदू साम्राज्य दिना’चा उत्सव सुरू केला. संघाच्या माध्यमातून डॅाक्टर हेडगेवारांनी जी मानसिक क्रांती केली त्यातून संघाने आपल्या शंभर वर्षांच्या आयुष्यात डॉक्टरांच्या स्वप्नात असलेल्या हिंदू समाजाचे स्वप्न साकार करण्याकरिता जगभरात काम करणारे हजारो कार्यकर्ते निर्माण केले आहेत. त्यांनी जो राष्ट्रवादाचा मंत्र हिंदू समाजाला दिला, त्याचा आशय युरोपीयन आक्रमक, विस्तारवादी, साम्राज्यवादी राष्ट्रवादाशी नसून हिंदू तत्त्वचिंतनातील मानवताधिष्ठीत राष्ट्रभावनेशी आहे. त्यामुळे राष्ट्रवाद वेगळा व देशभक्ती वेगळी अशी कसरत करण्याचे संघाला कारणच पडले नाही. त्यामुळे संघ परिवारातील सर्व व्यक्ती आणि संस्थांनी आम्हाला हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर परिवर्तन घडवायचे आहे ही भूमिका स्पष्टपणाने व अभिमानाने मांडली. याचे कारण हिंदू राष्ट्रवादाचे जागरण हे भारताच्या तसेच जगाच्या दृष्टीने हितकारक आहे असा स्पष्ट दृष्टिकोन त्यामागे होता. त्यातूनच ज्या गोष्टी अगदी पंचवीस वर्षांपूर्वी अशक्य वाटत होत्या त्या प्रत्यक्ष घडताना आपण पहात आहोत. 2014 साली जे राजकीय परिवर्तन झाले, त्याची बीजे 1925 सालीच पेरली गेली होती. त्यावेळी जे परिवर्तन झाले त्याचा थेट संबंध डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. संघ स्थापनेच्या आधी व नंतरच्या काळात अनेक महापुरूषांनी भारताचा उज्ज्वल भूतकाळाचा संदर्भ देऊन तेवढ्याच उज्ज्वल भविष्यकाळाचे चित्र रेखाटले होते. डॉक्टरांचे वैशिष्ट्य असे की, असे चित्र रेखाटतानाच सर्वसामान्य हिंदू समाजातील व्यक्तीमध्येही ते चित्र साकारण्याचे सामर्थ्य येईल, अशी राष्ट्रप्रेमाधिष्ठीत कार्यपद्धती त्यांनी विकसित केली. त्याच्या यशाची प्रचीती आपण घेत आहोत.

दिलीप करंबेळकर

दिलीप दामोदर करंबेळकर

मूळ गाव : पट्टणकुडी

शिक्षण    : बीएस्सी, एम.बी.ए.

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कोल्हापूर व गोव (1976-1980) कालावधीत होते.

मराठी साप्ताकिक विवेक, दैनिक मुंबई तरुण भारत,शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प यांचे प्रबंध संपादक आहेत, तसेच त्रैमासिक ज्येष्ठपर्व, वैद्यराजचे ते सल्लागार आहेत.

विवेक व्यासपीठ व सेवाभावी आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त.

सामाजिक अभ्यास आणि समाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण यासाठी कार्यरत असणाऱ्या स्पार्क या संस्थेचे संचालक

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे संचालक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष.

श्रीरामजन्मभूमी  लढयाचा अन्वयार्थ विकृत मानसिकतेचा पंचनामा व भारत - पाकिस्तान: एक सांस्कृतिक युध्द ही पुस्तके प्रकाशित.