दोन देश, दोन राष्ट्रनायक

सा. विवेक दीपावली विशेषांक २०२३

विवेक मराठी    29-Oct-2023   
Total Views |
vivek 
राष्ट्रनेता हा सामान्य राजनेता नसतो. सामान्य राजनेत्यांपेक्षा त्याच्याकडे अधिक आणि असामान्य गुण असावे लागतात. राष्ट्रनेता राष्ट्राला घडविणारी पिढी घडवितो. तो अशी काही ऊर्जा निर्माण करतो, की जी पुढे शे-सव्वाशे वर्षे राष्ट्राला पुरेशी होते. जगात ज्या प्रमुख देशांची नावे घेतली जातात, अशा बहुतेक प्रमुख देशांमध्ये राष्ट्राच्या अनेक पिढ्या घडविणारे अनेक राष्ट्रनायक झाले आहेत. जागतिक स्तरावरील काही राष्ट्रनेत्यांशी नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते. या लेखात अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे व्यक्तित्व आणि गुणवत्ता आणि मोदी यांचे व्यक्तित्व आणि गुणवत्ता यांच्यातील साम्यस्थळे आपल्याला बघायची आहेत.
व्यवस्थापनशास्त्रात ‘नेतृत्व’ या संकल्पनेची चर्चा गंभीरपणे केली जाते. मोठमोठ्या कंपन्यांचे डायरेक्टर्स, अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी अशा लोकांत कोणते नेतृत्वगुण आहेत, याबद्दल व्यवस्थापनशास्त्रावरील कोणतेही पुस्तक घेतले, तर गुणांची जंत्री पुढे येते. यातील काही गुण उपजत असावे लागतात, काही गुण मिळविता येतात. उपजत गुणांमध्ये धाडस, धोका स्वीकारण्याची तयारी, उत्तुंग महत्त्वाकांक्षा, इ. गुण मोडतात. बरोबरच्या सहकार्‍यांना कसे हाताळायचे, त्यांना कसे प्रेरित करायचे, त्यांच्या गुणांचा विकास कसा करायचा, इ. गुण शिकून घ्यावे लागतात.
 
 
आपल्याला या लेखात व्यवस्थापकीय नेतृत्वगुणांची चर्चा करायची नसून, राजकीय नेतृत्वाच्या गुणांची चर्चा करायची आहे. राजकीय नेतृत्वाची दोन भागांत वर्गवारी करता येते. पहिल्या भागात राष्ट्र घडविणार्‍या नेतृत्वाचा समावेश होतो, तर दुसर्‍या भागात सत्ता गाजविणार्‍या नेतृत्वाचा समावेश होतो. पहिल्या विभागातील नेतृत्वाला राष्ट्रपुरुष असे म्हणतात आणि दुसर्‍या प्रकारातील नेतृत्वाला राजकीय नेतृत्व असे म्हणतात. या दोन्ही प्रकारांतील नेतृत्वक्षेत्रात नेत्याकडे काही गुण समानतेने असावे लागतात. प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असावी लागते. प्रत्येकाकडे संघटनकौशल्य असावे लागते. आपले विचार मोजक्या आणि प्रभावी शब्दांत मांडण्याची शक्ती असावी लागते. सहकार्‍यांच्या क्षमतांची पारख करण्याची शक्ती असावी लागते. राजकारणात काय साध्य करायचे आहे, याची सुस्पष्टता असावी लागते. जनतेला नेमके काय पाहिजे आहे, हे जाणण्याची क्षमता असावी लागते. कोणत्या वेळी कोणते राजकीय डाव खेळले पाहिजेत याचे ज्ञान संपादन करावे लागते. पुरेशा प्रमाणात धनशक्ती आणि स्नायुशक्ती (मसल पॉवर) याची जोडणी करावी लागते. प्रत्येक राजकीय नेत्याला अफाट परिश्रमाची सवय ठेवावी लागते, दिवसातील बारा ते सोळा तास काम करावे लागते. राजकारण हा फावल्या वेळात करण्याचा विषय नाही.
 
 
एखादी व्यक्ती राजनेता आहे याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये वरील सर्व प्रकारची गुणसंपदा आहे, हे गृहीत धरावे लागते. काही नेत्यांना या गोष्टी वारसा हक्काने प्राप्त होतात, तर काही नेत्यांना या गोष्टी हळूहळू प्राप्त करून घ्याव्या लागतात. एखाद्या वॉर्डाचा कार्यकर्ता ते प्रदेशाचा मंत्री असा ज्या नेत्याचा प्रवास होतो, तो आपल्या प्रवासात या सर्व गोष्टी प्राप्त करतो. समाजजीवनाचे राजकीय अंग सर्वाधिक प्रभावशाली असते. समाजाला वेगवेगळ्या क्षमतांच्या राजनेत्यांची गरज असते. राजसत्ता कितीही मोहक असली तरी ती बेलगाम घोड्यासारखी असते, तिला नियंत्रणात ठेवून लोककल्याणासाठी राबविण्यासाठी राजनेत्यांची आवश्यकता असते. त्यांच्याकडे ते कौशल्य आणि क्षमता असावी लागते.
 
 
vivek
 
हे झाले सामान्य राजनेत्यांविषयी. राष्ट्रनेता हा सामान्य राजनेता नसतो. सामान्य राजनेत्यांपेक्षा त्याच्याकडे अधिक आणि असामान्य गुण असावे लागतात. अशा राष्ट्रनायकाला इंग्लिशमध्ये ‘दि ग्रेट’ असे म्हणतात. मराठीत आपण ‘महान राष्ट्रनायक’ असे म्हणू शकतो. सामान्य राजनेते देशाची राज्यसत्ता चालविण्याचे काम करतात. राष्ट्रनेता राष्ट्राला घडविणारी पिढी घडवितो. तो अशी काही ऊर्जा निर्माण करतो, की जी पुढे शे-सव्वाशे वर्षे राष्ट्राला पुरेशी होते. जगात ज्या प्रमुख देशांची नावे घेतली जातात, अशा बहुतेक प्रमुख देशांमध्ये राष्ट्राच्या अनेक पिढ्या घडविणारे अनेक राष्ट्रनायक झाले आहेत. इंग्लंडचा विचार केला, तर ऑलिव्हर क्रॉमव्हेल (1658), अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन, इटलीचे गॅरिबॉल्डी, मॅझिनी, फ्रान्सचे कार्डिनल रिसेल्यू व नेपोलियन, रशियाचे पीटर दि ग्रेट, जर्मनीचे प्रिन्स बिस्मार्क अशी नावे पुढे येतात. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रबांधणीचे कार्य स्वामी विवेकानंदांनी केले. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 560हून अधिक संस्थानिकांना भारतात विलीन करून टाकले आणि या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी राज्यघटना देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, म्हणून सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही राष्ट्रनायक या सदरात मोडतात.
 
 
आता आपल्या राष्ट्राचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. देशातील अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे तेदेखील एक राजनेता आहेत की त्याहून वेगळे राष्ट्रनेता आहेत? या प्रश्नाची चर्चा आपल्याला या लेखात करायची आहे. नरेंद्र मोदी यांचे समकालीन राजनेते त्यांच्या पक्षातदेखील आहेत आणि विरोधी पक्षातदेखील आहेत. पंतप्रधानपदाची इच्छा असणारे पक्षात आणि विरोधी पक्षातही अनेक जण असू शकतात. असे असण्यात काही गैर आहे, असेही नाही. नरेंद्र मोदी हे काही पंतप्रधानपदाचा अमरपट्टा घेऊन आलेले राजनेता नाहीत. आणखी काही वर्षांनंतर त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी येईलच. तो येणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान भरून काढेल असे सांगणे कठीण आहे. राष्ट्रनायक म्हणून नरेंद्र मोदी यांची गुणवत्ता सर्व राजकीय नेत्यांची बेरीज केली, तरी नरेंद्र मोदी यांच्या गुणांचे पारडे जड होईल. त्यांच्याशी तुलना करावी असा एकही समकालीन राजकीय नेता दिसत नाही.
 
vivek 
 
जागतिक स्तरावरील काही राष्ट्रनेत्यांशी नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते. अशा सर्वांशी तुलना करायची म्हटली, तर एक पुस्तक लिहावे लागेल, म्हणून या लेखात अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे व्यक्तित्व आणि गुणवत्ता आणि मोदी यांचे व्यक्तित्व आणि गुणवत्ता यांच्यातील साम्यस्थळे आपल्याला बघायची आहेत.
 
 
केंटुकी राज्यातील एका खेडेगावात 12 फेब्रुवारी 1809 रोजी लिंकन यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म राजप्रासादात झाला नसून एका लाकडी खोपट्यात झाला. लिंकनचे वडील अशिक्षित होते. आईला लिहिता-वाचता येत होते. त्यांच्या आईचे नाव आहे नॅन्सी हँक्स. लिंकन यांचे बालपण दारिद्य्रात गेले. समृद्ध अमेरिकेचा जन्म अजून व्हायचा होता. अमेरिकेत नशीब काढण्यासाठी इंग्लंड आणि युरोपमधून गोर्‍या लोकांच्या झुंडीच्या झुंडी येण्याचा तो कालखंड होता. पश्चिमेच्या प्रदेशात सरकत जाणे हे त्या काळात चालू होते.
लिंकन यांचे शिक्षण जेमतेम दुसरीपर्यंत झाले. त्यांच्या काळात अमेरिकेत अरविंद केजरीवाल नव्हता, हे अमेरिकेचे नशीब! तो असता, तर त्याने ‘दुसरी पास राष्ट्राध्यक्ष’ अशी लिंकनची खिल्ली उडविली असती. लिंकन कुठल्या महाविद्यालयात गेला नाही, त्याच्याकडे कोणतीही डिग्री नव्हती, पण त्याने कायद्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करून कायद्याची सनद मिळविली होती. वाचनाची गोडी त्याला बालपणापासून होती. तरुण होईपर्यंत त्याला शारीरिक कष्टाची कामे करावी लागली. शेतमजूर म्हणून काम करणे, वृक्षतोडीचे काम करणे, कुंपणाला लावण्यासाठी लाकडाच्या फळ्या तयार करणे - इंग्लिशमध्ये त्याला ‘रेल स्प्लिटर’ म्हणतात.
 
 
एकदा लिंकनने एका परिचित गृहस्थाकडून जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चरित्र वाचायला आणले. दिवसभराची शारीरिक कष्टाची कामे झाल्यानंतर तो हे पुस्तक वाचीत बसत असे. त्याचे घर लाकडाच्या फळ्यांचे होते. फळ्यांच्या फटीत तो पुस्तक ठेवून देत असे. एकदा खूप पाऊस पडला आणि ते पुस्तक भिजून गेले. ते भिजलेले पुस्तक घेऊन लिंकन आपल्या परिचित गृहस्थाकडे गेला. तो त्यांना म्हणाला, “तुमचे मौल्यवान पुस्तक माझ्याकडून खराब झाले आहे. तुमच्या शेतावर तीन दिवस काम करून मी त्याची भरपाई करतो.” त्या गृहस्थाने तीन दिवस अब्राहम लिंकन यांना भरपूर राबवून घेतले. अब्राहम लिंकन म्हणजे सचोटी आणि प्रामाणिकपणा हे समीकरण मानण्यात येते. हे त्यांचे अंगभूत गुण होते.
 
 
पुढे तरुण वयात त्यांनी बेरी नावाच्या आपल्या मित्राबरोबर भागीदारीत दुकान उघडले. बेरी दारुड्या आणि आळशी होता. दुकानाचे दिवाळे वाजले. एक हजार डॉलर्सहून अधिक कर्ज लिंकनच्या डोक्यावर बसले. लिंकन दिवाळखोरी जाहीर करू शकत होता, पण ती त्याने केली नाही आणि पुढील दहा-बारा वर्षे सर्व कर्ज तो फेडीत राहिला. सचोटी आणि प्रामाणिकपणा याची लिंकनच्या जीवनातील असंख्य उदाहरणे आहेत. नमुन्यासाठी फक्त दोन इथे दिली आहेत. आज लिंकनची अमेरिकेतील प्रतिमा राष्ट्रनायकाची आहे. राष्ट्रनायकाकडे सचोटी आणि प्रामाणिकपणा हे दोन गुण असावेच लागतात.
 
 
नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावी त्यांचा जन्म झाला. आपल्या आईवडिलांचे हे तिसरे अपत्य होते. त्यांच्या आईचे नाव हिराबेन आणि वडिलांचे नाव दामोदरदास असे होते. दामोदरदास मूलचंद मोदी यांची आर्थिक परिस्थिती सामान्य होती. वडनगर स्टेशनवर ते चहाचा ठेला चालवीत असत. वडिलांना मदत करण्यासाठी शालेय विद्यार्थी नरेंद्र रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यासाठी जात असत. अब्राहम लिंकन यांना जसे ‘रेल स्प्लिटर’ म्हटले जाते, तसे नरेंद्र मोदी यांनादेखील ‘चहावाल्याचा मुलगा’ असे म्हटले जाते. आपल्या घराण्याच्या, शिक्षणाच्या आणि श्रीमंतीच्या घमेंडीत जगणारे, चायवाला पंतप्रधान म्हणून मोदींचा उपहास करतात. असे उपहास करणारे लोक आपल्या सांस्कृतिक उंचीचे दर्शन घडवितात.
 
 
सुदैवाने नरेंद्र मोदी यांचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. बहि:शाल विद्यार्थी म्हणून दिल्ली विद्यापीठातून त्यांनी एम.ए.ची पदवी प्राप्त केली. शालेय जीवनापासून वादविवाद स्पर्धेत ते भाग घेत. आज ते देशाला महान वक्ता म्हणून परिचित आहेत. भाषणाची भरपूर तयारी करीत. वाचनाची त्यांना लहानपणापासून आवड निर्माण झाली. शाळेच्या ग्रंथालयात दीर्घकाळ बसून ते वाचन करीत. आज जेव्हा आपण त्यांची भाषणे ऐकतो, तेव्हा सामान्य माणसाला माहीत नसलेले थोर पुरुषांचे काही किस्से ते सांगतात, वेद-उपनिषदातील ऋचा हातात कागद न घेता, भाषणातून ते मांडतात. विद्यार्थिजीवनात या सर्वाची पायाभरणी झालेली आहे.
 
 
अब्राहम लिंकन आणि नरेंद्र मोदी या दोघांनी ज्ञानसाधना केली. सरस्वतीची साधना कष्टसाध्य असते. साधनेचे वय असे असते, ज्या वयात आकर्षणाचे शेकडो विषय असतात. सामान्य माणूस त्या विषयांच्या मागे धावतो, म्हणून तो सामान्यच राहतो. पण महान माणसांचे तसे नसते. हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो या नावाचे महान अमेरिकन कवी होऊन गेले. त्यांच्या The Ladder of St. Augustine या कवितेतील अतिशय गाजलेल्या ओळी अशा आहेत - The heights by great men reached and kept were not attained by sudden flight, but they while their companions slept, were toiling upward in the night.
 
 
याचा मराठी भावानुवाद असा - ‘शिखरावर गेलेल्या महान माणसांनी जी उंची गाठलेली असते, ती आकस्मिकपणे गाठलेली नसते. त्यांचे सहकारी जेव्हा झोपा काढीत असतात, तेव्हा रात्रीदेखील ते अपार कष्ट करीत राहतात.’ भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील श्लोक असा आहे -
 
‘या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
 
 
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥2.69॥’ या श्लोकाचा अर्थ होतो - सर्वसामान्य माणसांची रात्र असते, तेव्हा संयमी जागा असतो. आणि जेव्हा सर्वसामान्य माणसे जागी असतात, तेव्हा श्रेष्ठ माणूस झोपी गेलेला असतो. म्हणजे ज्या इंद्रिय विषयसुखात सामान्य माणसे रममाण होतात, त्यापासून श्रेष्ठ व्यक्ती अलिप्त असते आणि ती कष्ट करीत राहते. अब्राहम लिंकन आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या किशोर आणि तरुण वयात स्वत:चे भविष्य घडविणारे अपार कष्ट केले आहेत.
 
 
अब्राहम लिंकन यांच्या जीवनावर त्यांची आई नॅन्सी, राष्ट्रपिता जॉर्ज वॉिंशंग्टन, बायबल, थॉमस जेफरसन आणि अमेरिकन राज्यघटना यांचा जबरदस्त प्रभाव होता. ते नऊ वर्षांचे असतानाच त्यांची आई वारली. त्यांच्या वडिलांनी सारा बुश या विधवेशी दुसरे लग्न केले. अब्राहमची ही दुसरी आई आहे. लिंकनच्या जीवनावर या दोन्ही आयांचा अतिशय खोलवरचा परिणाम झालेला आहे. आपल्या आईविषयी लिंकन म्हणतात, ‘मला आई करीत असलेल्या प्रार्थनांची सतत आठवण येते. या प्रार्थना माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहेत.’ त्याची आई नॅन्सी हिची बायबलवर प्रगाढ श्रद्धा होती. आपल्या आईविषयी ते म्हणतात, "All that I am, or hope to be, owe to my angel mother' आज मी जो काही आहे आणि उद्या जो काही असणार आहे, त्याचे सर्व श्रेय माझ्या देवतासमान आईला जाते.
 
 
सावत्र आईच्या कथा आपण बालपणी खूप ऐकल्या असतील. लिंकनची दुसरी आई सारा ही जन्मदात्री आईसारखीच होती.अब्राहम यांच्याकडे अलौकिक गुण आहेत ते तिने ओळखले. ती घरी आल्यामुळे घराला घरपण येत गेले. अब्राहमला बर्‍यापैकी कपडे मिळू लागले. अब्राहमच्या वाचनाच्या गोडीला साराने खूप प्रोत्साहन दिले. आपल्या जन्मदात्या मुलाप्रमाणे तिने त्याला वाढविले. अब्राहम लिंकन यांच्या जीवनावर या दोन्ही मातांचा न पुसता येणारा प्रभाव उमटला आहे. महान माणसे आकाशातून पडत नाहीत. ती समाजातूनच निर्माण होतात. त्यांना घडविण्याचे काम त्यांच्या माता करीत असतात. म्हणून आपण म्हणतो कौसल्येचा राम, यशोदेचा कृष्ण आणि जिजाऊचा शिवाजी.
 
 
नरेंद्र मोदी हे अब्राहम लिंकनसारखे मातृभक्त आहेत. वडिलांच्या उत्पन्नात घर चालविणे कठीण असल्यामुळे त्यांच्या आईने श्रमाची अनेक कामे केली. बाल नरेंद्र एकदा तळ्यातून मगरीचे छोटे पिल्लू पकडून घरी घेऊन आला. आई हिराबेन त्याच्यावर रागावल्या. त्या म्हणाल्या, “लहान पिल्लाला त्याच्या आईपासून दूर करता कामा नये. तू जा आणि तळ्यात हे पिल्लू सोडून ये.” एके दिवशी बालक नरेंद्रला रस्त्यावर एक रुपया मिळाला. तो त्याने आईकडे दिला. आई त्याला म्हणाली, “हा तुझ्याकडेच ठेव आणि योग्य कामासाठी खर्च कर.” शाळेतील गरीब मुलीला वह्या-पुस्तके घेण्यासाठी पैसा नव्हता. नरेंद्रने तो रुपया तिला देऊन टाकला. आईचे संस्कार असे असतात. आपल्या आईविषयी, तिच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते लिहितात, ‘माझ्या जीवनात जे काही चांगले आहे आणि माझ्या चारित्र्यात जे काही चांगले आहे, त्याचे सर्व श्रेय नि:संकोचपणे माझ्या आईवडिलांकडे जाते. आज मी दिल्लीत बसलो असता भूतकाळातील आठवणींनी माझे मन भरून आले आहे. माझी आई जेवढी असामान्य आहे तेवढीच अत्यंत साधी आहे.’ नरेंद्र मोदी लिहितात, ‘आई’ हा केवळ एक शब्द नव्हे, तर आयुष्यातील अशी भावना आहे, ज्यामध्ये वात्सल्य, धैर्य, विश्वास अशा अपार भावना सामावल्या आहेत. जगातला कोणताही भाग असो, कोणताही देश असो, प्रत्येक मुलाच्या मनात आपल्या आईसाठी सर्वात अनमोल स्नेहभावना असते. आई (आईचे प्रेम), आपल्याला केवळ जन्मच देते असे नव्हे, तर आपले मन, आपला आत्मविश्वास, आपले व्यक्तिमत्त्व ती घडविते. आपल्या मुलांसाठी ती आयुष्यभर झिजते, स्वत:ला समर्पित करते. आज माझा आनंद, माझे भाग्य आपणा सर्वांसमवेत मी सांगू इच्छितो. माझी आई हिराबा, आज 18 जूनला वयाच्या शंभराव्या वर्षात प्रवेश करत आहे. म्हणजेच आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. वडील आज असते, तर गेल्या आठवड्यात तेही शंभर वर्षांचे झाले असते. म्हणजे 2022 हे असे वर्ष आहे, ज्यामध्ये माझ्या आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि याच वर्षात माझ्या वडिलांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले आहे.’
 
 
नरेंद्र मोदी हे आठ वर्षांचे असताना संघशाखेत जाऊ लागले. संघाच्या भाषेत सांगायचे तर ते शिशुकालापासून स्वयंसेवक आहेत. संघस्वयंसेवकाच्या जीवनावर डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव असतो. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्या दोन पुस्तिका आहेत. 1) डॉ. हेडगेवार जी की जीवनांजलि 2) श्रीगुरुजी ः एक स्वयंसेवक. स्वामी विवेकानंदांचे समग्र वाङ्मय त्यांनी वाचून काढले आहे. संघ हा विवेकानंदांच्या विचारांचा कालसापेक्ष आविष्कार आहे. एवढेच नव्हे, तर स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले की, ‘भाषणाने तात्कालिक जागृती निर्माण होते. सतत जागृत असणारे तरुण घडविले पाहिजेत.’ विवेकानंदांचा हा विचार डॉ. हेडगेवारांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. नरेंद्र मोदी यांची प्रत्येक योजना आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय हे दुसरेतिसरे काही नसून स्वामी विवेकानंद यांच्या महान विचारांची राजकीय क्षेत्रातील अभिव्यक्ती आहे. तथाकथित सेक्युलर पंडितांना ही अभिव्यक्ती समजत नाही, मतिमंदतेचा हा परिणाम आहे. या अभिव्यक्तीला काही जण हिंदुत्व म्हणतात, तर काही जण वैश्विक मानवतावाद म्हणतात.
 
 
संघप्रचारक म्हणून जीवन जगताना त्यांच्यावर लक्ष्मणराव इनामदार यांच्या व्यक्तित्वाचा फार खोलवरचा परिणाम झालेला आहे. त्यांच्याबद्दलदेखील नरेंद्र मोदी यांनी ‘संघयोगी वकील साहबःलक्ष्मणराव इनामदार’ हे पुस्तक लिहिले आहे. समजू लागल्यापासून नरेंद्र मोदी यांना विरक्तीची गोडी निर्माण झाली. घरदार सोडून ते हिमालयात गेले. त्यांनी भारतभ्रमण केले. स्वामी विवेकानंदांच्या बेलूर मठात गेले. त्या वेळच्या रूढीप्रमाणे अल्पवयात त्यांचा विवाह करून देण्यात आला. रामदास स्वामींप्रमाणे ते लग्नमंडपातून पळून गेले नाहीत, पण पती-पत्नीचा संसार त्यांनी कधी थाटला नाही. वैवाहिक जीवनापासून ते विरक्त राहिले.
 
 
अब्राहम लिंकन यांच्या जीवनाचा विचार करता ते संसारी होते. मेरी टॉड या तरुणीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन मुले झाली. मेरीशी विवाह होण्यापूर्वी ते अ‍ॅन रूटलेज या तरुणीच्या प्रेमात पडले होते. तिचा अकाली मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा घाव ते जन्मभर विसरू शकले नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावर दु:खाची गडद छाया होती असे त्यांचे चरित्रकार सांगतात. ही दु:खाची छाया अ‍ॅन रूटलेजच्या अकाली निधनाची होती.
 
 
अब्राहम लिंकन यांना तरुण वयापासून राजकारणाची गोडी होती. इलिनॉय राज्याच्या विधानसभेचे आणि अमेरिकन काँग्रेसचेदेखील ते सभासद झाले. 1858 साली सिनेटरपदासाठी त्यांनी निवडणूक लढविली. त्यात ते हरले. 1860 साली ते राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे राहिले. रिपब्लिकन पक्षाने त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली. उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी कोणत्याही उचापती केल्या नाहीत. आपले चारित्र्य, सचोटी आणि प्रामाणिकपणा या गुणांनी त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधामध्ये स्टिफन डग्लास, जॉर्न बे्रकिनरिज आणि जॉर्न बेल होते. मतांची विभागणी झाल्यामुळे लिंकन यांना सर्वाधिक मते मिळून ते निवडून आले.
 
 
ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत असताना अमेरिका एक राहणार की तिचे विभाजन होणार असा अमेरिकेपुढे सर्वात मोठा प्रश्न होता. विभाजनाचे कारण अमेरिकेत असलेले निग्रो गुलाम. गुलामी असावी की नसावी या प्रश्नावरून अमेरिकन जनमत विभाजित झाले होते. संसदेचे काही कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे एक-दोन निर्णय यांनी जनमताचे विभाजन अधिक टोकदार होत गेले. अब्राहम लिंकन यांची अध्यक्षपदी निवड होताच 11 राज्यांनी अमेरिकेतून फुटून निघून स्वत:चा स्वतंत्र देश निर्माण करण्याची घोषणा केली. देश एक कसा ठेवायचा? राज्यघटना अबाधित कशी ठेवायची? निग्रोंची गुलामी कशी संपवायची? असे तीन ज्वलंत प्रश्न अब्राहम लिंकन यांच्यापुढे उभे राहिले. ते त्यांनी यशस्वीपणे हाताळले, म्हणून त्यांची गणना राष्ट्रपुरुष-राष्ट्रनायक या शब्दांमध्ये केली जाते.
 
 
नरेंद्र मोदी हे संघप्रचारक होते. संघप्रचारकाला व्यक्तिगत राजकीय महत्त्वाकांक्षा नसते. संघ सांगेल ते काम करायचे, अशी त्याची मानसिकता असते. 1987 साली तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मोदी यांना भाजपाचे काम करण्यास सांगितले. 1987पासून त्यांचा राजकीय कालखंड सुरू झाला. संघप्रचारक हा स्वभावत: संघटनकुशल असतो. प्रारंभीच्या काही वर्षांत त्यांच्याकडे गुजरात भाजपाच्या संघटनाची आणि नंतर केंद्रातील भाजपाच्या संघटनाची जबाबदारी आली. 1990च्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेत ते सहभागी झाले. त्यांनी गुजरात ते महाराष्ट्र या यात्रा प्रवासाचे काटेकोर नियोजन केले. लालकृष्ण अडवाणी या रथयात्रेचे प्रमुख होते. या रथयात्रेने देशाची राजकीय विषयसूची बदलून टाकली. अशा घटनेला इंग्लिशमध्ये ‘वॉटर शेड इव्हेंट’ म्हणतात. 2002पर्यंत मोदी यांनी स्वत: निवडणूक कधी लढविली नाही. 2001 साली ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून निवडून येणे अपरिहार्य होते. ते सलग 2013पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. 2014ची लोकसभेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली. हे नेतृत्व त्यांनी मागितले नाही. अब्राहम लिंकन यांना ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागावी लागली नाही, त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनादेखील पंतप्रधानपदाची खुर्ची मागावी लागली नाही. अब्राहम लिंकन आणि नरेंद्र मोदी यांना त्यांच्या चारित्र्यबळामुळे, राष्ट्रहिताच्या दृष्टीमुळे आणि जनतेची कर्तृत्वशक्ती जागविण्याच्या सामर्थ्यामुळे देशाचे सर्वोच्च पद प्राप्त झाले.
 
 
अब्राहम लिंकन यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यापुढे विलक्षण आव्हाने होती. अब्राहम लिंकन यांच्यापुढची आव्हाने जीवघेणी होती, तशी जीवघेणी आव्हाने नरेंद्र मोदी यांच्यापुढे होती असे म्हणता येत नाही. बहुमताच्या आधारावर केंद्रात एका पक्षाची सत्ता स्थापन करणे हे नरेंद्र मोदी यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान होते. 1989 ते 2013पर्यंत आपल्या देशात एका पक्षाचे सरकार आले नाही. वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार बनविले. असे सरकार कार्यक्षम राहू शकत नाही. निर्णयाची एकवाक्यता नसते. जनहिताची दृष्टी नसते. राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक घटक पक्ष जास्तीत जास्त पैसा गोळा करण्याच्या मागे लागतो. राजीव गांधी भ्रष्टाचाराच्या भोवर्‍यात अडकले होतेे आणि अतिशय अकार्यक्षम पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची नाव भ्रष्टाचाराच्या तुफानात बुडाली.
 
 
स्थिर सरकार, कार्यक्षम सरकार, जनहितदक्ष सरकार, सुरक्षाजागरूक सरकार देणे हे मोदींपुढचे मोठे आव्हान होते. त्याच वेळी आपण कोण आहोत, आपली अस्मिता कशात आहे, आपल्या क्षमता कोणत्या आहेत, आपले जागतिक मिशन कोणते आहे याची जागृती करण्याचेदेखील होते. विकास, सुरक्षा, रोजगार, इ. कामे प्रत्येक शासनाला करावीच लागतात, परंतु राष्ट्रभाव जागृतीचे काम सामान्य कुवतीचे राजकीय नेते करू शकत नाहीत. विरोधी पक्षात असलेल्या कोणत्याही नेत्याकडे ही क्षमता नाही. अब्राहम लिंकन यांच्याकडे ती होती आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे उपजतच क्षमता आहे.
 
 
अब्राहम लिंकन यांचे राष्ट्र 1782 साली जन्माला आले. 1782 साली अमेरिकन स्वातंत्र्ययोद्ध्यांनी ब्रिटिश सैन्याचा पराभव केला. ब्रिटिशांनी आपली सत्ता सोडली. मोदी यांच्या भारताचे वय दहा हजार वर्षे आहे. थॉमस जेफरसन यांनी ‘स्वातंत्र्याची घोषणा’ यात अमेरिकन राष्ट्राचा ध्येयवाद मांडलेला आहे, तो तीन शब्दांत व्यक्त झालेला आहे - - Life, Liberty and the pursuit of Happiness - जीवन जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि सुख शोधण्याचा अधिकार, या जाहीरनाम्याचे पहिले वाक्य ‘निर्मितीने सर्व माणसे समान आहेत’ असे आहे. सर्व माणसे समान आहेत, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, सर्व माणसे अकृत्रिम बंधनातून मुक्त असली पाहिजेत आणि प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे सुखी जीवनाचा मार्ग शोधण्याचा अधिकार आहे, हे प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राचा जन्म झाला. आकाराने अतिशय लहान असलेल्या अमेरिकन संविधानात हा सर्व ध्येयवाद व्यक्त झालेला आहे. अब्राहम लिंकन यांनी स्वातंत्र्याच्या घोषणेचे पाठांतर केलेले नव्हते, ती घोषणा त्यांनी आत्मसात केली होती; राज्यघटना ही केवळ कायद्याची कलमे आहेत, एवढाच विषय त्यांच्यापुढे नव्हता. अमेरिकेला बांधून ठेवणारा तो दस्तऐवज आहे, अशी त्यांची धारणा होती.
 
 
राष्ट्रनेत्याला दृष्टी लागते. मला अमेरिका अभंग ठेवायची आहे, संविधान कायम ठेवायचे आहे, राष्ट्रातील दरी दूर करायची आहे, या लिंकनच्या दृष्टीत कोणती खोट नव्हती. नरेंद्र मोदी यांच्यापुढे दहा हजार वर्षांचा सनातन भारत आहे. या भारताचे एक जागतिक मिशन आहे. सर्व मानवजातीला मानवधर्माची शिकवण देणे हे आपले जागतिक लक्ष्य आहे. सर्व मानवजात एक, सर्व मानव सुखी व्हावे, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, सर्वांनी परस्परांशी बंधुवत व्यवहार करावा ही आपली सनातन शिकवण आहे. वैदिक प्रार्थनेतून, उपनिषदांच्या मंत्रातून, भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीतून, विवेकानंदांच्या वाणीतून ती अभिव्यक्त झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला त्याच्या जीवनलक्ष्याची जाणीव करून दिली. आम्हाला समृद्ध व्हायचे आहे, कशासाठी? आम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करायची आहे, कशासाठी? भारतात आम्हाला समरस समाजजीवन उभे करायचे आहे, कशासाठी? नरेंद्र मोदी यांचे सांगणे आहे की केवळ स्वार्थासाठी नाही, तर मानवजातीच्या कल्याणासाठी या गोष्टी आम्हाला साध्य करायच्या आहेत. सनातन भारताच्या अस्तित्वाचे तेच एक कारण आहे.
 
 
राष्ट्राच्या जीवनलक्ष्याचा ध्येयवाद अत्यंत मोजक्या आणि अतिशय परिणामकारक शब्दामध्ये मांडण्याची लिंकन यांची शक्ती थक्क करणारी होती. तीच गोष्ट नरेंद्र मोदी यांच्यादेखील बाबतीत आहे. अब्राहम लिंकन यांचे गेटिसबर्ग येथे झालेले भाषण हे त्यांच्या भाषणातील कोहिनूर हिरा आहे. केवळ तीन मिनिटांच्या भाषणात त्यांनी अमेरिका काय आहे, गृहयुद्धाचे अंतिम फलित कोणते होईल आणि आमची जीवनमूल्ये कोणती आहेत हे मांडले.
 
Fourscore and seven years ago,
Our fathers brought forth upon this continent,
A new nation, conceived in Liberty,
And dedicated to the proposition
That all men are created equals.
Now we are engaged in a great civil war.
Testing whether that nation, or any nation
So conceived and so dedicated
Can long endure; We are met
On a great battlefield of that war.
We have come to dedicate a portion of
That field as a final resting-place
For those who gave their lives
That that nation might live.
It is altogether fitting and proper
That we should do this.
But in a larger sense,
We cannot dedicate, we cannot consecrate
We cannot hallow this ground. The brave men,
Living and dead, who struggled here,
Have consecrated it for above out poor power
To add or distract. The World will little note,
Nor long remember what we say here,
But it can never forget what they did here.
It is for us the living, rather, to be dedicated here
To the unfinished work which they who fought here
Have thus far so nobly advanced.
It is, rather for us to be here dedicated
To the great task remaining before us
that from these honoured dead we take
Increased devotion to that cause for which
They have last full measure of devotion
that we here highly resolve that these dead
Shall not have died in vain that this nation
Under God, shall have a new birth of freedom
And that government of the people
By the people, for the people
Shall not perish from the earth..''
 
अब्राहम लिंकनचे हे भाषण तीन परिच्छेदांचे आहे. ते गद्यकाव्यात आहे. डेल कार्नेजीने ते गद्यात देण्याऐवजी काव्यमय रूपात दिले आहे. तसेच ते वर दिले आहे. या भाषणावर गॅरी विल्स याचे ‘लिंकन अ‍ॅट गेटिसबर्ग - दि वर्डस दॅट रिमेड अमेरिका’ या नावाचे 300 पृष्ठांचे सुंदर पुस्तक आहे आणि हिस्टरी चॅनलने या भाषणावर ‘परफेक्ट ट्रिब्यूट’ नावाचा एक सुंदर चित्रपट केला आहे.
 
 
अशा भाषणांचा मराठी अनुवाद करणे फार कठीण काम आहे. इंग्लिश भाषेतील सर्व सौंदर्य त्यात आणणे फार कठीण आहे. त्याचा भावानुवाद असा करता येईल - “आपल्या पूर्वजांनी सत्त्याऐंशी वर्षांपूर्वी या भूखंडावर स्वातंत्र्याच्या गर्भातून नवीन राष्ट्राला जन्मास घातले आणि हे राष्ट्र ‘सर्व माणसे निर्मितीने समान आहेत’ या महावाक्याला समर्पित केले.
 
 
आज आपण गृहयुद्धाच्या अग्निदिव्यातून जात आहोत. आपली परीक्षा घेतली जात आहे की अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या गर्भातून अवतरलेले आणि समर्पित कोणतेही राष्ट्र हे दीर्घकाळ टिकू शकते की नाही. यादवी युद्धाच्या या रणभूमीवर आज आपण एकत्र झालो आहोत. या रणभूमीचा काही भाग, ज्यांनी येथे आपले राष्ट्र जगावे म्हणून हौतात्म्य पत्करले, त्यांच्या चिरविश्रांतीसाठी अर्पण करण्यासाठी जमलो आहोत. ही गोष्ट करणे सर्वथा अत्यंत उचित आणि योग्यच आहे.
 
 
पण थोडा व्यापक विचार केला, तर ही भूमी आपण समर्पित करू शकत नाही, पवित्र करू शकत नाही आणि तेजोवलयांकितही करू शकत नाही. जी मृत वा शूर माणसे या ठिकाणी झुंजली, त्यांनी आपल्या कृतीने ही भूमी अगोदरच पवित्र केली आहे. त्यांत आपण इंचभरही भर घालू शकत नाही की त्यात कमी करू शकत नाही. आपण येथे काय बोललो याची दखल जग घेणार नाही आणि कोणी ते स्मरणातही ठेवणार नाही. पण या रणभूमीवर ज्या माणसांनी असीम त्याग केला, त्याचा विसर जगाला कधीही पडणार नाही.
 
 
आपण आज जे हयात आहोत, त्यांनी स्वत:ला, अपूर्ण राहिलेल्या या हुतात्म्यांचे काम पूर्ण करण्यास समर्पित केले पाहिजे. या सन्माननीय हुतात्म्यांकडून आपण अक्षय स्फूर्ती घेऊ या. आपण असा निश्चय करू या की त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. परमेश्वराचा कृपाप्रसाद लाभलेले हे राष्ट्र स्वातंत्र्याचा नवजन्म घेईल. त्यांचे पुण्यस्मरण करून आपण निश्चय करू या की लोकांकरिता, लोकांकरवी, लोकांचे शासन या भूतलावरून कधीही नामशेष होणार नाही.”
 
लिंकनचे हे सर्वोत्कृष्ट भाषण आहे.
 
2014 सालच्या मोदींच्या एका भाषणातील या ओळी,
 
Government has only one religion - India first. Government has one only holy book - the Constitution. The Government must be immersed in only one Bhakti - Bharat Bhakti. The Government’s only strength Jan Shakti. Government’s only rituals is the well-being of the 125 crore Indians. The only code of conduct of the Government should be ‘Sabka Saath, Sabka Vikas.
 
भावानुवाद -
 
”सरकारचा धर्म एकच- भारत सर्वप्रथम
 
सरकारचा परमपवित्र धर्मग्रंथ एकच आहे- संविधान
 
सरकार फक्त एकाच भक्तीत मग्न असावे, रममाण असावे, ती म्हणजे भारत भक्ती. सरकारचे एकमेव सामर्थ्य म्हणजे जनशक्ती. 125 कोटी देशवासीयांचे कल्याण करणे हीच सरकारची सर्वोत्तम अपेक्षित कृती. ‘सबका साथ सबका विकास’ अर्थात ‘सर्वांचे सहाय्य सर्वांचा विकास’ हीच सरकारची एकमेव आचारसंहिता असली पाहिजे.” याच वेळी मोदींनी जी घोषणा दिलेली आहे ती अशी - ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास.’
 
रामलीला मैदानावर कार्यकर्त्यांपुढे मोदींनी जे भाषण केले, त्यातील अतिशय महत्त्वाचा अंश असा आहे -
 
भावानुवाद - “भारतमातेला उजळवणारे इंद्रधनुष्य
 
इंद्रधनुष्याचे सात रंग आणि ह्या रंगांकडे निरखून बघताना जाणवते, किती उजळवून टाकतात हे रंग आपल्या भारतमातेला!
इंद्रधनुष्याचा पहिला रंग आहे - भारतीय संस्कृतीचा महान वारसा असलेल्या आपल्या कुटुंबपद्धतीचा. या कुटुंबव्यवस्थेने हजारो वर्षे आपल्याला घडविले आहे, वाढविले आहे. ही कुटुंबव्यवस्था अधिक सशक्त कशी करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपली धोरणे, आपल्या योजना, भारताची ही महान कुटुंबव्यवस्था सक्षम करणारी असली पाहिजेत.
 
इंद्रधनुष्याचा दुसरा रंग आहे- आपली शेती, आपले प्राणी, आपली गावे.
 
महात्मा गांधी भारताला खेड्यांचा देश म्हणत असत. हा आपल्या इंद्रधनुष्याचा महत्त्वाचा आणि तेजस्वी रंग आहे. तो अधिक चमकदार आणि प्रभावी करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. मग ती शेती असो, पशुसंवर्धन असो, आपली गावे असोत, वा गोरगरीब असोत, त्यांच्या कल्याणासाठी धोरणे आखली पाहिजेत आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
 
आपल्या इंद्रधनुष्याचा तिसरा रंग - म्हणजे आपल्या भारतातील स्त्री शक्ती. आपली मातृशक्ती म्हणजे त्याग आणि तपश्चर्येचे मूर्त स्वरूप. आज त्यांची काय स्थिती आहे? इंद्रधनुष्याचा रंग बदलावयाचा असेल तर आपल्या मातांना सक्षम बनविले पाहिजे. आपला भर त्यांच्या शिक्षणावर असायला हवा. त्यांना मोठा आर्थिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे.
 
 
आपल्या इंद्रधनुष्याचा चौथा रंग - म्हणजे जल, जमीन, जंगल, हवामान. हा आमचा वारसा आहे. हा आपला महत्त्वाचा ठेवा आहे. भारताला पुढील शतके विकासाच्या शर्यतीत पुढे ठेवायचे असेल, तर आपल्या इंद्रधनुष्याच्या चौथ्या रंगाचीही विशेष काळजी घ्यावी लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाने त्याला सुरक्षित करावे लागेल.
 
 
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, हे आपले परमभाग्य आहे. 65 टक्के लोकसंख्या 35पेक्षा कमी वयोगटातील आहे. एखाद्या देशाकडे एवढा मोठा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) असेल, आपल्याकडे एवढी युवाशक्ती असेल, तर तो जगाला काय देऊ शकत नाही? आगामी काळात संपूर्ण जगावर एक गंभीर संकट येणार आहे. आपण जर अगाऊ तयारी केली असती तर आपला भारत जगासाठी कल्याणकारी ठरला असता. आपल्या तरुणांमध्ये केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग घडवण्याची ताकद असेल, यासाठी आपण विचार करायला हवा. प्रयत्न करायला हवा. अंमली पदार्थांमुळे आपली तरुण पिढी काही ठिकाणी उद्ध्वस्त होत असल्याच्या बातम्या येत असतात. याविषयी राजकारण बाजूला ठेवून विचार करायला हवा. त्यांना सावरणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापूर्वी त्या मुलांचे संरक्षण करणे ही सर्व देशवासीयांची जबाबदारी आहे. या बाबतीत आपल्याला शून्य सहनशीलता हवी आहे. आपल्याला आपल्या या तरुण पिढीचे संरक्षण करावे लागेल.
 
 
लोकशाही हा इंद्रधनुष्याचा सहावा रंग आहे. आपली लोकशाही हा आपला अनमोल वारसा आहे आणि असा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश असलेला देश जगासमोर मोठ्या ताकदीने पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आपली लोकशाही ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. आपल्या लोकशाहीला प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेकडून सहभागी लोकशाहीकडे नेण्याची गरज आहे. प्रजासत्ताक परंपरांचा अभिमान आहेच. परंपरा पाळायला हव्यातच. परंतु प्रजासत्ताकातील गुणवत्तेची जाणीवही प्रत्येकाने ठेवणे ही काळाची गरज आहे.
 
 
इंद्रधनुष्याचा खूपच महत्वाचा असा सातवा रंग - म्हणजे ज्ञान. जेव्हा-जेव्हा मानवजात ज्ञानाच्या युगात जगली आहे, तेव्हा भारताने अग्रगण्य भूमिका बजावली आहे. आपण ज्ञानाचे उपासक आहोत. आई आपल्या मुलाला आशीर्वाद देताना म्हणते- ‘बेटा, खूप शिकून मोठा हो.’ हे प्रत्येक आईच्या तोंडून सहजपणे बाहेर पडते. ज्ञानाचा हा रंग अधिक शक्तिशाली कसा बनवायचा हे जाणून घ्यायचे आहे, त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.”
 
 
अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यावर जहरी टीका झाली. ते अकार्यक्षम आहेत, ते खेडवळ आहेत, राज्यसत्तेचे त्यांना काही ज्ञान नाही, ते अत्यंत कुरूप आहेत, स्वभावाने क्रूर आहेत, हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत, देशाचे संविधान ते गुंडाळून ठेवतील, त्यांना लष्करी हुकूमशाही आणायची आहे.. हे सगळे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील केले गेले आहेत आणि रोज होतात. नरेंद्र मोदी यांना राज्यघटना बदलायची आहे, ते असहिष्णू आहेत, ते मुस्लीमविरोधी आहेत असे आरोप करून केवळ विरोधक थांबलेले नाहीत, त्यांनी त्याची कथानके तयार केली आहेत. अब्राहम लिंकन यांना या आरोपांच्या दिव्यातून जावे लागले. नरेंद्र मोदी यांनादेखील जावे लागत आहे. जो नेता काळाच्या पुढे असतो आणि तेथे समकालीन, विचारांनी बुद्धीने, कर्तृत्वाने अत्यंत खुजे असतात, तेव्हा ते अशा प्रकारचे आरोप करीत राहतात. जगात ज्या ज्या देशात राष्ट्रनायक उभे राहिले, त्यांना हे सर्व भोगावे लागले आहे. इतिहासाची पाने हे सांगतात की, इतिहास अशा खुज्या लोकांची दखल घेत नाही. त्यांचा नामोल्लेख करावा अशादेखील लायकीचे ते नसतात. इतिहासाला वळण देणारे आणि नवीन इतिहास घडविणारे इतिहासाचे महानायक ठरतात. एका इतिहासकाराने म्हटले की, देशाचा इतिहास इतिहास म्हणजे तरी काय? त्याने त्याचे उत्तर दिले की, महान, कर्तृत्ववान माणसाची जीवनगाथा हाच त्या देशाचा इतिहास असतो. इतिहास घडविणार्‍या महापुरुषांत अब्राहम लिंकन यांची गणना केली जाते. मोदी हे नवइतिहास रचना करणारे महानायक आहेत, एवढे आज आपण म्हणू शकतो.
 
 
अब्राहम लिंकन यांना राष्ट्रनायक, राष्ट्ररक्षक अशा उपाधी लावल्या जातात. याचे कारण असे की, सामान्य राजनेते आणि राष्ट्रनायक यांच्या गुणांमध्ये फार मोठी तफावत असते. अब्राहम लिंकन यांचे तीन गुण - चारित्र्य, सर्व समाजाविषयी आत्यंतिक ममता, राष्ट्रापुढील प्रश्नांची अचूक जाण आणि तेवढीच अचूक निर्णयक्षमता. गृहयुद्ध कसे जिंकावे याचे फुकटचे सल्ले देणारे शेकडो लोक लिंकन यांना भेटत. ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेत. सूचना करणार्‍याच्या सूचनेतील फोलपणा लक्षात आणून देण्यासाठी ते एखादी मार्मिक गोष्ट सांगत. देशाच्या जीवनाला कलाटणी देणारे निर्णय त्यांनी घेतले. फुटून निघालेल्या अकरा राज्यांविरुद्ध निर्णायक युद्ध करण्याचा त्यांचा निर्णय आजच्या अभंग अमेरिकेच्या अस्तित्वाचा निर्णय ठरला. 1 जानेवारी 1863ला त्यांनी निग्रोंना गुलामीतून मुक्त करण्याचा आदेश दिला. गुलामीची प्रथा नाहीशी करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे अ‍ॅफ्रो अमेरिकन बराक ओबामा (2007) साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
 
 
नरेंद्र मोदी यांची निर्णयक्षमता अशीच अचूक असते. घटनेचे 370 कलम रद्द करून त्यांनी देशात दुसरा देश ही संकल्पना मोडीत काढली. पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर त्यांनी दोनदा हल्ले केले. यापूर्वी पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्याची कोणत्याही पंतप्रधानाची हिंमत झाली नाही. नोटाबंदीचा त्यांचा निर्णय असाच धाडसी निर्णय होता. देशाच्या विकासासाठी आणि जनसहभागसाठी नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना जाहीर केल्या. योजनेचे निर्णय हे त्यांचे निर्णय आहेत. बडोद्याजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा त्यांनीच उभा केला. अयोध्येतील राम मंदिराचे काम त्यांच्या कारकिर्दीत सुरू झाले. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या काशीचा त्यांनी कायापालट करून टाकला. त्यांच्यापूर्वी देशाचा कोणताही पंतप्रधान, पंतप्रधान या भूमिकेतून पूजेला बसला नाही. मोदींनी ते करून दाखविले. विविध देशांच्या प्रमुखांना भेटत असताना काहींना त्यांनी भगवद्गीता भेट दिली. महिलांना 33% आरक्षण देऊन ‘नारी शक्ती वंदन’ हे बिल नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले. अब्राहम लिंकन यांना फुकटचा सल्ला देणारे तेव्हा होते, तसेच आतादेखील नरेंद्र मोदी यांना फुकटचा सल्ला देणारे विविध वाहिन्यांचे संपादक आणि वृत्तपत्रांचे स्तंभलेखक आहेत.
 
 
अब्राहम लिंकन यांचे चारित्र्यबल फार उच्चकोटीचे होते. भ्रष्टाचार, अनाचार, अनैतिकता या सर्वांपासून ते शेकडो मैल दूर असत. नरेंद्र मोदी यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचे धाडस कोणालाही होत नाही. त्यांचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्य अत्यंत स्वच्छ आहे. चार वर्षांच्या अध्यक्षीय काळात अब्राहम लिंकन यांनी घेतलेल्या शारीरिक कष्टांना तोड नाही. तीच गोष्ट नरेंद्र मोदी यांच्याही बाबतीत आहे. पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी एकाही दिवसाची सुट्टी घेतलेली नाही. काम, सतत काम हे दोघांच्याही जीवनातील विलक्षण साधर्म्य आहे.
 
 
अब्राहम लिंकन महान होते आणि नरेंद्र मोदीदेखील महान नेते आहेत, अशी केवळ स्तुती करून फारसे काही साध्य होत नाही. थोर पुरुषांचे भक्तगण असतात ते अशी स्तुती वाचून आनंदित होतात, पण आपल्याला भक्तगणांच्याही पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. तो कसा केला पाहिजे, हे लाँग फेलोच्या A Psalm of Life या कवितेच्या शेवटच्या तीन कडव्यांतून लक्षात येईल.
 
 
A Psalm of Life
Lives of great men all remind us
We can make our lives sublime,
And, departing, leave behind us
Footprints on the sands of time;
Footprints, that perhaps another,
Sailing o’er life’s solemn main,
A forlorn and shipwrecked brother,
Seeing, shall take heart again.
Let us, then, be up and doing,
With a heart for any fate;
Still achieving, still pursuing,
Learn to labor and to wait.
 
याचा भावानुवाद असा - सर्व थोर पुरुषांची जीवनचरित्रे आमच्यासाठी एक धडा देतात की, आम्हीही आमचे जीवन उदात्त करू शकतो. कालपटलावर हे जग सोडून जात असताना आम्हीही आमची पदचिन्हे उमटवून जाऊ शकतो.
 
 
ही अशी पदचिन्हे असतील की, निराशेच्या आणि दुर्बलतेच्या वादळाने ज्याची नाव हेलकावे खात असेल, त्यालादेखील जीवन उभारणीची प्रेरणा देईल.
 
 
म्हणून आपण नित्य कर्मरत राहिले पाहिजे. उद्या काय होईल याची चिंता करू नये. आज काही प्राप्त केले आहे आणि भव्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे. कष्ट करण्याची आणि प्रतीक्षा करण्याची मनाला सवय लावून घ्यायला पाहिजे,
 
या कडव्यांचे हे शब्दश: भाषांतर नव्हे, मला समजलेला कवितेचा भावार्थ येथे मी मांडलेला आहे. लाँग फेलोचे शब्द जर आपण प्रत्यक्षात जगू शकलो, तर मोदी नावाच्या राष्ट्रनायकाला ही कृतज्ञतेची पावती ठरेल.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.