मुळांकडे परतताना

विवेक मराठी    10-Sep-2022   
Total Views |
कोविडच्या महासाथीने सर्वसामान्यांच्या जगण्यावर, जीवनशैलीवर खूप खोलवर परिणाम केला. काहींना या संकटात दडलेल्या संधी दिसल्या. त्यांनी या निमित्ताने आपल्या करिअरचा पुनर्विचार सुरू केला. मोठी जोखीम स्वीकारत शहरी जीवनाचा, त्यातल्या सोयीसुविधांचा विचारपूर्वक त्याग करत आपल्या गावची वाट धरली. तिथलं जगणं अधिक आरोग्यदायक आहे आणि उदरनिर्वाहाचे पर्याय तिथेही उपलब्ध आहेत, गरज आहे ती मानसिकता बदलायची, आपले अग्रक्रम बदलायची.. याची झालेली जाणीव या धाडसामागे होती. अशांची संख्या आज तुलनेने जरी कमी असली, तरी त्या निर्णयामागचा विचार खूप महत्त्वाचा, आवर्जून दखल घेण्याजोगा, अवलंबण्याजोगा आहे असं वाटलं, म्हणून हा लेखनप्रपंच.
 
 
village home
आपल्या गावात अशी उदाहरणं असतील, तर आम्हांला जरूर कळवा.
दि. 19 मार्च 2020. त्या दिवशी मी यवतमाळला होतो. विदर्भात गवताळ कुरण क्षेत्र संवर्धन क्षेत्रात कार्य करणार्‍या ’संवेदना’ संस्थेसह एका प्रकल्पामध्ये तेव्हा काम करत होतो. त्याआधी प्रसारमाध्यम क्षेत्रात मुंबईत व पुण्यात माझी दोन वर्षं नोकरी झाली होती. कोरोनाची स्थिती भयानक होते आहे असं त्या दिवशी लक्षात आल्यावर आम्ही काम थांबवायचा निर्णय घेतला. आता घरी जायचं म्हटलं तर मला सुमारे 1000 किलोमीटर प्रवास करावा लागणार होता. पटापट निर्णय घेऊन अमरावती-मुंबई ट्रेन पकडली. मुंबईत पोहोचल्यावर जनशताब्दी एक्स्प्रेस पकडून रत्नागिरीत आलो आणि तिथून दुसर्‍या दिवशी - म्हणजेच 21 मार्चला संध्याकाळी 25 तासांच्या प्रवासानंतर घरी पोहोचलो. 22 मार्चला जनता कर्फ्यू होता. नोकरी करणार्‍या माणसांना धीर नसतो. घरी गेल्या गेल्या पुन्हा कामावर कधी रुजू व्हायचं याचे विचार सुरू झाले. अखेर 24 मार्चला रात्री ’ती’ घोषणा झाली आणि समस्त देश ’लॉकडाउन’ नामक ध्यानीमनीसुद्धा नसलेल्या एका परिस्थितीत पडला. शहरात नोकरी करणारे काही लोक आपल्या गावी सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते, तर काही शहरातच अत्यंत विचित्र परिस्थितीत अडकले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाउनचा काळ सगळ्यांनाच घरी बसून काढावा लागला, कारण बाहेर काही हालचालीच होत नव्हत्या. पहिली लाट सरून जरा कुठे जीवनमान सुरळीत होतंय असं वाटलं, तोच दुसरी अधिक तीव्र लाट आली आणि तीही काही महिने टिकली. आता नोकरीची शाश्वती नाही या मन:स्थितीत समस्त तरुण वर्ग सापडला होता. पण हीच मन:स्थिती काही लोकांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी ठरली. गावात आपल्या घरी राहून आपल्या क्षमतेला अनुकूल असे काय नवीन व्यवसाय करता येतील आणि त्यातून आपली उपजीविका भागवता येईल, याचा विचार काही तरुण करू लागले आणि त्यात यशस्वीही झाले. कोकणातल्या आमच्या अणसुरे गावात लॉकडाउनच्या काळात 1000पेक्षा जास्त माणसं आली. गाव एकदम भरलेलं होतं. त्या वर्षी गावात कधी नव्हे इतकी शेती झाली. प्रत्येक दळा न दळा पिकाखाली आला. टाळेबंदी जसजशी शिथिल व्हायला लागली, तसतसे अनेक लोक पुन्हा शहरात जाऊन नोकरीवर रुजू व्हायला लागले किंवा नोकरी शोधायला लागले. काही तरुणांनी मात्र गावातच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आज गावाचं रूप किंचितसं पालटलेलं दिसतं.
 
 
माझं वैयक्तिक उदाहरण द्यायचं झालं, तर गेली दोन वर्षं मी गावातच राहतोय. लॉकडाउनच्या काळात घरी राहून ऑनलाइन करण्यासारखं काही काम मिळतंय का, याच्या शोधात होतो. लिखाणाची आवड असल्याने ‘गप्पा निसर्गाच्या’ हे पुस्तक पूर्ण केलं व ते जून 2021मध्ये प्रकाशित झालं. आपल्या गावाच्या जैवविविधतेची वेबसाइट तयार करावी, अशी एक कल्पना सुचली. ग्रामपंचायतीत तसा प्रस्ताव मांडला व तो मान्य झाला. पंचायतीने त्यासाठी अर्थसाहाय्यही दिलं. वर्षभराच्या कामानंतर ही वेबसाइट तयार झाली आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने त्याची दाखल घेतली. हा संपूर्ण भारतातला पहिला उपक्रम ठरला. वनस्पतींचे फोटो काढणं, त्यांचा अभ्यास करणं हा उद्योग टाळेबंदीच्या काळात सुरू होता. त्यातून एक कल्पना सुचली की आपण प्रत्येक तारखेवर एका वनस्पतीचा फोटो, त्याचं मराठी नाव आणि शास्त्रीय नाव असलेलं कॅलेंडर बनवावं. ते बनवलं आणि आश्चर्यकारकरित्या त्याच्या 10 हजार प्रती महाराष्ट्रभर खपल्या. दरम्यान आयसर पुणे संस्थेकडून सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 अशा सहा महिन्यांच्या प्रकल्पाचं काम मिळालं. ते पूर्ण झाल्यावर आयआयटी मुंबईकडून एक फ्रीलान्सिंग प्रकल्प मिळाला. पर्यावरण, जैवविविधता क्षेत्रात वेगवेगळी कामं मिळवण्यासाठी संस्थात्मक रूपात काहीतरी असलं पाहिजे, ही गरज लक्षात घेऊन मी गावाला घरीच एन्व्हायर्नमेंटल कन्सल्टन्सी फर्म सुरू केली आहे. दोन वर्षांच्या एकंदर अनुभवातून एका गोष्टीबाबत खात्री झाली आहे की शोधक वृत्ती असेल तर गावात राहूनही पैसे कमावण्याची साधनं मिळू शकतात. आता मला पुन्हा शहरात नोकरी करायला जाण्याची जरूर वाटत नाही. शहरात रोजीरोटी कमावण्यासाठी गेलेले आमच्या गावचे काही तरूण पुन्हा गावाकडे परतले आहेत. आमच्या आणि आजूबाजूच्या गावात मिळून 25 उदाहरणे असतील. गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा दखल घेण्याजोगाच. त्यातल्या काहींचा परिचय पुढे करून देत आहे.
 

village home 
 
उदय गाडगीळ यांचं दुकान... गावात ‘मेडिकल’ असणं हे किती गरजेचं!

 
उदय गाडगीळ हा आमच्याच गावातला एक तरुण. त्याने रत्नागिरीच्या कॉलेजमधून बीफार्म पदवी घेतली. त्यानंतर काही दिवस नोकरी करून सावर्ड्याला फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होता. लॉकडाउन लागल्यानंतर तो घरी आला आणि घरून ऑनलाइन लेक्चर्स काही दिवस सुरू होती. फार्मसी हे खासगी क्षेत्र असल्याने कायमस्वरूपी नोकरी मिळेल का, अपेक्षेएवढा पगार मिळेल का वगैरे प्रश्न होते. इथे काही दिवस राहिल्यावर असं लक्षात आलं की गावात पाच किलोमीटरच्या परिसरात कुठे मेडिकल स्टोअर्स नाहीये आणि हा इथे चालू शकेल असा व्यवसाय आहे. अखेर घरच्यांबरोबर चर्चा करून निर्णय झाला आणि एका वर्षात इमारत बांधणी, कायदेशीर परवानग्या, औषध खरेदी या सगळ्या बाबींची पूर्तता करून त्याने घराजवळच्याच जागेत ’गाडगीळ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स’ सुरू केलं. आज हे मेडिकल स्टोअर्स उत्तम प्रकारे चालतंय, कारण औषधं ही खेडेगावातही लोकांची रोजची गरज झालीये आणि जवळपास ती मिळण्याची सोय नव्हती.
 
 
village home
 
उदय गाडगीळ 
 
“जवळपास कुठे दुसरं मेडिकल नसल्याने विचार आला की गावात आपल्याला मेडिकल सुरू करायचं असेल तर आत्ताच संधी आहे. ती नाही घेतली तर कधीही हातची जाऊ शकते. आज काही महिने झाल्यानंतर लोकांना नेमकी कुठल्या प्रकारची औषधं लागतात आणि किती प्रमाणात लागतात याचा अंदाज आलाय, त्यामुळे त्याप्रमाणे मागवता येतात. खेडेगाव असल्याने माल पोहोचायला जरा उशीर लागतो. हाताशी योग्य माणूस मिळाला तर घरपोच औषधं पोहोचवणं, जवळ जिथे मेडिकल नाहीये तिथे ते एखादा आउटलेट सुरू करणं अशा प्रकारे व्यवसाय वाढवता येईल. अर्थात, लॉकडाउन झालं नसतं, तर हा निर्णय इतक्या लगेच कदाचित झाला नसता.” - उदय.
 
 
village home
 
 डॉ. प्रसाद दळवी - ‘गावाचा’ डॉक्टर
 
असंच एक दुसरं उदाहरण म्हणजे डॉ. प्रसाद दळवी. कोल्हापूरच्या कॉलेजमधून बीएएमएस पदवी घेऊन एक वर्ष इंटर्नशिप करून रत्नागिरीच्या खाजगी रुग्णालयात तो टेम्पररी जॉब करत होता. लॉकडाउन लागल्यावर त्याला घरी यावं लागलं. भविष्यात केव्हातरी गावातच दवाखाना सुरू करायची इच्छा होती, पण आणखी काही वर्षं नोकरी वा अन्य काही कोर्सेस करण्याचा विचार होता. लॉकडाउनच्या काळात हा घरी आहे म्हटल्यावर गावातले काही लोक बरं नाही म्हटल्यावर त्याच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले. सलाइन, बेसिक औषधं, इंजेक्शन्स असं काही साहित्य त्याने बरोबर आणून ठेवलेलं होतं. गावात दवाखाना नाही, लोकांना वैद्यकीय सेवेची गरज आहे हे लक्षात आल्यावर दवाखाना सुरू करायचा त्याचा निर्णय अंतिम झाला आणि एक वर्षात प्रसाद याचं ’आरोग्यम क्लिनिक’ गावात उभं राहिलं. आज त्याने दोन ठिकाणी दवाखाना सुरू केला आहे आणि दिवसातला थोडा थोडा वेळ तो दोन्ही ठिकाणी असतो. यामुळे गावातल्या लोकांना हक्काचा डॉक्टर मिळाला आहे. सर्व प्रथमोपचार प्रसादकडे होतात.
 
 
 
राजापूर तालुक्यातल्या जानशी-पठार या गावी मंदार परांजपे आणि पत्नी हर्षा परांजपे हे रत्नागिरीत नोकरी करणारं जोडपं आता कायमस्वरूपी गावातल्या घरीच येऊन स्थिरावलंय. बीए पदवीधर झालेल्या मंदार परांजपे यांनी सुरुवातीला काही वर्षं गोव्याला आणि नंतर रत्नागिरीत गद्रे इन्फोटेक कंपनीत काही वर्षं नोकरी केली. त्यांची पत्नी हर्षा हीसुद्धा विविध कंपन्यांमध्ये जॉब करत होती. लॉकडाउनपासून हे जोडपं गावातच आहे. मंदार यांची एका जर्मन कंपनीबरोबर ’वर्क फ्रॉम होम’ स्वरूपात नोकरी सुरू आहे. हर्षा परांजपे यांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा या उद्देशाने घराजवळच्याच जागेत ’ई-सेवा केंद्र’ सुरू केलं. गावातल्या लोकांना डिजिटल व्यवहारांची फारशी माहिती नसते. त्यासाठी साहाय्यकाची जरुरी असते. हर्षा यांच्या केंद्रात आधार कार्ड, पॅन कार्ड, व्होटिंग कार्ड, पीएम किसान नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, फास्ट टॅग, मिनी एटीएम, मोबाइल/टीव्ही रिचार्ज, ऑनलाइन सातबारा, केवायसी, ज्येष्ठ नागरिक कार्ड, ई-श्रम कार्ड, बस-रेल्वे रिझर्व्हेशन इ. सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा मिळतात. जानशी, पठार, बाकाळे, निवेली, जैतापूर, माडबन, तिवरंबी अशा आजूबाजूच्या सुमारे 10 कि.मी. परिसरातले लोक या ई-सेवा केंद्राचा लाभ घेतात. लोकांना कागदपत्रीय कामांची पूर्तता करण्यासाठी याचा मोठा लाभ होतो आहे. याच गावातले विघ्नेश पांडे आणि पत्नी भक्ती या टीसीएस कंपनीत नोकरी करणार्‍या जोडप्याची गेली दोन वर्षं घरातूनच नोकरी सुरू आहे. राजापूर इथला आयआयटीतून एमटेक केलेला युवक मंदार दातार हा राजापुरात घरी राहून मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरी करतो.
 
 
 
सेवा क्षेत्रात नोकरी करणारे लोक हे लॉकडाउनमधील सर्वात ’सुखी प्राणी’ म्हणावे लागतील. कारण अलीकडे गावागावांमध्ये जिओचं नेटवर्क पोहोचल्यामुळे त्यांच्या नोकर्‍या ’वर्क फ्रॉम होम’ स्वरूपात सुरू राहिल्या, अजूनही सुरू आहेत. एक कॉम्प्युटर-इंटरनेट हाताशी असेल, तर कुठूनही काम करता येतं. त्यासाठी आपण कुठे राहतोय त्याच्याशी काही देणंघेणं नसतं. अलीकडे सेवा क्षेत्रात ’टास्क बेस्ड जॉब्ज’ खूप वाढत आहेत - म्हणजे ’कायमस्वरूपी पूर्णवेळ नोकरी’ या स्वरूपात काम न करता छोटी छोटी, अल्प कालावधीची कामं कंपन्यांकडून आउटसोर्स केली जातात. अमुक अमुक काम अमुक अमुक वेळात पूर्ण करून द्यायचं आणि त्याचं अमुक अमुक मानधन. मग ते काम कधीही आणि कुठूनही करा! अशा ’फ्रीलान्सिंग’ पर्यायाचा तरुण पिढी विचार करते आहे. याचा दुहेरी फायदा आहे. कंपन्यांचा ऑफिसचा बराच खर्च कमी होतो आणि काम करणार्‍या माणसाचाही शहरात जागा घेऊन राहणं, रोजचा प्रवास हा खर्च आणि श्रम कैक पटींनी वाचतात. गावात स्वास्थ्यपूर्ण जीवन जगता येतं.
 
 
village home
 
आमच्या अणसुरे गावातल्या एका धाडसी तरुणाचं उदाहरण म्हणजे प्रशांत देसाई याने सुरू केलेला कोळंबी प्रकल्प. प्रशांत याने इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग पूर्ण करून सुमारे 10 वर्षं गोवा, पुणे इ. विविध ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये नोकर्‍या केल्या. गावालाच राहून काहीतरी व्यवसाय करायचा हा विचार त्याच्या डोक्यात अनेक वर्षं घोळत होता, परंतु त्याला मूर्त रूप येत नव्हतं. लॉकडाउन लागल्यावर प्रशांत, पत्नी सोनाली आणि छोटी मुलगी मीरा पुण्याचं बाडबिस्तर घेऊन गावी आले. त्यानंतर काही दिवस प्रशांत याचं पारी कंपनीत ’वर्क फ्रॉम होम’ सुरू होतं. त्याच वेळी घरापासून सुमारे 7 किलोमीटर लांब असलेल्या त्याच्या सासुरवाडीला खाडीकिनारी कोळंबी प्रकल्प सुरू करता येईल का, याबाबत डोक्यात विचार सुरू झाला. त्याच्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती त्याने मिळवायला सुरुवात केली. खर्च-उत्पन्न गणिताचा अभ्यास केला आणि अखेर निर्णय घेऊन नोकरीचा राजीनामा देऊन, सुमारे 50 लाखांची गुंतवणूक करून कोळंबी प्रकल्प सुरू केला. हा अत्यंत धाडसी निर्णय होता व गावातल्या सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. गावातल्या लोकांचे हिशोब हजारातच असतात! 50 लाखांची गुंतवणूक म्हणजे खायचं काम नव्हतं आणि तीही ऐन टाळेबंदीत! कर्जासाठी बँकेच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या. प्रकल्पासाठी आवश्यक असणारी यंत्रं मागवणं, ती कार्यान्वित करणं, कोळंबीचं बीज आणून सोडणं, मध्ये मध्ये येणारे असंख्य तांत्रिक प्रश्न सोडवणं हे प्रचंड मेहनतीचं आणि कटकटीचं काम होतं. दिवसरात्र अखंड मेहनत घेऊन प्रकल्प उभा झाला. पण पहिल्या वर्षी तांत्रिक अडचणींमुळे तोटा सहन करावा लागला. हा तोटा काही लाखांमध्ये होता. पण प्रशांतला कर्ज देणार्‍या लोकांनी सांभाळून घेतलं आणि त्याला संधी दिली. आज दुसर्‍या वर्षी कोळंबीचं उत्पादन चांगलं मिळालं आणि आता तो या व्यवसायात स्थिरावतो आहे. यात एमएस्सी झालेल्या त्याच्या पत्नीने गावात राहून त्याला चांगली साथ दिली.
 
 
village home
 
प्रशांत देसाई - मोठी जोखीम घेऊन उभारला कोळंबी प्रकल्प

 
“कोळंबी हा व्यवसाय मोठी गुंतवणूक असलेला आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात परतावा देणारा आहे. कोळंबीला जगाच्या बाजारपेठेत भरपूर मागणी असल्यामुळे हा व्यवसाय तोट्यात निश्चितपणे जाणारा नाही. फक्त जोखीम घ्यायची तयारी हवी आणि तांत्रिक ज्ञान नीट घ्यायला हवं. लॉकडाउन झालं नसतं, तर कदाचित हा प्रकल्प झालाच नसता.” - प्रशांत
 
 
 
अशी अनेक उदाहरणं अनेक गावांमध्ये असतील. यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे शहरांकडून गावांकडे पुन:स्थलांतरणासाठी (रिव्हर्स मायग्रेशनसाठी) लॉकडाउन हा एक मोठा ’पुश फॅक्टर’ ठरला. अनेक तरुणांना भविष्यात कधी ना कधी गावात येऊन स्थायिक व्हायची इच्छा होती, पण जोखीम कोणी घेत नव्हतं. लॉकडाउन ही जोखीम घ्यायला प्रवृत्त करणारं ठरलं. असं म्हणतात की देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो, तेव्हा इतर चार दरवाजे खुले झालेले असतात. काहीतरी धडपड करून गावात उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण करायला लॉकडाउनने भाग पाडलं आणि त्यातून काहीतरी चांगलं निर्माण झालं. गावातली फक्त म्हातारी माणसं शिल्लक राहिलेली घरं आता काही अंशी तरी तरुण पिढीने भरलेली दिसतात. त्यामुळे घरातले मुळातच असलेले शेती-बागायती इत्यादी परंपरागत व्यवसायही पुनरुज्जीवित होत आहेत.
 
 
 
अर्थात यात आव्हानंही अनेक आहेत. एकूण लोकसंख्येचा विचार करता यांचं प्रमाण अल्प आहे. दुसरं असं की गावात राहणार्‍या तरुणांची लग्नं होणं ही गंभीर समस्या आहे. शहराच्या तुलनेत गावाची अर्थव्यवस्था वेगळी असते. गावातले व्यवसाय हंगामी स्वरूपाचे असतात, त्यातून मिळणारं उत्पन्न शहराच्या तुलनेत कमी असू शकतं, पण त्यातही स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगात येऊ शकतं. परंतु शहरात राहून 5 लाख रुपये कमावणं आणि गावात राहून 2 लाख रुपये कमावणं हा हिशोब सारखाच होतो, हे तत्त्वज्ञान लग्नाच्या बाजारात व्यर्थ ठरतं. आणखी एक आव्हान म्हणजे गावातल्या व्यवसायांना कधीही स्पर्धा वाढू शकते. एकाने जो व्यवसाय सुरू केला, तोच गावातल्या आणखी चार जणांनी सुरू केला, तर तेवढी बाजारपेठ वाढेल का? हाही एक प्रश्न आहे. गावात ज्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आणि मोठी घरं आहेत, त्यांना घरी येऊन राहणं सोपं होतं. पण गावात अजूनही अशी घरं, कुटुंब आहेत, ज्यांत छोट्याशा जागेत 10-15 माणसं राहतात, त्यांची स्वतःची फार मोठी जमीन नाही, अशा लोकांना गावात नवीन व्यवसायनिर्मिती करणं अवघड जातं. अशा प्रकारची उडी घेतल्याचं समाजाकडून स्वागत होत नाही, हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. नवीन काहीतरी सुरू केल्यावर त्याची खिल्ली उडवणं आणि जर का अपयश आलं, तर ‘कोणी सांगितलं होतं करायला असले उद्योग?’ याच्या गप्पा मारत बसणं ही मानसिकता गावांत भरपूर आहे.
 
 
 
तरीही भूतकाळाच्या तुलनेत आज खेडेगावांमध्ये व्यवसायसंधी वाढताहेत. 50 वर्षांपूर्वी नुसती शेती करायची आणि आमटी-भात खाऊन राहायचं, याशिवाय गावांमध्ये दुसरं काही करताच येण्यासारखं नव्हतं. आज परिस्थिती बदलली आहे. अनेक पायाभूत सुविधा गावात उपलब्ध झाल्या आहेत. शहरातल्या, किंबहुना जागतिक बाजारपेठेशीही गावं जोडली गेली आहेत. तरुणांनी याकडे संधी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. म्हणून अनेक आव्हानं स्वीकारून गावांमध्ये नवीन व्यवसायांत उतरलेल्या अशा तरुणांचं कौतुकच करावं लागेल.
 
 

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड.