सेवा विवेकच्या पर्यावरणसंवर्धक राख्या

विवेक मराठी    08-Sep-2022   
Total Views |
हिंदू सण-उत्सवांमध्ये आपल्याला सामाजिक आशय पाहायला मिळतो. त्यातीलच नुकताच श्रावण पौर्णिमेला आपण सर्वांनी साजरा केलेला सण म्हणजे रक्षाबंधन. यात केवळ बहीण-भावाच्या नात्याचे अतूट बंधन नाही, तर संपूर्ण मानवजातीत असलेल्या बंधुतेचे दर्शन होते. व्यापक अर्थ असलेल्या रक्षाबंधन या सणातील राखी हे माध्यम आहे. सांस्कृतिक-सामाजिक भान या राखीने पिढ्यान्पिढ्या जपले आहे. हाच बंधुभावनेचा व्यापक आशय खर्‍या अर्थाने भालिवली येथील ‘सेवा विवेक’च्या माध्यमातून प्रकट होताना दिसतो. 2014-15पासून सेवा विवेकच्या माध्यमातून पाड्या-वस्त्यात राहणार्‍या आपल्या वनवासी बांधवासाठी ठोस काम करावे या निर्व्याज हेतूने, वनवासी भगिनींना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य अविरत चालू आहे.
 
 
rakhi
 
‘नारी सक्षम तो समाज सक्षम’ हे ब्रीद सत्यात उतरविण्याकरिता सेवा विवेक कार्यरत आहे. बांबू हस्तकलेची गंगोत्री म्हणून मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे यांच्या कार्याने सेवा विवेक प्रेरित झाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने सेवा विवेकमधील कार्य सुरू आहे, अशी प्रांजळ कबुली सेवा विवेकचे व्यवस्थापक लुकेश बंड यांनी दिली.
 
 
 
लुकेश बंड सांगतात, “संपूर्ण बांबू केंद्रातील एका प्रशिक्षकाने दोन-ते चार प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यानंतर येथील प्रशिक्षित वनवासी भगिनीच प्रशिक्षणार्थी भगिनींना प्रशिक्षित करू लागल्या. सेवा विवेकने आतापर्यंत चौदा प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. चौदाव्या प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षित भगिनींना भालिवली येथील केंद्रात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दखल घेतली आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली. या मान्यवर व्यक्तींनी आपल्या कामाची प्रशंसा केली आणि एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असणार्‍या व्यक्तींना आपण आपल्या कामामुळे भेटू शकलो, ही त्यांच्यासाठी असलेली स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरली याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर तर दिसत होताच, शिवाय त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलला, अशा आनंदाश्रूंनी त्या व्यक्त होत होत्या.” सेवा विवेकच्या छोट्याशा प्रयत्नामुळे वनवासी महिलांना झालेला आनंद आणि सन्मान समाधान देणारा आहे, असेही लुकेशजी यांनी सांगितले.
 
 
 
सेवा विवेकच्या वतीने दर वर्षी बांबूच्या पर्यावरणस्नेही राख्या तयार केल्या जातात, परंतु यंदाच्या राखीचे वैशिष्ट्य ठरली ती ‘एक राखी, एक वृक्ष’ ही अभिनव कल्पना. याबाबत लुकेश बंड आणि प्रगती भोईर यांनी माहिती दिली, “आम्ही दर वर्षी पर्यावरणस्नेही अशा बांबू राख्या तयार करीत असतो. आपल्या केंद्रात बांबूनिर्मित सर्वच वस्तूंचा वापर वर्षानुवर्षे केला जातोच, परंतु राखी ही अशी गोष्ट आहे की, जी पवित्र तर आहे, तरीसुद्धा ती कुणी वर्षभर आपल्या मनगटावर बांधून ठेवू शकत नाही. त्यामुळे काही दिवसांनंतर ती निर्माल्यात अथवा वाहत्या पाण्यात विसर्जित केली जाते. राखीचा पुनर्वापर कसा केला जाईल, हा विचार काही काळ आमच्या डोक्यात होता आणि त्यातून राखीत बियाणे टाकून पर्यावरणाची साखळी पूर्ण करता येईल इथपर्यंत आम्ही पोहोचलो.
 
 
 
राखीत बियाणे टाकायचे ठरल्यावर आम्ही देशी वृक्षांचे बियाणे निश्चित केले. आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात आपल्या देशी वृक्षांचे योगदान मोठे आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा आपल्या संस्कृतीतील पर्यावरण संस्कार आहे, परंतु संस्कृतीची विस्मृती हेच पर्यावरणाच्या र्‍हासाचे कारण झाले आहे. यानिमित्त हा पर्यावरण संस्कार जागृत व्हावा, यासाठी आमचा या संकल्पनेतून छोटासा प्रयत्न आहे.”
 
 
 
 
हा संस्कार समाजशक्तीने प्रस्थापित झालेल्या राज्यशक्तीमार्फत समाजशक्तीपर्यंत पोहोचला, तर तो अधिक गतीने समाजात प्रकट होईल. यासाठी विधान भवनामध्ये आणि विधानसभेत सद्य:स्थितीत सत्तेत असलेल्या लोकनियुक्त आमदारांना एक पत्र आणि राखी स्नेहसप्रेम भेट म्हणून पाठविली. त्यावर व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून चार ते पाच आमदारांनी प्रतिक्रियेचे पत्र लिहिले आणि सेवा विवेकच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नमुन्यादाखल आमदारांना पाठविलेल्या पत्रास प्रतिसाद म्हणून त्यांच्याकडून आलेले पत्र लेखात प्रकाशित करीत आहोत.
 
 
“वनवासी भगिनींमध्ये असलेले पारंपरिक कौशल्य आणि दिले गेलेले प्रशिक्षण यांचा सुरेख मेळ होऊन सुंदर कलाकुसर असलेल्या आकर्षक अशा पर्यावरणस्नेही राख्या सेवा विवेकच्या वतीने गेली अनेक वर्षे तयार होत असतात. राखीचा दर्जा आणि राखीनिर्मितीचे सातत्य यामुळे सेवा विवेकच्या वतीने केल्या जाणार्‍या राखीला बॅ्रंड प्राप्त झाला आहे. झगमगत्या मार्केटिंगच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकून राहायचे असेल, तर दर्जाबरोबरच पॅकेजिंगलाही त्याच तोडीला स्थान दिले पाहिजे, ही काळाची गरज ओळखून या वर्षीपासून आकर्षक पॅकेजिंगला सुरुवात केली आहे” अशी सेवा विवेकच्या प्रशिक्षण विकास अधिकारी प्रगती भोईर यांनी माहिती दिली.
 
 
 
पॅकेजिंगचा विचार करताना राखी पॅकेजिंग बॉक्सवर आपल्या वनवासी भगिनीचा राखी निर्माण करतानाचा फोटो, वेबसाइटचा पत्ता, संपर्क क्रमांक, क्यू.आर. कोड (संस्थेची इत्थंभूत माहिती), ‘नारी सक्षम तो समाज सक्षम’ हे ब्रीदवाक्य प्रिंट केलेले आहे, जेणेकरून सेवा विवेक नक्की काय काम करते आणि संस्थेचा निर्भेळ हेतू काय आहे, हे समाजापर्यंत पोहोचेल. सेवा विवेक निर्मित राख्या या एकाहून एक सुंदर कलाकृतीचा आविष्कार आहेत. या राख्यांना नाव देण्याचा विषय आला, तेव्हा भारतीय संस्कृतीचेच त्यातून दर्शन व्हावे हा विचार होता. भारतीय संस्कृतीत नद्यांना आपण पवित्र मानतो. जीवनदायिनी नदीला ‘जल है तो जीवन आहे’ असेही संबोधतो. त्यामुळे बहुतेक राख्यांना नद्यांची नावे देण्यात आली - गंगा, सूर्या, शंख, कावेरी, यमुना, नर्मदा, पूर्णा, गोदावरी, सरस्वती, झेलम, तानसा, गिरिजा. शिवाय जेव्हा देशी बियाणे राखीत टाकण्याचा विचार केला, तेव्हा त्याची रुजवण झाली पाहिजे, हे तर नक्की होतेच. तसेच वाढते शहरीकरण पाहता जागेचा अभाव हा प्रश्नही मोठा होता, तेव्हा देशी बियाणांच्या छोट्या छोट्या रोपांचाही - आवळा, शमी, पिंपळ, वड, लिंबू, तुळस यांचा समावेश केला.
 
 
 
“आपल्या माध्यामातून तयार केलेल्या राख्यांची गुणवत्ता आणि आकर्षकता पाहता अनेक संस्था आपल्याशी संलग्न झाल्या आणि त्यांच्यामार्फत त्यांनी राखींची विक्री केली. काही संस्थांनी त्यांच्या लोगोवर आपल्या राख्या विक्री केल्या, ही विश्वासार्हता आपण निर्माण केली आहे. बाजारमूल्याचा विचार करता आपल्या संस्थेला यातून नुकसान नाही, तर आपली वस्तू त्या गुणवत्तेची आहे हे सिद्ध तर होतेच, शिवाय आपल्या वनवासी भगिनीला यातून रोजगार निर्माण होतो. भगिनींचे कल्याण हेच सेवा विवेकचे लक्ष्य आहे,“ असे आनंदोद्गार प्रगती भोईर यांनी काढले. सेवा विवेकचे एकंदर कार्य पाहता कमी कालावधीत त्यांनी निर्माण केलेली विश्वासार्हता कौतुकास्पद आहे. एखादे काम शुद्ध हेतू ठेवून केले तर ते तडीस जातेच, ही शिकवण सेवा विवेकच्या कामातून पाहायला मिळते. यावर लुकेशजी यांच्याशी संवाद साधताना याचे गमक काय आहे असे विचारले, त्यावर ते म्हणाले की, “यात कुठले गमक वगैरे काही नाही, तर हा संघसंस्कार आहे.” सेवा विवेकचे संस्थापक प्रदीप गुप्ता आणि स्वतः लुकेश बंड हे बालवयापासून संघस्वयंसेवक आहेत. त्यामुळे बालवयापासूनच संघसंस्काराची रुजवण झाली आहे आणि आता त्याचे प्रकटीकरण होत आहे. समाजाविषयी सद्भाव जागृत ठेवणे, आपली इच्छाशक्ती, क्रयशक्ती ही कायम समाजहितैषी, राष्ट्रहितैषी ठेवावी, हा संघसंस्कार कायम जागृत आहे. समाजात काम करीत असताना शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या मनुष्याचे कल्याण व्हावे, हा शुद्ध हेतू हेच सेवा विवेकच्या कामातून साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.