पद्मश्री तारा जोहर दीदी

विवेक मराठी    09-Sep-2022   
Total Views |
पद्म गौरव लेखमालेत या वेळी आपण तारा जोहर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तारा जोहर या प्रेमाने तारादीदी म्हणून ओळखल्या जातात. त्या एक प्रसिद्ध लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत, ज्यांनी श्रीअरविंदांच्या शिकवणीसाठी आणि प्रचारासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. विद्यमान केंद्र सरकारने शिक्षण आणि त्याच्या प्रचारार्थ सर्वोत्तम कार्य करण्यासाठी त्यांना पद्मश्री बहाल केली आहे.
 
 
vivek
जीवन हाच एक योग आहे.. स्वत:ला ओळखा, स्वत:मध्ये बदल करा आणि आहात त्यापेक्षा अधिक उन्नत आणि परिपूर्ण अवस्थेला जा, असा मंत्र देणारे महायोगी श्रीअरविंद हे जागतिक कीर्तीचे विचारवंत, साहित्यकार आणि जीवनाचे भाष्यकार होते. पद्मश्री तारादीदी त्यांचे हेच विचार प्रत्यक्षात कृतीतून आचरणात आणतात. तारादीदींनी आपल्या आयुष्यात श्रीअरविंदांच्या चळवळीत अमूल्य योगदान दिले आहे.
 
 
5 जुलै 1936 रोजी जन्मलेल्या तारादीदी यांच्यावर पाँडिचेरी आश्रमात माँ आणि श्रीअरविंद यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव पडला. तारादीदी यांचे वडील सुरेंद्रनाथ जोहर हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी तारादीदींना वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी पाँडिचेरीला पाठवले. वयाच्या 40व्या वर्षापर्यंत त्या माँच्या छत्रछायेत आणि मार्गदर्शनाखाली राहिल्या. जवळपास 5 तपे पाँडिचेरीच्या आश्रमात त्यांनी अभ्यास, मनन आणि चिंतन केले आहे. त्यानंतर तारादीदी दिल्ली आश्रमात परत आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून तारादीदी श्री अरबिंदो आश्रम - दिल्ली शाखेचे प्रतिनिधित्व आणि व्यवस्थापन बघत आहेत. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ जोहर यांनी दिल्लीत श्री अरबिंदो आश्रमाची पायाभरणी केली होती.
 
 
 
तारादीदींच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री अरबिंदो आश्रमाने केवळ आपल्या उपक्रमांचा विस्तार केला नाही, तर आध्यात्मिक साधकांचा आणि माणसांचा एक मोठा जनसमुदाय तयार केला आहे. त्यांनी इंग्लिशमध्ये दोन पुस्तके लिहिली आहेत. ‘ग्रोइंग अप विथ द मदर’ आणि ‘लर्निंग विथ द मदर’ आणि फ्रेंचमधील दोन पुस्तके ‘रेपोन्सेस दे ला मेरे उने मोनिट्रिस’ आणि ‘ला माय ट्रॅव्हल एव्हेक लेस एन्फंट्स’ यांचा उत्तम असा अनुवाद केला आहे. माँबरोबरच्या त्यांच्या अनुभवांचा आणि संवादाचा खजिना या पुस्तकांमध्ये आहे आणि त्यांच्या अनेक व्याख्यानांमधून त्या माँबरोबरच्या आठवणींनी साधकांना समृद्ध करतात.
 
 
1981मध्ये तारादीदींनी ‘मिरांबिका फ्री प्रोग्रेस स्कूल’ नावाचा एक अभिनव प्रकल्प सुरू केला. त्यांचे मार्गदर्शन आणि एकात्मिक शिक्षण, गणिताचे प्रायोगिक शिक्षण, विज्ञान प्रकल्प भारतातील 200हून अधिक ग्रामीण शाळांना एकत्रितपणे आणून शिक्षण क्षेत्रातील विविध शैक्षणिक कार्यशाळा आणि साहित्य, ग्रंथालय आणि पुस्तके, क्रीडा उपकरणे इत्यादींवर आधारित विकसित केले. आज हा प्रकल्प अनेक ठिकाणी प्रत्यक्षात राबविला जातो आहे. याच शैक्षणिक क्षेत्रांतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 
 
 
ओरो - मीरा विद्या मंदिर ही तारादीदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहाय्याने 2018मध्ये सुरू करण्यात आलेली सर्वात प्रभावशाली शाळा आहे. सर्वोत्तम शैक्षणिक प्रकल्पांपैकी एक असा हा प्रकल्प आहे. ही आदिवासी मुलांसाठी निवासी आणि संपूर्ण मोफत शाळा आहे. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील केचला या दुर्गम आदिवासी गावात वर्षातून 365 दिवस ही शाळा चालते. आदिवासी शाळांमध्ये तारादीदींनी त्यांचे शिक्षण प्रायोजित करण्यासाठी योगी श्री. अरबिंदो आश्रमाने भारतभरातील अनेक मुलांना अनुदान सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
 
2015 मध्ये त्यांनी तरुणांमध्ये स्वाभिमानासह धैर्य आणि सहनशक्ती निर्माण करण्यासाठी युवा शिबिरे सुरू केली. पाँडिचेरीमध्ये सर्वांगीण क्रीडा प्रशिक्षणामुळे त्यांना नैनिताल येथे या शिबिरांची रचना आणि नेतृत्व करण्यास प्रवृत्त केले, श्री अरबिंदो आश्रम - दिल्ली शाखेचा विस्तार करण्यास त्यांनी मदत केली आणि आजही आपल्या कार्यातून ही शाखा दिशादर्शक म्हणून ओळखली जाते आहे. 1989मध्ये श्रीअरबिंदो आश्रम दिल्ली शाखेत ग्रामीण युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. तरुणांना एक चांगला शिस्तबद्ध आणि स्वावलंबी माणूस बनण्याच्या उद्देशाने त्यांनी एकात्मिक स्वरूप विकसित केले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरजूंच्या उन्नतीसाठी, आधार आणि मदतीसाठी व्यतीत केले .
 
 
 
एक कर्मयोगी आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचणारी आणि अनेकांची प्रेमळ मोठी बहीण, तारादीदी खर्‍या अर्थाने पद्मश्री या पुरस्काराच्या मानकरी आहेत. भौतिक प्रगतीने आज शिखर गाठले असले, तरी सुख, शांती आणि समाधानाच्या शोधार्थ माणसे वणवण भटकताना दिसतात. बाहेरच्या प्रचंड गोंगाटामुळे माणसे आतला आवाज ऐकू शकत नाहीत आणि अंतर्नाद ऐकण्यासाठी श्रीअरविंदांच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार केलेल्या भारताच्या उदात्त आध्यात्मिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणार्‍या तारादीदी यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा आहेतच.
 
 
 

श्री सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक ,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक,तरुण भारत नागपूर येथे २ वर्ष स्तंभ लेखन केले आहे. मुंबई तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स,पुण्यनगरी या वृत्तपत्रासाठी विविध विषयांवर लेखन सुरू असते. मध्य प्रदेश येथील इंदोर येथून एक पाक्षिक निघतं मराठी गौरवयात ही अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. प्रज्ञालोक ह्या त्रैमासिकात ही लेखन सुरू आहे. आणि प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय आहे. मुंबई तरुण भारताने "कालजयी सावरकर" या नावाने सावरकर विशेषांक प्रसिद्ध केला त्यात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' ह्या विषयावर लेख प्रकाशित झाला आहे. अनेक दिवाळी अंकांसाठी लेखन सुरू असते. साप्ताहिक विवेक साठी लिहितांना कायमच आनंद मिळत असतो. विवेकचा वाचक लेखकांना समृद्ध करणारा आहे.