प्रतापगडचा रणसंग्राम : अफजलखान वध

भाग दुसरा : शिवरायांची युद्धनिती (पूर्वार्ध) लेखांक : 6

विवेक मराठी    04-Oct-2023   
Total Views |
vivek
प्रतापगडचे युद्ध हे शिवचरित्रातील अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. या युद्धाची पूर्वपिठीका, त्याचे नियोजन आणि व्याप्ती, त्याचे परिणाम या बाबींचा विचार करता ह्या प्रकरणाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागात हे युद्ध आपण समजून घेणार आहोत.
 
एका बाजूला शिवरायांनी केलेला फत्तेखानाचा पराभव आणि दुसर्‍या बाजूला बंगळूरला संभाजीराजांनी फर्रादखानाचा केलेला पराभव या दोन्ही घटनांनी आदिलशहा चिडला. शिवरायांनीही शहाजीराजांच्या सुटकेसाठी मुघली शहजादा मुरादबक्ष याच्याशी संधान बांधून आदिलशहावर दडपण आणले. शेवटी 16 मे 1649 ने आदिलशहाने बंगळूर, कंदर्पी व कोंढाणा किल्ला देण्याच्या अटीवर शहाजीराजांची सुटका केली. परंतु शिवरायांना पायबंद घालण्यासाठी अफजलखानाची 1649च्या जून महिन्यात वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली.
 
 
बिकट परिस्थिती पाहून महाराजांनी मोठ्या मोहीमा करण्याऐवजी सावध पवित्रा घेण्याचे ठरवले. 1649 ते 1652 हा कालावधी राजे आणि आदिलशहा यांच्यातील शांतता कालावधी ठरला.
 
 
1647 मध्ये स्वराज्य बळकट करण्यासाठी महाराजांनी जावळीचे राजकारण साधले होते. जावळीचा चंद्रराव दौलतराव मोरे मरण पावल्यावर त्याच्या आईने शिवथरच्या कृष्णाजी बाजीला दत्तक घेऊन चंद्रराव केला त्यासाठी शिवरायांनी सहकार्य केले. परंतु अफजलखान वाईला आल्यावर त्याने हा दत्तक चंद्रराव नामंजूर केला. दरम्यान शहाजीराजांचे निष्ठावंत कान्होजी जेधे आणि दादोजी लोहकरे या दोघांना महाराजांच्या सेवेसाठी मावळात पाठवले. कान्होजींचा मावळात दबदबा होता. अफजलखानाने कान्होजींना मराठयांचा पाडाव करण्यासाठी हुकूम दिला . कान्होजींनी शिवरायांच्या सल्ल्यानुसार अटींची बोलणी करत वेळकाढू धोरण केले.
 
 
शिवरायांना थोडी उसंत मिळाल्यामुळे त्यांनी किल्ल्यांची दुरुस्ती, सैन्यभरती अशी राज्यबंधार्‍यांची कामे हाती घेतली. परंतु ह्याच काळात आदिलशहा आणि मुघल यांच्यातला परस्परांतील आणि दरबारी संघर्ष उफाळून आला. मुघल बादशहा शहाजहानने दख्खनचा सुभेदार असलेल्या औरंगजेबाला आदिलशाही समूळ नष्ट करण्याचे, न जमल्यास तह मोडून निजामशाहीचा आदिलशहाला दिलेला सर्व मुलुख घेण्यासाठी आदेश दिले. याच सुमारास मुहम्मद आदिलशहा आजारी पडला. आदिलशाहीसाठी सर्व बाजूनी संकटे उभी ठाकली त्यामुळे अफजलखानाला परत बोलावण्यात आले(1655). 4 नोव्हेंबर 1656 ला मुहम्मद आदिलशहा मरण पावला आणि त्याची पत्नी ताज-उल-मुखद्दिरात बिन उल्लिया जनाब अर्थात बडी बेगम हिने आपल्या सावत्र मुलाला अली आदिलशहाला गादीवर बसवले व खवासखानाच्या मदतीने कारभार करू लागली.
 
 
1657ला मुघल आणि आदिलशाहीत युद्ध सुरु झाले. परिस्थितीचा फायदा घेत 1656 ते 1658 या कालावधीत शिवरायांनी आदिलशाह आणि मुघलांच्या मुलखात धुमाकूळ घालायला सुरूवात केली. चंद्ररावावर आक्रमण कसन जावळी काबीज केली. रायरी घेऊन ’रायगड’ या स्वराज्याच्या नव्या राजधानीचा संकल्प सोडला. प्रतापगड बांधून घेतला. आपले सावत्र मामा मोहिते यांच्याकडून सुपे परगणा ताब्यात घेतला. रघुनाथ अत्रेंनी कोकणात दाभोळ घेतले. कोंढाणा घेतला. कल्याण, भिवंडी घेऊन दुर्गाडी किल्ला बांधत स्वराज्याच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. 23 एप्रिल 1657 ला औरंगजेबाची मर्जी संपादन करण्याचे पत्र धाडले तर फक्त सात दिवसांनी मुघलांचे जुन्नर शहर लुटले. औरंगजेबाने चिडून कारतलबखान, होशेदाखान, शाहिस्तेखान, मुल्ताफाखान असे अनेक सरदार शिवरायांचा बिमोड करण्यासाठी पाठवले. शिवरायांच्या मुलखातील पुणे, चाकण अशी सर्व ठाणी आणि गावे बेचिराख करून लोकांना ठार करा असे कडक हुकूम त्याने या सरदारांना सोडले.
 
 
महाराजांनी रघुनाथपंत कोरडेंना औरंगजेबाकडे पाठवून रदबदली केली.
 
 
1657 मध्येच दिल्लीचा मुघली तख्तासाठी सत्तासंघर्ष सुरु झाला. शहाजहान बादशाह वृद्ध झाल्यामुळे दारा शुकोहने आपल्या हाती कारभार घेतला आणि आदिलशहाशी तह केला. औरंगजेबाने राजांना माफी दिली पण आदिलशाहाला शिवाजीराजांना संपविण्याचा कानमंत्र देऊन सत्तासंघर्षासाठी तो स्वतः उत्तरेकडे निघाला.
 
ही सारी धामधूम संपताच आता आदिलशहाने संपूर्ण लक्ष शिवरायांवर केंद्रीत केले.
 
प्रतापगड :
 
महाबळेश्वराच्या पश्चिमेकडील रांगेवर भोरप्या डोंगर होता. 1656 मध्ये जावळी घेतल्यावर शिवरायांनी या डोंगरावर नवा किल्ला बांधण्यास मोरोपंत पिंगळ्यांना सांगितले. मोरोपंतांनी दोन वर्षात किल्ला बांधून घेतला. नाव ठेवले प्रतापगड. प्रतापगडाचे भौगोलिक स्थान महत्वाचे. जावळीच्या दुर्गम अरण्याने वेढलेला. घाट माथ्यावर आणि खाली कोकण. आजूबाजूला जोर, शिवथर, जांभूळ, कांदाट अशी खोरी. पारघाट, रडतोंडी घाट, कोंडेनळी घाट, ढवळा घाट, हातलोट घाट असे एकापेक्षा एक कठीण घाट आणि रापरी, मकरंदगड, चंद्रगड, सोनगड, चांभारगड अशा किल्ल्यांची माळ. अफजलखानच्या युद्धात प्रतापगडाच्या ह्या दुर्गमतेचा आणि भौगोलिक सामर्थ्यांचा मोठा वाटा होता.
 
मुघलांचं संकट गेल्यावर आदिलशहाने शिवरायांचा काटा काढायचे ठरवले. शिवरायांना नष्ट करण्यासाठी मोठी असामी लागणार हे बड्या बेगमेच्या लक्षात आले. तिच्या डोळ्यासमोर एकच नाव आले - अफजलखान.
 
 
अफजलखान :
 
अफजलखान हा शहाजी भोसले कुटुंबीयांचा पक्का वैरी होता. शहाजीराजांना कैद करण्यात व शिवरायांचे वडिलबंधु संभाजीराजे ह्यांना दगाबाजीने मारण्यात तो पुढे होता. वाई प्रांताचा तो सहा वर्षे सुभेदार होता. सव्वा-साडे सहा फूटाचा धिप्पाड देह. अत्यंत लहान कुटुंबातून येऊनही तो विजापूर दरबारातील नव्हे तर अवघ्या दख्खनमधला नामांकित सरदारपदाला पोचला होता. प्रचंड मुत्सुद्दी, क्रूर, कपटी, पराक्रमी व साहसी असलेला अफजलखान उत्कृष्ट प्रशासक होता. प्रजेवर जुलुम करणे त्याच्या स्वभावात नव्हते. एका पत्रात तो लिहितो, ’रयत आमचे पोंगडे (मित्र) आहेत. पण तो कमालीचा धर्मवेडा होता. तो स्वतःला ‘कातिले मूतमर्रिदान व काफरान, सिकंदए बुनियादे बुतान, दीन दार क्रुफ्रशिकन् आणि दीन दार बुतशिकन’ अशी बिरुदे लावी. मूर्तीविध्वंसक, काफिरांचा कर्दनकाळ, धर्मसंरक्षक असं म्हणवून घेणारा अफजलखान कट्टर इस्लामी धर्मनिष्ठ होता. स्वसामर्थ्यावरचा आत्मविश्वास आणि स्वतः बाबत असलेला अहंकार त्याच्या शिक्क्यातून दिसतो...
 
गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल
 
अझ हर मुल्की बजाए तसबीह, आवाझ आयद अफजल अफजल
 
(उच्च स्वर्गाची जर कुणी इच्छा केली तर सर्वोत्तम माणसातील उत्तमोत्तम गुण आणि अफजलखान याची तुलना करताना जपमाळेच्या प्रत्येक माळेतून अफजल अफजल असा आवाज येईल. थोडक्यात, अफजलखान हाच सर्वात महान योग्यता असलेला माणूस आहे.)
 
1638 ते 1643 कालावधीत अफजलखान रणदुल्लाखानाच्या हाताखाली कर्नाटक मोहिमेत असताना त्यांनी सर्व राजांना सळो की पळो करून सोडले होते. श्रीरंगपट्टण, बसवापट्टण, कर्णपूरम, चिकनायकन्हळ्ळी, बेदनूर अशा सर्व राज्यांना त्याने आदिलशहाचे मांडलिक बनवले होते. केवळ अफजलखान येतोय हे कळताच बंडखोर सिद्दी अंबर हात बांधून त्याला सामोरा गेला होता. शिरेपट्टणच्या कस्तुरीरंगाला तहासाठी अभय देऊन बोलवत ठार मारले होते. 1657 मध्ये औरंगजेबाने आदिलशहाविरुद्ध युद्ध पुकारले त्यावेळी एके ठिकाणी अफजलखानाने औरंगजेबाची अशी कोंडी केली की तो कैदच व्हायचा, मात्र खान महंमदाशी बोलणे लावून तो सहिसलामत सुटला. याचा अफजलखानाला एवढा राग आला की त्याने बड्या बेगमेचे कान भरून खान महंमदाला विजापूरात शिरतानाच ठार मारले. एक मात्र नक्की, करड्या शिस्तीचा अफजलखान विजापूर तख्ताशी पूर्णपणे एकनिष्ठ होता.
 
 
असा अफजलखान शिवरायांचा समूळ नाश करणार हा विजापूर दरबारचा विश्वास होता. बड्या बेगमेने त्याचा सत्कार करून त्याला तुरा, शिरपाव, घोडा, खिलत, रत्नजडीत कट्यार, मानाची तलवार देऊन मोठा खजिना दिला. शिवासोबत गोड बोलून त्याला पकडून त्याचा नाश करावा, तो शरण येईल, क्षमायाचना करेल, खोटी सोंगे आणेल, त्याला भरीस न पडता त्याला ठार करावे असा बहुमोलाचा सल्ला आदिलशहाने खानाला दिला. चढे घोडियानिशी सीवाला जिवंत कैद करून घेऊन येतो असे वचन खानाने दिले.
 
 
शिवाजी ही काय चीज आहे याचेही अफजलखानाला पूर्ण ज्ञान होते. त्याने स्वारीसाठी मोठी तयारी केली. आपले विश्वासातले सरदार सोबत घेतले. आपला मोठा मुलगा फाजलखान, त्याबरोबर अंकुशखान, याकूतखान, अंबरखान, मुसेखान, सिद्दी हिलाल, अब्दुल सैय्यद, हसनखान, रहीमखान, सय्यद बंडा, वहीदखान, नाईकजी पांढरे, बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, कल्याणजी यादव, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, झुंझारराव घाटगे, शंकराजी मोहिते, जिवाजी देवकाते असे एकाहून एक शिवरायांचे व शहाजीराजांचे हाडवैरी अफजलखानाने बरोबर घेतले. सुमारे वीस-बावीस हजाराचे सैन्य घेऊन खान निघाला. त्यात नुसते घोडदळच बारा हजाराचे होते. बाराशे उंट, पाउणशेहून अधिक हत्ती, चारशे लहान तोफा, नव्वद-एक मोठ्या तोफा, त्यासाठी पाच हजार खलाशी, बाजारबुणगे, गुलाम, नोकर असा भरगच्च सेनासागर अफजलखानाने सोबत घेतला. खजिना तर इतका की जवळजवळ तीन वर्षाची बेगमी होती.
  
 
विजापूरात अफजलखान आपल्या अवलिया गुरुचे आशीर्वाद घ्यायला गेला. त्याने खान यशस्वी होणार नाही असे भाकितच वर्तवले. खानाला चिंतेने ग्रासले. त्याने काही दिवस आपल्या जनानखान्यात घालवले आणि शेवटी त्या सर्व स्त्रियांना मारून त्यांच्या कबरी बांधल्या. अफजलपूर गावी आजही ह्या स्त्रियांच्या 63 कबरी दिसतात. त्यातून खानाचे क्रौर्य दिसतेच पण वरवर अहंकारी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या त्याच्या मनांत अकल्पिताचे भयही दिसून येते.
 
 
1659 च्या एप्रिल महिन्यात अफजलखानाने विजापूर सोडले आणि तोरवे गावच्या पहिल्याच मुक्कामी झेंड्याचा फत्तेलष्कर हा हत्ती मृत्यू पावला. ही बातमी कळताच आदिलशहाने स्वत:चा बिनिचा हत्ती अफजलखानाकडे पाठवून दिला.
 
 
अफजलखानासारखा अनुभवी, क्रूर, कपटी आणि हिंदुस्थानात नाव कमावलेला सेनाधुरंधर शिवरायांच्या स्वराज्याला गिळंकृत करण्यासाठी चालून येत होता. आता कसोटी लागणार होती महाराजांच्या युक्तीची, शक्तीची आणि ईश्वरी भक्तीची पण त्याहून कितीतरी अधिक अंतर्भूत योद्ध्याची!
विजापूरबाहेरील तोरवे गावावरून अफजलखान अखेरीस मे 1659मध्ये निघून बहुधा जूनअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वाईला पोहोचला. 12 जुलै 1659ला शिवाजी महाराज जावळीत आले, असा जेधे शकावलीत उल्लेख आहे, म्हणजे अफजलखान त्यापूर्वी वाईत आला असला पाहिजे.
अफजलखानाची स्वारी
सभासद बखर आणि अज्ञानदासाचा पोवाडा विजापुराहून अफजलखान थेट तुळजापुरावर चालून गेला आणि भोसल्यांचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीदेवीची मूर्ती फोडली, असे सांगतात. शिवकाव्य, शिवभारत, एक्क्याण्णव कलमी बखरसुद्धा खानाने देवीचा अपमान केल्याचे नोंदवतात. पण काळाची नोंद नाही. खानाने पंढरपुरावरसुद्धा स्वारी केली, असे अज्ञानदास व सभासद सांगताश्र. खानाने पालीचा खंडोबा, शिखर शिंगणापूरचा महादेव, औंधची यमाई यांना उपद्रव केल्याचेही इतर उल्लेख येतात. अफजलखानाची बुत्शिकन कृत्ये पाहता कदाचित या दोन्ही देवस्थानांना त्याने याआधी उपद्रव दिलेला असू शकतो. तरीही अफजलखानाने वाटेतल्या हिंदू मंदिरांचे अपमान केले हे नक्की, कारण शिवराय हिंदू होते. त्यांच्या व सैन्याच्या श्रद्धास्थानांचा अपमान करून त्यांना डिवचणे आणि त्यांचा आत्मविश्वास डळमळीत करणे हा विचार त्याच्या मनात होता.

 
परंतु अफजलखान वाईला येण्याचे मुख्य कारण होते, ते म्हणजे शिवरायांनी केलेल्या जावळीच्या चंद्ररावांचा पाडाव. वाई प्रांत अफजलखानाला मोकासा मिळालेला होता. पळून गेलेला चंद्ररावाचा भाऊ प्रतापराव मोरे विजापूरला सामील झाला होता. त्याच्या मनात जावळीच्या गादीवर बसण्याची अभिलाषा होती व त्यासाठी त्याने आदिलशहाकडे प्रयत्न केले होते. त्याला जावळी देण्यासाठी व शिवरायांनी बळकावलेला वाईचा प्रांत ताब्यात घेण्यासाठी मुख्यत्वे अफजलखान वाईत आला.
 
 
अफजलखानाला सामील व्हा आणि शिवरायांना धुळीस मिळवा अशा आशयाची फर्माने आदिलशहाने मावळातील सर्व देशमुखांना, वतनदारांना पाठवली होती. उत्रवळीच्या केदारजी खोपडेसारखे काही देशमुख तत्काळ अफजलखानाच्या फौजेत सामीलही झाले. असेच एक फर्मान भोर तरफेच्या कारीच्या कान्होजी जेध्यांनासुद्धा आले. कान्होजी आणि शहाजीराजे यांचा घरोबा होता. अतिशय विश्वासाने शहाजीराजांनी कान्होजींना बेलरोटीच्या शपथा वाहून शिवरायांकडे पाठवले होते. पण आता प्रसंग बाका होता. जेध्यांचे पिढ्यान्पिढ्यांचे वतन आणि मावळ मुलखातला मान दावणीला लागला होता. कान्होजी आपल्या मुलांसह शिवरायांकडे गेले. राजांनी फर्मान वाचून कान्होजींना ‘वतनासाठी खानाला सामील व्हा’ असा सल्ला दिला. पण कान्होजी जेध्यांनी आपल्या निष्ठा वाहात महाराजांच्या पायी वतनावर पाणी सोडले. खानाचे संकट मोठे होते, तरीही न डगमगता राजांबरोबर असलेल्या जेधे, बांदल अशा देशमुखांनी आपले इमान कायम राखले.
 
 
प्रतिस्पर्ध्यावर मानसिक दडपण आणून त्याचा आत्मविश्वास खच्ची करावा, ही युद्धाची मुख्य नीती. अनेक लढायांचा अनुभव असलेल्या अफजलखानाने शिवाजी महाराजांवर चौफेर दबाव आणायला सुरुवात केली. शिवरायांनी जिंकलेला मुलूख ताब्यात घेण्यासाठी, तिथे दहशत पसरवण्यासाठी आपले सरदार पाठवले.
 
 
शिवरायांचे मामा संभाजी मोहिते ह्यांच्याकडून शिवरायांनी सुपे प्रांत ताब्यात घेतला होता, तो घेण्यासाठी खानाने जाधवांना पाठवले. शिरवळ ठाणे मिळवण्यासाठी पांढर्‍यांना, पुणे प्रांतात सिद्दी हिलालला, तर खराडे यांना सासवडकडे धाडले. अफजलखानाला सामील असलेल्या जंजिर्‍याच्या सिद्दी सभे उर्फ सैफ याने परिस्थितीचा फायदा घेत तळकोकणात हल्ले केले.
 
 
एकंदरीत चहूबाजूंनी स्वराज्याच्या मुलखावर हल्ला करीत तो उद्ध्वस्त करण्याचे राजकारण अफजलखान करू पाहत होता, जेणेकरून शिवराय शरणागती पत्करतील व स्वत:होऊन तहाला सामोरे येतील. शिवरायांनीसुद्धा सरनौबत नेतोजी पालकरांना विजापूरच्या दिशेने आदिलशाही मुलखात धुमाकूळ घालायला सांगितले. पावसाळा संपेपर्यंत महाराजांनी जावळीत प्रतापगडावरच थांबायचे ठरवले होते. त्यांना अफजलखानाला जावळीत खेचायचे होते. अफजलखान मोकासा म्हणून लाभलेल्या वाईचा सहा वर्षे सुभेदार होता. जावळीच्या प्रांताची अफजलखानाला नीट माहिती होती. आपले विशाल सैन्य वाईपासून जावळीच्या जंगलात, घाटाघाटातून, डोंगराळ भागात घुसवणे, प्रतापगडाला वेढा घालणे हे कठीण होते आणि म्हणूनच तिथे युद्ध करणे तो टाळू पाहत होता. त्याला शिवरायांना हात बांधून वाईला येण्यासाठी भाग पाडायचे होते. त्यासाठीच त्याचे सर्व प्रयत्न सुरू होते.
 
वाटाघाटी
 
युद्धशास्त्राचा मुख्य भाग असतो तो प्रतिस्पर्ध्याचे डावपेच ओळखणे, त्याला न फसणे व स्वत:च्या योजनांबरहुकूम त्याला हालचाली करायला भाग पाडणे. महाराज नेमके तेच साधत होते. शेवटी त्यांना हवे तसेच घडले. पावसाळा संपल्यावर अफजलखानाने ऑक्टोबर महिन्यात स्वत:होऊन शिवाजी महाराजांकडे वाटाघाटी करण्यास सुरुवात केली. वाई परगण्याचा हवालदार कृष्णाजी भास्कर याला हेजीब म्हणजे वकील म्हणून शिवरायांकडे पाठवला. परमानंदांच्या शिवभारतात खानाने वकिलाकरवी शिवरायांना खरमरीत पत्र पाठवले, त्याचा मसुदा दिला आहे -

 
‘आपण आजकाल पावलोपावली जो उद्धटपणा करीत आहा तो आदिलशाहाच्या अंत:करणात शल्यासारखा बोचत आहे. निजामशाह विलयाला गेल्यावर आदिलशाहाने त्याचा मुलूख हस्तगत केलेला होता. तह करण्याच्या इच्छेने त्याने तो ताम्रांना (म्हणजे मुघलांना) दिला. तो हा त्यांचा गिरिदुर्गांनी व्याप्त मुलूख, हे शाहजी राजाच्या पुत्रा, तू आपल्या ताब्यात आणला आहेस. तेथे सतत भाग्यशाली अशा तुम्ही राजपुरीच्या धन्याचा - म्हणजे सिद्दीचा मुलूख काबीज केल्यामुळे तो कोंडीत सापडून क्रुद्ध झाला आहे. शत्रूंना अगदी अजिंक्य अशा चंद्ररावाच्या या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून व पराक्रम करून तुम्ही ते बलाने काबीज केलेत. कल्याण आणि भिवंडीसुद्धा घेऊन तू यवनांच्या मशिदी पाडल्यास. ज्यांचे सर्वस्वच हरण करून तू ज्यांची विटंबना केलीस, ते यवनरूपी सर्प अद्याप तुझ्यावर रागावलेले आहेत. तू आपल्या बळाचा विचार न करता यवनाचार्यांना म्हणजे काजी-मुल्लांना कैद करून निर्भयपणे अविंधाचा (म्हणजे मुसलमान धर्माचा) मार्ग अडवला आहेस. तू निर्भयपणे स्वत:च चक्रवर्तिपदाची चिन्हे धारण करीत आहेस, अनीतीने तू सुवर्णासनावर बसत आहेस, स्वत:च मनुष्यांचा निग्रहानुग्रह करीत आहेस, स्वतंत्र होऊन वंदनीयांना वंदन करीत नाहीस, दुर्निवार होऊन लुंग्यामुंग्यांना भीत नाहीस म्हणून प्रतापी आदिलशाहाने मला तुझ्याविरुद्ध पाठविले आहे. आदिलशाहाच्या आज्ञेवरून माझ्याबरोबर आलेले हे सहा प्रकारचे सैन्य मला ताबडतोब उद्युक्त करीत आहे. तुझ्याशी युद्ध करण्यास उत्सुक असलेले व जावळी काबीज करू इच्छिणारे हे मुसाखान इत्यादी सरदार मला या कामी प्रोत्साहन देत आहेत. तेव्हा, हे राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सर्व किल्ले व मुलूखही देऊन टाक. सिंहगड व लोहगड हे मोठे किल्ले, प्रबळगड, पुरंदर, चाकण, नगरी, आणि भीमा व नीरा यांच्या मधला प्रदेश महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशाहास शरण जाऊन लवकर देऊन टाक. जी तू चंद्राकडून जबरदस्तीने हिसकावून घेतलीस ती ही जावळीदेखील अली आदिलशाह तुझ्याकडून मागत आहे.’ मूळ पत्र उपलब्ध नसले, तरी शिवभारतात सांगितलेले हे पत्र महाराजांना आले व त्यातील मजकूर काहीसा असाच असेल.
 
खानाचा धमकीवजा निरोप मिळाल्यावर महाराजांनी त्याच्या वकिलाचा योग्य तो सन्मान करीत त्यांना परत पाठवले. महाराजांनी लढाईची पूर्ण तयारी केली आहे, हे खानाला कळले होते. खानाकडे बोलणी करायला मात्र महाराजांनी एका अतिशय चाणाक्ष, अनुभवी आणि निष्ठावंत वकिलाची नेमणूक केली. गोपीनाथपंत बोकील किंवा पंताजी गोपीनाथ हे त्यांचे नाव. महाराजांनी पंताजींबरोबर पत्र पाठवले -

‘ज्याने कर्नाटकातील सर्व राजे युद्धामध्ये पराभूत केले, अशा तुम्ही आज माझ्यावर एवढी तरी दया दाखविलीत, हे फार चांगले केलेत. आपले बाहुबळ अतुल आहे. आपले सामर्थ्य अग्नितुल्य आहे. आपण पृथ्वीला अलंकृत केले असून आपल्या ठिकाणी मुळीच कपट नाही. जर हे वनवैभव पहाण्याची तुमची इच्छा असेल, तर आपण ह्या जावळीला येऊन ते पहावे. आपण इकडे येणे हेच सांप्रत योग्य आहे असे मला वाटते. त्यामुळेच मला निर्भयता प्राप्त होऊन माझे वैभवही वाढेल. अत्यंत पराक्रमी अशा तुमच्यावाचून उन्मत्त ताम्रांचे म्हणजे मुघलांचे सैन्य, त्याचप्रमाणे आदिलशाहाचे सैन्य कस्पटासमान आहे असे मला वाटते. आपण मार्गाने दक्षपणे यावे. आपण मागत आहात ते किल्ले आणि ही जावळीदेखील मी आपल्याला देतो. ज्याच्याकडे दृष्टी फेकणे कठीण आहे अशा आपल्याला नि:शंक मनाने पाहून ही माझ्या हातातली तलवार मी आपल्यापुढे ठेवीन. हे जुनाट व अफाट अरण्य पहात असता आपले सैन्य पाताळाच्या छायेचे सुख अनुभवील.’

 
खानाच्या आत्मविश्वासाचे रूपांतर फाजील अहंकारात करण्याचा आणि वरवर आपण घाबरून शरण येत आहोत हा भ्रम निर्माण करण्याचा राजांचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि खान जावळीत यायला तयार झाला तो केवळ गोपीनाथपंतांसारख्या निष्णात वकिलामुळे. खान वाई सोडून जावळीत आला, यात प्रतापगडच्या युद्धाच्या विजयाचे खरे महत्त्व होते. अफजलखान असामान्य कर्तृत्ववान योद्धा होता, त्याची बुद्धिमत्ता विलक्षण होती, त्याच्याकडे रणनीतीचा बराच अनुभव होता. अशा धुरंधर माणसाला फसवून जाळ्यात ओढणे हे कठीण होते. पण पंताजींनी शिवरायांकडून अपाय नाही अशी बेलरोटीवर शपथ वाहत, गोडीगुलाबीने, मधाळ भाषेने खानाचा विश्वास संपादन केला होता. आपल्या वास्तव्यात त्याच्या सेनाधिकार्‍यांकडून आवश्यक माहिती मिळवून त्यांनी खानाची रणनीती ओळखली होती. सैन्यातले भेदी मिळवून एकंदरीत खानाच्या हालचालींची नस ओळखली होती. त्यांनी नेमके काय केले, काय बोलले ह्याचा तपशील कागदपत्रांत सापडत नाही. पण एवढे नक्की की खानाची इत्थंभूत माहिती मिळवून महाराजांचा डाव यशस्वी करण्यासाठी त्यांनी खानाला जावळीत येणे भाग पाडले. कितीतरी वेळा प्रत्यक्ष रणकौशल्याआधी शत्रूला जिंकणारे बुद्धिकौशल्य युद्धातील विजय निश्चित करते, त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपीनाथपंतांची वकिली.
 
 
खरे तर अफजलखानाच्या सल्लागारांनीसुद्धा त्याला जावळीत न जाण्याचा सल्ला दिला होता. पण जावळीत न जाणे म्हणजे सामर्थ्यवान अफजलखान शिवाजीला घाबरला असा लौकिक झाला असता व ते खानाच्या इभ्रतीला मारक होते. शिवाय कस्तुरीरंगासारखे शिवरायांनाही प्रत्यक्ष भेटीत एकांगी मारण्याचा त्याचा डाव होता, त्यासाठी त्याने पंताजींचे म्हणणे मान्य केले व जावळीला निघाला. त्याने बर्‍याच हत्ती-घोड्यांसह काही सैन्य वाईला ठेवले. उरलेले हत्ती, घोडे, सैन्य, बाजारबुणगे आणि तरबेज सरदार असा सुमारे 15 हजाराचा लवाजमा घेऊन खान जावळीच्या दिशेने चालू लागला. जावळीत सैन्यासह छावणी ठोकून शिवरायांना तिथेच भेटायला बोलवू, अशी त्याची मनीषा होती.

 
 
वाई ते जावळी

कार्तिक महिन्यात खानाने प्रस्थान ठेवले. कुसगाव - चिखली - पाचगणी पठार - तायघाट - लिंगमळा असे करत महाबळेश्वरास आला. आता रडतोंडीचा सरळ घाट आणि पुढे कोयना खोर्‍यातून उतरले की जावळी! खानाची फौज नदीच्या अंगाने छावणी मांडून जावळीत विसावली. जावळीतील वनराई, मौजमजा, बाजारहाट अशा वातावरणात खानाचे सैन्य रमले आणि ढिलाई आली. राजांकडून कुठलीही हालचाल होत नाही, हे जाणून खान मात्र उतावीळ झाला. राजांनी तत्काळ जावळीत भेटीला यावे यासाठी प्रयत्न सुरू केले. पण राजांनी मात्र खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आणि आपले पंताजी गोपीनाथ ह्यांना वारंवार बोलणी करायला लावून वेळ घालवायला सुरुवात केली. त्यांना खानाला भेटायचे होते, पण प्रतापगडाच्या पायथ्याशी. महाराजांनी पंताजींना सांगितले, “वाट्टेल ते करून खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी येण्यास भाग पाडा.” पंतांजींनी महाराज घाबरतात हे वारंवार सांगत, परोपरीने समजावून खानाला भेटीसाठी येण्यास मान्य करायला लावले. जावळीत शिवाजी आलाच नाही आणि भेट झालीच नाही तर सैन्याला एवढे घाट ओलांडायला लावणे हा मूर्खपणा ठरून खानाची सर्वत्र नाचक्की होणार, हे त्याला माहीत होते. विजापूरहून निघून सहा महिने संपले, तरी शिवाजी हाती लागत नव्हता. वेळ आणि खर्च दोन्ही वाया जात होते आणि ते खानाला मान्य नव्हते. म्हणूनच नाइलाजाने पण स्वबळाच्या विश्वासावर खान येण्यास तयार झाला.
रणयोजना
 
खान एवढी फौज घेऊन प्रतापगडापाशी चढणार नाही, हे शिवरायांना पक्के ठाऊक होते. पहिल्या फेरीत त्याच्या फौजेला वाई आणि जावळी असे दुभंगवत राजांनी डाव साधला होता. आता महाबळेश्वराच्या डोंगरदर्‍यांत त्यांना खानाच्या फौजेचे छोट्या छोट्या तुकड्यांत विभाजन करायचे होते, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी आपल्या तुकडीला एकामागोमाग हल्ला करणे सोपे जाईल. जावळीच्या अरण्यात आणि प्रतापगडच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगरांत खानाच्या फौजेचा फडशा पाडणे सोपे होते. खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवून भेट घ्यायची व त्या भेटीत त्याला मारायचाच, ही योजना महाराजांनी पक्की केली. ऐन युद्धावेळी वाईला परत पळणार्‍या उरल्यासुरल्या फौजेला घाटात रोखून संपवणे आणि शेवटी वाईवर आक्रमण करणे अशी योजना महाराजांच्या मनात होती. त्यानुसार राजांनी सर्व फौजेला आधीच प्रतापगडापाशी गोळा करून युद्धाची व्यूहरचना साधली.
 
प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘जनीचं टेंब’ नावाची छोटी सपाट जागा आहे. तिथे चौथरा उभारून महाराजांनी देखणा व उंची वस्तूंनी युक्त असा शामियाना खानासाठी उभारला. प्रतापगडावर हजारभर सैन्य ठेवले. अफजलखान मारल्यावर लगेच हल्ला चढवण्यासाठी भेटीच्या स्थानापासून नजरेच्या टप्प्यावर बखळीत हिरोजी फर्जंदला काही माणसांसोबत ठेवले. कान्होजी जेधे, बाजी, बांदल, शिळीमकर, पासलकर, अनाजी दत्तो अशा शिबंदीला भेटीच्या आणि पारघाटाच्या मधल्या डोंगर घळींत ठेवले, जेणेकरून पारमधील खानाची फौज वर येऊ शकणार नाही. पारघाटातून कोकणात उतरणे शक्य होऊ नये, म्हणून किनेश्वरापाशी मोरोपंत पिंगळे, श्यामराज पद्मनाभी यांच्याबरोबर त्र्यंबक भास्कर आणि जेध्यांची एक शिबंदी ठेवली. उत्तरेला कोकणात जाण्यासाठी लागणार्‍या आंबेनळीच्या घाटात कडेसरच्या जंगलामध्ये नेतोजी आणि रघुनाथ बल्लाळ अत्रे यांच्या घोडदळाला ठेवले. तिथून या घोडदळाला जावळीवर हल्ला करून महाबळेश्वर ओलांडत वाईच्या छावणीवर धडक देणे शक्य होते. पलीकडे बाबाजी भोसलेचे घोडदळ रडतोंडीच्या घाटात ठेवले, ज्यामुळे महाबळेश्वराकडून कुणी वाईला पळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अडवून बंदी करता येईल.

प्रतापगडाच्या व्यूहरचनेचा मोठा भाग होता महाबळेश्वराचा उंच डोंगर, कोयनेचे खोरे आणि जावळीचे घनदाट निबिड अरण्य. जागोजागी राजांचे हेर, सैन्य सर्व माणसे पेरली होती. खानाच्या आणि त्याच्या प्रत्येक माणसाच्या हालचालीवर महाराजांच्या माणसांची बारीक नजर होती.
 
भेटीचा दिवस आणि तपशील ठरले. गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 1659, शके 1581 विकारी संवत्सर, मार्गशीर्ष षष्ठीयुक्त सप्तमी, दुपारी तीन प्रहर म्हणजे साधारण चार वाजताची. 6 वाजताना अंधार लवकर पडणार. मध्यरात्रीनंतर चंद्रोदय म्हणजे अंधारात कमीत कमी वेळात शत्रूला पळता भुई थोडी करून युद्ध संपवणे सोपे जाणार होते.
 
 
दोघांनी पालखीतून यायचे. अफजलखान प्रथम पोहोचेल. शामियानात एकांगी सशस्त्र भेट घ्यायची. बाहेर हाकेच्या अंतरावर दोघांचे दहा सशस्त्र हशम. खानाचे अंगरक्षक सय्यद बंडा, अब्दुल सय्यद, पहिलवानखान, रहिमतखान, शंकराजी आणि पिलाजी मोहिते, कमाल खुर्शीद आणि तरबेज शूर असे तीन योद्धे. महाराजांच्या दहा अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी कोंढाळकर, जिवा महाला, कोंडाजी व येसाजी कंक, भानाजी इंगळे, सूरजी काटके, संभाजी करवर, कृष्णाजी गायकवाड आणि विश्वास मुरुंबक.
महाराजांनी सर्व विश्वासू निष्ठावंतांबरोबर मसलती करून युद्धाची रचना केली होती. प्रत्येकाच्या हालचालींची सर्व सूत्रे अगोदरच ठरवली होती. आदल्या दिवशी रात्रीपर्यंत सर्व जण आपापल्या ठिकाणावर रवाना झाले होते. आता योजलेले फक्त साधायचे होते.
प्रतापगड रणसंग्राम
 
भेटीचा दिवस उगवला. महाराजांनी प्रात:काळी गडावर केदारेश्वराची आणि कुलदेवतेची यथासांग पूजा केली. दानधर्म करून आशीर्वाद घेतले. जिवाभावाच्या सवंगड्यांना समजावून योग्य त्या सूचना दिल्या. भोजनपान करून भेटीसाठी सशस्त्र तयार झाले. अकराच्या सुमारास गोपीनाथपंत अफजलखानास आणण्यास रवाना झाले. खानाने स्वत:बरोबर अधिक अशा 1500 सैनिकांची तुकडी घेतली, पण ’एवढा जमाव असल्यास महाराज परत जातील’ या भीतीचे नाटक वठवत त्यांनी भेटीच्या ठिकाणाआधीच ही सर्व माणसे रोखली. अफजलखान पंताजींच्या बोलण्याच्या जाळ्यात अडकत नाइलाजाने शेवटी ठरल्याप्रमाणे पालखीतून शामियान्यात पोहोचला. शामियान्याचे वैभव त्याला विस्मय करायला लावणारे होते.

खान पोहोचल्याची खबर मिळताच महाराज प्रतापगडवरून ठरल्याप्रमाणे निघाले. पालखीतून जवळ येताच सय्यद बंडा शामियान्यात असल्याचे कळले आणि ते थांबले. अधीर झालेल्या खानाने आणखी वेळ नको म्हणून बंडाला शामियान्याबाहेर उभे राहण्यास सांगितले. आता शामियान्यात फक्त अफजलखान, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर आणि पंताजी गोपीनाथ होते. महाराज सावधपणे आत शिरले. दोन्ही वकिलांनी खानाची व महाराजांची एकमेकांना ओळख करून दिली. खानाने हसत हसत महाराजांना मिठीत घेण्यासाठी दोन्ही बाहू पसरले. धिप्पाड खानापुढे राजे एकदम खुजे वाटत होते. मिठीत आल्याबरोबर खानाने महाराजांचे मस्तक डाव्या बगलेत दाबून धरले आणि कमरेच्या कट्यारीने महाराजांवर वार केला. अंगरखा फाटला, पण आतल्या चिलखतामुळे इजा झाली नाही. क्षणाचाही विलंब न लावता भानावर येत महाराजांनी स्वत:कडील बिचवा खानाच्या पोटात खुपसला आणि खानाची आतडीच बाहेर आली. खान जखम सावरत झोकांड्या देत ओरडतच बाहेर जाऊ लागला. महाराजांनी पंताजींकडून आपली तलवार घेत खानावर आणखी वार केले. तेवढ्यात कृष्णाजी भास्कराने महाराजांवर तलवारीने वार केला. वार अडवत त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा कृष्णाजीने तलवार उचलताच त्याच्यावर तलवार चालवीत त्याला गतप्राण केले. गडबड झाल्यामुळे सय्यद बंडा महाराजांवर चालून आला. त्याचा उगारलेला पट्ट्याचा हात जिवा महालाने चपळाईने वरच्यावर कापून पुढच्या घावात बंडा लोळवला. पंताजी आणि महाराज तत्काळ गडाच्या दिशेने निघाले. काही अंगरक्षकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांच्या माणसांनी कापाकापी करून खानाच्या सर्वांना यमसदनास धाडले. जखमी अफजलखानाला उचलण्यासाठी भोयांनी पालखी आणली, पण ती उचलताच जवळच असलेल्या संभाजी कावजीने त्यांच्यावर हल्ला चढवत खानाचे मुंडके कापून गडाच्या दिशेने कूच केले. गडावरून तोफांची इशारत गेली. तोफा धडाडू लागल्या, क्षणार्धात महाबळेश्वराचा डोंगर आणि कोयनेचे खोरे दुमदुमू लागले. राजे वेगात गडावर पोहोचले. अफजलखानाची 1500ची शिबंदी जवळ अंतरावर होती, त्यांना काही कळायच्या आत कान्होजी जेधे, अनाजी दत्तो आणि बांदलांच्या तुकडीने आणि समोरून हिरोजी फर्जंदने त्यांच्यावर हल्ला चढवला. पुढे सरकत त्यांनी पारच्या फौजेला मोरोपंतांची फौज चढून येईपर्यंत रोखून धरले. दुसरीकडे पारघाटातल्या मुसेखानाच्या फौजेवरही हल्ला चढवला. बरेच जण मारले गेले, काही शरण आले. स्वत: मुसेखान जंगलात पळून गेला.

 
दुसरीकडे कडेसरकडला नेतोजी आणि अत्रेंच्या सैन्याने जावळीतल्या खानाच्या फौजेवर हल्ला चढवला. बेसावध अशा त्या छावणीला अचानक झालेल्या हल्ल्याने सावरायलासुद्धा वेळ मिळाला नाही. महाबळेश्वर येथे बाबाजी भोसलेला मदत करून नेतोजी स्वत: पुढे थेट वाईपर्यंत दौडत गेला. तोपर्यंत मोरोपंतांच्या फौजेने पारघाट ते पारपर्यंत सर्वत्र सुमारे दोन तास चहू बाजूंनी खानाच्या सर्व छावण्यांवर हल्ला चढवला होता. अंधार पडला होता. खानाच्या सैन्याला काहीच दिसत नव्हते. मराठे जंगलात पळून चाललेल्या सर्वांना टिपून जायबंदी करत होते. कोकणाकडे पळून जाण्याची वाट अधिक अवघड. वाईकडे जायचे तर वाटेत प्रत्येक ठिकाणी मराठे आडवे येत होते. एवढे साहित्य, तोफा, बंदुका, शस्त्रे असताना, हत्ती-घोड्यांसह सर्व काही निरुपयोगी ठरले होते आणि मराठ्यांच्या हाती लागले होते. विजापूरचे मोठमोठे सरदार पराभूत झाले होते. जखमी झालेले अफजलखानाचा मोठा मुलगा फाजलखान, अंकुशखान, याकुतखान, हसनखान प्रतापराव मोरे ह्याच्या मदतीने जंगलातून वाट काढत सातारा दिशेने पळून गेले. अंबरखान, झुंजारराव, छोटा रणदुल्लाखानासह अफजलखानाचे आणखी दोन मुलगे मात्र कैद झाले.

अफजलखान वध ही शिवचरित्रातील सर्वात विलक्षण असामान्य अशी घटना, परंतु प्रतापगडचे युद्ध हे भौगोलिक अभ्यासाचा आणि सुनियोजित योजनेचा, सूत्रबद्ध हालचालींचा कळसाध्याय. खानाची सुमारे 5-6 हजार माणसे मारली गेली. तेवढीच जायबंदी झाली. तीनेक हजार कैद व उरलेले सारे सैन्य पळून गेले. दीडेक हजार मराठे पडले व जवळपास पाचशे जखमी झाले. खानाचा सात लाखांइतका प्रचंड खजिना, जडजवाहीर, मोहरा हत्ती, घोडे, उंट, बैल, शस्त्रे, तोफा, कापडचोपड, तंबू अशी सारी लूट महाराजांच्या हाती लागली.
 
 
महाराजांनी सर्व शूरवीरांचा यथोचित सन्मान केला. युद्धात कामी आलेल्यांच्या वारसांना नोकरी आणि जखमींना होन इनाम दिले. कान्होजी जेध्यांना दरबारात तलवारीचे पहिले मानाचे पान दिले. गोपीनाथ पंताजींना एक लाख होन बक्षीस देऊन हिवरे गाव वंशपरंपरागत इनाम दिले, भोळी आणि मांडकी इथली एकेक चावर जमीन आणि शेटेपणाचे वतन दिले. संभाजी कावजीला हजारी मिळाली. जिवाजी महालाला खास इनाम दिले.

 
अफजलखान मारला गेला. त्याचे मुंडके राजगडावर जिजाऊसाहेबांकडे पाठवले. आऊसाहेबांनी ते बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी कोनाड्यात पुरून दिवाबत्तीची सोय केली. भेटीच्या ठिकाणी अफजलखानाचे धड पुरून त्यावर कबर बांधायला परवानगी दिली.
 
 
प्रतापगडाच्या युद्धाचे महत्त्व
 
 
शिवाजी महाराजांनी पंधरा वर्षे अविरत धडपड करून बांधलेले स्वराज्य संपवण्यासाठी अफजलखानाने सर्व प्रकारे योग्य योजना आखली होती. त्याला महाराजांना मारायचेच होते. परंतु शिवरायांनी प्रतापगडच्या युद्धात त्याच्या विपरीत साध्य केले. खानाच्या सर्व योजना वाया जाऊन तो स्वत: धराशायी झाला होता. विजापूरचा सर्वात मातबर सरदार संपल्यामुळे आणि महत्त्वाचे इतर वीर पराभूत झाल्यामुळे आदिलशहावर अणि बड्या बेगमेवर नामुश्कीची वेळ आली. शिवरायांच्या सामर्थ्याचा हिंदुस्थानभर बोलबाला होऊन मुघल सरदारांनासुद्धा राजांबद्दल धाक बसलाच, तसेच पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज अशा पाश्चात्त्य शक्तींनाही शिवरायांपासून सांभाळावे लागेल हा धडा शिकायला मिळाला. एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा ही प्रतिमा पुसली जाऊन एक तरबेज, शूरवीर, साहसी, निष्णात योद्धा आणि स्वराज्य निर्माण करणारा कुशल राजकारणी अशी ख्याती पसरली.
 
 
प्रतापगडचे युद्ध वेगवेगळ्या पातळ्यांवर अभ्यासता येते. मराठ्यांच्या ठायी असलेल्या निष्ठा, प्रयत्न, संयम, संघटन, शौर्य, साहस, धैर्य अशा कितीतरी गुणांचे दर्शन होते. व्यक्तिगत अडचणी राष्ट्रापुढे फिक्या ठरतात, प्रिय पत्नी आजारी, मूल लहान, पुढे पत्नीचा मृत्यू हे सारे विसरून स्वराज्यसंरक्षणासाठी महाराज अफजलखानाशी झुंजायला तयार झाले होते. वाई-जावळीचा परिसर अफजलखानाच्या अभ्यासातला असतानाही याच परिसरात त्याच्या मन-बुद्धीला भ्रमित करीत प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत त्याला एकांगी आणण्यात यशस्वी ठरलेली गोपीनाथपंतांची बुद्धिमत्ता.. मार्गशीर्ष सप्तमीच्या दिवस-रात्री प्रहरातील नैसर्गिक बदलांचा अभ्यास, प्रतापगडाची भौगोलिक दुर्गमता, महाबळेश्वराचा डोंगर, जावळीच्या घनदाट जंगलाने भरलेले कोयनेचे खोरे.. पाच-सहा घाटांनी एका बाजूस वाई आणि दुसरीकडे कोकण अशा भौगोलिक प्रदेशात खानाच्या फौजेचे झालेले विभाजन.. प्रत्येक तुकडीचा धुव्वा उडवण्यासाठी विविध ठिकाणी दडवलेले मराठी सैन्य, त्यांच्या सुबद्ध व वेळेवर केलेल्या हालचाली.. प्रतिस्पर्ध्याला सावरायला किंवा प्रत्युत्तर न देता पळायला भाग पाडणारे अकस्मात केलेले हल्ले.. अशा सर्व प्रकारे प्रतापगडाचा रणसंग्राम हे शिवरायांच्या युद्धनीतीतले सर्वोच्च पान ठरते.

 
कविराज भूषण म्हणतो -
 
यौं तम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसी चांदनी चारू पसारी।
 
ज्यौं अफजल्लहि मारि मही पर कीरति श्री सिवराज सुधारी॥
 
- ज्याप्रमाणे अफजलखानाला मारल्यावर शिवरायांची कीर्ती जगभर पसरली, त्याचप्रमाणे अंधकाराचा चावा घेऊन, त्याला मारून सर्वत्र चंद्राचं चांदणं रायगडाच्या आसमंतात पसरलं आहे.

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.