जननी, जन्मभूमी, जगन्माता

विवेक मराठी    05-Jan-2023   
Total Views |
जननी जन्मभूमीची शक्ती जन्म दिलेल्या जननीपुत्राला जागृत करावी लागते. जन्मदात्रीचे तसे संस्कार असतील तर ते प्रकट होते. जिजाऊने बाल शिवाजीवर असे संस्कार केले. त्या शिवाजीने पुढे या संस्काराच्या माध्यमातून आपल्या जन्मभूमीला वैभवसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न केले. जननीची सेवा करून जननीचे ऋण फेडावे लागते. त्याचप्रमाणे मातृभूमीच्या ऋणातूनदेखील मुक्त व्हावे लागते. जननीपासून विश्वजननीपर्यंत आपल्या विचारांची कक्षा घेऊन जाणे, तशी कर्मशीलता जोपासणे हे आपले खास वैशिष्ट्य आहे. माता हिराबेन हे वैशिष्ट्य जागृत ठेवणार्‍या एक महान माता होत्या.
  
modi
 
जननी हिराबेन यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी कर्णावती येथे निधन झाले. नरेंद्र मोदी यांच्या त्या माता होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत थोडक्या शब्दात आपल्या आईची महानता सांगितली, “शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... माँ में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है।’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईची आणखी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “आईच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा त्या एकच गोष्ट म्हणाल्या होत्या - जी माझ्या कायम लक्षात राहील, ती गोष्ट म्हणजे ‘बुद्धीने काम करा आणि शुद्धीने आयुष्य जगा.”
 
 
 
माता हिराबेन यांचा जन्म सामान्य परिवारात झाला. संसाराची काही वर्षे गरिबीतच गेली. परंतु त्यांनी आपल्या मुलांना उत्तम संस्कार देऊन वाढविले. ज्या दिवशी नरेंद्रचा जन्म झाला असेल, त्या दिवशी ‘हा मुलगा पुढे देशाचा पंतप्रधान आणि विश्वाचा नेता होईल’ असे त्यांना वाटलेही नसावे. आपल्या पोटी महान पुत्र जन्मणार आहे, हे देवकीला माहीत होते. सिद्धार्थची माता महामाया यांनादेखील माहीत होते. हिराबेन यांच्याविषयी असे काही सांगितले जात नाही. महान पुत्र घडविण्याचे श्रेय मात्र त्यांना द्यावेच लागते.
 
 
 
महान पुत्र घडविण्याची आपल्या भारताची फार प्राचीन परंपरा आहे. महाभारतातील विदुलेचे आख्यान हे या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे आणि मौलिक आख्यान मानले जाते. कुंती कृष्णाला विदुलेची कथा सांगते. कुंती म्हणते, विदुला ही मोठी यशस्विनी, तेजस्वी स्वभावाची कुलीन आणि धर्मशील व दीर्घदृष्टीची होती. तिचा मुलगा राजा होता, त्याचा पराभव दुसर्‍या राजाकडून झाला. त्याचे राज्य गेल्यामुळे तो दीनवाणा होऊन पडलेला असे. काहीच हालचाल करीत नसे. विदुलेला ते सहन झाले नाही आणि एके दिवशी तिने त्याची अत्यंत कठोर शब्दात कानउघडणी केली.
 
 
modi
 
विदुलेचे शब्द असे आहेत, “तू माझा मुलगा नाहीस. तू शत्रूंना आनंद देणारा झालेला आहेस. तुझ्यात यत्किंंचितही आत्मविश्वास नाही. तुझी बुद्धी नपुंसक झालेली आहे. शरीरात प्राण असूनही तू निराश झाला आहेस. स्वत:चे कल्याण करून घ्यायचे असेल तर युद्धासाठी सिद्ध हो. या वेळी अंगावर वीज पडून बेशुद्ध होऊन पडल्यासारखा झाला आहेस. शत्रूकडून मार खाऊन असा पडून राहू नकोस. साम, दाम, दंड, भेद, मध्यम, उत्तम, नीच उपायांचा अंगीकार करून शत्रूला जिंक. दंड सर्वश्रेष्ठ आहे. वीरपुरुष निरंतर पुरुषार्थ साध्य कर्म करीत राहतो. त्याला स्वत:साठी धन मिळविण्याची इच्छा नसते. एकतर तू पुरुषार्थ करून विजय प्राप्त कर, अन्यथा वीरगती प्राप्त कर. धूर काढून जगत राहण्यापेक्षा विद्युल्लतेप्रमाणे क्षणभर चमकून जाणे श्रेष्ठ आहे.” विदुलेच्या शब्दमाराचा हा सारांश आहे.
 
 
 
माता विदुला आंधळी पुत्रभक्त नव्हती. आपला मुलगा पराक्रमी असावा, हजारो लोकांना आश्रय देणारा असावा, आपण कुणाच्या आश्रयाने राहू नये, हा तिचा स्वाभिमान होता. बा हिराबेन विदुलेच्या पंक्तीत जाऊन बसणार्‍या होत्या. आपला मुलगा पराक्रमी व्हावा, शीलसंपन्न व्हावा, कर्मयोगी व्हावा, असे संस्कार त्यांनी आपल्या पुत्रावर केले. कुंती विदुलेची गोष्ट सांगते. स्वत: कुंतीदेखील विदुलेचे दुसरे रूप होते. तीदेखील राजकारण धुरंधर होती, दूरदृष्टीची होती आणि मुलांत पराक्रमाचे तेज जागविणारी होती. कोणताही अपमान सहन करण्याची तिची मनोवृत्ती नव्हती. आपल्या मुलांचे हित कशात आहे हे तिला पुरेपूर समजत होते. तिला स्वत:साठी काहीही नको होते. परंतु आपल्या मुलांचे जे हक्काचे आहे, ते त्यांनी सोडता कामा नये. दुर्बलता झाकण्यासाठी तत्त्वज्ञान उभे करू नये, असा तिचा युधिष्ठिरास उपदेश होता. पुत्रप्रेमाने ती आंधळी झालेली नव्हती. बा हिराबेन यांनादेखील आधुनिक काळातील कुंतीचेच प्रतिरूप मानले पाहिजे. स्वत:साठी त्यांना राजवैभव नको होते. हे वैभव मुलाने प्राप्त करावे आणि लोककल्याण करावे, हीच या माउलीची आंतरिक इच्छा होती.
 
 
अशा मातांना आपल्याकडे शक्तिरूपा माता म्हणून पाहिले जाते. त्यांचेच प्रतिबिंब आपण आपल्या जन्मभूमीत पाहत असतो. या मातांप्रमाणे ही जन्मभूमीदेखील वत्सल, निरपेक्ष प्रेम करणारी, आणि संतानांच्या कल्याणाची अहर्निश चिंता करणारी असते. जन्मदात्या मातेविषयी श्रेष्ठ भावना व्यक्त करणारी अनेक गीते आहेत.
 
 
‘आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही,
 
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
 
मुलांनो शिकणे, अ, आ, ई’
 
हे ग.दि. माडगूळकरांचे गीत ऐकणार्‍याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आपल्या जन्मभूमीविषयीदेखील अशाच प्रकारची भावमधुर गीते आहेत. बंकीमचंद्रांचे वंदे मातरम् हे अशा सर्व गीतांचा कोहिनूर हिरा समजले जाते. या गीतात वत्सल मातृभूमीचे दैवी गुणगान केलेले आहे, जे ऐकले असता ऐकणार्‍याच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
 
 
 
याच गीतातील एका कडव्यात ‘भारतमाता ही कोट्यवधी कंठांची आहे, ती लक्ष्मी-सरस्वती-दुर्गा रूप आहे, असे तिचे वर्णन केलेले आहे. जननी हीदेखील एका अर्थाने लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा रूपच असते. अपत्याचे शिक्षण तीच करते. अपत्यांच्या सर्व गरजांची पूर्तता तीच करीत असते आणि प्रसंगी कठोर बनून कान उघडण्याचे कामही तीच करते. असे हे जननी आणि जन्मभूमीच्या रूपातील साम्य आहे. जननी शक्तिशाली असते. विदुला, कुंती, जिजामाता या गतकाळातील माता आणि कस्तुरबा, रमाबाई या आधुनिक काळातील माता शक्तीचेच प्रतीक होत्या. त्यांची शक्ती त्यांच्या कर्मयोगात आणि मूल्याधाारित जीवन जगण्यात असते. या दोन्ही मूल्यांची त्या चुकूनही तडजोड करीत नाहीत. मुलालाही करू देत नाहीत.
 
 
modi
 
जननी जन्मभूमी भारतमातेची शक्ती तिच्या संतानात असते. भारतमाता शक्तिशाली होणे म्हणजे शक्तीची जी विविध अंगे आहेत, त्या अंगांची वृद्धी करणे होय. धन, विद्या, राज्य (दंड), विज्ञान, सैनिक ही भारतमातेच्या शक्तीची स्थाने आहेत. भारतमाता शक्तिशाली आहे याचा अर्थ भारतमातेकडे विपुल प्रमाणात धन आहे, कारण धन ही शक्ती असते. भारतमाता शक्तिशाली आहे, कारण भारतमातेकडे ज्ञानशक्ती आहे. ही शक्ती विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, संगीत, कला या माध्यमांतून प्रकट व्हावी लागते. राज्यशक्ती, दंडशक्तीच्या माध्यमातून म्हणजे देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या माध्यमातून व्यक्त होते. आणि भारतमातेची शस्त्रशक्ती तिच्या सैनिकी सामर्थ्याच्या माध्यमातून व्यक्त होते.
 
 
 
जननी जन्मभूमीची शक्ती जन्म दिलेल्या जननीपुत्राला जागृत करावी लागते. जन्मदात्रीचे तसे संस्कार असतील तर ते प्रकट होते. जिजाऊने बाल शिवाजीवर असे संस्कार केले. त्या शिवाजीने पुढे या संस्काराच्या माध्यमातून आपल्या जन्मभूमीला वैभवसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न केले. जननीची सेवा करून जननीचे ऋण फेडावे लागते. त्याचप्रमाणे मातृभूमीच्या ऋणातूनदेखील मुक्त व्हावे लागते. आपल्या अथर्ववेदात पृथ्वीसूक्त आहे. हे पृथ्वीसूक्त म्हणते, ‘पृथ्वी आमची माता आहे आणि आम्ही तिचे पुत्र आहोत. हे माते, आम्ही डावा-उजवा पाय तुझ्यावर ठेवून चालत राहतो. तुझ्यावरच बसतो, उभे राहतो, तु दु:खी होऊ नकोस. झोपलो असताना तुझ्याकडे पाय पसरून झोपतो, तू दु:खी होऊ नकोस. आम्ही वनस्पती लावण्यासाठी, शेती करण्यासाठी तुला खणतो, आमचा हेतू तुला जखमी करण्याचा नसतो. या खोदकामामुळे चांगली झाडे उगवतात, पीकपाणी चांगले येते. या पृथ्वीसूक्तात धरतीमातेचे आणखी खूप गोडवे गायलेले आहेत. ‘हे धरतीमाते, सूर्यकिरणांकडून आम्हाला वाणी प्राप्त होवो, आम्हाला मधुरस तुझ्याकडून प्राप्त होवो, तूच दोन पायांच्या आणि चार पायांच्या प्राण्यांचे भरणपोषण करतेस.’
 
 
 
जननी ते जन्मभूमी यांचा नातेसंबंधाचा आणि भावनिक संबंधाचा असा प्रवास असतो. जननी, जन्मभूमी आणि जगन्माता अशी मातृशक्तीची तीन रूपे आहेत. जगन्माता ही दुर्गेच्या रूपात प्रकट झाली अशी आपली श्रद्धा आहे. आणि तिच्या प्रकटीकरणाचीही कथा आहे, ती कथा अशी - राक्षस अतिशय बलवान झाले. त्यांचा पराभव करणे देवांना शक्य होईना. त्या राक्षसाचा वध एका कुमारिकेकडून होईल अशी भविष्यवाणी होती. सर्व देव एकत्र आले आणि कुमारिका निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शक्तीचा अंश दिला. देवीचे कोणते अंग, कोणत्या देवापासून निर्माण झाले याची पौराणिक कथा आहे. या कथेचे तात्पर्य असे की, प्रत्येकाकडे लहान-मोठी शक्ती असते, परंतु ती दैत्यशक्तीपुढे अतिशय लहान असते. या सर्व लहान-मोठ्या शक्तींचे एकत्रीकरण केले की, त्यातून दुर्गाशक्ती प्रकट होते. ती अजेय असते.
 
 
 
जेव्हा बंकीमचंद्र भारतमातेविषयी म्हणतात की, दहा हातांची तूच दुर्गा आहेस, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, कोटी कोटी भारतीयांच्या शक्तिसंचयाचे तू रूप आहेस. हे शक्तिसंचयाचे सामर्थ्य संघटन बळातून प्राप्त होते. संघटन बळ एक विचार, एक संकल्प, एक दृष्टी आणि सर्वांच्या हिताचे समान कर्म यातून निर्माण होते. दुर्गावताराची कथा या अंगाने वाचली, तर तिचा कालोचित अर्थ लक्षात येतो. ती केवळ, पूजापाठ, पुण्यप्राप्ती या अंगाने वाचली, तर डोक्यात काही शिरत नाही.
सर्व सात्त्विक शक्तीचा संचय असलेली दुर्गा ही जननी जन्मभूमीच्या रूपात स्वामी विवेकानंदांनी पाहिली, योगी अरविंदांनी पाहिली आणि श्रीगुरुजींनीदेखील पाहिली. ही पाहण्याची दृष्टी सर्व थोर पुरुषांना आपापल्या जन्मदात्रीकडून प्राप्त झाली. त्यामुळे ते जीवनभर मातृभक्त राहिले. त्यांची मातृभक्ती जन्म देणार्‍या आईपुरती सीमित राहिली नाही, ती व्यापक बनत गेली. याच आईचे रूप त्यांनी जन्मभूमीत पाहिले आणि जन्मभूमीचे रूप जगन्मातेत पाहिले.
 
 
 
नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वात हे गुण आपल्याला दिसतात. ते मातृभक्त आहेतच. त्यांच्या आणि आईच्या भेटीचे व्हिडिओ आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत. आईची चरणसेवा करता करता भारतमातेच्या चरणसेवेतही ते तेवढेच मग्न झालेले आपण रोजच पाहत आहोत. विश्वजननीला ते विसरले नाहीत, म्हणून भूमी ही माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे आणि ही भूमी विश्वभूमी आहे. या विश्वभूमीवरदेखील त्या विश्वजननीला ते आवाहन करतात. तिचे सांगणे आहे की, प्रेमाने राहा, बंधुभावनेची जोपासना करा, दुराग्रह सोडा, हे विश्वचि माझे घर ही भावना जोपासा. जननीपासून विश्वजननीपर्यंत आपल्या विचारांची कक्षा घेऊन जाणे, तशी कर्मशीलता जोपासणे हे आपले खास वैशिष्ट्य आहे. माता हिराबेन हे वैशिष्ट्य जागृत ठेवणार्‍या एक महान माता होत्या.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.