मुंबई वेगळी करण्याची भीती किती दिवस दाखवणार?

विवेक मराठी    27-Oct-2023   
Total Views |
 

shivsena
दसरा मेळाव्याची परंपरा उबाठाला वारसा हक्काने मिळालेली आहे. पक्षाला दिशा देण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. पण टोमणे, शिव्या आणि तथ्यहीन भाषण करून उद्धव ठाकरे पक्षाला काय दिशा देणार? कार्यकर्त्यांना कोणत्या विचारांचे सोने मिळणार? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आजवर पूर्ण भरणारे मैदान आज अर्धेच भरू लागले आहे. अशी सुमार भाषणे सुरू राहिली, तर दसरा मेळावा मैदानाऐवजी सभागृहात घेण्याची वेळ येईल 
शिवसेनेचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक मेळाव्यांपैकी एक मेळावा आहे. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ मुंबईतील शिवाजी पार्क मैदानामध्ये दसरा मेळावा झाला आहे. पूर्वी दसरा मेळावा म्हटले की विरोधकांना धडकी भरायची. बाळासाहेब ठाकरे आपल्या ठाकरी शैलीतून काँग्रेसवर तर शरसंधानच करायचे, तसेच विद्यमान सरकारवर टीका आणि हिंदुत्ववादी भाषणातून शिवसैनिकांमध्ये चैतन्य भरायचे. अनेक वेळा भाषणानंतर सेनेची आगामी रणनीती, आंदोलन काय असेल याची दिशा स्पष्ट व्हायची. महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिक वाजतगाजत, गुलाल उधळत मेळाव्याला उपस्थित असायचे. हजारोंच्या संख्येने आलेल्या महिला शिवसैनिकांची उपस्थिती विशेष असायची. शिवसेनेच्या ‘आवाज कुणाचा’ व इतर घोषणांनी शिवाजी पार्कचे मैदान दणाणून जायचे. 2010नंतर सभेला ध्वनिप्रदूषणाच्या नियमाचा फटका बसला होता. विशिष्ट मर्यादा राखूनच आवाज ठेवण्याच्या नियमावरच परवानगी दिली होती. पण शिवसैनिकांनी उत्साहाने दिलेल्या घोषणांमुळे आवाजाची मर्यादा भंग व्हायची. पण बाळासाहेबांच्या भाषणाच्या वेळी तेवढीच शांतता राखून आणि तल्लीन होऊन साहेबांचे भाषण ऐकणारा शिवसैनिक होता. असा स्वयंशिस्तीने, विचारांनी प्रेरित होऊन आणि पक्षनिष्ठेने आलेला शिवसैनिक आज पाहायला मिळत नाही. आज दसरा मेळावा ही एक औपचारिकता राहिली आहे. भाषण शिवसैनिकांना चेतवणारे न होता ते टोमणे मारणारे झाले आहे. त्यात ना विचार असतात, ना त्यात नावीन्य असते.
 

shivsena
या वेळीसुद्धा उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे रटाळ भाषण झाले. त्यात कमी म्हणून काय, राऊत, नवीन रणरागिणी यांची शब्दांचा खेळ करणारी तथ्यहीन भाषणे होती. ‘महाराष्ट्रापासून मुंबई तोडू देणार नाही’ या गर्जनेनंतर शिवसेनेला तीन दशके महापालिकेची सत्ता मिळवून दिली. कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणात हीच भाषा पुन्हा आली. गेल्या दोन पिढ्यांनी याचे भांडवल करून पालिकेची सत्ता मिळवली. आता पुढील पिढीही हीच भाषा करून पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी सज्ज आहे. यावच्चंद्रदिवाकरौ पालिकेवर आमची सत्ता राहावी, हीच ठाकरे परिवाराची इच्छा आहे. त्याच्यापलीकडे कधी फारसा विचारही त्यांना शिवत नाही. पालिकेची सत्ता हा त्यांचा ऑक्सिजन असल्याने त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. पण याच्या बदल्यात मराठी माणसाला काय दिले? हा प्रश्नच आहे. आज मुंबईतील कमी होत चालेला मराठी टक्का हा खरे तर उबाठासाठी चिंतेचा विषय आहे. पण हे दृष्टिक्षेपात येताच आम्ही मुंबईकर, फाफडा-जिलेबी, लाई चणा, केम छो, अझान स्पर्धा असे मार्ग अवलंबून पालिकेसाठी आपली नवीन व्होट बँक तयार केली आहे. खरे तर पालिकेच्या सत्तेत तीन दशकांत काय केले याचा लेखाजोखा घेतला, तर रस्त्यावर विविध नक्षीचे पेव्हर बॉक लावणे आणि पेंग्विन सोडल्यास काहीच नवीन दिसले नाही. अशा पालिकेच्या क्षेत्रात आता विकास झपाट्याने होताना दिसत आहे, असे विविध विकासकामांवरून दिसून येते. मुंबई पालिकेत महापौर व नगरसेवक नसल्याने जनतेच्या प्रश्नांना कोणी वाली नाही. त्यामुळे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पालिकेतील कार्यालय सुरू झाले आहे. धारावी विकासासाठी खरे तर खुद्द मनोहर जोशी प्रयत्नशील होते, पण त्यांनाही धारावीचा विकास करण्यासाठी काहीच करता आले नाही. पण फडणवीस-शिंदे सरकार येताच त्यांनी धारावी पुनर्विकासासाठी पावले उचलली आणि त्यातील अडचणी दूर केल्या. यामध्ये सर्वाधिक किमतीचे टेंडर भरणार्‍या अदाणीसारख्या बांधकाम क्षेत्रात नाव असलेल्या विकासकाला सदर टेंडर मिळाले. पण धारावीचा विकास आणि पालिकेतील लोढांचे कार्यालय यावरून उद्धव ठाकरे यांनी पराचा कावळा करून मुंबई तोडण्याची टीका केली. यात उद्धव ठाकरे यांना मुंबई तोडण्याचा काय डाव दिसला, ते न समजण्यासारखे आहे. पण खरी पोटदुखी ही मुंबईपालिकेत कार्यालय सुरू केल्याची आहे. पालिका म्हणजे आमची मक्तेदारी आहे, तेथे दुसर्‍या कोणाची सावलीही बघू शकत नाही.. एकंदरीतच अर्धवट आणि जोडाजोड करून ठाकरेंनी टीका करून टाळ्या मिळवल्या. पण त्यांचेच अज्ञान प्रकट झाले.
 
दसरा मेळाव्याची परंपरा उबाठाला वारसा हक्काने मिळालेली आहे. पक्षाला दिशा देण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. पण टोमणे, शिव्या आणि तथ्यहीन भाषण करून उद्धव ठाकरे पक्षाला काय दिशा देणार? कार्यकर्त्यांना कोणत्या विचारांचे सोने मिळणार? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आजवर पूर्ण भरणारे मैदान आज अर्धेच भरू लागले आहे. अशी सुमार भाषणे सुरू राहिली, तर दसरा मेळावा मैदानाऐवजी सभागृहात घेण्याची वेळ येईल, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.