तामिळनाडूत भाजपचे ‘एकला चलो रे’!

विवेक मराठी    07-Oct-2023   
Total Views |
bjp
अण्णा द्रमुकने भाजपाशी असलेली युती तोडली, याकडे भाजप संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहत आहे. या घटनेमुळेे अस्वस्थ न होता भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचा निर्धार केला आहे. तामिळनाडूतील हे आव्हान भाजपला सोपे नाही. पण कसोटी असते तिथेच संधी असते. हाच निर्धार घेऊन भाजपने आता तामिळनाडूत ‘एकला चलो रे’चा निर्णय घेतला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कर्नाटकात भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात युती जाहीर झाली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी तामिळनाडूत अण्णा द्रमुकने भाजपशी असणारी युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला. अण्णा द्रमुक आणि भाजप दरम्यान 2019 ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2021 ची विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांत युती होती. हा काळ जयललिता यांच्या निधनानंतरचा आहे. जयललिता हयात असताना भाजपशी अण्णा द्रमुकने केलेली युती अल्पायुषी ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर आताच्या युतीचा कालावधी अधिक होता. कोणतेही दोन पक्ष युती किंवा अधिक पक्ष आघाडी करतात ते निरनिराळ्या उद्देशांनी. प्रमुख आणि बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला एकट्याने सामोरे जाता येत नाही तेव्हा युती वा आघाडी केली जाते. त्यात वैचारिक एकवाक्यता असेलच असे नाही. काही वेळा वैचारिक धोरणांमधील साम्यामुळे आणि परिणामतः मतांचे विभाजन समविचारी पक्षांदरम्यान होऊ नये म्हणून युती केली जाते. काहीदा आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी अन्य मोठ्या पक्षाशी युती केली जाते. नक्की काय साधायचे यावर युतीचे प्रयोजन आणि पर्यायाने आयुष्य ठरते. अण्णा द्रमुकने भाजपशी युती तोडल्याचे जाहीर केल्यामुळे तामिळनाडूत भाजपची पुढची वाटचाल कशी असणार हा प्रश्न भेडसावणारा आहे यात शंका नाही.
 
 
ज्या राज्यात विस्तार मर्यादित असतो अशा ठिकाणी ’एकला चलो रे’ची भूमिका धाडसाची असते; आव्हानात्मक असते. परंतु येथे याचीही नोंद घेतली पाहिजे की ही युती तुटणार याची कुरकुर अगोदरपासून ऐकू येऊ लागली होती. अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी भाजपवर आणि प्रामुख्याने तेथील भाजप प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांच्यावर सातत्याने शरसंधान केले होते. दिल्लीत जाऊन अण्णा द्रमुक नेत्यांनी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची भेटही घेतली होती. तरीही भाजप नेतृत्वाने आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि युतीचा बळी जाऊ दिला. याचा एक अर्थ असा की भाजपने तामिळनाडूत एकट्याने वाटचाल करण्याचा निर्धार केला आहे. या निर्णयाचे प्रतिबिंब निवडणूक निकालांत कसे उमटते हे लवकरच समजेल कारण लोकसभा निवडणुका आता फार दूर नाहीत. मात्र अण्णा द्रमुकने युती का तोडली आणि भाजपने ती का तुटू दिली याची मीमांसा करणे आवश्यक.
 
bjp
दाक्षिणात्य राज्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे अगदी संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या काळापासूनच सुरु झाले होते. विशेषतः तामिळनाडू आणि केरळ ही त्यातील तुलनेने जास्त आव्हानात्मक राज्ये. तामिळनाडूत द्राविडी राजकारणाने मूळ धरल्याने तेथे संघकार्य रुजविणे कसोटी पाहणारे होते. मात्र संघाच्या प्रचारकांनी आणि कार्यकर्त्यांनी निष्ठेने आणि निग्रहाने ते सुरु केले आणि चालू ठेवले. दादा परमार्थ, रामभाऊ म्हाळगी, दत्तोपंत ठेंगडी, शिवरामपंत जोगळेकर प्रभृतींनी संघविचार, हिंदुत्वाचा विचार तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत रुजविण्यासाठी कष्ट घेतले. सामाजिक काम रुजण्यासाठी दीर्घ काळ लागतो आणि त्याचे प्रतिबिंब राजकीय क्षेत्रात पडायला अधिकच अवधी लागतो. तामिळनाडू आणि केरळात भाजपला निवडणुकीतील यशाने हुलकावणी दिली आहे ती त्यामुळेच. मात्र राजकीय परिस्थिती बदलत असते; जनतेचा दृष्टिकोन बदलत असतो; जागृती हळूहळू येत असते आणि मग त्याचे प्रतिबिंब राजकीय यशात पडू लागते.
 
 
तामिळनाडूत भाजपला आता यशाचा प्रत्यय येऊ लागला आहे. याचा अर्थ तेथे भाजपला आताही स्थिती पूर्णपणे अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी भाजपसमोर असणारे आव्हान स्पष्ट केले आहे. पण गेल्या वर्षी तामिळनाडूत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी भाजपची उमेद वाढविली आहे. 2011 साली भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आणि जागांच्या तुलनेत गेल्या वर्षीच्या आलेखात वाढ झाली आहे. शिवाय भाजपने तामिळनाडूमध्ये आपला विस्तार करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आक्रमक शैली असणारा आणि तरुणाईत लोकप्रिय ठरेल असा प्रदेशाध्यक्ष नेमला आहे. या सगळ्यामुळे आगामी काळात एकट्याने निवडणूक लढविणे श्रेयस्कर अशी भाजप नेतृत्वाची धारणा झाली असल्यास नवल नाही. भाजपचा विस्तार हीच अण्णा द्रमुक समोरची डोकेदुखी ठरत होती का हा ही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतो. त्याचे पर्यवसान त्या पक्षाने भाजपशी युती तोडण्यात झाले का हा कळीचा मुद्दा आहे.
 
 
bjp
 
भाजपने तामिळनाडूतील दोन्ही प्रमुख प्रादेशिक पक्षाशी- द्रमुक आणि अण्णा द्रमुक- कधी ना कधी युती केलेली आहे. 1998 साली जयललिता यांनी भाजपशी युती केली होती. त्याच सुमारास जयललिता यांच्या मालमत्तेवर तपास यंत्रणांनी टाच आणल्याने जयललिता यांनी केंद्रातील वाजपेयी सरकारवर दुहेरी दबाव आणण्यास सुरुवात केली. एक म्हणजे जयललिता यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत आणि दुसरे म्हणजे तामिळनाडूतील द्रमुक सरकार बरखास्त करावे. वाजपेयी यांनी या मागण्यांना धूप घातली नाही. 1999 साली लोकसभेत विश्वासदर्शक ठरावात वाजपेयी सरकारचा केवळ एका मताच्या अंतराने पराभव झाला; त्यास जयललिता यांचा लहरीपणा कारणीभूत होता. साहजिकच वर्षभरातच ती युती संपुष्टात आली. त्यानतंर द्रमुक हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाला. 1999 च्या निवडणुकीत तामिळनाडूत भाजपने सहा जागांवर उमेदवार उतरविले आणि चार ठिकाणी भाजपला विजय मिळाला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकने एनडीएला रामराम ठोकला आणि भाजपची पुन्हा अण्णा द्रमुकशी युती झाली.
 
 
मात्र भाजपला त्या निवडणुकीत तामिळनाडूत एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर अण्णा द्रमुक आणि भाजप युती झाली नाही. 2016 साली जयललिता यांचे आकस्मिक निधन झाले. अण्णा द्रमुकमध्ये गटबाजी उफाळून आली. तेव्हा पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी गटांच्या परस्परांवरील कुरघोड्यांनी अण्णा द्रमुक पक्षात फूट पडू नये आणि तो एकसंघ राहावा म्हणून भाजपने मध्यस्थी केली. तो पक्ष एकसंघ राहिला एवढेच नाही तर त्या पक्षाने सत्तेचा आपला कार्यकाळ पूर्ण केला. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाने 2019 ची लोकसभा आणि 2021 ची विधानसभा अशा दोन्ही निवडणुका भाजपशी युती करून लढविल्या. मात्र या निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकच्या वाट्याला अपेक्षित यश आले नाही आणि राज्यातील सत्ताही गमवावी लागली. अण्णा द्रमुकमधील सुप्त सत्तासंघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला. अखेरीस बर्‍याच सुंदोपसुंदीनंतर पलानीस्वामी गटाने पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळविले; पलानीस्वामी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले. त्याच सुमारास लोकसभा आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला आलेल्या अपयशाचे खापर अण्णा द्रमुकचे काही नेते भाजपशी असणार्‍या युतीवर फोडायला लागले होते. या युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले त्याचा तो आरंभबिंदू. गेल्या वर्षी अण्णा द्रमुकचे एक नेते पोन्नईयन यांनी राज्यात भाजपचा विस्तार हा अण्णा द्रमुकच्या जीवावर होतो आहे असे वक्तव्य केले होते.
 
 
bjp
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पाच जागा लढविल्या; पण पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र भाजपची उमेद वाढविणारे ठरले. भाजपने 20 जागा लढविल्या आणि चार जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरले. तब्बल वीस वर्षांनी भाजपला यशाची पुनरावृत्ती करता आली होती. तत्पूर्वी 2001 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चार जागा जिंकता आल्या होत्या. तामिळनाडूत आपली स्वीकारार्हता वाढते आहे याचा प्रत्यय भाजपला त्या निकालांतून आला असावा. कायम दुय्यम भूमिका घेतली तर स्वबळावर मार्गक्रमण करता येणार नाही याची जाणीव भाजपला असणार. त्यामुळे भाजपने त्यादृष्टीने आपली व्यूहनीती बदलली. त्यातील महत्वाचा निर्णय होता तो अन्नामलाई या तरुण नेत्याला प्रदेशाध्यक्षपद सोपविण्याचा.
 
 
के अन्नामलाई यांचा जन्म तामिळनाडूच्या पश्चिम भागातील. ते अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आणि लखनौ येथील आयआयएममधून एमबीएची पदवी घेतलेले बुद्धिमान तरुण. उद्योजक होण्याची त्यांची इच्छा होती; पण लोकांत मिसळून त्यांच्यासाठी काम करण्याच्या उर्मीतून त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि ते कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी झाले. त्यांच्यातील कर्तव्यनिष्ठतेचा प्रत्यय तेव्हापासूनच आला. गुटखा विक्रेत्यांवर धाडी घालण्यापासून बेकायदेशीर दारूविक्री दुकाने बंद करण्यापर्यंत अनेक धडाडीच्या मोहिमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. दक्षिण बेंगळुरूच्या उपयुक्त पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. पोलीसदलात असताना अन्नामलाई लोकप्रिय होते. एका अधिकार्‍याने सांगितल्याप्रमाणे त्यांची ओळख तीन ’एच’ने होत. ते असे- हॉनेस्टी, ह्युमननेस आणि हार्ड वर्क- म्हणजेच प्रामाणिकपणा, माणुसकी आणि मेहनत. त्या आपल्या प्रतिमेसह अन्नामलाई राजकरणात आले. 2019 साली त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला. 2020 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पुढच्याच वर्षी त्यांची नियुक्ती तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ते अरवकुरुची मतदारसंघातून उमेदवार होते. पण द्रमुकच्या उमेदवाराकडून ते पराभूत झाले. तथापि भाजपला मात्र चार जागांवर विजय मिळाला. यातील एका जागेवर भाजपच्या उमेदवार वासंती श्रीनिवासन यांनी अभिनेते कमल हसन यांचा पराभव केला होता.
 
 
कन्याकुमारी, नागरकॉइल या भागांत भाजपचा प्रभाव राहिलेला आहे. पण आता तो अन्य भागांत देखील वाढतो आहे. अण्णा द्रमुकला भाजपच्या या वाढत्या प्रभावाने काहीशी अस्वस्थता वाटत असल्यास नवल नाही. भाजपच्या या वाढत्या प्रभावाचा प्रत्यय गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आला. भाजपने तामिळनाडूत तळागाळात जाऊन पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. सुमारे 48 हजार बूथ, कमिट्या स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे. याचाच अर्थ भाजपचे कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सहा हजार वॉर्डांमध्ये आपले उमेदवार उतरविले होते. एकूण जागांच्या सुमारे 43 हे प्रमाण टक्के आहे. इतके उमेदवार भाजपला उतरविता आले म्हणजेच भाजपला मिळणारा प्रतिसाद हळूहळू वाढतो आहे. भाजपने या निवडणुकीत एकूण 308 जागा जिंकल्या. यापूर्वीच्या निवडणुकीत हा आकडा 226 होता. मात्र यातील उल्लेखनीय भाग हा की काही भागांत भाजपला लक्षणीय यश मिळाले. कोइंबतूरच्या काही मतदारसंघांत भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण 15 टक्के आहे. हे नगण्य नाही. महापालिकांमध्ये भाजपचे 22 उमेदवार निवडून आले; नगरपालिकांमध्ये 50 तर नगरपंचायतींमध्ये 230. ज्या वॉर्डांत भाजपला विजय मिळाला त्यापैकी 200 हे केवळ कन्याकुमारी भागांतील आहेत. तेव्हा तेथे भाजपचा विस्तार आहे आणि प्रभावही आहे. चेन्नईमध्ये तीस वॉर्डांमध्ये भाजप दुसर्‍या स्थानावर राहिला. शहरी भागांनी भाजपला नेहेमीच साथ दिली आहे. त्याचेच हे द्योतक म्हटले पाहिजे. कन्याकुमारी, कोइंबतूर या पलीकडे जाऊन वेल्लोर, मदुराई, चेन्नई अशा काही ठिकाणी भाजपने प्रथमच यश मिळविले. अन्नामलाई हे प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी बजावत असल्याची ही पावती म्हटली पाहिजे.
 
 
अन्नामलाई यांचा लौकिक हा आक्रमक नेत्याचा आहे. त्याचमुळे ते तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. त्यांनी काढलेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अगोदरच्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक सरकारांच्या भ्रष्टाचारावर अन्नामलाई निःसंकोचपणे टीका करतात. त्यामुळेही अण्णा द्रमुकची कोंडी झाली होती. अलिकडेच द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. अण्णा द्रमुक कात्रीत सापडले. भाजपने मात्र उदयनिधी यांच्यावर टीकेची झोड उठविली. अन्नामलाई यांनी तर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णा दुराई यांनी 1956 साली हिंदू धर्मावर मदुराई येथे टीका कशी केली होती आणि अखेरीस दिलगिरी व्यक्त केल्यानंतरच मदुराईमधून त्यांना जाता कसे आले होते याची आठवण करून दिली. याचे निमित्त करीत अण्णा द्रमुकने भाजपशी संबंध तोडले. भाजपने ते संबंध टिकावेत म्हणून यत्किंचितही प्रयत्न केले नाहीत; त्यावरूनच भाजपला देखील अण्णा द्रमुकशी संबंधांचे ओझे नको होते हे स्पष्ट झाले. आता भाजप द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांना पर्याय म्हणून तिसरा घटक म्हणून मतदारांच्या समोर जाऊ शकतो.
 
 
तामिळनाडूवर भाजपचे लक्ष आहे याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. काशी-तामिळ संगम आयोजित करण्यामागे सांस्कृतिक आदान प्रदानाचा मुख्य हेतू असला तरी तामिळनाडूशी संबंध दृढ करण्याचाही त्यामागे हेतू होता. नव्या संसद भवनात सेंगोल (राजदंड) ठेवण्यात आले त्याचाही संबंध तामिळनाडूशी होता. अर्थात या बरोबरच तामिळनाडूत भाजपने दमदार पावले टाकली आहेत असे दिसते. अन्नामलाई ज्या भागातील आहेत त्याच भागातील अण्णा द्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी आहेत. अन्नामलाई यांच्या वाढत्या प्रभावामुळे पलानीस्वामी यांना असुरक्षित वाटत असल्यास नवल नाही. त्या पक्षाने देखील भाजपशी खोडसाळपणा करण्याची संधी सोडली नाही. इरोडे मतदारसंघात या वर्षीच्या प्रारंभी पोटनिवडणूक झाली. तेव्हा अण्णा द्रमुकने आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक नसून राष्ट्रीय लोकशाही प्रागतिक आघाडीचे घटक पक्ष आहोत असे दर्शविणारे फलक लावले. त्याने भाजप नाराज होणे स्वाभाविक. भाजपच्या माहिती तंत्रज्ञान आघाडीच्या प्रमुखाने अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश केला तेव्हा अन्नामलाई यांनी भाजप तामिळनाडूत वाढतो आहे त्याचे हे संकेत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
 
 
येत्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत भाजप 39 पैकी किमान 25 जागांवर विजय मिळवेल अशी आशा अन्नामलाई यांनी व्यक्त केली आहे. अण्णा द्रमुकशी संबंध तोडून भाजपने स्वबळावर मार्गक्रमण करावे यासाठी ते आग्रही होतेच. अण्णा द्रमुक किंवा द्रमुक अशा प्रादेशिक पक्षांवर कायम विसंबून राहिले तर काँग्रेस जशी त्या राज्यात दुर्बल झाली तशी अवस्था भाजपची होईल, असा इशारा अन्नामलाई यांनी दिला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकशी युती असताना भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण पावणे चार टक्के होते. मात्र गेल्या चार वर्षांत भाजपने पक्षाची यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी भाजपला प्रतिसाद मिळतो आहे. तंजावर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीला बळजबरीने ख्रिस्ती धर्मात प्रवेश करण्यास भाग पाडण्यात आले होते; त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. अशा भागात भाजपला विचारधारेमुळे अनुकूलता लाभते आहे. अन्नामलाई यांची प्रतिमा एका धडाडीच्या आणि आक्रमक नेत्याची आहे. त्याचा लाभ भाजपला मिळेल अशी अपेक्षा आहे. अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांच्याकडून दोन-चार टक्के मतांची जरी दिशा बदलली तरी निवडणूक निकालांत लक्षणीय फरक पडलेला दिसेल. भाजपचा प्रयत्न ती दिशा बदलण्याचा आहे. त्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणार्‍या तरुणांना आकृष्ट करण्यासाठी भाजपचा राज्यभर प्रयत्न आहे. त्याशिवाय अण्णा द्रमुकमधील असंतुष्ट नेत्यांशी किंवा अण्णा द्रमुकमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन करणार्‍या टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या सारख्यांची साथ भाजप घेऊ शकतो. भाजपशी अण्णा द्रमुकने संबंध तोडल्यानंतर दिनकरन यांनी पलानीस्वामी यांच्या रक्तातच विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ती पुरेशी बोलकी आणि भाजपशी सलगीचे संकेत देणारी.
 
 
हा सगळा भाग व्यूहरचनेचा आहे. भाजप त्यावर यथायोग्य निर्णय घेईलच. तूर्तास तामिळनाडूत अण्णा द्रमुक-भाजप युती तुटली आहे. पण त्यामुळे अस्वस्थ न होता भाजपने स्वबळावर पुढे जाण्याचा निर्धार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाली नाही; पण काँग्रेस आणि डाव्यांना बाजूला सारून विरोधी अवकाश भाजपने भरून काढला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजप हा पल्ला गाठेल अशी अपेक्षा काही वर्षांपूर्वी पर्यंत कोणी केली नसती. तामिळनाडूत भाजपला तीच उर्मी आणि अपेक्षा आहे. तामिळनाडूत भाजपला वाट सोपी नाही हे नाकारणे भाबडेपणाचे. पण कसोटी असते तिथेच संधी असते. भाजपने आता तामिळनाडूत ‘एकला चलो रे’चा निर्णय घेतला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 1905 साली लिहिलेली ही प्रख्यात कविता. विपरीत परिस्थितीत देखील आपले मत ठामपणे मांडणे आणि कर्तव्य पथावर एकट्याने न डगमगता अग्रेसर होणे याची प्रेरणा देणारी ती कविता. तामिळनाडूत भाजपच्या धोरणाला ती चपखल लागू पडते. अण्णा द्रमुकने युती तोडली याकडे भाजप संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहत आहे. पांगुळगाड्याशिवाय चालल्याखेरीज स्वबळाचा आत्मविश्वास निर्माण होत नाही.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार