‘देशाच्या गौरवात वाढ करणारा’ वाढदिवस

विवेक मराठी    19-Sep-2022   
Total Views |
@रमेश पतंगे

नेहरू-गांधी घराणे म्हणत की, आम्ही म्हणजेच भारत. मोदींनी या प्रमेयाला सुरुंग लावला आहे. मोदींचा भारत 130 कोटी लोकांचा भारत आहे. तो प्रभू रामाचा भारत आहे, कृष्णाचा भारत आहे, भगवान बुद्धाचा भारत आहे. स्वामी विवेकानंदांचा भारत आहे. महात्मा गांधींचा भारत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भारत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारत आहे, नेताजी सुभाषचंद्र यांचा भारत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत आहे. भारत भारतीयांचा आहे, कुठल्याही एका घराण्याचा नाही, हे मोदींनी अधोरेखित केले आहे.

modi
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी सर्व देशभर उत्साहाने साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करणे स्वाभाविक आहे. योगी आदित्यनाथ, रामनाथ कोविंद, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार इत्यादी वरिष्ठ भाजपा नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर लेखही लिहिले आहेत. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत, नरेंद्र मोदी यांची सर्वांनी स्तुती करणे हेदेखील देशाच्या राजकीय संस्कृतीला धरून झाले आहे.
 
 
 
वाढदिवसाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील कुणी टीका-टिप्पणी करीत नाही. सर्व जण राजकीय शिष्टाचाराचे पालन करतात. परंतु विरोधी पक्षातील कुणीही नरेंद्र मोदी यांची विचारसरणी, त्यांच्या शासनाची कार्यक्रमपत्रिका यावर चांगले बोलत नाही. ‘आयडिया ऑफ भारत’ हा भारतातील तथाकथित बुद्धिवाद्यांचा आवडता शब्दप्रयोग आहे. ‘भारताची संकल्पना’ असा त्याचा मराठी अर्थ होईल. या सर्वांचे म्हणणे असे आहे की, नरेंद्र मोदी आयडिया ऑफ भारत उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. स्तुतिपाठक आणि विरोधक या दोघांमध्ये सत्य काय आहे? याचा शोध घ्यायला पाहिजे.
 
 
 
‘आयडिया ऑफ भारत’ म्हणजे भारताची संकल्पना पं. नेहरू यांनी मांडली, हा विचार भारतातील उदारमतवादी, डावे विचारवंत आणि नेहरू विरोधक राजकीय नेते मांडीत असतात. पं. नेहरू यांची भारताची संकल्पना सर्वसमावेशक होती. मुसलमान आणि ख्रिश्चन यांना सन्मानाने सामावून घेण्याची होती. सेक्युलॅरिझम हा संकल्पनेचा गाभा होता. समाजवादी समाजरचना हा कार्यक्रम होता. नरेंद्र मोदी यांनी वेगळी विषयसूची पुढे आणली आहे.
 
 
 
राहुल गांधी म्हणतात की, ‘गेल्या आठ वर्षांत भाजपाने देशाला दुर्बळ केले आहे. त्यांची विषयसूची हिंदू सांप्रदायिकता निर्माण करणारी झाली आहे. मुसलमान आणि ख्रिश्चन यांना वगळणारी झाली आहे. त्यांचे कायदे मुसलमानांना लक्ष्य करणारे झाले आहे. भारतीय लोकशाही सर्वधर्म समभाव, उदारमतवाद, भारतीय संविधान, धोक्यात आलेले आहे.’
 
 
राहुल गांधी, डावे विचारवंत, तथाकथित उदारमतवादी यांना नरेंद्र मोदी यांची विषयसूची धोकादायक का वाटते? याचे कारण असे की, नरेंद्र मोदी सांगतात - भारत एक सनातन राष्ट्र आहे, भारताची स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. सर्व उपासना पंथाचा आदर करणे ही भारतीय परंपरा आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणे, सर्वांचा समतोल विकास करणे, सर्वांना आत्मगौरव आणि आत्मभान देणे, जागतिक स्तरावर ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा सनातन विचार प्रस्थापित करणे ही नरेंद्र मोदी यांची विषयसूची आहे. नेहरूंची विषयसूची या सर्व गोष्टी मानत नाही, म्हणून नेहरू आणि मोदी यांच्यामध्ये विस्तृत वैचारिक अंतर आहे.
 
 
19 September, 2022 | 14:48
 
काँग्रेससाठी मुसलमानांची आणि ख्रिश्चनांची मतबँक तयार करणे एवढ्यापुरते नेहरू यांचे सेक्युलर मॉडेल मर्यादित राहिले. पं. नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्या कालखंडात मुस्लीम समाज अत्यंत मागासलेला राहिला. मदरशातील शिक्षणाने मुस्लीम तरुण तांत्रिक आणि वैज्ञानिक जगाला सामोरे जाण्यास असमर्थ झाला. बुरखा पद्धती, शरियत कायदा इत्यादींमुळे सामाजिक सुधारणांपासून दूर राहिला. 1947 साली मुस्लीम समाजाची प्रतिमा मातृभूमीचे तुकडे करणारा समाज अशी झाली होती आणि आता दहशतवादाचे समर्थन करणारा समाज अशी झाली आहे. नेहरू-सेक्युलॅरिझमचा हा परिणाम आहे.
 

modi
 
नेहरू-सेक्युलॅरिझमने हिंदू समाजाला सांप्रदायिक ठरवून टाकले. ‘बहुसंख्याकांचा संप्रदाय वाद’ हा नेहरू यांचा शब्दप्रयोग आहे. नेहरूंच्या सेक्युलरवादाचे हिंदूंना सांगणे असे की, तुम्ही आयोध्या, मथुरा, काशी हे प्रश्न हाती घेऊ नका, त्यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावतात. काश्मीरचे 370 कलम ठेवा, कारण काश्मीरमधील मुसलमानांना आपल्याला बरोबर ठेवायचे आहे. हिंदूंनी आपल्या शाळांतून गीतापाठ, उपनिषद पाठ, ज्ञानेश्वरी गाथा, तुलसीरामायण शिकवू नये त्यामुळे सांप्रदायिकता वाढेल. सरकारातील कोणत्याही मंत्र्याने हिंदू मंदिरे, हिंदू सण, यात सहभागी होऊ नये, त्यामुळे सेक्युलॅरिझम धोक्यात येईल.
 
 
 
मंत्र्यानी आणि काँग्रेसी नेत्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करावे, समान नागरी कायद्याला विरोध करावा, पोपचे भारतात स्वागत करावे, धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांविरुद्ध अजिबात बोलू नये, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गोळवलकर गुरुजी इत्यादी हिंदू नेत्यांबद्दल आणि त्यांच्या विचारसरणीबद्दल संदर्भहीन आणि आगलावी टीका करीत राहावी, ही विचारसरणी देशाला कशी घातक आहे, हे मांडत राहावे.
 
 
 
नेहरू यांच्या समाजवादाने देशाचा आर्थिक विकासाचा दर तीन टक्के राहिला. कुत्सितपणे लोक म्हणू लागले, हा ‘हिंदू विकास’ दर आहे. उद्योजकांची प्रेरणा मारून टाकण्यात आली. ज्यांच्याकडे प्रतिभा आहे असे तरुण आपला विकास करून घेण्यासाठी परदेशात गेले. त्यांना ‘ब्रेन ड्रेन’ असे म्हणतात. परदेशस्थ भारतीय त्रिशंकूसारखे झाले. नेहरूंचे सेक्युलर मॉडेल त्यांना स्वीकारे ना आणि विदेशात ते परके झाले. नेहरूंच्या सेक्युलर उदारमतवादी आणि समाजवादी मॉडेलमुळे भारत जगात हास्यास्पद देश झाला. सिंगापूरचे ली तू आन एकदा म्हणाले की, “भारत हा तीस राष्ट्रांचा समूह आहे, त्याला स्वत:ची काही ओळख नाही.” जागतिक शांतता, युद्धबंदी, शस्त्रबंदी, वगैरे विषयांवर नेहरू घराण्यातील लोक आणि त्या घराण्याची सरदारकी करणारे राजकारणी जगभर प्रवचनांचा पाऊस पाडत होते. जग कानात कापसाचे बोळे घालून बसले होते.
  
 
ही नेहरू मॉडेलच्या ‘आयडिया ऑफ भारत’ची स्थिती होती. दुसर्‍या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशाची अस्मिता जागृत करण्याचे कार्य अनंत अडचणी सोसून शांतपणे चालू राहिले. या कार्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी आपले अस्तित्व संपवून टाकले. त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळे झोपलेला हिंदू समाज जागा होऊ लागला. तो आपली अस्मिता शोधू लागला. आपली खरी ओळख काय आहे, हे तो पाहू लागला. आपण कोण आहोत, पूर्वी कसे होतो, आज कसे आहोत, आपले लक्ष्य कोणते याचे त्याला भान येत चालले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तो आपला आवाज शोधू लागला.
 
 
राजकीय क्षेत्रात हा आवाज अटलबिहारी वाजपेयींनी दिला. पन्नास वर्षे कार्यकर्ते घोषणा देत राहिले - ‘अगली बारी अटल बिहारी’ आणि अटल बिहारी पंतप्रधान झाल्यानंतर शेकडो जणांनी कृतार्थतेने डोळे मिटले. या अस्मितेचा प्रवास तसाच पुढे चालू राहिला आणि 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या रूपात देशाने आपली ओळख पाहिली. नरेंद्र मोदी कोण आहेत? दामोदरदास यांचे पुत्र आहेत, हिराबेन यांचे पुत्र आहेत, गुजरातमध्ये जन्मले म्हणून गुजराती आहेत, त्याच्या पलीकडे कोट्यवधी भारतीयांचे ते आत्मरूप आहेत. ही व्यक्ती नाही, मोदी ही शक्ती आहे. मोदी ही व्यक्ती नाही, मोदी ही अस्मिता आहे. मोदी ही व्यक्ती नाही, हजारो वर्षे दाबलेल्या भारताचा आत्मोद्गार आहेत.
 
 
 
मोदी हे जागृत भारताचे प्रतिनिधित्व करतात. ‘सत्यमेव जयते’ हा जागृत भारताचा ध्वनी आहे. ‘सर्वपंथसमभाव’ हा जागृत भारताचा मार्ग आहे. ‘वसुुधैव कुटुंबकम्’ हा जागृत भारताचा वैश्विक कार्यक्रम आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामय:’ ही जागृत भारताची आराधना आहे. ‘ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै। तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥’ हा जागृत भारताच्या जगण्याचा मार्ग आहे. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हे जागृत भारताचे मातृभूमीप्रती समर्पण आहे.
 
 
 
नेहरू संकल्पनेचा भारत एका परिवाराच्या मक्तेदारीचा भारत झाला. या भारतात नेहरू-गांधी घराणे सोडून कुणालाही स्थान नाही. देशभर पुतळे त्यांचे, शासकीय संस्था त्यांच्या नावाने, बंदरांना त्यांची नावे, शैक्षणिक संस्था त्यांच्या नावाने, कला संस्था त्यांच्या नावाने, विज्ञान संस्था त्यांच्या नावाने, फ्रान्सचा चौदावा लुई म्हणत असे की, ‘मी म्हणजेच राज्य’! नेहरू-गांधी घराणे म्हणत की, आम्ही म्हणजेच भारत. मोदींनी या प्रमेयाला सुरुंग लावला आहे. मोदींचा भारत 130 कोटी लोकांचा भारत आहे. तो प्रभू रामाचा भारत आहे, कृष्णाचा भारत आहे, भगवान बुद्धाचा भारत आहे. स्वामी विवेकानंदांचा भारत आहे. महात्मा गांधींचा भारत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भारत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारत आहे, नेताजी सुभाषचंद्र यांचा भारत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत आहे. भारत भारतीयांचा आहे, कुठल्याही एका घराण्याचा नाही, हे मोदींनी अधोरेखित केले आहे.
 
 
19 September, 2022 | 13:44
 
राहुल गांधी यांना हे मान्य नाही, म्हणून त्यांनी ‘कंटेनर यात्रा’ काढली आहे. तिला नाव दिले आहे ‘भारत जोडो यात्रा’. वर दिलेले महापुरुष जोपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहेत, तोपर्यंत भारत जोडलेलाच राहणार आहे. या स्मृती सतत जिवंत ठेवण्याचे कार्य नरेंद्र मोदी अफाट परिश्रम घेऊन करतात. हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांचा वाढदिवस त्यांचे वय वाढविणारा नसतो, त्यांचा वाढदिवस देशाच्या गौरवाची वाढ करणारा असतो. हे या वाढदिवसाचे आगळेपण आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.