सांस्कृतिक राजधानीचा आधुनिक साज

विवेक मराठी    02-Oct-2023   
Total Views |
पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असले, तरी सोयीसुविधांची वानवा होती. याआधीच्या सत्तेत असणार्‍या सरकारने पुणे शहराला नवनवीन योजनांची गाजरे दाखविली, मात्र अंमलबजावणी शून्य. पुण्यात होणारी सततची वाहतूक कोंडी आणि दगदग यांना कंटाळलेल्या पुणेकरांसाठी विद्यमान सरकारने गतिमान केलेला पुण्यातील महामेट्रो हा प्रकल्प वरदान ठरला आहे.
vivek
 
एखादे शहर फक्त आधुनिक आहे असे सांगून चालत नाही, तर आधुनिकतेची सर्व लक्षणे तिथे दिसली पाहिजेत. सध्याच्या काळाचा हा नियम आहे. त्यात हे शहर जर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणार्‍या पुण्यासारखे शहर असेल, तर बघायलाच नको. दुर्दैवाने पुण्याच्या परिस्थितीकडे बघितले, तर सांस्कृतिक राजधानी हे बिरुद हे शहर का मिरविते, असाच प्रश्न नवागतांना पडू शकतो. या शहरातील मूलभूत सोयीसुविधा वास्तविक जागतिक दर्जाच्या असायला पाहिजेत, मात्र त्या अगतिक दर्जाच्या आहेत असे म्हणावे लागते.
 
 
गेल्या वीस वर्षांपासून पुण्याला अनेक नवनवीन योजनांची गाजरे दाखविण्यात आली. स्काय बसपासून हायपरलूप रेल्वेपर्यंत अनेक प्रकल्पांची चर्चा झाली. मात्र यातील क्वचितच एखाद-दुसरा प्रकल्प साकार झाला. शिवाय साकार झालेल्या प्रकल्पाचा लोकांना कितपत फायदा झाला, हा प्रश्नही वेगळाच. बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट म्हणजेच बीआरटी नावाचा एक प्रकल्प पुण्याच्या माथी मारण्यात आला. शहरातील तीन रस्त्यांवर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र तिन्ही ठिकाणी त्याचे तीनतेरा वाजले, हा ताजा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पुण्यात डौलाने धावणारी पुणे मेट्रो पाहिली, तर मोठे स्वप्न पाहून ते साकारण्यासाठी केवढी धडाडी लागते, हे लक्षात येते.
 
 
पुणे हे मुंबईखालोखाल महत्त्वाचे शहर. संस्कृतीच्या क्षेत्रात अग्रमान मिळविलेल्या या शहराने गेल्या काही वर्षांत औद्योगिकतेचा साज ल्यायला आहे. मात्र या शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाकडे फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. जो विकास झाला, तो त्या शहराच्या अंगभूत क्षमतांमुळे, त्याला बाहेरून कोणी आधार दिला नव्हता. तो अनुशेष आता भरून निघू लागला आहे. विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो मार्ग, नदी सुधार प्रकल्प, शिक्षण, आरोग्य अशा विविध प्रकारे शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.
 
vivek 
 
वास्तविक ही सर्व कामे आधीच्या सरकारची. हे सर्व प्रकल्प आधीच्या वेगवेगळ्या सरकारांनी आखलेले. त्यातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 या काळात पुण्यासाठी अनेक प्रकल्प आखण्यातही आले आणि राबविण्यातही आले. या सर्वांचा कळस म्हणजे पुण्यातील महामेट्रो हा प्रकल्प. तो तर फारच जुना प्रकल्प. दिल्लीत मेट्रो साकार झाल्यानंतर त्यानंतरचा पुढचा प्रकल्प म्हणजे पुण्यातील मेट्रोचा प्रकल्प होय. त्या वेळी काँग्रेसचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी हे पुण्याचे सर्वेसर्वा होते. पुण्याची महापालिकासुद्धा त्यांच्या ताब्यात होती. पुण्यातील बीआरटी प्रकल्प हा त्यांचा लाडका प्रकल्प होता. तो अर्धवट असतानाच मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मेट्रोचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र काँग्रेसच्या परंपरेनुसार त्यात एवढा घोळ घालण्यात आला की 2015-16 उजाडेपर्यंत कागदी घोडे नाचविण्यापलीकडे या प्रकल्पाचे काही काम झाले नाही. पुण्यामागून मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली या शहरांतील तीन टप्पे, जयपूर, तिरुअनंतपुरम आणि नागपूर येथे मेट्रो धावू लागली. मात्र पुण्यात काही मेट्रोला हिरवा बावटा दिसण्याची चिन्हे दिसत नव्हती.
 
 
अखेर हा प्रकल्प साकार करण्यासाठी आवश्यक असलेली विशेष कंपनी (स्पेशल पर्पज वेहिकल) स्थापन करण्याचा निर्णय फडणवीस यांच्या कार्यकाळात झाला. त्यानंतर चक्रे वेगाने हलू लागली. त्यातही परत कोविड महामारीचा फेरा आला. तरीही हे काम सुरू राहिले आणि आज पुण्यातील नियोजित मार्गांपैकी 80 टक्के मार्गांवर प्रवासी मेट्रो प्रवासाचा आनंद घेत आहेत आणि आपला बहुमूल्य वेळ वाचवतही आहेत. पुण्यातील मेट्रोचा एक इंचसुद्धा रूळ 2008 ते 2014 या सहा वर्षांत अस्तित्वात आला नव्हता. त्याच तुलनेत गेल्या पाच वर्षांत पुण्यात सुमारे 24 कि.मी. मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. यातूनच सध्याच्या सरकारने (त्यात फडणवीस यांचा आधीचा कार्यकालही आला) मेट्रोला गती देण्यात किती महत्त्वाची भूमिका निभावली, हे लक्षात येईल.
 
 
आता पुणे शहरात मेट्रोमार्गांचा विकास गतीने सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो या 23.3 कि.मी. टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नुकतेच 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याचे लोकार्पण झाले. वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो हा टप्पा लवकरच सुरू होईल. आता त्यातील 2 टप्प्यांचे (पिंपरी- चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो) प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. तसेच तिसर्‍या टप्प्यातील 85 कि.मी. लांबीच्या मेट्रोचा प्रकल्प अहवाल महानगरपालिका करत आहे. मान्यता मिळाल्यानंतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे भविष्यातील पुण्याच्या दळणवळण व्यवस्थेला निश्चित आकार देतील.
 
 
vivek
 
शिवाजीनगर ते पिंपरी-चिंचवड आणि शिवाजीनगर ते वनाझ या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, तर हा प्रकल्प पुणेकरांच्या भावविश्वाशी किती जोडलेला आहे, हे लक्षात येते. सततची वाहतूक कोंडी आणि दगदग यांना कंटाळलेल्या पुणेकरांसाठी हे मेट्रो म्हणजे एक वरदान ठरली आहे. सुरुवातीला फक्त गरवारे ते वनाझ एवढी धावणारी मेट्रो चेष्टेचा विषय झाली होती. या मेट्रोच्या डब्यातून सायकल नेण्यापासून ढोल वाजविण्यापर्यंत काहीही करण्यात येत होते. मात्र तेच लोक आता केवळ वीस मिनिटांत वनाझहून शिवाजीनगरला किंवा शिवाजीनगरहून चिंचवडला जाण्याचे अप्रूप अनुभवत आहेत. सोशल मीडियातून ते लोकांपुढे मांडतही आहेत. मेट्रो सुरू झाल्यापासून आपली दुचाकी किंवा चारचाकी कार्यालयात आणणे बंद करून मेट्रोने प्रवास करणारे किमान एक-दोघे जण प्रत्येकाच्या ओळखीमध्ये सापडतील. हे सगळे झाले ते सध्याच्या सरकारने नेटाने केलेल्या कामामुळे.
 
 
सध्या पुणे मेट्रो साधारणपणे दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालते. आधी ती सकाळी सात वाजता सुरू व्हायची, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी तिची वेळ वाढविण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी 7.15 वाजता मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन ही पुणेकरांच्या जिवाभावाचा आणखी एक विषय. ही गाडी पकडण्यासाठी धडपडणार्‍या पुणेकरांची संख्या काही हजारात आहे. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी सुरुवातीचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे आता प्रवासी मेट्रोने जाऊन डेक्कन क्वीन पकडू शकतात.
 
 
हा वाढता प्रतिसाद पाहून सरकारनेही त्याची दखल घेतली. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रो रेल्वेच्या कामकाजाची वेळ मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्याचा घवघवीत फायदा मेट्रोला झाला आहे. महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) हेमंत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीची मेट्रो सेवा शुक्रवार, 22 सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि ती 27 सप्टेंबरपर्यंत चालली. तसेच, विसर्जनाच्या दिवशी ती रात्री 2 वाजेपर्यंत सुरू राहिलीे. मेट्रोच्या या जादा सेवेमुळे उत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागात येणार्‍या नागरिकांची सोय झाली. मेट्रोने 22 सप्टेंबरला रात्री 10 ते 12 या वेळेत 2130 प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी ही संख्या वाढून अनुक्रमे 3568 आणि 7820वर पोहोचली. एकूण प्रवाशांची संख्या रविवारी 135502वर पोहोचली. ही मेट्रोची एका दिवसातील उच्चांकी प्रवासी संख्या आहे.
 
 
उपयुक्तता आणि सौंदर्यसुद्धा
 
 
पुण्यातील महामेट्रो प्रकल्प हा उपयुक्ततेबरोबरच सौंदर्यमूल्यासाठीसुद्धा नावाजण्यात येत आहे. प्रवासी वाहतूक गतीने होण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच प्रत्येक स्टेशन वेगवेगळ्या संकल्पनेनुसार डिझाइन करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडेल. याबरोबरच शिवाजीनगर एसटी बस स्थानकाखाली एक मल्टीमॉडेल एकिकृत भूमिगत स्थानक बनविण्यात आले आहे. तिथे एसटी, रेल्वे स्थानक, पीएमपीएल आणि हिंजेवाडी मेट्रो लाइनशी जोडणी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्व वाहतूक सुविधांचा उपयोग होणार आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाला भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपल्यासमोर उभा राहील अशा संकल्पनेनुसार या स्थानकाचे डिझाइन करण्यात आले आहे. ऐतिहासिक बांधकामांच्या प्रतिकृतीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संरचना या बांधकामात वापरण्यात आल्या आहेत.

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक