कंटेनरचा भारत आणि खेड्यातील भारत

विवेक मराठी    12-Sep-2022   
Total Views |
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा संदेश कोणता? संघ आणि भाजपा विरोध हा नकारात्मक संदेश झाला. संघाला या यात्रेचे लक्ष्य करणे, हा राजकीय मूर्खपणा आहे. पं. नेहरूंनी हा मूर्खपणा आयुष्यभर केला, श्रीमती इंदिरा गांधींनी तो 50% केला, राजीव गांधी त्या भानगडीत पडले नाहीत आणि राहुल गांधी पणजोबांच्या पावलावर पाऊल टाकून निघाले आहेत. संघविद्वेषाचा मार्ग द्वारकेच्या समुद्रात बुडविणारा मार्ग असतो.

rahul gandhi
 
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ झालेला आहे. साडेतीन हजार किलोमीटरची ही यात्रा असणार आहे आणि ती बारा राज्यांतून जाईल. या यात्रेबद्दल सोशल मीडियावर अनेक कुत्सित शेरेबाजी वाचायला मिळते. समाजाचा एक वर्ग नेहमीच असा असतो की, जो कधी चांगले पाहत नाही आणि वेड्यावाकड्या भाषेमध्ये टिंगळटवाळी करण्यात त्यांना आनंद वाटतो. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. काँग्रेसला न मानणारे राजकीय लोक याची चेष्टा-कुचेष्टा करीत राहतील. या विषयात न शिरता आपल्याला यात्रेकडे थोडे गंभीरपणे बघावे लागेल.
 
 
यात्रा हा विषय भारतीय लोकांना नवीन नाही. तीर्थयात्रा बारा महिने चालू असते. अधूनमधून वेगवेगळ्या विषयांच्या साक्षरता यात्रा चालूच असतात. आध्यात्मिक यात्रा सोडल्या, तर अन्य यात्रांचा उद्देश लोकांशी संपर्क करणे, लोकांना काही विषय सांगणे, जनजागृती करणे असा असतो. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कशासाठी आहे?
 
 
 
ही यात्रा राजकीय आहे, हे नव्याने सांगायला नको. यात्रा भाजपा आणि केंद्र शासनाविरूद्ध आहे, हेदेखील सांगायला पाहिजे असे नाही. यात्रेचे शीर्षक ‘भारत जोडो’ असे आहे. यावर पहिला प्रश्न मनात निर्माण होतो, भारत केव्हा विखुरलेला होता? आजही तो एकात्म आणि एकरस आहे. मग भारत जोडो या शब्दांचा अर्थ काय होतो? राहुल गांधी सांगतात की, गेल्या आठ वर्षांत भाजपा आणि आरएसएसने देश तोडण्याचेच काम केलेले आहे. देशात फुटीरतावाद निर्माण करण्याचे काम केले आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू विद्वेषाच्या राजकारणामुळे झाला, मला प्रेमाने लोकांना जोडायचे आहे. देश विखुरलेला मी पाहू शकत नाही, वगैरे वगैरे.
 
 
राहुल गांधीचे हे आरोप नवीन नाहीत. गेली आठ वर्षे ते तीच वाक्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवरून बोलत आहेत. भाजपाने त्याला उत्तरे दिलेली आहेत. आणि जसजशी यात्रा पुढे जाईल, तसतशी भाजपाकडून सणसणीत उत्तरे यायला सुरुवात होईल. भाजपाचे काम आपण करण्याचे कारण नाही.
 
 
 
जनजागृतीच्या यात्रांचा विषय येतो, तेव्हा आपल्या देशात झालेल्या काही यात्रांची आठवण होते. सर्वप्रथम महात्मा गांधींच्या दांडी यात्रेची आठवण होते. महात्मा गांधींनी साबरमती ते दांडी असा पायी प्रवास केला. ब्रिटिशांनी मिठावर कर लावला होता. तो कायदा गांधींनी दांडी यात्रेने मोडला. ही यात्रा साबरमती ते दांडी अशी 385 किलोमीटर एवढीच असली, तरी तेव्हा सगळा देश दांडी यात्रामय झाला होता. मीठ प्रत्येक घरी वापरले जाते. या यात्रेने गांधीजी प्रत्येक घरात पोहोचले. याला गांधीजींची प्रतिभा म्हणतात.
 
 
 
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा संदेश कोणता? संघ आणि भाजपा विरोध हा नकारात्मक संदेश झाला. संघाला या यात्रेचे लक्ष्य करणे, हा राजकीय मूर्खपणा आहे. पं. नेहरूंनी हा मूर्खपणा आयुष्यभर केला, श्रीमती इंदिरा गांधींनी तो 50% केला, राजीव गांधी त्या भानगडीत पडले नाहीत आणि राहुल गांधी पणजोबांच्या पावलावर पाऊल टाकून निघाले आहेत. संघविद्वेषाचा मार्ग द्वारकेच्या समुद्रात बुडविणारा मार्ग असतो.
 
 
 
जबरदस्त परिवर्तन करणारी दुसरी यात्रा विश्व हिंदू परिषदेची यात्रा, तिला एकात्मता यात्रा असे म्हटले गेले. भारतमातेचे पूजन आणि गंगाजलाचे वितरण याने संपूर्ण देश ढवळून निघाला. हिंदू समाजजागृतीची प्रचंड लाट निर्माण झाली. देशात आमूलाग्र परिवर्तन आणणारी यात्रा म्हणून अडवाणींच्या रथयात्रेचा उल्लेख करावा लागतो. 1990 साली ही यात्रा निघाली. विषय होता ‘रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन’. आणि यात्रेचा परिणाम असा झाला की, 1985 साली फक्त दोन खासदार असणारी भाजपा 1996 साली सत्तेवर आली. राष्ट्रजागृतीची ही यात्रा गांधीजींच्या दांडी यात्रेसारखी समाजाच्या प्रत्येक घरात पोहोचली.
 

rahul gandhi 
 
डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी काढलेली तिरंगा यात्रा. काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकविण्याचा या यात्रेचा उद्देश होता. या यात्रेने काश्मीरच्या प्रश्नाविषयी फार मोठी जनजागृती केली. या यात्रांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या यात्रेचा संदेश कोणता? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही.
 
 
 
काही वाचक म्हणतील, उत्तर कसे नाही? उत्तर आहे, भाजपा आणि संघाची बदनामी करणे या यात्रेचा उद्देश आहे. पण दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की हे काम करण्यासाठी यात्रा कशासाठी काढायला पाहिजे? काँग्रेस ही अखिल भारतीय संघटना आहे. तालुका स्तरापर्यंत सभा घेऊन सर्व देशभर संघाला आणि भाजपाला शिव्या घालण्याचा अभिषेक ते करू शकतात. त्यासाठी यात्रा, कंटेनर, कंटेनरमधील शाही व्यवस्था वगैरे वगैरे करण्याचे काही कारण नव्हते. आपल्या देशात यात्रा हा शब्द विशिष्ट अर्थानेच वापरला जातो. भारतीय जनमानस राजकीय यात्रा स्वीकारीत नाही. यात्रेमागे सत्य, धर्म आणि न्याय असावा लागतो. तो लोकभाषेत सांगावा लागतो. तो विषय लोकांच्या मनाला स्पर्श करणारा असावा लागतो. आपल्याला सोयीच्या नसलेल्या संघटनांची बदनामी हा यात्रेचा पवित्र उद्देश कसा होणार?
 
 
 
राहुल गांधी म्हणतात की त्यांना भारतीय जनतेशी संवाद सधायचा आहे, हा हेतू चांगला आहे. जनतेशी संवाद म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद नव्हे किंवा पक्षाने सभेसाठी आणलेल्या भाडोत्री लोकांशी संवाद नव्हे. भाडोत्री लोकांना काही समजत नाही आणि पक्षकार्यकर्ते ‘बॉस इज ऑलवेज राइट’ या मानसिकतेत असतात. त्यांच्याशी संवाद साधून ज्ञानात काहीच भर पडत नाही. महात्मा गांधींजी दलित वस्तीत जाऊन राहत असत. अत्यंत दरिद्री माणसाला जाऊन भेटत असत. एकात्मता यात्रेत खेडोपाड्यातील अशिक्षित लोकांपर्यंत कार्यकर्ते गेले. विवेकानंद सांगून गेले की, खरा भारत झोपडीत राहतो. गांधीजी म्हणत, खरा भारत खेड्यात राहतो. कंटेनरचा भारत वेगळा आणि खेड्यातील भारत वेगळा, हे राहुल गांधीना जर समजले तर त्यांची राजकीय उंची नक्कीच वाढेल.
 
 
 
भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यापूर्वी याविषयी काँग्रेसने खूप विचारमंथन करायला पाहिजे होते. सर्व जनतेच्या भावनेला स्पर्श करील असे एक-दोन भावनिक विषय शोधून काढायला पाहिजे होते आणि या विषयांना धर्मभावनेचा स्पर्श देण्याची गरज होती. भारतीय जनतेला धर्मभावनेतून दिलेला संदेशच समजतो. कल्याणकारक राज्य हे शब्द त्यांना समजणार नाहीत, पण रामराज्य हे त्यांना समजते. ‘भारत माझा देश आहे’ हे झाले शुष्क वाक्य, ‘ही माझी भारतमाता आहे’ हे झाले माता आणि संतान यांचे नाते. लोकांना ही भाषा समजते.
 
 
राहुल गांधी सेक्युलॅरिझमच्या भाषेत बोलणार, ती भाषा सामान्य माणसाला समजत नाही. प्रेमाने सर्वांना जोडायचे आहे असे ते म्हणणार. जोडणार्‍या प्रेमाचा भावनिक अर्थ ते सांगणार नाहीत. नीतिवचने सांगून लोक जोडले जात नाहीत. तसे जोडले गेले असते, तर या देशात लाखो राहुल गांधी उभे राहिले असते. नरेंद्र मोदी देशनिर्माणाची सकारात्मक सूची घेऊन काम करीत आहेत. त्यांची विषयसूची पूर्ण नाही, अयोग्य आहे, देशाचे दीर्घकालीन कल्याण करणारी नाही असे सांगणे म्हणजे नुसती वाक्यफेक आहे. या विषयसूचीला पर्याय द्यावा लागतो.
 
 
 
राहुल गांधींकडे कोणता पर्याय आहे का? लोकशाही धोक्यात आलेली आहे, देशातील साधनसंपत्ती, तीन उद्योजकांच्या हातात गेली आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण झाली आहे. बेरोजगारी वाढली आहे असली वाक्ये अर्थहीन वाक्ये असतात. ती अर्थपूर्ण करण्यासाठी लोकशाही संस्था कशा बळकट होतील, संपत्तीचे केंद्रीकरण कसे होणार नाही, मंदिर आणि मशीद यातील दुरावा कसा दूर होईल आणि रोजगार कुठे व कसे उत्पन्न होतील यांचा कृती आराखडा मांडावा लागतो. भारत जोडो यात्रेमध्ये उरलेल्या दिवसात राहुल गांधी हे करू शकतील का? तशी त्यांची क्षमता आहे का? त्यांच्याकडे तशी प्रतिभा आहे का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला यात्रासमाप्तीच्या काळात नक्की मिळतील.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.