पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स सुरुवात 180 वर्षांपूर्वी सांगली इथे झाली

बावनकशी

विवेक मराठी    20-Jan-2023   
Total Views |
महाराष्ट्रातले पहिले मराठी सुवर्णकार असं म्हटलं तर वावगं ठरू नये इतका काळ गाडगीळ कुटुंब या व्यवसायात आहे. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स या पेढीची सुरुवात सुमारे 180 वर्षांपूर्वी सांगली इथे झाली. सांगली आणि परिसरात भरणार्‍या आठवडे बाजारात गाडगिळांचे पूर्वज टोपलीत दागिने घेऊन विकायला जायचे. सूर्यास्तानंतर बाजार उठला की ती टोपली बैलगाडीत घालून घरी परतायचं असा शिरस्ता आणि हाच त्यांच्या व्यवसायाचा उगमबिंदू.
 
 
vivek
 
वाडवडिलांनी दिलेला व्यावसायिकतेचा मूलमंत्र आणि ग्रहकहिताचं व्रत जपत गाडगिळांच्या 6 पिढ्यांनी हा व्यवसाय पुढे वाढवला. सोन्यासारखा बावनकशी व्यवसाय करणार्‍या गाडगीळ बंधूंपैकी अजित गाडगीळ यांच्याशी, त्यांच्या ‘कॉर्पोरेट लूक’ असलेल्या नव्या कार्यालयात बसून केलेली बातचीत...
 
 
पटवर्धन संस्थानिकांबरोबर कोकणातली जी काही कुटुंबं सांगलीत स्थलांतरित झाली त्यापैकी एक गाडगिळांचं. त्यांचे पूर्वज टोपलीत दागिने घालून आठवडे बाजारात विकायला जायचे. ही व्यवसायाची सुरुवात. सुरक्षारक्षकांच्या आणि अत्याधुनिक यंत्रणांच्या कडेकोट पहार्‍यात उभ्या असलेल्या आजच्या टोलेजंग पेढ्यांच्या दर्शनापुढे, त्यावेळच्या फिरत्या दुकानाचं हे चित्र नुसतं डोळ्यासमोर जरी आणलं तरी तेव्हाचं जग किती निर्मळ असेल याची कल्पना येते. कालांतराने, 1832 साली सांगलीच्या सराफ कट्ट्यावर गाडगीळ कुटुंबाची पेढी उभी राहिली आणि ‘पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स’ असं तिचं नामकरण झालं. मराठी माणसाची इतकी जुनी अशी ही पहिलीच सोन्याची पेढी!
 
 
सुरुवातीपासूच व्यवहार सचोटीचा असल्याने त्यांचा जम बसायला वेळ लागला नाही. सर्वसामान्य ग्रहकांबरोबरीनेच संस्थानिकांचे सराफ ही गाडगिळांची ओळख तेव्हापासूनचीच... गाडगिळांच्या व्यावसायिक यशाचं मर्म, पटवर्धन संस्थानिकांनी त्यांच्याविषयी काढलेल्या कौतुकोद्गारात दडलंय. संस्थानिकांनी म्हटलंय, ‘‘या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे मलाही या दुकानात सर्वसामान्यासारखी वागणूक मिळते.’’ याविषयी बोलताना अजित गाडगीळ म्हणाले, ‘‘आमच्याकडे एखादा ग्राहक 100 मिलीग्रॅमचा एक मणी घ्यायला आला किंवा एखादा 100 ग्रॅम सोनं घ्यायला आला तरी, दोघेही आमच्यासाठी ग्रहक राजाच असतात. ग्रहक देवो भव ही बांधिलकी जपत काम केलं, म्हणूनच या व्यवसायात पाय घट्ट रावून उभे आहोत.’’
 
 
 
 
पहिलं सीमोल्लंघन... सव्वाशे वर्षांनी
सांगलीत स्वतंत्र ओळख तयार झाल्यावरही त्यांनी लगेच नव्या गावात नवी शाखा उघडण्याची घाई केली नाही, अर्थात त्या काळात, ‘आमची कुठेही शाखा नाही’ हेच सांगण्यात भूषण वाटत असे. हळूहळू हा विचार कालबाह्य ठरत गेला. सांगलीतल्या गाडगिळांनी सीमोल्लंघन करत पुण्यासारख्या चोखंदळ ग्रहकांच्या नगरीत पाऊल टाकलं. विसूभाऊ, दाजीसाहेब आणि नानासाहेब या तीन गाडगीळ बंधूंनी पुण्यातल्या दुकानाची जबाबदारी स्वीकारली. लक्ष्मी रोडवर पहिली 600 चौ.फुटाची जागा भाड्याने घेतली. तेव्हा पुण्यातला सगळा बाजार सोन्या मारुती चौकात होता. तिथल्या ग्राहकाला लक्ष्मी रोडकडे वळवणं हे पूर्वीच्या पुण्यात धाडसच होतं. मात्र, व्यवहारात पारदर्शकता असली, जसं बोलू तसा आपला व्यवहार असतो याची ग्राहकाला खातरी पटली की नव्या ठिकाणीही बस्तान बसवता येतं हा विश्वास या सीमोल्लंघनाने त्यांना दिला.
सांगली, पुण्याबरोबरच नाशिक, कोल्हापूर या शहरातही गाडगीळ बंधूंनी नावलौकिक मिळवला. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि भारताबाहेरही त्यांचे ग्रहक आहेत. आणि आता तर अमेरिकेतल्या भारतीय ग्रहकांच्या सोयीसाठी त्यांनी कॅलिफोर्निया इथे शाखा सुरू केली आहे.
 
 
आधुनिकतेची कास...
‘‘सोन्याच्या पेढीला आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहायचं असेल आणि वाढायचं असेल, तर तिनं आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करायला शिकायला हवं, त्यापासून दूर राहणार्‍याचं नुकसान होतं असा आमचा अनुभव आहे.’’ अजित गाडगीळ म्हणाले. त्याची प्रचिती त्यांच्या अतिशय प्रशस्त आणि पूर्णपणे कॉर्पोरेट लूक असलेल्या कार्यालयाच्या दर्शनाने येत होती. ‘‘पेढीचं रंगरूप आता पूर्वीसारखं राहून चालणार नाही. तिला कॉर्पोरेट लूक द्यावाच लागतो. त्यासाठी स्टाफलाही प्रशिक्षित करावं लागतं. पेढीतले सर्व व्यवहार संगणकीकृत करण्यावर आम्ही भर दिला. जगाशी जोडणारी इंटरनेट सुविधा, दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे याची जोड दिली. आणि आता तर लोकांकडून फीडबॅक घेण्याकरता स्वत:चं कॉल सेंटरही सुरू केलं आहे. एखाद्या सराफी पेढीत झालेला असा पहिलाच प्रयत्न.’’ त्यांनी माहिती दिली आणि त्यांच्या आधुनिकतेची कास धरण्याच्या वृत्तीची साक्ष पटली.
चोखंदळ ग्रहकांचे सोनार
‘‘काळाच्या ओघात राजेपण दुकानदाराकडून ग्रहकाकडे आलं. ग्रहक हा राजा झाला आणि अतिशय चोखंदळही. दूरचित्रवाहिन्यांवरच्या वेगवेगळ्या मालिकांतून,
***
खास महिलांसाठीच्या विविध नियतकालिकांतून पाहायला मिळणारे दागिने, विविध प्रांतांतून आलेल्या लोकांमुळे कळणारे दागिन्यांचे विविध प्रकार यामुळे त्याचा चोखंदळपणा वाढला आहे. तसंच ग्रहकाला आज बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत याचंही भान दुकानदाराला आलं आहे. तेव्हा आपले पारंपरिक ग्रहक टिकवण्यासाठी आणि नवे वळवण्यासाठी दुकानदाराला दर्जा आणि वैविध्य दोन्ही पाहावं लागतं.’’ आपल्या ग्रहककेंद्री व्यवहाराची कारणमीमांसा करताना गाडगीळांनी सांगितलं. म्हणूनच जेव्हा दागिन्यांतली व्हरायटी पाहण्यात ग्रहकाला रस असतो तेव्हा त्याची पावलं पु.ना. गाडगीळांच्या दुकानाकडे वळतात.
...आणि ग्रहकांशी अनौैपचारिक नातं जोडणारेही
कारणपरत्वे का होईना पण दागिने विकावे लागणं हे मध्यमवर्गीय कुटुंबांना आजही कमीपणाचं वाटतं. अशावेळी खुद्द सोनार जर धीराचे, सहानुभूतीचे चार शब्द बोलला तर त्या माणसांना वेगळी उभारी येते, असा गाडगीळांचा आजवरचा अनुभव आहे. कधी घराची खरेदी तर कधी मुलांचं शिक्षण तर कधी आजारपणातला खर्च भागवण्यासाठी सोनं विकावं लागतं. ‘‘एकदा एक जोडपं घर घेण्यासाठी म्हणून दागिने मोडायला दुकानात आलं.’’ अजित गाडगीळ सांगत होते. ‘‘घरातले दागिने मोडायचं त्या बाईंना मनापासून पटत नव्हतं. तेव्हा मी त्यांना समजावणीच्या स्वरात म्हटलं, ‘‘अहो आत्ता तुमचं मोठं घर होणं ही महत्त्वाची गरज आहे. सोनं काय, आपल्याला पुन्हा करता येईल.’’ गाडगिळांच्या या आपलेपणाच्या भावनेने त्या आश्वस्त झाल्या. काही दिवसांनी त्यांच्या यजमानांनी भेटून गाडगिळांचे आभार मानले, म्हणाले...‘‘त्या दिवशी तुम्ही बोलल्यामुळे माझी बायको सोनं विकायला राजी झाली आणि केवळ म्हणूनच आम्ही मोठं घर घेऊ शकलो. आता मी पुन्हा सोनं घ्यायला आलो आहे. अशा प्रसंगातून आमच्यात आणि आमच्या ग्रहकांमधे एक अनौपचारिक नातं तयार होतं. आमचं धीराचं एखादं वाक्यही त्यांच्या मनावरचं निराशेचं मळभ दूर करतं.
तसंच, कोणी जुने दागिने मोडून नवीन दागिने करायला आले तर शक्यतो जुने न मोडण्याचा आम्ही सल्ला देतो. होणारी घट, द्यावी लागणारी मजुरी यामुळे ग्रहकाचं नुकसान होतं. अशा वेळी आमच्या फायद्याचा विचार न करता, आम्ही तो दागिना दुरुस्त करायचा किंवा पॉलीश करायचा सल्ला देतो. बरेचदा लोक ऐकतात. काही वेळा मात्र बायकांना नवीन फॅशनचे दागिने करण्याची हौस असते. अशा वेळी आमच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून नव्या दागिन्यांची ऑर्डर देतात. त्यावेळी आमचा नाईलाज असतो.’’ जेव्हा ग्रहक हिताचा विचार कृतीतून व्यक्त होतो तेव्हा ग्रहक घरांच्या पिढ्यान्पिढ्या त्या पेढीशी बांधलेल्या राहतात.
नव्या वाटा...
सर्वसामान्य ग्रहकांचे आणि संस्थानिकांचे सोनार या ओळखीबरोबरच देवादिकांचे सोनार अशीही गाडगीळ सराफांची ओळख आहे. दगडू हलवाई, मंडईतला गणपती, तुळशीबागेतलं राम मंदिर, पुण्यातले मानाचे गणपती, बर्‍याचशा सार्वजनिक मंडळांचे गणपती; त्याचबरोबर पुणे परिसरातील बर्‍याच देवस्थानांसाठी, तसंच आळंदी देवस्थानासाठी आणि काशीच्या विश्वेश्वरासाठीही गाडगिळांनी दागिने घडवले आहेत. आणि आता तर, नितीन देसाईंच्या ‘छत्रपती शिवाजी’ मालिकेपासून ऐतिहासिक-पौराणिक मालिकांसाठी-सिनेमांसाठी, त्या त्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण दागिने घडविणारे सोनार अशीही त्यांची नवी ओळख तयार झाली आहे. ‘‘या निमित्ताने व्यवसायाचं एक नवं दालन उघडलं गेलं. वेगळं काम केल्याचं समाधान मिळालं.’’ अजित गाडगीळ म्हणाले. ‘‘शिवाजी मालिकेसाठी दागिने करणं हा आमच्यासाठी प्रयोग होता. मात्र तो यशस्वी झाल्यानंतर अशा कामांसाठी आम्ही स्वतंत्र संशोधन विभाग सुरू केला.’’ त्यानंतर, बाजीराव मस्तानी, महाराणी पद्मिनी या मालिका, बराच गाजलेला बालगंधर्व सिनेमा आणि आगामी ‘अजंठा’ हा सिनेमा यासाठीही गाडगिळांनी दागिने बनवले आहेत.
तरुण पिढीचा सहभाग...
‘‘आमचा व्यवसाय जोखमीचा असल्याने घरातले जितके सदस्य व्यवसायात असतील तेवढे हवेच असतात. त्यातही गेल्या 6 पिढ्या व्यवसायात असल्याने, आमच्या घरातली तरुण पिढी व्यवसायात येणं हे अगदी सहज घडलं. नोकरीचा विचारही आमच्या घरातल्या मुलांच्या मनात येत नाही. नव्या पिढीच्या विचारांना-मतांना योग्य ते स्थान दिलं, आधुनिकतेच्या त्यांच्या आग्रहामागचं कारण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण बदल केले तर ही पिढी व्यवसायात टिकून राहते. इतकंच नव्हे तर उत्साहाने सहभागी होते.’’ गाडगीळ त्यांचा अनुभव शेअर करत होते.
सराफीच्या व्यवसायाबरोबरच बांधकाम व्यवसायातही गाडगीळ बंंधूंनी प्रवेश केला आहे. कमर्शियलबरोबर रेसिडेन्शियल बांधकामं करण्याचाही त्यांचा विचार आहे. त्याशिवाय पुण्यातल्या अभिरुची मॉलमध्ये आणि थिएटरमध्येही काही प्रमाणात भागीदारी आहेच. याविषयी बोलताना अजित गाडगीळ म्हणाले, ‘‘आजच्या काळात एकाच व्यवसायावर विसंबून राहणं जोखमीचं झालं आहे. शिवाय सराफी हा पिढीजात व्यवसाय म्हणून सगळे जण आनंदाने करतात, पण त्या व्यतिरिक्तही स्वत:ची स्वतंत्र आवड असू शकते. ती आवडही जपली जायला हवी.’
कामाची आवश्यक विभागणी
आज पु. ना.गाडगीळांची पुण्यात 5, तर सांगली, नाशिक आणि कोल्हापूर इथं प्रत्येकी 1 शाखा आहे. गाडगीळ परिवारातील एकेका व्यक्तीवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘‘एखादा व्यवसाय जेव्हा या टप्प्यावर येतो तेव्हा कामाची अशी विभागणी अपरिहार्य असते. तरच अधिक जोमाने वाढ होते. आणि प्रत्येकाला स्वतंत्र काम करण्यातला आनंदही घेता येतो. तेव्हा ही विभागणी आम्हां गाडगीळ परिवारातील सदस्यांना दूर नेणारी नाही तर अधिक बांधून ठेवणारी, आमचं नातं अधिक दृढ करणारी आहे.’’
जाचक कायद्यांचे अडथळे..
‘‘एकीकडे मुक्त अर्थव्यवस्थेचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे सोन्याच्या आयातीवर बंधनं घालायची, हा सरकारचा दुटप्पी व्यवहार आहे. सोन्यावरच्या आयात करात वाढ करणं, अनब्रँडेड तयार दागिन्यांवरही एक्साईज ड्यूटी बसवणं हे सगळं कशाचं निदर्शक आहे? शिवाय ब्रँडेड दागिन्यांची व्याख्याही स्पष्ट नाही.’’ व्यवसायातील सरकारी अडथळ्यांविषयी बोलताना गाडगीळ म्हणाले, ती सुवर्णकारांची प्रातिनिधिक व्यथा होती. ‘‘अशा जाचक अटीच व्यावसायिकाला गैरव्यवहाराला प्रवृत्त करतात. मात्र आमच्या अलीकडच्या संपाने या सरकारवर चांगला दबाव आला आहे असं आत्तातरी वाटतंय. एकतर या संपात भारतभरातले सर्व व्यावसायिक, कारागीर सहभागी झाले होते. शिवाय ममता बॅनर्जी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पंतप्रधानांशी बोलणी केली. आमच्या प्रतिनिधींची प्रणव मुखर्जींशी दीर्घ चर्चा झाली आहे. त्यामुळे आम्हांला लवकरात लवकर तोडगा निघण्याची आशा आहे.’’
अर्थात, व्यवसाय म्हटला की काही ना काही अडथळे येतातच. पण त्यावर मात करत यशस्वी होणं, टिकून राहणं यातूनच समाजातली उद्यमशीलता वाढीस लागते. आज अनेक उच्चशिक्षित मराठी तरुणही व्यवसायात येण्याचा विचार करताहेत. ‘‘आता लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. आर्थिक पायाच्या उभारणीसाठी आज बँकांकडे बर्‍याच योजना आहेत त्याचा लाभ होऊ शकतो. शेवटी स्वत:चा व्यवसाय उभारून पैसे कमावणं यातला आनंद काही वेगळाच असतो. आणि त्यातला आनंद अनुभवण्याचं धाडस आजची पिढी करू पाहते आहे हे कौतुकास्पद आहे. शिवाय आपल्या व्यवसायातून चार जणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं समाजोपयोगी कामही नकळत केलं जातं.’’ गाडगीळ म्हणाले.
‘‘मात्र, ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून पारदर्शी व्यवसाय करणं आणि काळाला साजेसे बदल करत चोख सेवा देणं ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली याचं भान ठेवावं.’’ नव्या पिढीला त्यांनी दिलेल्या यशस्वितेच्या या मंत्राबरोबरच आमच्या भेटीला विराम दिला.
-अश्विनी मयेकर
9594961865
(पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स - कॉर्पोरेट ऑफीस -
020-24612000)

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.