तिरंगा यात्रा फॉर पी.ओ.के.

विवेक मराठी    07-Oct-2023   
Total Views |
पाकव्याप्त काश्मीरचा जो भूभाग पाकिस्तानने बळजबरीने बळकाविला आहे तो परत करावा या मागणीसाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या नेतृत्वात देशभरातील हजारो मुस्लीम महिला-पुरुष-तरुणांनी एकत्र येऊन लाल किल्ला ते चांदणी चौक आणि परत असा मोर्चा काढला. मुस्लीम मंचाच्या झेंड्याखाली भारतीय मुस्लिमांनी पीओकेतील आपल्या मूळ भारतीय मुस्लीम बंधूंना यानिमित्ताने आवाहनदेखील केले की, या... भारतात सामील व्हा... तुमचे स्वागत आहे.
 
tiranga

रविवार दिनांक 1 ऑक्टोबर या दिवशी भर दुपारी दिल्लीकरांनी एक इतिहास घडताना अनुभवला. भारताच्या काश्मीरचा जो भूभाग पाकिस्तानने बळजबरीने बळकाविला आहे तो परत करावा या मागणीसाठी मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या नेतृत्वात देशभरातील हजारो मुस्लीम महिला-पुरुष-तरुणांनी एकत्र येऊन लाल किल्ला ते चांदणी चौक आणि परत असा मोर्चा काढला. हातात तिरंगा ध्वज घेऊन, पाकव्याप्त काश्मीर खाली करो, पीओके से आयी आवाज हिंदुस्तान-हिंदुस्तान अशा घोषणांचे फलक हातात घेत, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत देशाच्या सर्व प्रांतातून आलेले हे मुस्लीम पाकिस्तानला जणू एक इशाराच देत होते.
 
 
या यात्रेचे गुरुद्वारा शीश गंज, सुनहरी मस्जिद, दिगंबर जैन मंदिर, गौरीशंकर मंदिर आणि सेंट स्टिफन्स चर्च अशा रस्त्यात येणार्‍या सर्व ऐतिहासिक धर्मस्थळी जंगी स्वागत झाले. मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल, डॉ. शाहीद अख्तर, अबू बकर नक्वी, इलियास अहमद, शालिनी अली, फातिमा अली, शहनाझ अफझल, शमीम बानो आणि अन्य नेते या मोर्चाच्या अग्रस्थानी होते आणि मोर्चातील लोकांचे मार्गदर्शन करीत होते. सुफी मलंग संप्रदायाचे मुस्लीम धर्मगुरूदेखील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पगडीमुळे उठून दिसत होते.
 
 
केंद्रीय मंत्री आणि माजी सेनाध्यक्ष जनरल व्ही. के सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात उपस्थित होते. लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक मैदानावरून जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, तो दिवस आता फार दूर नाही जेव्हा पीओकेचा भारतात समावेश होईल. (वो दिन अब दूर नहीं जब गुलाम कश्मीर पीओके एक बार फिर से भारत का होगा).
 
 
मुस्लीम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक अणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी आपल्या भाषणात एक पाऊल पुढे जावून भविष्यवाणी केली की, अगदी नजीकच्या काळात पीओके सोबत बलुचिस्तान आणि सिंधदेखील पाकिस्तानच्या अत्याचारामुळे, आणि कोसळत्या अर्थव्यवस्थेमुळे वेगळे होतील. (बहुत जल्द ही पीओके के साथ साथ बलुचिस्तान अनुर सिंध भी पाक की नापाक हक्षकतीं, बदनीयती और बहुत तेजी से चरमराती अर्थव्यवस्था ले कारन अलग हो जायेगा).
 


tiranga
 
माजी सेना प्रमुख जनरल सिंग यापूर्वीही अनेकदा पीओके संदर्भात असे वक्तव्य देत आले आहेत. परंतु मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून असे वक्तव्य करणे हे विशेष महत्त्वाचे आहे. जनरल सिंग आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, इंग्रजांनी कारस्थान करून देशाची फाळणी केली आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर पाकिस्तानने 1947 मध्ये काश्मीरवर आक्रमण करून भारताचा एक लाख बहात्तर हजार चौरस किमी भूभाग बळजबरीने बळकाविला. आजपावेतो त्या भूभागावर पाकिस्तानचा अवैध ताबा आहे. भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना जबाबदार ठरवीत जनरल सिंग यांनी आरोप केला की माउंटबॅटन यांनी पंतप्रधान नेहरू यांना चुकीचा सल्ला दिला आणि काश्मीरला भारतापासून तोडण्याचे कारस्थान रचले.
 
 
पीओकेमध्ये जे लोक राहतात त्यांच्यापैकी अनेकांचे नातेवाईक भारतीय प्रदेशात राहतात त्यामुळे पाकिस्तानला नेहमी अशी भीती वाटत असते की आपल्या भारतीय नातेवाईकांच्या मदतीने पीओकेतील लोक पुन्हा भारतात सामील होतील. त्यामुळे पीओके मधील नागरिकांना पाकिस्तान सरकारने सतत दाबून ठेवले. पण आता तो दिवस दूर नाही जेव्हा लवकरच पीओकेचा भूभाग पुन्हा एकवार भारतात सामील होईल. पीओके भारताचाच होता, आहे आणि नेहमीच असेल याचा जनरल सिंग यांनी जोरदार शब्दात पुनरुच्चार केला त्यावेळी उपस्थित मुस्लीम समुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला आणि भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणांनी लाल किल्याचा परिसर दणाणून सोडला.


tiranga
इंद्रेश कुमार आपल्या भाषणात म्हणाले की, पाकिस्तानचे सरकार हे जुलमी सरकार आहे आणि भारताचे सरकार हे शांतताप्रिय, आणि प्रगतीचे सरकार आहे. भारताच्या सरकारच्या काळात या देशातील सुख, शांती आणि सांस्कृतिक वातावरण बघता पीओकेमधील लोकांना (जे आपलेच बांधव आहेत) भारतासोबत एकत्र येण्याची इच्छा होणे स्वाभाविकच आहे. पीओकेमध्ये एक सैन्य सोडले तर पाकिस्तानचे काहीच अस्तित्व नाही. तेथे पाकिस्तानचे चलन चालत नाही, पोस्टाचे तिकीटदेखील चालत नाही आणि पाकिस्तानचा राष्ट्रध्वजदेखील नाही. तेथील लोक स्वत:ला भारताचेच नागरिक समजतात आणि भारतासोबत येण्याचे स्वप्न पाहतात.
 
संयुक्त अरब अमिरातीच्या उपपंतप्रधान सैफ बिन जायद अल नाह्यान यांनी तर पीओके हा भारताचाच अभिन्न भूभाग असल्याचे विधान केले आहे. त्यांनी भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक मार्गाचा एक नकाशा जारी केला असून त्यात पीओके आणि अक्साई चीन हे भारतीय भूप्रदेश असल्याचे दाखविले आहे आणि हेच सत्य आहे, असे इंद्रेश कुमार यांनी ठासून सांगितले.
 
 
याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करीत इंद्रेश कुमार म्हणाले की पीओकेचा भूप्रदेश पाकिस्तानच्या घशात जावू देणे ही तत्कालीन भारत सरकारची मोठीच चूक होती. इंग्रजांनी ज्यावेळी भारताची फाळणी केली त्यावेळी संपूर्ण काश्मीर हा भारताचा भूप्रदेश म्हणून मान्य केला होता. त्यामुळे आज जो पीओकेचा प्रदेश आहे तो भारतीय भूप्रदेशच होता. आजही जम्मू काश्मीरच्या विधानसभेत पीओकेतील लोकांच्या प्रतिनिधींसाठी 24 जागा रिकाम्या सोडल्या जातात. आजपावेतो पाकिस्तानने तेथे कोणतीच निवडणूक घेतली नाही हे विशेष.

tiranga 

या तिरंगा मार्चसाठी जम्मू-काश्मीर-लडाखमधून सुमारे 200 हून अधिक कार्यकर्ते लाल किल्ल्यावर उपस्थित होते. तसेच तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या दक्षिणेतील राज्यातून आणि आसामसारख्या दूरवरच्या प्रदेशातून ही मोठ्या संख्येने मुस्लीम महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. पाकिस्तान पीओकेखाली करो-खाली करो, पिओके से आई आवाज हिंदुस्तान-हिंदुस्तान अशा घोषणांनी रंगलेले फलक हातात आणि तिरंगा पताका फडकावीत हा मार्च दिल्लीच्या ऑक्टोबर हिटची पर्वा न करता यशस्वीरित्या संपन्न झाला.
 
 
यापूर्वी मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल आणि जम्मू काश्मीरचे क्षेत्रीय संयोजक मीर नझीर यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये 9 ते 30 ऑगस्ट या काळात अशी एक मोहीम चालवली होती. त्या मोहिमेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या संख्येने काश्मिरी मुस्लीम या तिरंगा मार्चमध्ये सहभागी झाले होते.
 
 
मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. शहीद अख्तर यांनी सांगितले की मंचाने देशव्यापी आंदोलन करीत घटनेतील कलम 370 आणि 35ए यासारख्या काश्मीरमध्ये वेगळेपणाची भावना जोपासणार्‍या तरतुदींचा भरपूर प्रखर विरोध केला होता. मंचाच्या दबावामुळे सरकारने या कलमांची घटनेतून हकालपट्टी केली आणि हे दाखवून दिले की भारत सरकार काश्मिरी नागरिकांचे भलेच करू इच्छिते आणि त्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. ते म्हणाले, आज पुन्हा भारतीय मुस्लिमांनी निश्चय केला आहे की पडेल ती किंमत देऊन पीओकेचा भारतात विलय करूनच दाखवू.
 
गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानातील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे हे सगळे जग पाहत आहे. त्यांची आर्थिक स्थिती तर अत्यंत हलाखीची झाली आहे आणि आता तर तो देश भिकारीसुद्धा निर्यात करू लागला आहे असे वृत्त आहे. पाकिस्तानचे अस्तित्वच मुळी भारताच्या द्वेषावर आहे. त्यापायी बांगलादेश वेगळा झाला आणि आता बलुचिस्तान, सिंध, गिलगीट-बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद हे प्रदेशदेखील वेगळे होण्याची भाषा बोलत आहेत. काश्मीर भारतापासून तोडण्याचे पाकिस्तानचे फार जुने स्वप्न आहे पण अलीकडच्या भू-राजकीय घडामोडी बघता पाकिस्तानचे हे निव्वळ स्वप्नच राहील असेच संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिप्लोमसीमुळे जागतिक मत हे पाकिस्तानच्या अगदी विरोधात जरी नसले तरी त्यांच्या आंधळ्या समर्थनात सुद्धा नाही. मोदींनी पाकिस्तानची खूपच कोंडी करून टाकली आहे आणि बलुचिस्तान-सिंध आणि पीओकेसारख्या भागातील नागरिकांच्या असंतोषाच्या परिस्थितीकडे त्यांचे निश्चितच लक्ष असणार. मुस्लीम मंचाच्या झेंड्याखाली भारतीय मुस्लिमांनी पीओकेतील आपल्या मूळ भारतीय मुस्लीम बंधूंना या निमित्ताने आवाहनदेखील केले की, या... भारतात सामील व्हा... तुमचे स्वागत आहे.