एका ज्ञानोपासकाचे जाणे...

विवेक मराठी    29-Oct-2023   
Total Views |
 
rss
आदरणीय रंगा हरिजींचं देहावसान झाल्याची दुःखद वार्ता घेऊन आजची सकाळ उजाडली. शुद्ध बुद्धीचे आणि समतोल दृष्टीचे चिंतक असलेले रंगा हरिजी यांच्याशी परिचय झाला आणि तो काळाच्या ओघात दृढ झाला, हे माझं परमभाग्य. मराठीसह अनेक भारतीय भाषा अवगत असलेले हरिजी साप्ताहिक विवेकचे नियमित वाचक होते, ही माझ्यासाठी आणि विवेकसाठीही खूप महत्त्वाची गोष्ट होती. एखादा लेख आवडला तर ते आवर्जून फोन करत आणि कामाचं बोलून झालं की माझी ख्यालीखुशाली विचारत. माझे बाबा गेल्याचं कळलं, तेव्हाही त्यांनी आवर्जून फोन करून सांत्वन केलं होतं. खूप दूर राहत असूनही मायेचा एक अदृश्य धागा आमच्यात होता. आज ते सर्व संपलं.
 
***
दृष्टी विस्तारणार्‍या संवादाचे दोन दिवस
 
साधारण तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा रा.स्व. संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. रंगा हरिजी यांचे विचार ऐकण्याचा योग आला. निमित्त होतं संघाची संपादक परिषद. संदर्भसमृद्ध आणि एका सूत्रात गुंफलेल्या एका शांत संथ लयीत चाललेल्या त्यांच्या बोलण्याने मी भारावून गेले होते. पहिल्या दिवशी संध्याकाळच्या चहापानाच्या सत्रात त्यांनी मला खुणेने जवळ बोलावून घेतलं. म्हणाले, "आप अश्विनी मयेकरजी है ना? मै हर सप्ताह विवेक की पत्रिका पढता हूँ| अच्छा काम कर रही है आप|" हे अनपेक्षित कौतुक, तेही रंगाजींसारख्या व्यासंगी विद्वानाकडून, खूपच छान वाटलं ऐकून. नंतरच्या दोन दिवसांत हेही समजलं की त्यांना भारतातल्या बहुतेक मुख्य भाषांमध्ये उत्तम गती आहे. त्यामुळे त्यांच्या वाचनात खूप वैविध्य आहे. सम्यक दृष्टी म्हणजे काय, याचा परिचय त्यांच्या बोलण्यातून होत होता. नंतरही दोन दिवस ते आवर्जून माझ्याशी बोलत राहिले. ते बोलणं माझ्यातल्या त्या वेळच्या नवख्या संपादकावर संस्कार करणारं होतं. या अनौपचारिक आणि जिव्हाळ्याच्या संवादामुळे, सुरुवातीला अत्यंत आदरापोटी निर्माण झालेली माझी भीड हळूहळू कमी झाली. त्यानंतरही फोनवरून आमचा संवाद कारणपरत्वे होत राहिला.
 
 
rss
 
गेल्या वर्षी मंदिरप्रवेशावरून उठलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विवेकमध्ये भारतीय स्त्री शक्तीच्या नयना सहस्रबुद्धे यांचा लेख प्रकाशित झाला होता. नयनाने त्या विषयाची केलेली मांडणी रंगाजींना अतिशय भावली. त्यांनी आवर्जून नयनाला फोन करून हे सांगितलं. या विषयासंदर्भातला त्यांनी केलेला विचार सांगितला. तेव्हाच आमच्या दोघींच्या मनात आलं की, नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या या ऋषितुल्य व्यक्तीचे स्त्रीपुरुष समानतेसंदर्भातले कालसुसंगत विचार शांतपणे ऐकून- समजून घेण्यासाठी त्यांची सविस्तर भेट घ्यायची. आपल्या मनातल्या शंकांचं समाधान करून घ्यायचं. अर्थात मनातलं प्रत्यक्षात येईपर्यंत मध्ये एक वर्षाचा कालावधी गेला आणि बघता बघता दोघींऐवजी पाच जणी त्यांच्या भेटीला गेलो. रंगाजींच्या भेटीमागचा आमचा हेतू समजताच भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक निर्मलाताई आपटेही बरोबर यायला तयार झाल्या. नागपूरहून भारतीय स्त्री शक्तीची डॉ. मनीषा कोठेकरही आली. केरळमध्ये स्त्री शक्तीचं काम करणारी, धडाडीची कार्यकर्ती डॉ. जयश्री अशा आम्ही पाच जणी रंगाजींच्या भेटीसाठी एर्नाकुलमच्या माधव निवासात पोहोचलो.
 
 
भारतीय स्त्रीवादाची आजच्या काळाला सुसंगत मांडणी कशी करावी, त्यासाठी इतिहासातल्या कोणत्या गोष्टींचा आधार घ्यावा, कोणत्या त्याज्य मानाव्यात, सगळ्या घटनांकडे वा अजरामर साहित्यकृतींकडे पाहण्याची दृष्टी कशी चिकित्सक, विश्लेषक हवी याचं दर्शन त्यांच्या बोलण्यातून घडलं. आमच्या मनाची कवाडं अधिक खुली करणारे हे दोन दिवस. विद्वान, व्यासंगी व्यक्ती किती नम्र, ऋजू असू शकते याचं साक्षात उदाहरण समोर ठेवणारे. एखाद्या प्रश्नावर बोलता बोलता अगदी सहजपणे ते म्हणत, "इस विषय में मेरा अभ्यास नही है, किंतु कुछ बिंदू रखने का प्रयास करता हूँ.. मै बोलूँगा वो ही सही है, ऐसे समझने की जरूरत नही| आप भी उसपर चिंतन किजिए.. शायद आपको सही दिशा मिल जाए|" हे ऐकून त्यांच्याविषयीचा आदर दुणावत होता.
 
ते जितक्या शांतपणे स्वतःची मतं मांडत होते, त्याहूनही अधिक शांतपणे आमचा दृष्टीकोन, आमचे प्रश्न ऐकून घेत होते. त्यांच्यापेक्षा वेगळं मत ऐकताना एकदाही त्यांच्या कपाळावर आठी नव्हती की नजरेत नाराजी. Good listener म्हणजे काय, याचा वस्तुपाठच होता तो.
 
नवी दृष्टी, नवा विचार देणारे, समजशक्ती वाढवणारे असे दोन दिवस...
 
एकेक सत्र जवळजवळ तीन तासांचं झालं. पण ते दमले आहेत असं कुठेही जाणवलं नाही.
 
आमच्या बोलण्यादरम्यान त्यांच्या भेटीसाठी काही जण आल्याने, दोन-चार वेळा बोलणं मध्येच थांबवून आलेल्या माणसांशी त्यांना बोलावं लागलं. असा खंड पडल्यावरही त्यांच्या स्वरांत नाराजी नव्हती वा कोरडेपणाही. घरातल्या वयोवृद्ध आजोबांनी ज्या ममत्वाने विचारपूस करावी, तशी अभ्यागताची विचारपूस करून त्यांचा निरोप घेतल्यावर ते जिथे थांबलेले असत, तिथून पुन्हा विषय सुरू करत होते.
 
इतक्या लांबवर आला आहात तर आदिशंकराचार्यांच्या जन्मस्थानाचं दर्शन घेऊन जा, असं त्यांनी आग्रहाने सुचवल्यामुळे आम्ही परतीच्या वाटेवर कालडीला गेलो. खरं तर शंकराचार्यांशी आमची भेट माधव निवासातच झाली होती.
 
- अश्विनी मयेकर

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.