मंतरलेल्या रेघा

विवेक मराठी    31-Oct-2023   
Total Views |
 
 Rangoli
भारतीय संस्कृतीत रांगोळी ही कला भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहे. कोणत्याही शुभप्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी मांगल्याचे, सौंदर्याचे आणि पावित्र्याचे वातावरण निर्माण करते. विविधतेने नटलेल्या भारतात रांगोळ्यांचेसुद्धा अनेक प्रकार आणि रचना आहेत. सर्व प्रकारच्या पारंपरिक भूमिचित्रांसाठी रांगोळी हा शब्द अधिककरून वापरला जातो. प्रत्येक बोलीभाषेत रांगोळी या प्रकाराला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. रांगोळी साकारताना एकाग्रता, सर्जनशीलता, कौशल्य वृद्धिंगत होते. आत्म-जागरूकता विकसित करण्यास, तणावाचा सामना करण्यासाठी आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी कलेची निर्मिती मदत करते, असे वैज्ञानिक संशोधन सांगते. रांगोळी ही जग अशाश्वत असल्याचे स्मरण करून देते, त्याचबरोबरच दुसर्‍या दिवशी नवी रेखलेली रांगोळी नवांकुराचा आनंद देते, नवनिर्मितीचा आनंद देते. हाच आशावाद मन:स्वास्थ्य आणि मन:शांती देणारा आहे.
 
गभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये जमिनीवर विविध चित्रे रेखायची पद्धत रूढ होती. अमेरिकेतील मूळ रहिवासी आरोग्य लाभावे म्हणून जमिनीवर चित्रे काढत, ऑस्ट्रेलियामधील आदिवासी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी ठिपक्यांची चित्रे तयार करत असत, क्यूबाजवळच्या हैती बेटावरील पुजारी जमिनीवर नक्षी रेखाटत, तर आफ्रिकेतील लोक सुपीकतेसाठी जमिनीवर वेगवेगळ्या आकृत्या काढत असत. जरी जगातील अनेक संस्कृतींमध्ये जमिनीवर चित्र रेखणे महत्त्वाचे होते, मंगलकारक होते, तरी आज मात्र ती कला केवळ भारतात पाहायला मिळते. भारतीय स्त्रियांनी ह्या कलेला त्यांच्या जीवनाचा दैनंदिन भाग केल्याने रांगोळीची परंपरा जिवंत राहिली आहे. पाषाणयुगापासून आईकडून मुलीकडे चालत राहिलेली ही गुरु-शिष्य परंपरा!
 
 Rangoli
 
वर्षभरातील विविध सणांमध्ये फुले, पत्री, कलश, आरास, तोरणे, फुलांच्या माळा, समया, दिवे आणि त्यांच्या बरोबरीने लक्ष वेधून घेते ती रांगोळी! दिवाळीत अंगणात तिघी-चौघींनी मिळून काढलेल्या मोठ्ठ्या रांगोळीपासून ते देवासमोर काढलेल्या लहानशा रांगोळीपर्यंत सगळ्या प्रकारची रांगोळी मांगल्याचे, सौंदर्याचे आणि पावित्र्याचे वातावरण निर्माण करते. विविधतेने नटलेल्या भारतात रांगोळ्यांचेसुद्धा अनेक प्रकार आणि रचना आहेत.
 
दारात रांगोळ्या काढायची पद्धत शहरी, ग्रामीण आणि वनवासी भागात प्रचलित आहे. ह्या कलेला महाराष्ट्रात रांगोळी, गुजरातमध्ये साथिया, तामिळनाडूत कोलम, आंध्र प्रदेशात मुग्गुलू, कर्नाटकात रंगवली, उत्तर भारतात चौकपुराणा, राजस्थानात आणि मध्य प्रदेशात मंडणा, बिहारमध्ये अरिपन, बंगालमध्ये अल्पना, ओडिशामध्ये ओसा, हिमाचलमध्ये ऐपन, केरळमध्ये पुवीदल इत्यादी नावांनी ओळखले जाते. सर्व प्रकारच्या पारंपरिक भूमिचित्रांसाठी रांगोळी हा शब्द अधिककरून वापरला जातो.
 
 Rangoli 
 
चित्रांचे प्रकार
 
प्राचीन ग्रंथांत चित्रांचे वर्गीकरण ‘शाश्वत चित्रे’ आणि ‘क्षणिक चित्रे’ असे केले आहे. शेकडो वर्षे टिकलेली भीमबेटका किंवा अजिंठासारख्या गुफांमधील भित्तिचित्रे शाश्वत चित्रे आहेत, तर एकच दिवस टिकणारी रांगोळी क्षणिक चित्रांच्या वर्गात येते.
 
 
चित्रांचे वर्गीकरण ‘भौमचित्र आणि भित्तिचित्र’ असेही केले आहे. जी भूमीवर काढली जातात ती भौमचित्रे आणि जी चित्रे भिंतीवर काढली जातात ती भित्तिचित्रे.
 
 
‘शिल्परत्न’ नावाच्या एका प्राचीन ग्रंथात चित्रांचे दोन प्रकार सांगितले आहेत - रसचित्र आणि धूलिचित्र. रसचित्र ही ओल्या रंगांनी काढलेली असतात, तर धूलिचित्रे रंगीत भुकटीने काढलेली असतात. भित्तिचित्रे केवळ रसचित्र प्रकारातच येतात, तर भौमचित्रे रसचित्र आणि धूलिचित्र ह्या दोन्ही प्रकारांत पाहायला मिळतात.


 Rangoli
 
ह्या चित्रांच्या रेखाटनाची तंत्रेही वेगळी आहेत. रसचित्र काढायला कुंचला, काडी किंवा कापडाचा बोळा यासारखी साधने लागतात. धूलिचित्र मात्र बोटांचा वापर करून काढले जाते. तसेच भिंती, खांब किंवा छत रंगवण्यासाठी एखाद्या द्रावणात रंगीत भुकटी मिसळावी लागते. मात्र धूलिचित्र काढताना थेट रंगीत भुकटीचा वापर करता येतो. ह्यावरून लक्षात येते की भूमीवरील धूलिचित्र काढायला साधने कमी लागतात. त्यामुळे ही कला आधी विकसित झाली. त्यावरून लक्षात येते की रांगोळीची कला फार प्राचीन आहे. धूलिचित्रे ही रसचित्रांची जननी असावी. तसेच ती बहुधा लेखनकलेचीसुद्धा जननी असावी. लहान मुलांना अक्षरओळख करून देण्याला धुळाक्षरे गिरवायला सांगत असत, त्या प्रकाराशी ही कला मिळतीजुळती आहे.
 
रांगोळीचे उल्लेख
 
वैदिक साहित्यापासून रांगोळीचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदीय ब्रह्मकर्म समुच्चय ह्या ग्रंथात कर्मकांड आणि उपासनेविषयी सांगितले आहे. त्यातील रंगरंजितमंडलानी ह्या भागात विविध मंडले व यंत्र उपासनेचा भाग म्हणून भूमीवर काढायला सांगितली आहेत. त्यात सर्वतोभद्र मंडल, चतुर्लिंगतोभद्र मंडल, ग्रहदेवता मंडल आदी मंडले आणि सप्तशती महायंत्र, रुद्रमहायंत्र आदी यंत्रे यांचा समावेश आहे. गृह्यसूत्रांमध्येदेखील मंगल रेघा काढण्याचा विधी दिला आहे.
 
 
पुराणांतील पूजाविधीमध्येदेखील रांगोळी काढण्यास सांगितले आहे. त्याची पद्धत अशी - आधी जागा स्वच्छ करून घ्यावी. मग गायीच्या शेणाने जमीन सारवून घ्यावी. सारवलेल्या जमिनीवर सर्वतोभद्र मंडल, स्वस्तिक किंवा अष्टदलपद्म ह्यासारख्या मंडलांचे रेखाटन करावे.
 
शिवपुराणात रत्नजडित पद्माचे रेखाटन करून, पाकळ्यांवर उपदेवता आणि मध्यभागी मुख्य देवता काढण्यास सांगितल्या आहेत. लिंग पुराणानुसार इंद्रनील, पद्मराग, मोती अशा रत्नांच्या कणांचा वापर करून मंदिरात शिवासमोर असे कमळ काढायला सांगितले आहे. ज्याला रत्ने परवडत नाहीत, त्याने तांदळाच्या पिठाने रांगोळी काढावी असे म्हटले आहे.
 
 
स्कंद पुराणात सणासुदीला कुंकू आणि केसर वापरून मंदिरात रांगोळी काढायचा उल्लेख आला आहे. तसेच विवाहासारख्या मंगल प्रसंगी फुलांच्या पाकळ्या आणि तांदूळ वापरून रांगोळी काढण्यासंबंधी लिहिले आहे. नारद पुराणात गोवत्स द्वादशीला वासरासह गायीची रांगोळी काढून तिची पूजा करावी, असे सांगितले आहे.
 
 
पद्मपुराणात गृहिणीच्या जबाबदार्‍या सांगितल्या आहेत. त्यामध्ये तिने दररोज आपले घर केर काढून स्वच्छ करावे, तसेच अधूनमधून शेणाने फरशी गुळगुळीत करावी आणि पांढर्‍या रंगाने नक्षी काढून सजवावे, असे लिहिले आहे. मार्कंडेय पुराणात स्त्रियांनी दररोज सकाळी जमिनीवर स्वस्तिक चिन्ह काढणे नितांत आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. भागवत पुराणात कृष्णाच्या वियोगाचे दु:ख कमी करण्यासाठी गोपिकांनी रांगोळी काढल्याचा उल्लेख आला आहे.
 
रामायणात आणि महाभारतातही या कलेचा उल्लेख आढळतो. बिभीषणाच्या घरासमोरील रांगोळी त्याच्या अभिजातपणाचे लक्षण म्हणून नमूद केली आहे. महाभारतात कृष्ण घरी येणार असल्याचे कळताच विदुराने घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्याचा उल्लेख आहे.
 
 
भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नवीन बांधलेल्या नाट्यगृहात, रंगमंचाच्या देवतांच्या पूजेचा तपशील आला आहे. मंचावर मंडप काढावा आणि देवतांना आसनावर विराजमान करावे आणि त्यांची पूजा करावी, असे म्हटले आहे. नाट्यशास्त्रातील आणखी एका विधीत अष्टदलपद्म मंडल रेखाटून त्यात मध्ये ब्रह्मा आणि आठ पाकळ्यांवर अष्टदिक्पाल यांची पूजा सांगितली आहे.
 
 
कामसूत्रात 64 कलांपैकी एक म्हणून रांगोळीचा उल्लेख आला आहे. त्यामध्ये रांगोळीला ‘तांदुला-कुसुमा-बळी-विकार’ म्हटले आहे - अर्थात तांदूळ आणि फुले वापरून जमिनीवर काढलेली क्षणिक आकृती.
 
रांगोळीची जागा
 
भौमचित्र काढण्यासाठी सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढचा भाग. अंगणातील तुळशीसमोरसुद्धा रांगोळी काढली जाते. त्याबरोबरच उंबरठ्यावर आणि देवघरात देवासमोर चित्रे काढली जातात. पूर्वी स्वयंपाकघरात मातीच्या चुली असत, तेव्हा रोज सकाळी चूल स्वच्छ करून चुलीला पोतरा करायचा, त्याभोवती लहानशी रांगोळी काढायची, मगच चूल पेटवून स्वयंपाकाला सुरुवात करायची पद्धत होती. सणासुदीला अंगणात, चौकात, घराच्या आतील मजल्यांवर, स्वयंपाकघरात आणि वेदीसमोर ही चित्रे काढली जात.
 
उंबरठ्याची देखभाल आणि सजावटीची जबाबदारी घरातील स्त्री सांभाळते. उंबरठा हा चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टींचे प्रवेशद्वार असल्याने, चांगल्याचा प्रवेश सुलभ करण्याचे आणि वाईटाला आळा घालण्याचे रक्षकाचे काम उंबरठ्यावरील रांगोळी करते, असा समज आहे. लक्ष्मणाने काढलेली लक्ष्मणरेषा अशाच पद्धतीची रक्षक रेषा होती.
 
पारंपरिक भारतीय घरात अनेक घरगुती कार्यक्रम अंगणात पार पडतात. लग्नाचा मांडव अंगणात घातला जातो. तसेच स्त्रियांचा सहभाग असलेले कार्यक्रम - भोंडला, मंगळागौर हे अंगणात पार पडतात. अशा कार्यक्रमांना स्त्रीआचार किंवा स्त्रीसंस्कार म्हणतात. या विधींच्या वेळी घरातील मुली-स्त्रिया एकत्र मिळून जमिनीवर विस्तृत रांगोळ्या काढतात.
 
 
सणासुदीच्या प्रसंगी जेवणाच्या थाळीभोवती रांगोळी काढली जाते - मग ती पारंपरिक पानांच्या स्वरूपात असो किंवा आधुनिक थाळीत. जेवणाच्या वेळी प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी हे केले जाते.
 
 
रांगोळीसाठी जमीन तयार करणे

परंपरेने संपूर्ण भारतात घरासमोरील अंगण शेणाने सारवलेले असायचे. ग्रामीण भागात आजही ही प्रथा पाळली जाते. अंगणाचा केर काढणे, सडा टाकणे, झाडलोट करणे आणि गायीच्या शेणाचा वापर करून जमीन तयार करणे ही दिवसाच्या सुरुवातीची कामे असत. ह्या स्वच्छतेला महाराष्ट्रात सडासंमार्जन, तामिळमध्ये मेझुकू, मल्याळममध्ये चाणकम, उत्तर भारतात लिंपना इत्यादी नावांनी ओळखले जाते. किंबहुना रांगोळीसाठी अलिम्पाना, अल्पना, अरिपान किंवा ऐपन ही नावे याच प्रथेवरून आली आहेत.
 
 
जवळजवळ सर्वच पुराणांमध्ये कोणतीही पूजा करायची असल्यास रांगोळी काढण्याच्या आधी पूजेसाठी जागेची निवड करून, त्या जागेची स्वच्छता करून, गायीच्या शेणाने सारवून घेण्यास सांगितले आहे. क्वचित काही सुगंधी द्रव्यदेखील शिंपडायला सांगितले आहे.
 
 
रांगोळी ही भूदेवीला वाहिलेली पुष्पांजली आहे. भूदेवीला प्रसन्न करून घेण्याची प्रार्थना मानली आहे.
 
रांगोळीतील आकृतिबंध

रांगोळीतील आकृतिबंध प्रतीकात्मक असतात. उदाहरणार्थ - घरात येणारी दोन पावले लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करतात, गोपद्म गायीचे प्रतिनिधित्व करतात, शंख-चक्र विष्णूचे प्रतिनिधित्व करतात, इत्यादी. रांगोळीमध्ये मंडल आणि यंत्र यांच्या काही पैलूंचादेखील वापर केला जातो. काही ठिकाणी आठवड्याच्या प्रत्येक वारासाठी नेमून दिलेल्या रांगोळ्या आहेत, त्यामध्ये त्या त्या वाराच्या अधिष्ठात्री देवतेची बीज-अक्षरे असतात. ठरावीक रंग वापरून रंगवलेल्या अशा रांगोळ्या नवग्रह पूजेसाठी काढल्या जातात.
 Rangoli
 
मोहनजोदडो, इ.स.पूर्व 2500

रांगोळीमध्ये वापरली जाणारी चिन्हे प्राचीन आहेत. काही चिन्हे सरस्वती-सिंधू संस्कृतीच्या काळापासून चालत आलेली दिसतात. उदा., स्वस्तिक, पिंपळपान, चक्र, चौक, कोलमसारखी नागमोडी रचना, हत्ती इत्यादी. ही संस्कृतीची अखंडता आपल्याला सांगते की इथे कुठलेच आक्रमण यशस्वी झाले नाही. आक्रमण यशस्वी झाले असते आणि इथली संस्कृती नाश पावली असती, तर सरस्वती-सिंधूची चिन्हे आज बंगाली, मराठी, गुजराती, तामिळी भागात दिसली नसती.
 
 
रांगोळीची रचना अत्यंत सममित, संतुलित असते. निसर्गात दिसणारी रचना, समरूपता, पुनरावृत्ती, समतोल आणि सुसंवाद रांगोळीतील नक्षीमध्ये दिसतात. अनेक भौमितिक आकार - ठिपके, रेषा, चौरस, वर्तुळ, त्रिकोन, चौकोन, षटकोन, अष्टकोन इत्यादी रांगोळीत वापरले जातात. रांगोळीमध्ये भूमिती मूलभूत आहे. महाराष्ट्रातील ठिपक्यांच्या रांगोळ्या आणि दक्षिणेतील कोलम ह्यांच्यामधून गणितीय कल्पनांची अभिव्यक्ती होते. एका ठिपक्यापासून दुसर्‍या ठिपक्यापर्यंत काढली जाणारी रेघ जितकी कलात्मक आहे, तितकीच त्यामध्ये गणिताची आणि भूमितीची समजसुद्धा आहे. ठिपक्यांना वेगवेगळ्या प्रकारे जोडून त्यामधून अनेक रचना निर्माण करता येतात. (झर्शीाीींरींळेपी रपव उेालळपरींळेपी) क्रमपरिवर्तन आणि संयोजनांसह विविध नमुने तयार करण्यासाठी चित्रकारीला वाव मिळतो. खाली 5 ठिपके, 5 ओळीतील वेगवेगळे आकृतिबंध निर्माण केलेले दिसतात.
 
 
रांगोळीमध्ये recursion, fractal यासारख्या गणितीय संकल्पना दिसतात.
 
रांगोळीतील एक एक घटक एक एक यंत्र आहे. एक ठिपका म्हणजे एक बिंदू, हे एक यंत्र आहे. जसा बीजातून वृक्ष निर्माण होतो, तशी बिंदूमधून रांगोळी निर्माण होते. एकमेकांना छेदणार्‍या रेघांमधून विविध भूमितीय आकृत्या - स्वस्तिक, षटकोन, अष्टकोन इत्यादी तयार होतात. वृत्तदेखील एक मंडल आहे. ज्याला आदि नाही आणि अंत नाही, हे दर्शवणारे चिन्ह आहे. वृत्त सूर्याचे चिन्ह मानले आहे. वृत्त हे चक्रसुद्धा आहे, जे सुदर्शन चक्र म्हणून विष्णूचे चिन्ह मानले जाते. धर्मचक्र, कालचक्र, चक्रव्यूह अशा पद्धतीनेदेखील वृत्त रांगोळीत काढले जाते.


 Rangoli
 
रांगोळीतील रंग
 
पारंपरिक रांगोळीत नैसर्गिक घटकांपासून बनवलेले रंग वापरले जातात, उदा.,
 
पांढरा - तांदळाच्या पिठापासून तयार केला जातो.
 
काळा - जळलेल्या भाताच्या भुशापासून किंवा कोळशापासून बनवला जातो.
 
पिवळा - हळदीपासून.
 
लाल - हळद, चुना आणि पाणी मिसळून तयार केला जातो.
 
हिरवा - वाळलेल्या पानांपासून.
 
 
रांगोळीतले पाच रंग पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये पांढरा रंग - जल, लाल रंग - अग्नी, काळा रंग - वायू, पिवळा रंग - पृथ्वी आणि निळा रंग - आकाश या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात.
 
समुद्राकाठच्या कोकण, बंगाल, दक्षिण वगैरे भागात, जिथे तांदूळ मुबलक प्रमाणात पिकवला जातो, तेथे तांदळाचे कोरडे पीठ किंवा तांदूळ पाण्यात वाटून त्याच्या मिश्रणापासून रांगोळी काढली जाते. जैनांमध्येसुद्धा रांगोळी काढण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा इतर प्रदेशात पांढरा दगड किंवा चुना आणि कधीकधी गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ रांगोळी काढायला वापरले जाते. केरळमध्ये फुलांचा वापर केला जातो.
 
रांगोळीसाठी वापरला जाणारा चुना जंतुनाशकाचे काम करतो. तांदूळ, तांदळाचे पीठ रांगोळीसाठी वापर करण्यामागचा एक हेतू आहे - भूतयज्ञ. अशी धारणा आहे की आपल्या प्रत्येकावर पाच ऋण आहेत - गुरूंचे ऋषिऋण, पूर्वजांचे पितृऋण, निसर्गाचे देवऋण, समाजाचे मनुष्यऋण आणि प्राण्यांचे भूतऋण. आपले जीवन प्राण्यांशिवाय अशक्य आहे. शेतात काम करणारे बैल, शेतातील माती सुपीक करणारे कृमी, परागण करणारे अनेक प्रकारचे कीटक, पिकावर पडलेली कीड खाणारे पक्षी अशा कित्येक प्राणिमात्रांचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांचे उपकार स्मरून, रोज भूतयज्ञ करायला सांगितला आहे. भूतयज्ञ म्हणजे आजूबाजूच्या प्राणिमात्रांची सेवा करणे. उदा., पहिली पोळी गायीला, शेवटची पोळी कुत्र्याला, पक्ष्यांना चारा-पाणी घालणे आदी गोष्टींचा समावेश होतो. तांदळाने किंवा तांदळाच्या पिठाने काढलेली रांगोळी भूतयज्ञ आहे. अशी रांगोळी अंगणात काढली की मुंग्या, इतर कीटक, चिमण्या यांच्यासारख्या लहान जिवांना अन्न अर्पण केल्याचे पुण्य मिळते.
vivek 
बंगालची अल्पना
 
बंगालमध्ये पारंपरिक पद्धतीने अल्पना काढली जाते. पांढर्‍या शुभ्र तांदळाची पिठी पाण्यात कालवून त्यापासून काढली जाते. ही रांगोळी प्रामुख्याने पांढर्‍या रंगाचीच असते, क्वचित कुठे लाल किंवा हिरवा रंग वापरला जातो. बंगालमधील दुर्गापूजा, कालीपूजा, सरस्वतीपूजा किंवा वसंतपंचमी, दिवाळी त्याचबरोबर तेथील विविध व्रते-वैकल्ये या प्रसंगी आणि लग्नादी मंगल समारंभात ही अल्पना आवर्जून काढली जाते.
 
 
आपल्याकडे अशुभ मानले जाणारे घुबड बंगाल आणि ओडिशामध्ये मात्र लक्ष्मीचे वाहन असल्याने शुभलक्षणी मानले जाते. अल्पनामध्ये सूर्य, मासा, कमळ, भाताची लोंबी, विड्याचे पान, शिडी, कुंकवाचा करंडा, लक्ष्मीची पावले ह्याबरोबरच घुबडसुद्धा रेखले जाते.
 
vivek 
 
तामिळनाडूची कोलम
 
तामिळनाडूमध्ये घराबाहेर रांगोळी काढल्यावरच दिवसाची सुरुवात होते. शहरातले लहानसे घर असले, तरी तिथे उपलब्ध जागेत छोटीशी का होईना रांगोळी दिसते. पारंपरिक कोलममध्ये रंग फारसे वापरले जात नाहीत. ह्या रांगोळीचे वैशिष्ट्य आहे त्यातील सुबक, एकसमान आकार आणि अतिशय क्लिष्ट नक्षी. ह्या रांगोळीत ठिपक्यांच्या भोवतीने एक अखंड रेष फिरत फिरत शेवटी पुन्हा सुरुवातीच्या ठिपक्याला येऊन मिळते. यातील नागमोडी रेषांनी काढलेल्या भागाला नेली कोलम म्हणतात आणि बिंदूभोवती फिरणार्‍या गाठदार रेषांना सिक्क कोलम म्हणतात.
 
महाराष्ट्राची रांगोळी
 
महाराष्ट्रातील ठिपक्यांची रांगोळी हा भूमितीचा आविष्कार आहे. त्यामध्ये सममिती, प्रमाणबद्धता, एकसारखेपणा आहे. सहसा दिवाळीमध्ये ठिपक्यांची मोठी रांगोळी काढली जाते. तीन-चार जणी एकत्र मिळून रांगोळी काढतात, रंगवतात.


 Rangoli
 
काही सणांना विशिष्ट रांगोळी काढली जाते, जशी चैत्रातली चैत्रांगण. अन्न पुरवणारी, समस्त जिवांचे पोषण करणारी अशा अन्नपूर्णादेवीची, म्हणजेच पार्वतीची - गौरीदेवीची ह्या महिन्यात पूजा केली जाते. घरासमोरील अंगण स्वच्छ केले जाते. गेरूच्या साहाय्याने एक चौकोन, त्यामध्ये अनेक शुभचिन्हे असलेले चैत्रांगण काढले जाते. त्यामध्ये समृद्धीची विविध प्रतीके काढली जातात. रांगोळीच्या सर्वात वरच्या बाजूला आंब्याचे तोरण काढले जाते. यानंतर त्याखाली देवघर काढले जाते. त्यामध्ये दोन देवता काढल्या जातात. त्या देवता - शिव-पार्वती / लक्ष्मी-नारायण / राम -सीता असल्याचे मानले जाते. त्याबरोबर सूर्य, चंद्र, गणपती, सरस्वती यंत्र; शिवाशी संबंधित शिवपिंडी, डमरू, त्रिशूळ; विष्णूशी संबंधित शंख, चक्र, गदा, पद्म; कृष्णाशी संबंधित पाळणा, बासरी, मोरपीस, तुळशी वृंदावन; लक्ष्मीची पावले; रामाशी संबंधित धनुष्यबाण; सीतेसाठी हळदीकुंकवाचा करंडा, कंगवा काढला जातो; त्याशिवाय हत्ती, घोडा, नाग, गरुड, कासव, गाय-वासरू आणि समृद्धीची चिन्हे - उदा., स्वस्तिक, कलश, सनई-चौघडा, यशाचे प्रतीक असलेला ध्वज, नववर्षाची सुरुवात म्हणून गुढी काढली जाते, प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून दिवा आणि समईचे चित्र काढले जाते.
 
 
राजस्थानची मंडना
 
घराचे मंडन करणारी अर्थात सुशोभन करणारी ती मंडना. ही राजस्थानमधली पारंपरिक रांगोळी आहे. घरच्या भिंतीवर किंवा सारवलेल्या जमिनीवर मंडना काढतात. चुन्याच्या पेस्टमध्ये कापसाचे बोळे बुडवून त्याने विविध आकार व नक्षी काढून मंडना काढली जाते. गेरूचे लिंपण करून त्यावर चुन्याची पांढरीशुभ्र नक्षी काढतात. मंडनामध्ये मोर फार प्रिय आहे. त्याशिवाय विविध रेघा, ठिपके, धार्मिक चिन्हे, इतर प्राणी यांचाही समावेश यात होतो. नवरात्रीत आणि दिवाळीत घर स्वच्छ करून झाले की घराच्या बाहेरील भिंतीवरदेखील मंडना काढतात.


 Rangoli
 
 
आंध्र प्रदेशची मुग्गुलू
 
घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून त्यावर गायीच्या शेणाने सारवण काढून त्यावर सुबकशी रांगोळी रेखाटतात. काळपट जमिनीवर चुन्याने काढलेली पांढरीशुभ्र मुग्गुलू उठून दिसते. मुग्गुलू रांगोळी तीन प्रकारांत काढली जाते - ठिपक्यांची चुक्कला मुग्गुलू, ठिपक्यांशिवाय चुक्कालू लेनी मुग्गुलू आणि नागमोडी रेषांची तिप्पुडू मुग्गलू. तसेच संक्रांत, दिवाळी आदी सणांच्या वेगळ्या मुग्गुलू असतात.
 
 
उत्तराखंडची ऐपन
 
 
ऐपन म्हणजे कुमाऊँ-उत्तराखंड भागातली पारंपरिक रांगोळी. एखादा विशिष्ट धार्मिक विधी असल्यास, किंवा एखाद्या देवतेसाठी काढलेली किंवा सुशोभनासाठी अंगणात किंवा घराच्या भिंतींवर ऐपन काढली जाते. त्यामध्ये विविध भौमितिक आकार असलेली पारंपरिक ऐपन असते. पूजास्थानी किंवा तुळशी वृंदावनाभोवती वसुधारा ऐपन काढली जाते. तसेच स्वस्तिक, अष्टदलकमल, लक्ष्मीची पावले, विवाहप्रसंगी काढली जाणारी ऐपन, मुंजीसाठी काढली जाणारी ऐपन, बारशासाठी नामकरण चौकी आदी ऐपन काढल्या जातात.
 
 
संथालांची अल्पना
 
वारली, गोंड, प्रधान, कातकरी, संथाल आणि इतरही जनजातींमध्ये घरातील जन्म, लग्न आणि मृत्यू अशा विशिष्ट कार्यांसाठी विशिष्ट रांगोळी काढली जाते. कधी चौक म्हणजे चौकोनी रचना, तर कधी मंडल म्हणजे वर्तुळाकार रचना वगैरे रेखल्या जातात. ह्या रांगोळ्या हळद आणि गुलालाने रंगवल्या जातात.
 
 
जैन रांगोळी
 
जैनांमध्ये चैतीवंदना पूजेचा भाग म्हणून स्त्रिया विविध गहुली काढतात. जिना प्रतिमेसमोर ठेवलेल्या लाकडी स्टूलवर तांदूळ घालून त्यावर बनवले जातात. गहुली चिन्हांमध्ये प्रामुख्याने स्वस्तिक आणि स्वस्तिकसारखी इतर चिन्हे काढतात. नंद्यावर्त स्वस्तिक हे स्वस्तिकाचे विस्तृत आणि विस्तारित रूप आहे. नामजप करत गहुली काढली जाते. विधी पूर्ण झाल्यावर गहुली विखुरली जाते आणि तांदळाचे दाणे गोळा करून एका पेटीत ठेवले जातात.
 Rangoli 
 
पारसी चॉक
 
700 वर्षांपूर्वी पारसी (पर्शियन) लोक येथे स्थायिक झाले. येथील काही रिती त्यांनी आत्मसात केल्या, त्यापैकी एक रांगोळी आहे. पारशी लोक आपल्या दारासमोर चॉक काढतात. चॉक काढण्यासाठी टिनच्या साच्यात ठेवलेल्या खडूच्या पुडीचा शिक्का मारला जातो. पांढर्‍या डिझाइनवर छिद्रे असलेल्या लहान टिन डबीमधून रंग शिंपडला जातो. खडूचे चूर्ण अतिशय बारीक, मऊ आणि गुळगुळीत असते. त्यामधून बारीक आणि स्पष्ट डिझाइन तयार केले जाते.
 
बौद्ध रांगोळी


 Rangoli
 
तिबेट, लदाखमधील बौद्ध भिक्षू तांत्रिक उपासनेचा एक भाग म्हणून रंगीत वाळूने मंडल चित्रे रेखाटतात. मंडल हे जगाच्या स्वरूपाचे प्रातिनिधिक चित्र असते. चार-पाच भिक्षू मिळून एक मोठे मंडल तयार करतात. ह्या किचकट कामाला काही आठवडेही लागू शकतात. त्यातील सुंदर रंग आणि रंगसंगती मन वेधून घेते. मंडल पूर्ण झाले की एक प्रार्थना म्हणून ती रांगोळी पुसून टाकतात.
 
संस्कार भारती रांगोळी
 
गेल्या काही दशकांत संस्कार भारती समूहाने महाराष्ट्रातील रांगोळी कलेचे पुनरुज्जीवन करण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. 1954 साली लखनौमध्ये उगम पावलेला हा समूह भारतीय परंपरेच्या आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. कला हा संस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू असल्याने पारंपरिक कलांचे संवर्धन गरजेचे आहे. पारंपरिक रांगोळी त्यांनी घराबाहेर आणली. त्यामुळे साहजिकच रांगोळी काढण्याचा हेतू, तंत्र, आकार आणि शैली बदलली.
 
 
रांगोळी - एक अलंकार
 
भारतीय विचारानुसार अलंकाराने सौंदर्य प्राप्त होते. अनुप्रास, यमक, श्लेष, उपमा, रूपके इत्यादीने जसे काव्य सजते; हार, माला, कुंडल, मेखला आदी अलंकारांनी जशी स्त्री सजते, तसे रांगोळीने घर, देवालय आदी निवासस्थाने सजतात. रांगोळीने सजलेले घर घराचे सौंदर्य वाढवते. घरातील स्त्रीचे घराकडे, अंगणाकडे लक्ष असल्याचे द्योतक असते. रांगोळी असलेल्या घराची गृहिणी घराची स्वच्छता, शुचिता आणि मांगल्य सांभाळत असल्याचे सूचित करते. म्हणून रांगोळी हा केवळ घराचा नाही, तर गृहिणीचासुद्धा अलंकार आहे, असे वाटते.
 
 
अलंकाररहित स्त्री जशी शोकात बुडालेली समजली जाते, तसे शोकात बुडालेले घर रांगोळीरहित असते. घरात मृत्यू झाल्यास 14 दिवस रांगोळी काढली जात नाही. पारसी लोकांमध्येसुद्धा ही प्रथा पाळली जाते. त्यामुळे रांगोळी नसलेल्या घरात प्रवेश करताना सौम्यपणे, शांतपणे, गंभीरपणे प्रवेश करावा, हे तिचे नसणे सुचवते.
 
 
अलंकाराला रक्षाभूषण असेही म्हटले जाते. अंगणातील रांगोळी घराची शोभा तर वाढवतेच, तसेच घराचे रक्षणदेखील करते. लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी पर्णकुटीभोवती आखलेली रेघ रांगोळीची रक्षक रेघ होती, असे समजले जाते. दारात आलेला कोणी दु:खी अंत:करणाने किंवा संतापाने घरात आला, तर क्षणभर तो रांगोळीपुढे थबकतो. ती रांगोळी एक क्षणभर शांतता देते. तो किंचित विराम त्या व्यक्तीचा रागाची तीव्रता कमी करतो. त्याच्या संतापापासून रांगोळी घराचे रक्षण करते.
 
रांगोळी - फलश्रुती
 
रांगोळी काढून काय फायदा आहे? कशाला काढायची? कोणी संगितलीये ही घर सजवण्याची हौस? ही रोजची कटकट करण्यापेक्षा सरळ रांगोळीचे स्टिकर आणून चिकटवले तर? वगैरे प्रश्न मनात ज्यांच्या मनात आले असतील, त्यांच्यासाठी ही फलश्रुती ...
 
विष्णुधरमोत्तर पुराण सांगते - सर्व कलांमध्ये चित्रकला श्रेष्ठ आहे. चित्र काढल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे फळ मिळते. दररोज रांगोळी काढणे स्त्रीला चारही पुरुषार्थांचे फळ प्राप्त करून देते.
 
 
अंगण स्वच्छ करून एकदा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि एकदा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी रांगोळी काढायची प्रथा आहे. सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला केल्या जाणार्‍या अग्निहोत्रासारखा, सकाळ-संध्याकाळ रांगोळी काढणे हा सूर्यपूजेचा एक प्रकार मानला गेला आहे. रांगोळी अग्निहोत्र केल्याचे फळ देते. संध्याकाळी अंगणात रांगोळी काढून, रांगोळीवर एक दिवा लावला की गडद अंधार होण्याच्या आधी प्रकाशाची सोय केली जाते. हा प्रकाश केवळ अंगणातच पडत नाही, तर मनातही पडतो. सूर्यास्तानंतर मनात दाटणारी हुरहुर तो दूर करतो.
 
 
संध्याकाळी अंगणात काढलेली रांगोळी लक्ष्मीचे स्वागत करते, अशीदेखील कल्पना आहे. लक्ष्मी म्हणजे उत्साह, आनंद, आळस झटकून काहीतरी कामाला लागणे. संध्याकाळच्या उदास वेळेला रांगोळी काढल्याने संधिकालची उद्विग्नता मनाला शिवत नाही. दिवसाचा उत्साह अंधार पडल्यावरही टिकवून ठेवते.
 
 
अंगणात काढलेली रेखाचित्रे दिवसभरात कधी पक्षी खाऊन जातात, कधी त्यावरून कोणी चालत जाते, कधी ती पावसाच्या एका सरीने वाहून जातात, कधी वार्‍याने उडून जातात आणि ह्यापैकी काहीच झाले नाही, तर दुसर्‍या दिवशी सकाळी रांगोळी काढणारी स्त्री केर काढताना स्वत:च ती रांगोळी पुसून टाकते! ही क्षणिक चित्रे, जग अशाश्वत असल्याची आठवण करून देतात. पण त्याबरोबरच दुसर्‍या दिवशी नवीन रेखलेली रांगोळी नवांकुराचा आनंद देते. नवनिर्मितीचा आनंद देते.
 
 
रांगोळी काढताना गुडघे मुडपून बसावे लागते, थोडे ताण देऊन वाकावे लागते, दोन्ही बाजूंना वळावे लागते. हे करताना सहजच मलासन, उत्कटासन, वज्रासन, उत्तनासन यासारखी योगासने आपोआप होतात. सकाळी उठून अशी आसने केल्याने पचनसंस्था सुधारते, रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीराची लवचीकता वाढते.
 
 
रांगोळी काढताना ती लक्ष देऊन एकाग्र चित्ताने काढावी लागते. त्यादरम्यान कोणाशी न बोलता रांगोळी काढली जाते. मन, बुद्धी आणि शरीर एकत्र आल्याशिवाय रांगोळी होत नाही. तेवढ्या दहा-वीस मिनिटांसाठी एकाच गोष्टीवर लक्ष द्यावे लागल्याने अष्टांग योगातील धारणेचे फळ मिळते. मौन धरून, एकचित्ताने रांगोळी काढल्याने मन:शांती मिळते.
 
 
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ईीं ढहशीरिूचा वापर केला जातो. त्यामध्ये गायन, नृत्य आदी कलांचा बरोबरच चित्रकलेचा समावेश आहे. बोटांनी चित्र काढणे, पेन्सिलने चित्र काढणे, रंगवणे आदी गोष्टी केल्याने मन:शांती मिळते, सर्जनशीलता वाढते, अंतर्दृष्टी मिळते, कौशल्य वाढते असे वैज्ञानिक संशोधन सांगते. कलेची निर्मिती आत्म-जागरूकता विकसित करण्यास, तणावाचा सामना करण्यास आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी मदत करते. वृद्धत्वाशी संबंधित समस्या, चिंता, नैराश्य, खाण्याच्या तक्रारी, इतर ताणतणाव इत्यादी समस्यांच्या बाबतीत आर्ट थेरपी उपयुक्त ठरली आहे. तसे रजोनिवृत्तीबरोबर येणार्‍या समस्यांवरदेखील आर्ट थेरपीचा उपयोग फायदेशीर ठरला आहे. रांगोळी काढणे ही एक आर्ट थेरपीच आहे. मन:शांती देणारी आणि मन:स्वास्थ्य देणारी.
 
 
तर्जनी आणि अंगठ्याच्या चिमटीने रांगोळीची रेघ काढली जाते. ती ज्ञानमुद्रा होत असल्याने अनायासे त्याचेही फळ मिळते. ज्ञानमुद्रा मानसिक आजारावर प्रभावी आहे, आनंद देणारी आहे, बुद्धीचा विकास करणारी आहे आणि स्मरणशक्ती वाढवणारी आहे. एक रांगोळी काढल्याने स्त्रीला हे सर्व फायदे मिळतात. उगीच नाही ती पिढ्यानपिढ्या सकाळी लवकर उठून, सडा घालून रांगोळी काढत!
 
 
उद्या पहाटे, घर अजून झोपले असताना, कोणी कविता नेहमीप्रमाणे लवकर उठेल. ही वेळ तिची एकटीची असते. फ्लॅटसमोरच्या जागेचा केर काढेल. ओल्या फडक्याने पुसून घेईल. मग लक्ष देऊन पांढर्‍या रंगाने दारात एक नाजूकशी, नक्षीदार रांगोळी काढेल. शांत चित्ताने तीमध्ये एखादा रंग भरेल वा केवळ हळदी-कुंकू वाहील. ती पूर्ण झाल्यावर आपल्या निर्मितीकडे तृप्त नजरेने डोळेभरून पाहील आणि मग तिचा दिवस सुरू होईल..

संदर्भ

1. Ephemeral floor art of India - History tradition and continuity - Nayana Tadvalkar
2. भारतातील विविध रांगोळ्या - मैत्रेयी जोशी
 
3. What Is Art Therapy? By Kendra Cherry
 
4. How an Ancient Indian Art Utilizes Mathematics, Mythology, and Rice - Computer scientists have studied these pictorial prayers. BY Rohini Chaki

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com