सांस्कृतिक दहशतवाद आणि त्याची पाळेमुळे

विवेक मराठी    14-Jan-2023   
Total Views |
 
 
Cultural terrorism
 
नाशिकला जाने. 27-29 रोजी अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन आयोजन केले आहे. ‘मुस्लीम - प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या दोन विषयांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आयोजकांनी कोणा हिंदू वक्त्याला बोलावले असते, तर ते अधिक समर्पक ठरले असते. त्यांनी या देशातील बहुसंख्य हिंदूंची बाजू मांडणारा वक्ता न बोलावून आपले बौद्धिक दारिद्य्र उघडे पाडले आहे. आता लयाला जाऊ घातलेल्या राजकीय पक्षाने उकरून काढलेल्या हिंदू दहशतवादाला धरूनच एकजात वक्ते परिसंवादात गरळ ओकणार आहेत, हे सांगायची आवश्यकता नाही.
 
नाशिकला जाने. 27-29 रोजी अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन आयोजित झाले आहे. चित्ररथ आणि पथनाट्याने त्याची सुरुवात होणार आहे. त्यात पाच परिसंवाद आयोजित केले आहेत. परिसंवादांपैकी पहिला परिसंवाद ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुस्लीम - प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आहे, तर दुसरा परिसंवाद ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ यावर होणार आहे. या संमेलनाला मान्यवर पाहुण्यांत माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, लेखक आणि अनेकदा दू.द. वाहिन्यांवर आपल्याला दिसणारे अब्दुल कादर मुकादम, दिल्लीवरून गौहर रझा, विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, डॉ. श्रीमंत कोकाटे, मा. हुसेन दलवाई, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी अशी मान्यवर मंडळी आहेत. मला मान्यवरांच्या यादीत सर्व सेक्युलॅरिस्ट गैरमुस्लीम आणि मुस्लीम धर्मीयच दिसले. खरे पाहिले, तर सांस्कृतिक दहशतवाद हा विषय केवळ मुस्लीम समाजापुरताच मर्यादित नसून ‘सर तन से जुदा’ ही सांस्कृतिक दहशतवादी घोषणा, त्याची महाराष्ट्रात झालेली रक्तलांछित अंमलबजावणी यांच्या पार्श्वभूमीवर हिंदूंसाठीही तेवढाच पोटतिडकीने विचारात घेण्याचा विषय आहे. ‘मुस्लीम - प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’ आणि ‘साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद’ या दोन विषयांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आयोजकांनी कोणा हिंदू वक्त्याला बोलावले असते, तर ते अधिक समर्पक ठरले असते. अखिल भारतीय म्हणवणार्‍या संमेलन आयोजकांसाठी ते शोभून दिसले असते. त्यांनी या देशातील बहुसंख्य हिंदूंची बाजू मांडणारा वक्ता न बोलावून आपले बौद्धिक दारिद्य्र उघडे पाडले आहे. आता लयाला जाऊ घातलेल्या राजकीय पक्षाने उकरून काढलेल्या हिंदू दहशतवादाला धरूनच एकजात वक्ते परिसंवादात गरळ ओकणार आहेत, हे सांगायची आवश्यकता नाही. तेव्हा सर्व आयोजक आणि वक्ते मंडळींसमोर जागतिक स्तरावर शेकडो वर्षे घडत आलेल्या सांस्कृतिक दहशतवादाचा आरसा समोर धरण्याचा हा प्रयत्न आहे. ‘नामूलं लिख्यते किंचित’ - सबळ पुराव्याशिवाय थोडेही लिहिणार नाही या सूत्राला अनुसरून सांस्कृतिक दहशतवादाच्या अंमलबजावणीच्या इतिहासावर ओझरता प्रकाश टाकण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे, त्यावरून संमेलनातील वक्ते किती एकांगीपणे सांस्कृतिक दहशतवाद या विषयाला धरून मतप्रदर्शन करतील, हे लक्षात येऊ शकेल.
 
 
सांस्कृतिक दहशतवादाचा काळाकुट्ट इतिहास
 
 
धर्म आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्मप्रसाराची भूमिका ही आध्यात्मिक प्रेरणेपुरती निगडित न राहता जेव्हा व्यक्तिगत स्वर्गसुखाशी जोडली जाते, तेव्हा ती दहशतवादाशी जोडली जाते. माझा व्यक्तिगत अनुभव नोंदवतो. अनेकदा मुस्लीम लोकांशी थोडा जास्त वेळ बोलणे झाले की 80 टक्के वेळा समोरचा माणूस सहजगत्या विचारतो, “तुम्ही इस्लाम धर्म का स्वीकारत नाही?” तेव्हा माझे उत्तर ठरलेले असते, “भल्या माणसा, मला काफिराला इस्लामचे आवतण देऊन तू तुझ्यासाठी स्वर्गात जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहेस. माझ्या धर्मात तसे आकर्षण नाही. तुझे पुण्य तुला लखलाभ असो.” हेच इतिहासकाळात धाकदपटशाहीने आणि तलवारीच्या धाकाने केले जात असे. तो सांस्कृतिक दहशतवाद होता.
 
 
 
आधुनिक इतिहासात इ.स. चौथ्या शतकात रोमन सम्राट कॉन्स्टंटाइनने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर मध्यपूर्वेत सांस्कृतिक दहशतवाद मूळ धरू लागला. गैरख्रिस्ती लोकांना अश्रद्ध (Infidel) ठरवून त्यांना बाटवायचे, त्यांच्या सांस्कृतिक वारशाला नष्ट करायचे हे धोरण सरसकट अंमलात आणले गेले. त्याच्या पाठोपाठ साम्राज्यविस्तार आला. शतकभरातच बायझेंटाइन राज्यकर्त्यांनी आर्मेनियावर आणि मेसोपोटेमियावर हक्क सांगण्याचे कारण तेथे ख्रिश्चन बहुसंख्य झाले होते. पूर्वीची संस्कृती नष्ट झाली होती. सातव्या-आठव्या शतकात ओसरणीस लागलेल्या रोमन आणि पर्शियन साम्राज्यांना तरुणाईत असलेल्या इस्लामच्या आक्रमणाला सामोरे जावे लागले. स्पेन तर पूर्णपणे इस्लामच्या ताब्यात गेला. The Middle East या बर्नार्ड लेविसच्या पुस्तकात गेल्या 2000 वर्षांच्या रक्तरंजित इतिहासाचा मागोवा घेतला आहे. या पुस्तकात दिल्याप्रमाणे यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या एकेश्वरी धर्मांनी समानतेचा कितीही ब़डिवार माजवला असला, तरी प्रत्यक्षात स्वधर्मीय पुरुषांव्यतिरिक्त, इतरांना कमी लेखण्याची पारंपरिक प्रवृत्ती सांस्कृतिक दहशतवादात परिणत झालेली आपण पाहतो. That is to say, enshrined in all the three religious traditions has been the presumption that the slave, the child, the women and the unbeliever are in significant respects inferior (The Middle East, P 206).
 
 
आज मानवाधिकारांचा हक्क जणू आपलाच आहे असा तोरा मिरवणारी पश्चिमी संस्कृती, आपल्या धर्मात अथवा पंथात नसलेल्या इतरांशी मध्ययुगीन युरोपात किती अमानुष व्यवहार करत होती, याचा सविस्तर आढावा The Medieval Underworld या Andrew McCallच्या पुस्तकात आहे. या पुस्तकातील चित्रे त्या काळातील नृशंसतेचे दर्शन घडवतात. पूर्वीच्या अनेक लेखकांनी नोंदवलेले छळांचे प्रकार या पुस्तकात संदर्भांसह दिले आहेत. सैतानाची बाधा झाल्याचा आरोप ठेवून किती लोकांचे अमानुषरित्या बळी घेण्यात आले, त्या सांस्कृतिक दहशतवादाचा पाढा मॅक्कॉलने घेतला आहे.
 
 

Cultural terrorism
 
भारतही या सांस्कृतिक दहशतवादाला गेली 1000-1200 वर्षे झेलतो आहे. खिलजी, गझनी यांनी आणि शेवटी मुघलांनी सांस्कृतिक दहशतवाद कसा अंमलात आणला, त्याची हजारो उदाहरणे नोंदलेली आहेत. त्यांची एकजात विकृत मनोवृत्ती आणि काफिरांविरोधात घृणा याचे एकच उदाहरण देतो. ज्या औरंगजेबाला आताची राजकारणी मंडळी मतांसाठी लांगूलचालन करताना साधनशुचितेचे प्रमाणपत्र देण्यास उत्सुक आहेत, त्याचा बापजादा बाबराने केलेल्या अत्याचारांचे वर्णन बाबरनाम्यात दिले आहे, Many (Hindus) fell on the field of battle; others desisting from fighting fled to the desert of exile and became food of crows and kites. Mounds were made of the bodies of slain (Hindus), pillars of their heads (Baburnama: - Memoir, 2017 edn. n¥. 371) धारातीर्थी पडलेल्यांचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे सोडून त्यांच्या मुंडक्याचे ढिगाऱे आनंदाने पाहणे हा विकृत सांस्कृतिक दहशतवाद ठरतो. अनेक मुस्लीम राज्यकर्ते असे लांछनास्पदरित्या वागले आहेत. त्यांच्या या सांस्कृतिक दहशतवादी वृत्तीवर मुस्लीम मराठी साहित्यात निषेध होणे मी माणुसकीचे लक्षण मानेन.
 
 
 
ख्रिश्चन युरोपने शतकानुशतके यहुदी शरणार्थींवर केलेल्या अत्याचारांना (Pogroms) सीमा नव्हती. गावात काहीही अनिष्ट घडले की त्याचे खापर स्थनिक यहुदींवर फोडून त्याच्या वस्त्यांवर हल्ले करणे तर नित्याचेच होते. सांस्कृतिक दहशतवादाचे साहित्यातील उदाहरण मला जगन्मान्य साहित्यिक विल्यम शेक्सपिअरचे वाटते. त्याने रंगवलेले शायलॉक यहुद्याचे चित्रण आणि त्याला जोडून येणारा वाक्प्रचार Pound of Flesh हे सांस्कृतिक दहशतवादाचे उत्तम साहित्यिक उदाहरण ठरते. पाउंडभर वजनाचे मांस घेऊन शायलॉकसारखा व्यापारी काय करणार होता? त्याला काय यहुद्यांविरोधात युरोपात असलेली घृणा माहीत नव्हती? पण साहित्यिकाच्या मनात असलेली यहुद्यांविरोधातील घृणा त्याने रंगवलेल्या पात्रात उतरली. त्याची आजवर कोणी मीमांसा केली असेल तर मी जाणण्यासाठी उत्सुक आहे. मुस्लीम साहित्य संमेलनातील वक्त्यांनी या साहित्यातील सांस्कृतिक दहशतवादावर प्रकाश टाकावा. यहुदीद्वेषाची परिसीमा लाखो यहुद्यांना विषारी वायुने मारणार्‍या हिटलरने केली. तो ख्रिश्चन होता हे खुलेपणाने कोणी ख्रिश्चन सांगत नाही. याउलट पारशी आणि यहुदी शरणार्थींना अत्यंत सभ्यपणाची वागणूक हिंदूंनी दिली. हे दोन्ही समाज स्वत:चे अस्तित्व राखून येथील समाजाशी एकरूप झाले. पारशी लोकांचे आपल्या देशासाठी योगदान सर्वज्ञात आहे. पण यहुद्यांच्या बाबतीत मला एक निदर्शनास आणायचे आहे. काही वर्षांपूर्वी मी पेण, जि. रायगड, महाराष्ट्र येथील यहुदी स्मशानभूमीला भेट दिली. त्या वेळी तेथे मृतांच्या स्मृतिफलकांवर मी यहुदी आणि इंग्लिश वर्षगणनांबरोबरच शक गणनेची नोंदणी पाहिली होती. यहुदी समाज एकरूप होण्याचे ते निरुपम लक्षण आहे. निरुपम का, तर मराठी ख्रिश्चन आणि मुस्लीम साहित्यिकांनी असे त्यांचे एकतरी उदाहरण निदर्शनास आणावे.
 
 
Cultural terrorism
 
मुस्लीम संस्कृतीने दोन विभाजने अस्तित्वात आणली. दार-उल-हर्ब म्हणजे काफिरांची, अश्रद्धांची युद्धग्रस्त भूमी आणि दार-उल-इस्लाम म्हणजे श्रद्धावान, खलिफाचा धार्मिक अंमल असलेली भूमी. सर्वसामान्य मुस्लीम जर गैरमुस्लीम देशात राहत असला, तरी त्याला ती आपली वाटत नाही. ती येनकेनप्रकाराने दार-उल-इस्लाम करावी हे तो धार्मिक कर्तव्य मानतो. जो काही भूभाग इस्लामबहुल करता येईल, तो करण्याचे त्याचे धोरण असते. जेथे थोडी मुस्लीम वसती वाढते, तेथे इतर धर्मीयांना हुसकावून लावण्याचे कैराना अथवा मुंबईतील प्रकार भारतातच घडतात असे नाही. ज्यांना इंग्लंड-युरोपने आयसिसच्या अथवा तालिबान्यांच्या जुलूमशाहीला तोंड न देता पलायन करून आल्यावर खुल्या दिलाने आसरा दिला, त्याच युरोपात हे शरणार्थी सर्व सामाजिक सुविधांचा पुरेपूर फायदा घेऊन तेथेच बंडाळी माजवत आहेत. युरोपात स्थानिक, पिढ्या दोन पिढ्या सुखाने वाढलेल्या, पण अगदी सहजपणे काफिरद्वेषी (Kafirophobia) झालेल्या नव्या पिढीने अनेक घातपाती कृत्ये केली. शार्ली हेब्दोवरच्या हल्ल्याने सांस्कृतिक दहशतवादाचे उदाहरण जगापुढे आणले. ज्या शरण देणार्‍या देशांच्या भूमीवर सुखाने वाढलो, त्या युरोपातील मोकळ्या संस्कृतीशी जुळवून न घेता दहशत माजवून आपली संस्कृती लादण्याचा हा घृणास्पद प्रयत्न होता. इंग्लडमध्ये कोपरा कोपरा गैरमुस्लीम करण्याचे आणि इस्लामी शरीया लादण्याचे पद्धतशीर प्रयत्न इद हुसैन या जन्माने ब्रिटिश असलेल्या लेखकांने ओपस Among the Mosques: A Journey Across Muslim Britain (2021) या पुस्तकात मांडले आहे. इंग्लंडमध्ये पद्धतशीरपणे वाढत असलेल्या तबलिघी प्रभावामुळे स्थानिक ख्रिश्चन नागरिक तो भाग सोडून जात आहेत. इद हुसैनने दहा शहरांमधील दिलेली साद्यंत माहिती सांस्कृतिक दहशतवादाचे गेल्या 2-4 वर्षांतील सप्रमाण मानक आहे.
 
 
धार्मिक पाळेमुळे
 
 
या सांस्कृतिक दहशतवादाची पाळेमुळे धार्मिक प्रचारात आहेत. हे मी सांगत नाही, तर तीन मान्यवर मुस्लीम लेखक लिहितात. इद हुसैनने दिल्याप्रमाणे, देवबंदी पुस्तकांद्वारे खिलाफतीची तयारी करणारी पुस्तके इंग्लंडमध्ये उपलब्ध आहेत (पृ. 26.) तेथील मुस्लीम वस्त्यांमध्ये शरीया लागू केला जातो. महिलांना मशिदींमध्ये प्रवेश नाकारला जातो. Muslim Becoming: Aspiration and Skepticism in Pakistan (2017) या पुस्तकाच्या लेखिका नवीदा खान यांनी तर इस्लाममधील धार्मिक-सांस्कृतिक असहिष्णुता, पैगंबरांचा सर्व फिरक्यांना समान लेखण्याचा आदेश झुगारून मुल्लाशाहीने स्वत:च्या एकाच पंथाला प्रमाण मानून तसे धार्मिक प्रवचनांद्वारे सामान्य मुस्लिमांवर ठसवण्याच्या मनोवृत्तीत असल्याचे सांगितले आहे. (पृ. 186-187.) जगभरात मुस्लीम पंथीयांमध्ये कटोकटीच्या संघर्षाचा इतिहास आपण आयसिसच्या अस्तित्वादरम्यान या विकृतीतून पुनरावृत्ती होताना पाहिला. पाकिस्तानी या मुल्ला लोकांकडे तुच्छतेने पाहतात. ते मुल्लांना बदमिजाजी दीनी बंदे म्हणतात. (नवीदा खान, पृ. 147.) या मुल्लाशाहीने सांस्कृतिक दहशतवादाला जन्म दिला. त्याचे दुष्परिणाम सामान्य मुस्लीम भोगतो आहे. या साहित्य संमेलनात सांस्कृतिक दहशतवादाच्या या पैलूंवर चर्चा होईल अशी अपेक्षा करतो. शेवटी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांच्या ‘इस्लाम: ज्ञात आणि अज्ञात’ पुस्तकातील उतारा देतो - ‘आधुनिक काळातील गुंतागुंतीच्या सामाजिक आणि राजकीय अवस्थेचे आकलन होण्याची कुवत नसलेल्या आणि धर्मशास्त्राचा विकृत अर्थ लावणार्‍या उलेमांच्या दुराग्रहामुळे भारतीय मुसलमानांचे दुर्दैव मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.’ (पृ. 163). या मुद्द्यावर मुस्लीम साहित्यिक आत्मपरीक्षण करणार आहेत का, हा प्रश्न मी, एक हिंदू, विचारार्थ ठेवतो आहे.
 
 

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.