सर्वयुक्त भारत

विवेक मराठी    30-Sep-2022   
Total Views |
काँग्रेसने देशाचे वाटोळे केले, असे म्हणण्याऐवजी काँग्रेसने देशाला चांगले काय दिले, याचा विचार केला पाहिजे. संघ-भाजपाने देशासाठी चांगले काय केले याचा विचार केला पाहिजे आणि दोन्ही चांगल्यांचा समन्वय करून पुढे जाता आले पाहिजे. आपली परंपरा कलह नाकारणारी आहे. आपला सनातन विचार ‘सर्वयुक्त भारत’ असा आहे. एक महाभारतीय कलह झाला, तेवढा पुरे. आता पुन्हा त्या कलहाच्या मार्गाने जायचे नाही. सर्वांमधील चांगले आत्मसात करून भगवंतांनी दाखविलेल्या मध्यममार्गाने आपल्याला जावे लागेल.
 
political
 
राजकीय क्षेत्रात दोन घोषणा सतत चालू असतात - पहिली घोषणा ‘काँग्रेसमुक्त भारत’ची असते आणि दुसरी घोषणा ‘संघ-भाजपामुक्त भारत’ अशी असते. राजकीय विचारसरणीची ही दोन टोके आहेत. या घोषणा देणारे राजनेते नामवंत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला जबरदस्त प्रसिद्धी मूल्य असते. त्यामुळे ते परोक्षपणे किंवा अपरोक्षपणे असे काही बोलले की, त्याच्या ठळक बातम्या होतात. 2024 साली लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्याची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झालेली आहे. काही राजनेत्यांचे म्हणणे असे आहे की, भाजपाला सत्तेवरून दूर करण्याची हीच संधी आहे. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे.
 
 
 
सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्याचा एक प्रयोग महाराष्ट्रात केला गेला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी असलेली युती मोडली. महाविकास आघाडी निर्माण करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची कामे दुय्यम ठरवून भाजपाला कसे भकास करता येईल, याच्याच मागे लागले. राजकीय परिपक्वता नसल्यामुळे त्यांनी कधीही वाणी संयम पाळला नाही. त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर जीभ नको तितकी सैल सोडली. शेवटी शिवसेनेतील आमदार याला कंटाळले, त्यांनी बंड केले, यापुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे.
 
 
political
 
हा प्रयोग केंद्रात कसा करता येईल, असा विचार अनेक राजनेते करतात. राहुल गांधी यांनी त्यासाठी कंटेनर यात्रा काढलेली आहे. रोजच्या वर्तमानपत्रात कंटेनर यात्रेच्या बातम्या जवळजवळ नसतात. त्यांचा हेतूदेखील संघ आणि भाजपामुक्त भारत असा आहे. शरदराव पवार यांचा हाच हेतू आहे, नितीश कुमार यांचा आहे, अरविंद केजरीवाल यांचा आहे, चंद्रशेखर राव यांचा आहे आणि ममता बॅनर्जी यांचादेखील आहे. भाजपाचा हेतू काँग्रेसमुक्त भारत करण्याचा आहे. या दोघांचे हेतू सफल होतील की नाही, हे येणारा काळच सांगेल. परंतु ‘अमुक अमुक मुक्त भारत’ हा भारतीय विचार नाही, एवढे मात्र खरे.
 
 
 
आपला सनातन विचार ‘सर्वयुक्त भारत’ असा आहे. सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. दुर्गेने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि शेवटी त्याला ठार केले, अशी फार प्राचीन कथा आहे. दुर्गेची पूजा करीत असताना दुर्गेच्या शस्त्राने खाली पडलेल्या महिषासुराचीदेखील पूजा करावी लागते. महिषासुर तर दुष्ट, मग दुर्गेबरोबर त्याची पूजा का करायची? असला प्रश्न कुणी विचारीत नाही, कुणाला असा प्रश्न पडत नाही. त्याचे कारण आपला धर्मविचार आहे. दैवी आणि दानवी प्रवृत्ती एकाच परमेश्वरातून उत्पन्न होतात. ती त्याचीच दोन रूपे आहेत. मरणान्ती सर्व जण त्या परमपित्यालाच जाऊन मिळतात, असे आपले तत्त्वज्ञान सांगते. ईश्वर आणि सैतान अशा दोन शक्तींची कल्पना आपल्या धर्मात नाही, ती ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांत आहे. रावण, कंस, जरासंध, बाणासुर इत्यादी सर्व दुष्ट प्रवृत्तीचे लोक अंतकाळी ईश्वराधीन होतात, अशा आपल्या कथा सांगतात. ‘सर्वयुक्त भारत’ ही आपली धार्मिक, आध्यात्मिक संकल्पना आहे.
 
 
भगवान गौतम बुद्धांच्या विचारांत या विचाराचे फार सुंदर दर्शन घडते. भगवंतांनी ‘अष्टांगिक मध्यममार्ग’ सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात की, मनात जर तृष्णा, कामवासना तशाच असतील तर तपश्चर्या करून, शरीर कृश करून काय फायदा? तसेच सर्व प्रकारच्या भोगात रममाण झाल्याने मनुष्याला शाश्वत परमसुखाचा आनंद कसा होणार? कारण सुख देणार्‍या सर्व वस्तू या अनित्य असतात. अनित्य वस्तू नित्य सुख देऊ शकत नाही.
 
 
यातून मार्ग कोणता? यातून मार्ग असा आहे की, शरीर आहे, शरीराच्या विविध गरजा आहेत, या गरजांची पूर्ती केली पाहिजे, परंतु शरीराच्या गरजांचे गुलाम होता कामा नये. शरीर स्वस्थ ठेवले पाहिजे आणि शरीर स्वस्थ राहिले, तरच मनोबल चांगले राहील आणि प्रज्ञेचा विकास होईल.
 
 
political
 
नंतर भगवंत म्हणतात, ‘हे परिव्राजकांनो, एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या की, माणसाने या दोन्ही टोकांपासून स्वत:ला वाचविले पाहिजे. पहिली गोष्ट काम, भोगसंबंधी तृष्णा वाढविणार्‍या वस्तूंच्या आकर्षणात पडता कामा नये किंवा पडून राहू नये. आणि दुसरी गोष्ट तपश्चर्या, कायाक्लेश करून स्वत:च्या शरीराला नको तितका त्रासही देऊ नये. असे करणे अयोग्य आणि हानिकारक आहे. या दोन्ही टोकांचा विचार करता एक मध्यममार्ग आहे, मधला मार्ग आहे. मी मध्यममार्गाचा उपदेश देत असतो.’
 
 
नंतर भगवंतांनी अष्टांगिक मार्ग परिव्राजकांसमोर ठेवला. हा अष्टांगिक मार्ग कोणता, याचे मनन, चिंतन सर्वांनीच करण्याची गरज आहे आणि समाजात ज्यांना काही ना काही नेतृत्व करायचे आहे - मग ते राजकीय क्षेत्रातील असो, सामजिक क्षेत्रातील असो की आर्थिक क्षेत्रातील, हा अष्टांगिक मार्ग सर्वांना अत्यंत लाभदायक आहे. 1. सम्यक दृष्टी, 2. सम्यक संकल्प, 3. सम्यक वाणी, 4. सम्यक कर्मांत, 5. सम्यक आजीविका, 6. सम्यक व्यायाम, 7. सम्यक स्मृती आणि 8. सम्यक समाधी. भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रात आपण यावरील विस्तृत विवेचन वाचू शकतो. आपण राजकीय क्षेत्रासंबंधी दोन टोकांच्या विचारांवर चिंतन करीत आहोत, म्हणून फक्त पहिल्या तीन विषयांचा अगदी थोडक्यात विचार करू.
 
 
 
पहिला विषय आहे सम्यक दृष्टीचा. भगवंतांचे सांगणे असे आहे की, ‘मानवजात अज्ञानाच्या गहन अंधकारात असते. एक प्रकारे व्यक्ती या अंधकारात कैदच झालेली असते. ज्ञानाचा कोणता तरी प्रकाश आहे, असेही या अंधांना वाटत नाही. परंतु मनाच्या विकासातून प्रकाशाचा मार्ग दिसू शकतो. एक चांगला आदर्श मनुष्यापुढे उपस्थित झाला, तर त्याची इच्छाशक्ती जागृत होते आणि क्रियाशील होते. आणि मग आपल्या इच्छाशक्तीनुसार माणूस चालू लागतो. आपण बंधनात आहोत, हे त्याला प्रथम समजले पाहिजे आणि नंतर तो या बंधनातून मुक्त होण्याचा विचार करतो.’ (संविधानाच्या भाषेत याला ‘लिबर्टी’ म्हणतात.) अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.
 
 
 
‘हा’मुक्त भारत, ‘तो’मुक्त भारत ही अंध दृष्टी झाली आणि एक प्रकारची ती अविद्यादेखील आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी सम्यक दृष्टीची - म्हणजे समग्र दृष्टीची आवश्यकता आहे. सम्यक संकल्प हा अष्टांगिक मार्गातील दुसरा विषय आहे. भगवंतांचे सांगणे असे आहे की, प्रत्येकाच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा असतात. परंतु या आशा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा उच्चतम असल्या पाहिजेत. सामान्य असू नयेत. सत्ताप्राप्ती करणे ही आकांक्षा चांगली आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करणेही वाईट नाही. परंतु हे सर्व प्रयत्न निर्मळ असावेत, पारदर्शक असावेत, जातीय-धार्मिक तेढ वाढविणारे नसावेत आणि जनतेचे कल्याण करणारे असावेत. हा सम्यक संकल्पचा राजकीय अर्थ झाला.
 
 
 
अष्टांगिक मार्गातील तिसरा विषय सम्यक वाणीचा आहे. कोणत्याही राजनेत्याची भाषा सभ्य असली पाहिजे. आपल्या वाणीने दुसर्‍याचे मन दुखावले जाणार नाही, मी असे बोललोच नाही, मी माझे शब्द मागे घेतो, मी माफी मागतो, अशा प्रकारची वक्तव्ये दर तीन-चार महिन्यांत आपल्याला वाचावी लागतात. सम्यक वाणीच्या अभावाची ही उदाहरणे आहेत. राजकीय क्षेत्रात दुसर्‍याला घालून-पाडून बोलणे, त्याची अक्कल काढणे, त्याच्या नावावर कोट्या करणे, ‘बावन्न कुळे येवोत नाही तर छप्पन कुळे येवोत’ असली भाषा सम्यक वाणीत बसत नाही. निरर्थक भाषणे करणे, संपूर्ण भाषण प्रतिपक्षावर हल्ला करणारे करणे हा वाणीचा दुरूपयोग झाला. वाणीचा सदुपयोग करायचा असेल, तर ज्यामुळे लोकांच्या मनातील राजकीय कर्तव्यभावना वाढीला लागतील, त्यांना सामाजिक कर्तव्याचा बोध होईल अशा प्रकारची भाषणे केली पाहिजेत. सम्यक वाणीचा हा राजकीय अर्थ झाला.
 
 
 
‘हा’मुक्त भारत, ‘तो’मुक्त भारत, अशी भाषा आपल्या पूर्वजांनी कधी केली नाही. त्यांनी आपल्याला सांगितले की, कधीही टोकाचा विचार करू नका. दुसरा जे काही म्हणतो, ते शांतपणे ऐकून घ्या. कारण त्याला सत्य जसे समजले तसे तो मांडत असतो. त्याचे बोलणे असत्य आहे असे म्हणता येत नाही, पूर्ण सत्य आहे असेही म्हणता येत नाही, म्हणून त्यातील चांगला भाग घेऊन मध्यममार्ग शोधला पाहिजे, ही आपली परंपरा आहे. काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असे म्हणण्याऐवजी काँग्रेसने देशाला चांगले काय दिले, याचा विचार केला पाहिजे. संघ-भाजपाने देशासाठी चांगले काय केले याचा विचार केला पाहिजे आणि दोन्ही चांगल्यांचा समन्वय करून पुढे जाता आले पाहिजे. आपली परंपरा कलह नाकारणारी आहे. एक महाभारतीय कलह झाला, तेवढा पुरे. आता पुन्हा त्या कलहाच्या मार्गाने जायचे नाही. सर्वांमधील चांगले आत्मसात करून भगवंतांनी दाखविलेल्या मध्यममार्गाने आपल्याला जावे लागेल.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.