गृहिणीचं आरोग्य

विवेक मराठी    09-Jan-2023   
Total Views |

women
 
केवळ स्वकेंद्रित न राहता किंवा स्वत:कडे टोकाचं दुर्लक्ष न करता, संतुलित, प्रसन्न आणि समाधानी जीवन जगणं ही एक कला आहे. गृहिणींनी ती प्राप्त केली, तर स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवनात त्या आनंदाचं झाड लावू शकतात. त्यांच्या अर्थार्जनापेक्षा त्यांचं गृहिणीपणच यासाठी अधिक उपयुक्त ठरतं, हे निश्चित.
 
 
कलियुगात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांमध्ये, अर्थाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. साहजिकच अर्थार्जन न करणार्‍या गृहिणीला, गृहिणी ही स्वत:ची ओळख अप्रिय असते. अर्थार्जन करत नसल्याचा न्यूनगंड, शिक्षण वाया घालवल्याचा अपराधगंड, आर्थिक स्वातंत्र्य नसल्याचं दु:ख, निर्णयस्वातंत्र्य नसल्याचा अपमान आणि आयुष्यभर खपून कोणाला किंमत नसल्याची टोचणी असे अनेक गंड ती उराशी बाळगून असते. चुकूनमाकून एखाद्या स्त्रीला यातील कुठलाच गंड नसेल, तर अर्थार्जन करणार्‍या समस्त महिला, पुरुष आणि स्त्रीवादी गट तो निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
 
एक गृहिणी घरात किती भूमिका निभावत असते, याचं वर्णन करताना कवी कालिदास म्हणतात,
 
गृहिणीसचिव:सखीमिथ:प्रियशिष्याललितेकलाविधौ। (रघुवंशम्)
 
गृहिणी, सचिव, सखी, जोडीदार (अर्धांग), शिष्या (अशा विविध नात्यांनी) तू माझं जीवन समृद्ध केलंस.
 
गृहिणीशिवाय घर शून्य असतं, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात -
 
माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी।
 
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम्॥
 
 
- ज्याच्या घरी प्रेमळ माता नसेल आणि पत्नी प्रिय संभाषण करत नसेल, त्याने सरळ अरण्यात जावं; कारण गृहिणीविरहित त्याचं घर आणि अरण्य यात काहीच अंतर नाही.
 
 
गृहिणी हा काही व्यवसाय नाही. ते एक दायित्व आहे. तरी कुटुंबातील त्या भूमिकेचं महत्त्व लक्षात घेऊन आपण त्यांच्या आरोग्याचा विचार प्राधान्याने करायला हवा. कारण गृहिणी आजारी पडली की घर आजारी असल्यासारखं वाटतं, हे आपण अनुभवतो. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जरी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा स्वतंत्रपणे विचार करणार असलो, तरी हे लेख संपूर्ण कुटुंबाने वाचायला हवे आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींना आपली मदत होईल, किमान अडथळा होणार नाही अशा प्रकारे आपली वर्तणूक ठेवावी.
 
 
 
भारतीय गृहिणी हे खरं तर अजब रसायन आहे. ‘एक लीटर अस्सी किलोमीटर’ असा भन्नाट output ती देते. अष्टभुजा असल्यासारखी ती एका वेळी अनेक कामं करते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य, जेवणाच्या वेळा, आवडीनिवडी, घराची स्वच्छता, पाहुणे, सणवार, कौटुंबिक समस्या, आर्थिक नियोजन अशा सगळ्या आघाड्यांवर लढताना तिचं स्वत:चं आरोग्य मात्र दुर्लक्षित राहतं. मग साचलेले दोष कधीतरी बंड करतात आणि ती अंथरूण धरते, विश्रांतीशिवाय पर्याय राहत नाही आणि घरादारावर आजारपणाची कळा पसरते.
 
यावर उपाय शोधण्यासाठी गृहिणीच्या अनारोग्याची काही कारणं आणि आजारांचं स्वरूप जाणून जाणून घ्यायला हवं.
 
 
1) आहारविषयक कारणं - चोवीस तास घरात असल्याने बर्‍याच गृहिणींच्या जेवणाच्या वेळा अत्यंत अनियमित असतात. कधी अन्न कमी पडलं म्हणून त्या अर्धपोटी किंवा उपाशी राहतात, तर कधी संपवायचं म्हणून शिळंपाकं खात राहतात.. असं करताना आहाराचे कुठलेच नियम त्या पाळत नाहीत. हिवाळ्यात पौष्टिक लाडू केले किंवा घरात बदाम भरलेले असले, तरी ‘मला मेलीला कशाला हवे चोचले?’ म्हणून त्या त्यातलं काहीही खात नाहीत. या सगळ्यातून अपचन, अम्लपित्त, भूक मंदावणं किंवा कुपोषण अशा समस्या जन्म घेतात. 90% महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीन कायम कमी असतं. अगदी स्थूल महिलांच्या शरीरातदेखील अनेक प्रकारच्या कमतरता आढळतात.
 
 
2) अपुरी झोप - रात्री सगळ्यांचं आवरेपर्यंत जागरण आणि सकाळी डबे बनवण्यासाठी लवकर उठणं यामुळे बर्‍याच गृहिणींची झोप पूर्ण होत नाही. मुलं लहान असताना त्यांची शी-सू काढत, ती शाळेत जाऊ लागली की त्यांना अभ्यासासाठी सोबत करत, स्वतंत्र झाली की ते घरी येण्याची वाट बघत, नवरा उशिरा येत असेल तर त्याला जेवायला वाढण्यासाठी, सासू अंथरुणावर असेल तर तिचा कानोसा घेत गृहिणी जाग्याच असतात. रात्रीच्या झोपेच्या या कमतरतेमुळे रुक्षता, वात, पित्त वाढून निरनिराळे आजार होऊ शकतात.
 
 
3) तणाव - प्रत्यक्ष काम आणि कामाचं नियोजन यातून एकही दिवस सुटका न मिळाल्याने तणाव वाढतो. याचं पर्यवसान मानेच्या विकारांत होऊ शकतं.
 
 
4) दुर्लक्ष - अनेक गृहिणी आपल्या आजारांकडे फार दुर्लक्ष करतात. कुठल्याही आजाराच्या सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं, तर वेळेवर उपचारांअभावी आजार विकोपाला जाण्याची शक्यता असते.
 
 
5) उपचारांमधील अनियमितपणा - आजारी पडल्यावर उपचारांमधील अनियमितपणा ही बाबदेखील गृहिणींमध्ये सररास आढळते. वेळ किंवा धन यांच्या अभावात हे घडत असावं. परंतु त्यामुळे छोटे छोटे आजारदेखील दीर्घकाळ रेंगाळतात.
 
 
 
6) कुठल्याही आजाराचे उपचार पूर्ण न करणं - दीर्घकाळ उपचार घेण्याचा कंटाळा हे याचं मुख्य कारण असावं. घरातल्या प्रत्येकाला त्याचं औषध- पाण्यासहित हातात नेऊन देणार्‍या गृहिणी स्वत:चं औषध घ्यायला मात्र हमखास विसरतात.
 
 
7) विशिष्ट परिस्थितीत नियम आणि चर्या यांचं पालन न करणं - रज:स्वला (पाळीचे दिवस), प्रसूता (बाळंतीण) या काळात आरोग्यासाठी आवश्यक असलेले नियम धाब्यावर बसवण्यात गृहिणी आघाडीवर असतात. काही वेळा नाइलाजाने त्यांना त्या काळात आवश्यक काळजी घेता येत नाही. या काळात स्त्रियांना विश्रांती हवी असते, यावर कित्येक स्त्रियांचा स्वत:चाच विश्वास नसतो. ‘पाळी आणि बाळंतपण म्हणजे आजारपण नव्हे’ असं म्हणून नियमांची खिल्ली उडवत निरंकुश चर्या आचरली जाते. मात्र याचे दुष्परिणाम व्हायचे ते होतातच. आजकाल रजोनिवृत्तीच्या वयात वाढलेल्या स्त्रीविशिष्ट समस्यांची मुळं या हलगर्जीपणात दडलेली असतात.
 
 
 
8) कुटुंबीयांच्या सहकार्याचा अभाव - बहुधा घरातील महिलेच्या आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण कुटुंब बेफिकीर तरी असतं किंवा कृतघ्न! त्यामुळे आजारपण, बाळंतपण, पाळीचे चार दिवस, गर्भपात या काळात फार क्वचित महिलांना आवश्यक विश्रांती मिळते. योग्य वेळी योग्य विश्रांती न मिळाल्याने शरीराच्या आणि मनाच्या क्षमता कमी होत जातात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मुख्य म्हणजे ‘आपली किंमत नसल्याची’ भावना बळावून जीवनातील रसच कमी होऊ लागतो.
 
 
गृहिणींच्या आरोग्यातील या समस्या लक्षात घेता, त्यांचा प्रतिबंध हे एकट्या गृहिणीचं काम नाही. त्यासाठी कुटुंबातील सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. अर्थात आपलं आरोग्य हे सर्वप्रथम आपलं उत्तरदायित्व असल्याने, महिलांनी आपल्या स्वस्थ्याला प्राधान्य दिल्याशिवाय इतरांचं सहकार्य मिळणं कठीण आहे.
 
 
थोडक्यात काय, तर गृहिणी निरोगी राहण्यासाठी
 
 
• तिने वेळेवर, ताजं, पथ्यकर, योग्य प्रमाणात (भुकेपेक्षा कमी अथवा जास्त नको) आणि पौष्टिक जेवण घ्यायला हवं. संध्याकाळी देशी गाईचं दूध आणि तूप अवश्य घ्यावं.
 
 
• वेळेवर (म्हणजे रात्री) आणि पुरेशी (सात ते आठ तास) झोप घ्यायला हवी.
• व्यायाम आणि योगासनं यासाठी दिवसातील किमान पाऊण तास काढावा.
 
• तणावनियोजनासाठी योगनिद्रेचा अभ्यास असावा.
 
• आपल्या कुठल्याही छोट्या आजाराचे उपचार वेळेवर करून घ्यावे.
 
• बाळंतपण, पाळी या काळात योग्य विश्रांती घ्यावी.
 
• वर्षा ऋतूत आपल्या वैद्यांकडून बस्ती उपक्रम करून घ्यावा. (makeup सामग्री, भारंभार साड्या, पायताणं, दागिने, पार्लर, हॉटेलिंग यांच्यावरील निरुपयोगी खर्च कमी करून बस्ती करून घ्यावी.)
 
 
• लोह (iron), कॅल्शियम यांच्या कृत्रिम सप्लिमेंट्सचा अतिरेकी मारा करू नये. त्याऐवजी खजूर, तीळ, नाचणी, बदाम यांचा आहारात समावेश ठेवावा. स्वयंपाकासाठी तीळतेल, लोखंडाची कढई, पितळेची पातेली वापरावी.
 
 
• शारीरिक कष्ट टाळू नयेत. त्यामुळे शरीर लवचीक राहायला मदत होते.
 
 
• वार्धक्यात होणारे वाताचे आजार टाळण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस अभ्यंग करावं.
 
 
• गृहिणीच्या आरोग्याबाबत कुटुंबीयांनीदेखील सजग असायला हवं. तिच्यावर कामाचा अतिरेकी भार पडू नये, म्हणून प्रत्येकाने स्वावलंबी असावं. आवश्यक असेल तेव्हा तिला पुरेशी विश्रांती द्यावी. तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं. मुख्य म्हणजे तिच्या श्रमांबाबत कृतज्ञ असावं.
 
 
 
• आपण अर्थार्जन करत नसल्याच्या न्यूनगंडावर गृहिणींनी मात करायला हवी. त्याचप्रमाणे आपल्या कामाचं मोलदेखील करू नये. कारण तिचं काम अनमोल आहे.
 
 
• आपल्या श्रमांचा आणि मानसिकतेचा बाऊ करून, सतत आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची काही महिलांची वृत्ती असते. ती त्यांच्या आणि कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक असते. आपण आपलं कर्तव्य करणं हे कोणावरही उपकार नसतात, हे जाणून आपली भूमिका शंभर टक्के निभावता आली पाहिजे.
 
 
केवळ स्वकेंद्रित न राहता किंवा स्वत:कडे टोकाचं दुर्लक्ष न करता, संतुलित, प्रसन्न आणि समाधानी जीवन जगणं ही एक कला आहे. गृहिणींनी ती प्राप्त केली, तर स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवनात त्या आनंदाचं झाड लावू शकतात. त्यांच्या अर्थार्जनापेक्षा त्यांचं गृहिणीपणच यासाठी अधिक उपयुक्त ठरतं, हे निश्चित.
 
 
9322790044
vaidyasuchitra@yahoo.com