फूल गळाले.. सुगंध कायम

विवेक मराठी    29-Oct-2023   
Total Views |
रंगा हरिजी हे केशववृक्षाला लागलेले अत्यंत सुंदर सुवासिक, सुमधुर पुष्प होते. ते उमलले, फुलले, आपला रसगंध सर्वांना देऊन निसर्गनियमाने गळून पडले. सावरकरांच्या पंक्तीची आठवण झाली - ‘अशीच फुले फुलती, फुलोनिया सुकून जाती, कुणी त्याची महती गणती ठेवीत असे। परि जे गजेंद्रसुंडेने उपटिले श्रीहरिचरणी ठेले। मोक्षदात्री पावन॥’ रंगा हरिजींचे जीवनपुष्प भारतमातेच्या चरणी अर्पित झाले. ते पावन झाले आणि सांगायला नको की, ते मोक्षप्राप्तकर्ते झाले.
 
rss
 
ज्यांच्याबरोबर आपला खूप सहवास घडतो, त्यांच्या जाण्याने दु:ख होते. दु:ख केवळ मृत्यूचे नसते. दु:ख याचे असते की, गेलेल्या व्यक्तीचा प्रेमळ स्वभाव, मार्गदर्शन आता आपल्याला काही लाभणार नाही. त्यांची प्रेमळ थाप कधी पाठीवर पडणार नाही. आपण काहीतरी मौल्यवान गमावून बसलो, याचे दु:ख आणि वेदना सोबत करत राहील.
 
 
रंगा हरिजींना मल्याळी भाषेत तेथील संघकार्यकर्ते ‘हरिएटन’ असे संबोधित असत. सर्व भारतासाठी ते रंगा हरिजी होते. मध्यम उंची, स्थूल शरीर आणि चेहर्‍यावर प्रसन्न हास्य हे चित्र डोळ्यापुढून कधी जाणार नाही. मी बहुतेक वेळा त्यांना पांढर्‍याशुभ्र कपड्यातच पाहिले. नव्वदच्या दशकात ते अखिल भारतीय कार्यकर्ते झाले. बौद्धिक प्रमुख अशी त्यांच्यावर जबाबदारी आली. त्या काळात त्यांचा-माझा परिचय झाला. ‘मी, मनू आणि संघ’ या माझ्या पुस्तकाच्या निर्मितीत त्यांचा फार मोठा वाटा आहे.
 
 
हा वाटा असा आहे - 94च्या विवेकच्या दिवाळी अंकात ‘मी, मनू आणि संघ’ हा माझा लेख प्रकाशित झाला. एके दिवशी रंगा हरिजींचा मला फोन आला, तेव्हा ते पितृछाया या संघकार्यालयात होते. ते मला म्हणाले, “रमेशजी, मैंने अपका लेख पढा (लेख मराठीत असूनही)। लेख बहुत सुंदर है, ऐसे लेख से कार्यकर्ताओं का मनोबल बढता है।” लेखाचे पुस्तक कर असे ते मला म्हणाले नाहीत, पण त्यांची कौतुकाची थाप मला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा देऊन गेली.
 
 
रंगा हरिजींचे सर्वात मोठे ऐतिहासिक कार्य म्हणजे समग्र श्रीगुरुजी यांच्या खंडाचे प्रकाशन. श्रीगुरुजी जन्मशताब्दी वर्षात वर्ष-दीड वर्षे नागपूर संघकार्यालयात थांबून त्यांनी श्रीगुरुजींच्या सर्व बौद्धिक वर्गांची, पत्रांची, लेखांची छाननी करून विषयबद्ध खंडाची रचना केली. संघविचारधारेला मिळालेला हा अमृतकलश आहे. त्यानंतर त्यांनी श्रीगुरुजींचे चरित्र लिहिले. दीपक जेवणे यांनी त्याचा केलेला अनुवाद सा. विवेकने प्रकाशित केला.

https://www.vivekprakashan.in/books/shri-guruji-golwalkar-biography/

  
याचा अर्थ असा झाला की, रंगा हरिजी हे बहुभाषाविद होते. इंग्लिश, तामिळ, हिंदी, मराठी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ज्ञानेश्वरीवरील त्यांच्या एका पुस्तकाचा परिचय विवेकमध्ये मीच करून दिला. त्यांचे वाचन चतुरस्र होते. सर्व वाचन हेतुप्रधान हाते. संघकार्यासाठी जीवन समर्पित केले असल्यामुळे जे आपल्या ध्येयाला पूरक आणि प्रेरक, त्याचे वाचन चालत असे. काही पुस्तकांविषयी त्यांचे-माझे संवाद होत. तशी दोन-तीन वेळेला माझ्याकडील असलेली पुस्तके त्यांना वाचण्यासाठी पाठवून दिली होती. ‘एकदा गेलेले पुस्तक परत येत नाही’ असे संस्कृत सुभाषित आहे. रंगा हरिजी त्याला अपवाद होते.
 
 
जेव्हा मी संविधानावर पुस्तके लिहू लागलो, तेव्हा प्रकाशित झालेले पुस्तक मी रंगा हरिजींना पाठवत असे. त्याचा परिणाम एवढाच झाला की, तृतीय वर्ष आयोजन करणार्‍या कार्यकर्त्यांना संविधान हा विषय बौद्धिक अभ्यासक्रमात ठेवावा, असे रंगा हरिजींनी सुचविले. रमेश पतंगे यांच्याकडे हा विषय द्यावा असेही त्यांनीच सुचविले. दोन वर्षांपूर्वी मी त्यांना म्हणालो की, “मे महिन्याच्या तृतीय संघ शिक्षा वर्गात मी संविधान हा विषय मांडायला जाणार आहे.” त्यांनी माझे अभिनंदन केले आणि म्हणाले, “मी तुझेच नाव सुचविले होते.” कार्यकर्त्याला कसे मोठे करायचे, त्याला कसे प्रोत्साहन द्यायचे, त्याच्यातील गुणांची अभिवृद्धी कशी करायची याची पाठशाळा म्हणजे रंगा हरिजी होते. माझ्यासारखेच त्यांनी भारतात किती कार्यकर्ते घडविले असतील, याची मोजदाद करता येत नाही.
 
 
कोरोनापूर्वी दिल्लीला काही निवडक कार्यकर्त्यांची अखिल भारतीय बैठक होती. त्या बैठकीला मी गेलो होतो. रंगा हरिजींनी त्या बैठकीत कार्यकर्त्यांपुढे पहिलाच एक विषय मांडला. त्याला सेमिनारच्या भाषेत ‘की नोट अ‍ॅड्रेस’ म्हणतात. या भाषणात त्यांनी आपण कोण आहोत, आपली संस्कृती काय आहे, आपली सांस्कृतिक मूल्ये काय आहेत, आपले जीवनलक्ष्य कोणते आहे हा विषय फार उंचीवर नेऊन मांडला. वर्षानुवर्षे हे विषय कार्यकर्ते ऐकत असले, तरी आजच्या काळाच्या संदर्भात रंगा हरिजींनी जी मांडणी केली आणि विषयाला जी खोली व उंची प्राप्त करून दिली, ती विसरणे अशक्य आहे.
 
 
रंगा हरिजी नाहीत, म्हणजे काय? ते पार्थिव शरीराने नाहीत. परंतु रंगा हरिजी केवळ देहधारी व्यक्ती नव्हे. रंगा हरिजी म्हणजे जीवनमूल्ये, रंगा हरिजी म्हणजे हिंदू जीवन आणि रंगा हरिजी म्हणजे संघविचार. रंगा हरिजी म्हणजे संघआचार. देह मर्त्य आहे, पण मूल्ये अमर असतात, विचार अमर असतात, ध्येयवाद अमर असतात, संस्कृती आणि राष्ट्रवाददेखील अमर असते. या सर्व रूपांत रंगा हरिजी अमर आहेत. यमाची सत्ता देहावर चालते, त्याची सत्ता अमरत्वावर चालत नाही.
 
रंगा हरिजींच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.