पाकिस्तानात दहशतवाद्यांच्याच कत्तली

विवेक मराठी    06-Oct-2023   
Total Views |

pakistan
कराचीत झिया उर रहमान मारला गेल्यानंतर पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या लष्करी गुप्तचर यंत्रणेने कराचीत असलेल्या आणि आपल्या पंखाखाली काम करणार्‍या सर्व दहशतवाद्याांना सुरक्षित स्थळी हलवले. दाऊदसारख्या दहशतवादी गुंडाला त्यांनी जशी संरक्षणव्यवस्था पुरवली आहे, तशीच व्यवस्था त्यांनी अन्य सर्व दहशतवाद्यांना दिलेली आहे. इतके असूनही पुढल्या काही दिवसांमध्ये आणखी काही दहशतवादी मेले, तर त्याला ‘आयएसआय’च जबाबदार असल्याचे आपण गृहीत धरायला हवे. याचे कारण पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्ट आणि सर्वात जास्त दहशतवादी हीच एकमेव संघटना आहे. हे सर्व हल्ले आणि त्यानंतर भारतावर केले गेलेले आरोप लक्षात घेता पाकिस्तान हाच सध्या दहशतवाद्याांच्या कचाट्यात सापडला आहे असे म्हणण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
पाकिस्तानात सध्या कोण कोणाला मारतो आहे आणि कोण कोणाच्या विरोधात काम करतो आहे हे कोणालाच कळेनासे झाले आहे. पाकिस्तानात भारताविरूद्ध काम करणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सरकार काय किंवा ‘आयएसआय’सारखी गुप्तचर संस्था काय, त्यांना आपली खास मालमत्ता समजत असते. त्या मालमत्तेलाच आता घरघर लागलेली आहे. आपल्याकडे दोन चांगले वाक्प्रचार आहेत. करावे तसे भरावे आणि जो दुसर्‍यांसाठी खड्डा खणतो, त्याचा अंत त्या खड्ड्यातच होतो, हे ते दोन. पाकिस्तानी तालिबानांचे अफगाण तालिबानांशी संबंध आहेत म्हणून त्यांच्याविरोधात नव्याने कामाला लागलेली ‘इस्लामिक स्टेट ऑफ खुरासन प्रॉव्हिन्स’ (आयएसकेपी) ही संघटना पाकिस्तानी तालिबानांना संपविण्यामागे आहे म्हणावे तर, ती याच अफगाण तालिबानांशी संबंध ठेवणार्‍या जमियत उलेमा इ इस्लाम (फजलूर) या संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्याही मागे हात धुवून लागलेली आहे. का? तर त्यांची धोरणे इस्लामी शरियाच्या बाजूने नाहीत. पाकिस्तानी तालिबान (तेहरिक ए तालिबान पाकिस्तान) खूप दिवसांनी भूमिगत अवस्थेतून वर आले म्हणावे, तर अफगाण तालिबान त्यांनाही पुन्हा भूमीत गाडायला तयार झाले आहेत. हा वेगळाच सत्तासंघर्ष उफाळून वर येतो आहे. त्यातच हाफिज सईद या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात हात असणार्‍या लष्कर ए तोयबाच्या चिथावणीखोर प्रमुखालाही आता शेवटची घरघर लागलेली आहे. त्याला ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ या पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर संघटनेने गायब केले आहे. आतापर्यंत भारताकडून त्याच्यावर आरोप केले गेले की, लगेचच त्याला सुरक्षित जागी हलवले जात होते, पण आता एकापाठोपाठ एक दहशतवादी मारले जात आहेत म्हणताच त्याला ‘आयएसआय’ने कराचीत सुरक्षित जागी नेऊन ठेवले आहे. कदाचित त्याने दाऊद राहतो त्याच भागात कडेकोट लष्करी बंदोबस्तात आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे. पण मग दाऊद कोठे आहे? त्याचाही एक दिवस खात्मा केला जाईल. ‘आयएसआय’ने तसेच लष्करप्रमुख जनरल सईद असीम मुनिर यांनी ‘आम्ही एकाही दहशतवाद्यााला सोडणार नाही’, असे जाहीर केलेले असतानाच तिकडे बलुचिस्तानात मास्तुंगमध्ये रबी उल अव्वलच्या दिवशी मिरवणुकीत जमलेल्यांना आत्मघाती हल्ल्यात ठार करण्यात आले. किमान साठ जण त्यात मृत्युमुखी पडलेे आहेत. त्यात तितकेच जखमी झाले आहेत. त्यात जमियत उलेमा इ इस्लाम (फजलूर) या पक्षाचा नेता हाफिज हमिदुल्लाही ठार झाला. आता इतक्या लोकांना एकत्रितरित्या ठार करणारे कोण आहेत, याविषयी चौकशी सुरू झाली तेव्हा लष्करप्रमुख जनरल मुनिर यांनी त्यात परकीयांशी संबंधित असणार्‍या एखाद्या संघटनेचा ‘हात असण्या’ची शक्यता आहे, असे म्हटले. तर पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री (गृहमंत्री) सरफराज अहमद बुग्ती यांनी ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संघटनेचे नाव घेऊन तिचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगितले. बरे, या त्यांच्या संशयाला पुरावा काय, असे विचारताच त्यांनी आपल्याकडे पक्की माहिती असल्याचे सांगितले. (त्यातही ट्रुडो यांचा सल्ला असावा.) ज्या विषयाची त्यांना पक्की माहिती आहे तिचे धागेदोरे त्यांच्याकडे आहेत का? तर त्याविषयी त्यांचे कानावर हात होते. मुळात हे अहमद बुग्ती तात्पुरते गृहखाते सांभाळणारे मंत्री आहेत. त्यांना ‘आयएसआय’कडे किंवा लष्करप्रमुखांकडे पाहूनच बोलावे लागते. प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध असलेल्या एकानेही या स्फोटाविषयी चकार शब्द तोंडातून काढलेला नाही किंवा त्यांनी तो काढला असल्यास कोणत्याही वृत्तपत्राने त्यास प्रसिद्धी दिलेली नाही. ज्याने या आत्मघाती हल्ल्यात भाग घेतला, त्याच्या हाताचे ठसे आमच्या ‘डेटाबेस’मध्ये मिळत नाहीत, असे एका गुप्तचर अधिकार्‍याने सांगितले. याचा अर्थ असा होतो की, कोणकोण आत्मघाती बॉम्ब बनवणार आहेत, त्यांची नावनिशीवार यादी बहुदा त्यांच्या संग्रही आधी तयार होत असावी किंवा त्यांची तयारीच त्यांच्याकडून करवून घेतली जात असावी. त्याशिवाय त्यांच्या अंगठ्यांचे ठसे कसे संग्रही असणार? आपण काय बोलतो आहोत आणि त्याबद्दल आपल्याला विचारले जाईल किंवा काय याचा पत्ता नसला की हे असे ‘खरेखरे’ सांगून गुप्तचर अधिकारी हात झटकून मोकळे होत असावेत.
 
सांगायचा मुद्दा हा की, पाकिस्तानात या दहशतवादी कारवायांचा सुळसुळाट झालेला असताना भारतात कारवाया करून पाकिस्तानात दडून राहिलेल्या दहशतवाद्याांना टिपून टिपून मारले जात आहे. त्यातही पुन्हा एक विचार असा येतो, की पुरावे नष्ट करण्याची ही त्यांचीच चाल नसेल कशावरून? कराचीत मरणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. हे सगळे कराचीत का दडून बसले होते? तर लाहोर किंवा पेशावरमध्ये त्यांना सुरक्षित वाटत नाही म्हणून. क्वेट्टा या बलुचिस्तानची राजधानी असलेल्या शहरात तर त्यांना कोण आपला, आणि कोण परका हेच कळेनासे होत असावे. अफगाणिस्तानवर अमेरिकेने कब्जा केल्यानंतरच्या काळात क्वेट्टामध्ये मरणार्‍यांना अल्लाच्या घरात तरी स्थान मिळत असेल की नाही हे सांगता येत नाही. हे मी आपले सहजच विधान केलेले नाही. ज्या दहशतवाद्यांना भारतात मुंबईमध्ये किंवा इतरत्र पाठवले गेले, त्यांना ‘इस्लामिक स्टेट’, अल कायदा किंवा तालिबान यांनी प्रशिक्षित करतानाच सांगितले होते की, तुम्ही आत्मघाती हल्ल्यात काफिरांना माराल तर तुम्हाला स्वर्गात सुंदर सुंदर पर्‍या उपभोगायला मिळतील. त्यामुळे सर्वाधिक दहशतवादी हे क्वेट्टा परिसरात तयार झाले आणि आजही त्यांचे अस्तित्व त्या भागातच सर्वात जास्त असल्याचे मानले जात आहे. स्वाभाविकच आहे, तिथे जायला अजूनही कोणी तयार होत नाही. त्याच भागातून आलेले बुग्ती आजवरच्या सर्व घातपाती कारवायांना विसरून ‘रॉ’वर आरोप करून बसले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांची सत्ता असतानाच्या काळातही पाकिस्तानात आत्मघाती हल्ले झाले, पण तेव्हा कोणी त्यात भारताचा सहभाग शोधलेला नव्हता. तसा तो शोधला तर त्याचे काय होते हे त्यांना माहिती असल्याने ते गप्प बसले असावेत.
 
आता मी मूळ मुद्यााकडे येतो. कराचीत गुलशन ए जौहर नावाच्या अशाच एका अलिशान भागात असणार्‍या बागेत ‘जॉगिंग’साठी गेलेल्या मौलाना झियाऊर रहमान या दहशतवाद्याला ठार करण्यात आले. त्याला मारण्यासाठी दोघेजण मोटारसायकलवरून त्या भागात गेले होते आणि त्यातल्या एकाने अगदी जवळून गोळ्या घालून त्याला ठार केले. त्याचा जो सुरक्षा अधिकारी होता, तोही त्या हल्ल्यात आधी जखमी झाला आणि रूग्णालयात तो मृत्यूमुखी पडला. रहमान हा मौलाना होता, त्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे पाकिस्तानची लष्करी उद्योगाची बाजारपेठ (पाकिस्तानात काही महत्त्वाच्या उद्योगांची आणि मादक पदार्थांच्या ने-आणीची व्यवस्था खुद्द पाकिस्तानी लष्कर पाहते) असलेल्या त्या भागातल्या अधिकार्‍यांना वाटले असावे किंवा त्यांचे त्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक झाले असण्याची शक्यता आहे. रहमान हा जामिया अबू बकर या दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणार्‍या ‘पाठशाळे’चा प्रमुख होता. या कारवाया अर्थातच भारताविरूद्धच्याच असतात. रहमान हा लष्कर ए तैयबाचा कराचीचा प्रमुख होता. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीनेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलेले होते. रहमानला मारल्याने सध्या मौलानांनाही पाकिस्तानात वाईट दिवस आले असल्याचे मानले जात आहे. त्याला ज्या पद्धतीने मारले ती आणि काही महिन्यांपूर्वी लाहोरमध्ये खलिस्तान कमांडो फोर्सच्या परमजितसिंग पंजवारला मारले गेले त्याच्या पद्धतीत एकसारखेपणा होता. अल बदर संघटनेचा खालिद रझा यालाही त्याच भागात काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तिंनी गोळ्या घालून ठार केले होते. तो जरा म्हणून घराबाहेर पडला आणि मेला. त्याच भागाच्या जवळपास जैश ए महमद या दहशतवादी संघटनेचा झहूर इब्राहिम मिस्त्री याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. हा झहूर मिस्त्री म्हणजे इंडियन एअरलाइन्सचे विमान काठमांडूहून नवी दिल्लीकडे येत असताना ज्याने 25 डिसेंबर 1999 रोजी अपहरण केले, तो हा दहशतवादी. तो मेला तेव्हा मात्र कोणी भारताकडे बोट दाखवलेले नव्हते. परस्पर टोळीयुद्धात त्याला मारले गेले असावे असे तेव्हा सांगण्यात आले होते. ज्या तिघांच्या सुटकेसाठी तेव्हाचे हे अपहरण घडवले गेले, त्यापैकी मौलाना मसूद अजहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद झरगर हे शिल्लक आहेत. पाकिस्तानमध्ये परतल्यावर लगेचच मौलाना मसूद अजहरने कराचीतच घेतलेल्या एका सभेत ‘भारताचा संपूर्ण विनाश होत नाही, तोपर्यंत मुस्लिमांनी स्वस्थ बसून चालणार नाही’, असे म्हटलेले होते. तो सुरक्षित आहे आणि सध्या दडी मारून बसलेला आहे. तिसरा दहशतवादी अहमद उमर सईद शेख हा सध्या तुरुंगात आहे. डॅनियल पर्ल या अमेरिकन पत्रकाराच्या खुनाबद्दल त्याला झालेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली होती. प्रत्यक्ष अपहरणात सहभागी असलेले किती जण सध्या शिल्लक आहेत तेही गूढ आहे.
 
काश्मीरमध्ये जन्मलेला एजाज अहमद अहंगिर ऊर्फ अबू उस्मान अल काश्मिरी हा आधी जैश ए महमद या दहशतवादी संघटनेत होता, त्याने अलीकडेच ‘इस्लामिक स्टेट’मध्ये प्रवेश केला. त्याला कराचीतच त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. कराचीमध्येच जमात उद दावाचा दहशतवादी आणि हाफिज सईदचा एक अगदी जवळचा सरदार हुसेन याला त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. हा खून आपल्या संघटनेने केल्याचे ‘सिंध रेव्होल्यूशनरी आर्मी’ने जाहीर केले आहे. त्या संघटनेने अधिकृत पत्रक काढून जाहीर केल्याने तशी एक संघटना आजही कार्यरत आहे हे स्पष्ट आहे. लष्कर ए तैयबाचा आणखी एक दहशतवादी आणि हाफिज सईदच्या जवळचा कासीम फारूख हा ही कराचीतच मेला. त्याचा खून अंतर्गत शत्रुत्वातून झाल्याचे जाहीर करण्यात आले. हिज्बुल मुजाहिदीन या आणखी एका दहशतवादी संघटनेचा कमांडर बशिर अहमद पीर ऊर्फ इम्तियाझ आलम याला इस्लामाबादेत गोळ्या घालून ठार करण्यात आले. हिज्बुलचा प्रमुख सैद सलाहुद्दिन याच्या अगदी जवळचा मानला जात असे. सलाहुद्दिनचा आत्मघाती बॉम्ब तयार करण्याचाच धंदा आहे. तो सध्या कोठे आहे, त्याचा पत्ता लागत नाही. याचाच अर्थ तो भूमिगत आहे. तोही कदाचित कराचीतच असण्याची शक्यता आहे. कराचीचेच उपनगर असलेल्या नझिमाबादमध्ये अगदी अलीकडेच कारी खुर्रम शाहजाद या लष्कर ए तैयबाशी संबंधित दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्याचाच दुसरा एक सहकारी अबू कासिम काश्मिरी याला पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये रावळकोट येथे ठार करण्यात आले. या दोन्ही खुनांमागे दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याचा अर्थ पाकिस्तानी दहशतवाद्याांनीच त्यांना संपवले असल्याचे पोलिसांना मान्य आहे, असा होतो.
 
अगदी काही वर्षांपूर्वी कराचीत मी बेनजीर भुट्टोंची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या क्लिफ्टन रोडवरच्या बंगल्यावर गेलो असता त्यांनी तेव्हाच्या झिया सरकारविरोधात आग ओकलेली होती. या सरकारला कराचीला समूळ उखडून टाकायचे आहे, असा त्यांचा आरोप होता. आधी मुहाजिर, मग बांगलादेशी असणारे बिहारी आणि नंतर अफगाण निर्वासित यांना कराचीमध्ये वसवून या एका सुंदर शहराला ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवायचे आहे, असे त्यांनी तेव्हा म्हटलेले होते. हे आज आठवायचे कारण असे की, कराचीत सध्या एका पाठोपाठ एक दहशतवादी मारले जात आहेत. गुंड दहशतवाद्यांच्या टोळ्या आपआपसात लढून मृत्यूमुखी पडत आहेत. त्यांचे आश्रयदाते हेही पुन्हा वेगवेगळ्या धार्मिक संघटनांमध्ये राहून त्यांच्यातल्या उन्मादाला खतपाणी घालत आहेत. पाकिस्तानच्या विनाशालाच हे सर्व कारणीभूत ठरणार आहे. कराचीत झिया उर रहमान मारला गेल्यानंतर पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या लष्करी गुप्तचर यंत्रणेने कराचीत असलेल्या आणि आपल्या पंखाखाली काम करणार्‍या सर्व दहशतवाद्याांना सुरक्षित स्थळी हलवले. दाऊदसारख्या दहशतवादी गुंडाला त्यांनी जशी संरक्षणव्यवस्था पुरवली आहे, तशीच व्यवस्था त्यांनी अन्य सर्व दहशतवाद्यांना दिलेली आहे. इतके असूनही पुढल्या काही दिवसांमध्ये आणखी काही दहशतवादी मेले, तर त्याला ‘आयएसआय’च जबाबदार असल्याचे आपण गृहीत धरायला हवे. याचे कारण पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्ट आणि सर्वात जास्त दहशतवादी हीच एकमेव संघटना असल्याने बाकी सर्व दहशतवादी त्यापुढे फिके पडतात हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व हल्ले आणि त्यानंतर भारतावर केले गेलेले आरोप लक्षात घेता पाकिस्तान हाच सध्या दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडला आहे असे म्हणण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जरला मारण्यात आल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी जी खुनशी बाष्कळ बडबड केली ती पाहून पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, तेव्हा त्या देशाने आणि तिथल्या काही ‘महान’ पत्रकारांनी ‘आपण गेल्या कित्येक वर्षांपासून भारत हाच देश दहशतवादी असल्याचे सांगत होतो, त्याचा पुरावाच ट्रुडो यांनी सादर केला, असे त्याहून नीचपणाचे विधान केले होते. त्यांना आता हा पुरावा काय सांगतो ते विचारायला हवे आहे. थोडक्यात काय, तर पाकिस्तानात सध्या दहशतवाद्याांना त्यांच्या बिळात लपून राहावे लागते आहे. अमेरिका शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये असतानाही त्यांच्यावर ही वेळ आलेली नव्हती.