समकालीन वास्तवाचा वेध घेणारा कार्यकर्ता डॉ. प्रल्हाद खंदारे

विवेक मराठी    16-Sep-2022   
Total Views |
आपल्या समाजासाठी आपण अर्जित केलेले ज्ञान पणाला लावून प्रबोधन करणारे लोक सध्या दुर्मीळ झाले आहेत. व्यक्तिगत विकास आणि आर्थिक समृद्धी हेच जीवनध्येय असणार्‍या समाजाला दिशा कोण देणार? प्रवाहाच्या विरुद्ध कोण जाणार? असे प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा डॉ. प्रल्हाद रामभाऊ खंदारे हे नाव डोळ्यासमोर येते. प्रल्हाद रामभाऊ खंदारे यांनी दीर्घकाळ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम केले असून या अनुभवातून ते समाजासमोर नवा विचार मांडत आहेत, तो विचार आहे समन्वयाचा आणि समतेचा. आपल्या बांधवांना उन्नत करण्याचा. समकालीन समाजवास्तव आणि राजकारण यांच्या पलीकडे जाऊन ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ अशी भूमिका ते मांडत आहेत.
 
vivek
 
प्रल्हाद खंदारे हे मराठवाड्यातील एका छोट्या गावातून मुंबईत आले असले, तरी त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात नामांतर आंदोलनापासून झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात ते दलित पँथरचे सक्रिय सदस्य म्हणून सहभागी झाले होते. चळवळीबरोबरच शिक्षण घेऊन त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पदवीनंतर पीएच.डी.ही केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आदर्श निर्माण केला, त्याच मार्गाने प्रल्हाद खंदारे यांची वाटचाल झाली आहे. मुंबई येथे त्यांनी दोन विधी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा दिली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. प्रल्हाद खंदारे यांचा सामाजिक व राजकीय प्रवास असा असला, तरी ते अधिक रमतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याच्या कामात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानणारे प्रल्हाद खंदारे हे विविध माध्यमांतून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत असतात. समाजाचे सर्व प्रश्न केवळ राजकारण करून सुटणार नाहीत, तर अन्य मार्गांचा अवलंब केला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. प्रल्हाद खंदारे केवळ असा आग्रह करत नाहीत, तर आग्रहाला कृतीची जोड देतात.
 
 
16 September, 2022 | 16:47
 
फेब्रुवारी 2020मध्ये प्रल्हाद खंदारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवामागील भूमिका सांगताना प्रल्हाद खंदारे म्हणतात, “बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी व वारसा घेऊन मी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात समाजप्रबोधनाचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ठरावीक समाजाचे नेते नसून ते या भारत देशाचे नेते आहेत. या देशाच्या घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांचे विचार हे सर्व समाजासाठी, जनतेसाठी आहेत. त्यांच्याविषयी इतर समाजात असलेले गैरसमज दूर करून बाबासाहेबांविषयी त्यांचा आदर कसा वाढेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा कसा स्वीकार करेल, यासाठी प्रयत्न करणे हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असे मला वाटते. या भावनेतून मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सवाची कल्पना सुचली. बाबासाहेब स्वत: कलाप्रेमी होते. सर्व प्रकारच्या कलाकारांविषयी त्यांना प्रचंड आदर होता. त्यामुळे साधनांचा अभाव असतानाही मानवमुक्तीचा लढा लढताना अनेक नाटककार, कधी लोकशाहीर, गायक आंबेडकरी चळवळीचा भाग बनले. कला, साहित्य, चित्रपट, नाटक इत्यादी माध्यमांतून बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला महोत्सव आयोजित केला होता.”
 
 
 
प्रल्हाद खंदारे यांनी केवळ कला महोत्सव आयोजित केला नाही, तर ‘जजमेंट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नीला सत्यनारायण यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. कला क्षेत्रात काम करताना आपल्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय ते विसरले नाहीत. समाजप्रबोधन करताना समाजवास्तवही अधोरेखित व्हायला हवे, ही त्यांची भूमिका आहे. आज दलित समाज म्हटला की डोळ्यांसमोर आरक्षणाचा मुद्दा उभा राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील समाज अजूनही निर्माण झाला नाही, हे वास्तव ते विसरत नाहीत. आरक्षणाचे राजकारण आणि त्यातून निर्माण झालेले समाजातील समर्थक व विरोधक असे दोन गट आपण सातत्याने पाहत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर प्रल्हाद खंदारे यांनी ’आय अ‍ॅम नॉट दलित’ नावाचा माहितीपट तयार करून वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक सन्मान
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज
भूषण पुरस्कार, बेस्ट ऑर्गनायझेशन अवार्ड, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, संविधान गौरव पुरस्कार, राष्ट्रभक्ती पुरस्कार आदी पुरस्कारांनी प्रल्हाद खंदारे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
या माहितीपटाची संकल्पना सांगता प्रल्हाद खंदारे म्हणतात, “मी तरुण वयात चळवळीचा भाग झालो. आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांना मला अनुभवता आले. या कालखंडात मोठा संघर्षही अनुभवला. दलित चळवळीचे यश-अपयश फार जवळून पाहिले आहे. या शिदोरीच्या बळावर मी दलित चळवळीचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 


vivek
 
अ‍ॅड. डॉ. प्रल्हाद खंदारे
एल. एल.बी, पीएच.डी.(लॉ), डीएलएल अँड एलडब्ल्यू,
एलएल.एम., एम.ए., बी.कॉम., एम.कॉम.,
 
 अमेरिकेतील ब्लॅक पँथरच्या धर्तीवर इथे दलित पँथरची स्थापना झाली. त्या चळवळीमध्ये नामदेव ढसाळ, ज.वि. पवार, राजा ढाले या नेत्यांचे नेतृत्व आणि संघर्ष, रमाबाई नगर गोळीबार, खैरलांजी हत्याकांड, नितीन आगे हत्या अशा विविध घटनांतून आणि प्रसंगातून जे प्रश्न उपस्थित होत गेले, त्यांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय, सामाजिक समता या तत्त्वावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल असे मला वाटले. आज खरेच मी दलित आहे का? दलितांच्या उद्धारासाठी, उत्कर्षासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मागणी केली. आज जर आर्थिक व सामाजिकदृष्ट्या माझे जीवनमान उंचावले आहे, तर मी स्वत:ला दलित म्हणवून मला मिळणार्‍या सुविधाचा त्याग का करू नये? असा प्रश्न स्वत:ला विचारणे या उद्देशाने ‘आय अ‍ॅम नॉट दलित’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. हा माहितीपट म्हणजे एका चिकित्सक दृष्टीने मांडलेला दलित चळवळीचा इतिहास आहे.“
 
16 September, 2022 | 16:49
 
प्रल्हाद खंदारे यांनी मांडलेल्या या भूमिकेचे वर्णन करण्यासाठी कवी दत्ता हलसगीकर यांच्या कवितेचा आधार घ्यावा लागतो. दत्ता हलसगीकर म्हणतात,
ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले,
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग,
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची,
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले,
त्यांना थोडे उचलून घ्यावे
 
 
वरील कविता जगण्याचा प्रयत्न करणारा समाज निर्माण करण्यासाठी प्रल्हाद खंदारे प्रयत्न करत आहेत. आरक्षण हा उन्नतीचा मार्ग असला, तरी तो तहहयात हक्क नाही. आपण उन्नत झाल्यावर पुन्हा आरक्षणाचा लाभ न घेता इतरांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, हा विचार प्रल्हाद खंदारे यांनी ‘आय अ‍ॅम नॉट दलित’ या माहितीपटातून समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रल्हाद खंदारे यांनी एका ज्वालाग्राही पण आवश्यक विषयावर चर्चा सुरू केली असून या चर्चेतून समाजासमोर सकारात्मक विचार येईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.
 
 

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001