इस्रायल-हमास युद्धाच्या छायेतील भारताचे ‘ऑपरेशन अजय’

विवेक मराठी    21-Oct-2023   
Total Views |
इस्रायलमध्ये हजारो भारतीय विविध कारणांनी राहावयास आहेत. जवळजवळ 18000 भारतीय नागरिक या अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत. ज्यांना भारतात परत यावे असे वाटत आहे, अशांसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तेल अविवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने या नागरिकांना इस्रायलमधून सुखरूप परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले. अकराशे पेक्षा जास्त भारतीय आणि काही नेपाळी नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणलेले आहे.

Operation Ajay In Israel
शनिवारी 7 ऑक्टोबरला जेव्हा इस्रायलमधील लोक सुकोत सणाचा शेवटचा दिवस आणि शब्बात साजरा करत होते, त्या दिवशी सकाळी सहा वाजता गाझा सीमेचे कुंपण तोडून जीप्स, मोटरसायकल्स घेऊन, तसेच पॅराग्लायडर्समधून, समुद्रमार्गे हमासचे हजारो अतिरेकी इस्रायलच्या हद्दीत घुसले आणि गाझा सीमेजवळील छोट्या छोट्या इस्रायली गावांत, किबुत्समध्ये त्यांनी मृत्यूचे तांडव केले. गाझा सीमेनजीकच्या वाळवंटात सुकोतनिमित्त जो संगीत महोत्सव चालू होता, त्या महोत्सवातही घुसून अतिरेक्यांनी नृशंस गोळीबार केला. अनेकांना ठार मारले, लहान मुलांना जिवंत जाळले, तरुणांचे गळे कापले. ओलीस ठेवण्यासाठी लहान मुलांचे, स्त्रियांचे आणि वयस्कर लोकांचे अपहरण केले. अनेक स्त्रियांवर अमानुष बलात्कार केले. या सगळ्याने इस्रायलमधील सगळेच प्रचंड धक्क्यामध्ये आहेत. जेव्हा तिथे इस्रायली संरक्षण दल पोहोचले, तेव्हा 7 तारखेला झालेल्या हल्ल्याची भयानकता आणि व्याप्ती लक्षात आली. बरेच मृतदेह मिळाले, पण ओळख न पटण्याच्या अवस्थेतील होते. यात किमान 1400 इस्रायली मारले गेलेत, तर 3000च्या वर जखमी झालेत. किमान दीड हजार बेपत्ता म्हणून नोंद झालेली आहे. सगळ्यांवर अंत्यसंस्कार शक्य नाहीत, म्हणून हे सगळे मृतदेह लाल समुद्राजवळील वाळवंटात एकाच वेळी एकावर एक ठेवून पुरले गेले. इस्रायलने ताबडतोब हमास आणि पॅलेस्टाइनविरुद्ध अधिकृत युद्धाची घोषणा केली आणि गाझामध्ये रॉकेट हल्ल्यांनी प्रत्युत्तर देणे चालू केले आहे. जगभरात कामानिमित्त विखुरलेल्या तरुण इस्रायली पुरुषांनी युद्धासाठी आपल्या लष्करात सामील होण्यासाठी आपल्या मायदेशी परतण्यास सुरुवात केली. उत्तरेकडून हिजबोला लेबनॉनमधून हल्ला करण्यास उत्सुक आहे. हमास आणि हिजबोला या दोघांनाही इराणचा पूर्ण पाठिंबा आहे. इस्रायल-पॅलेस्टाइन युद्ध तर चालू झालेलेच आहे. पण यात हिजबोला उतरले, तर अमेरिका इस्रायलच्या बाजूने उतरणार, हे नक्की. एकूणच इस्रायल आणि अरब देश हे भूमध्य समुद्रातील युद्ध कधीही भडकू शकते, अशी परिस्थिती आहे.
 

Operation Ajay In Israel  
 
इस्रायलमध्ये हजारो भारतीय विविध कारणांनी राहावयास आहेत. त्यातील बरेचसे इस्रायली विद्यापीठांत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, त्यांची कुटुंबे, आयटी व्यावसायिक, हिर्‍याचे व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि शुश्रुषा कर्मचारी, भारतीय दूतावासातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय इ. असे जवळजवळ 18000 भारतीय नागरिक या अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत. अजून संपूर्ण युद्ध चालू झालेले नसल्याने ज्यांना भारतात परत यावे असे वाटत आहे, अशांसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तेल अविवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने या नागरिकांना इस्रायलमधून सुखरूप परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले. त्याअंतर्गत सर्वप्रथम दूतावासातर्फे इस्रायलमधील सगळ्या भारतीय पासपोर्ट धारकांना परतण्यासाठी आपली नावे रजिस्टर करावयास सांगितली. एकूण किती नागरिक परत येऊ इच्छितात, याचा अंदाज घेऊन सुरुवातीला 4 चार्टर्ड विमानांची सोय केलेली होती. पण आवश्यकतेनुसार पाचवे विमानही वापरले गेले. 18 ऑक्टोबरपर्यंत 1180 भारतीय आणि काही नेपाळी नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणलेले आहे. आतापर्यंत भारताने ऑपरेशन गंगा (अफगाणिस्तान-तालिबान युद्धाच्या वेळी) आणि ऑपरेशन कावेरी (युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी) हे त्या त्या देशांतून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी यशस्वीरित्या राबविलेली ऑपरेशन्स आहेत. ऑपरेशन गंगा आणि ऑपरेशन कावेरी ही सगळ्यात जास्त अवघड होती, कारण तिथे पूर्णपणे युद्ध चालू झालेली होती. पण इस्रायलमधील परिस्थिती अजूनही आटोक्यात आहे. त्यामुळे भारत सरकारला भारतीय नागरिकांना सुरक्षित हलविण्यासाठी वेळ मिळालेला आहे.
 किबुत्समध्ये केअर टेकर म्हणून काम करणार्‍या केरळमधील सविता आणि मीरा या दोघींच्या शौर्याची कहाणी समजली. हमासचे अतिरेकी किबुत्समध्ये घुसल्यानंतर या दोघी ज्या घरात होत्या, त्या घराच्या दिशेने ते आले. तर दोघींनी आपली सर्व शक्ती पणाला लावून घराचा दरवाजा उघडू दिला नाही. शेवटी अतिरेक्यांना वाटले असेल की घरात कुणीच नाही आणि म्हणून ते पुढे गेले असावेत. या दोघींनी स्वत:चा आणि त्यांच्या वृद्ध रुग्णाचादेखील जीव वाचविला.
Operation Ajay In Israel
 
इस्रायलमधील माझा एकूणच अनुभव असा आहे की तेल अविवमधील भारतीय दूतावास खूपच चांगले सहकार्य करतो. त्याचबरोबर इस्रायलमध्ये त्यांची यंत्रणाच इतकी परिणामकारकरित्या काम करत असते की भारतीय नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची तेच मुळात काळजी घेतील. यातच गाझाच्या जवळच्या एका किबुत्समध्ये केअर टेकर म्हणून काम करणार्‍या केरळमधील सविता आणि मीरा या दोघींच्या शौर्याची कहाणी समजली. हमासचे अतिरेकी किबुत्समध्ये घुसल्यानंतर या दोघी ज्या घरात होत्या, त्या घराच्या दिशेने ते आले. तर दोघींनी आपली सर्व शक्ती पणाला लावून घराचा दरवाजा उघडू दिला नाही. शेवटी अतिरेक्यांना वाटले असेल की घरात कुणीच नाही आणि म्हणून ते पुढे गेले असावेत. या दोघींनी स्वत:चा आणि त्यांच्या वृद्ध रुग्णाचादेखील जीव वाचविला. बेपत्ता असलेल्यांमध्ये काही भारतीय आणि नेपाळी नावेदेखील आहेत. नक्की किती लोक गेले आणि बाकीचे सगळे तपशील हळूहळू येतच राहतील. ज्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत येण्याची इच्छा आहे, त्यांना भारत सरकार ऑपरेशन अजयअंतर्गत परत आणण्याची सुविधा आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत चालू ठेवेलच. पण असेही अनेक भारतीय आहेत, जे आपल्या इस्रायली मित्रांवर संकट आलेले असताना त्यांना सोडून परत येऊ इच्छित नाहीत. कदाचित मी तिथे असते, तर परत यायचे की नाही याचा मी दहा वेळा विचार केला असता. या परिस्थितीतून इस्रायल लवकर बाहेर पडो, अशी आपण सगळेच प्रार्थना करू या.
 

डॉ. अपर्णा लळिंगकर

 पी.एचडी - एज्युकेशन टेक्नॉलॉजी (ट्रीपल आय टी बंगलोर), एम. फिल. (केम्ब्रिज विद्यापीठ, इंग्लंड); एम. एस्सी - गणित (पुणे विद्यापीठ), बीएड; स्वतःची एज्युकेशन टेक्नॉलॉजीची कंन्सलटन्सी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य; एनसीईआरटीच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती कमिटीच्या गणित विषयाच्या सदस्य (member of NSTC CAG mathematics); जी 20 सी 20 आंंतर्गत Diversity Inclusion Mutual Respect आणि वसुधैवकुटुंबकम या दोन कार्यगटांत काम; उच्च शिक्षणासाठी देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्त्यांचे संपादन; पोस्टडॉक्टोरेे संशोधनासाठी इस्त्रााली गव्हर्नमेंटच्या फेलोशिपवर वर्षभर इस्रायल मध्ये वास्तव्य; दोन वर्षे विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती शिक्षिका म्हणून नॉर्थ ईस्टमधील अरूणाचल प्रदेश व आसाममधील शाळांमधे काम; ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथे चार वर्षे गणिताचे अध्यापन; विवेकानंद केंद्र पुणे येथे सह-सचिव म्हणून जबाबदारी त्याआंतर्गत युथ कॅम्प्स, व्याख्यानमाला यांचे आयोजनात सहभाग, स्वामी विवेकानंदांचे विचार आणि कार्य यांवर विविध ठिकाणी व्याख्याने देणे, कार्यशाळा घेणे; महाविद्यालयीन जीवनात संघाच्या कौशिक आश्रम या कार्यालयाच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग घेणे, त्यातूनच पर्वती दर्शन परिसरात वस्तीतील मुला-मुलींसाठी एक अभ्यासिका चालू केली होती. एज्युकेेन टेक्नॉलॉजी, स्वामी विवेकानंद, इस्त्रायल, एल जी बी टी क्यू सारखे विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवर साप्ताहिक विवेक, मासिके, दिवाळी अंक, समाजमाध्यमे यांत अभ्यासपूर्ण लेखन.