पपेट सादरीकरण - विधायक वळण देणारी स्पर्धा...

विवेक मराठी    07-Oct-2023   
Total Views |

shikshan vivek
शिक्षण विवेकच्या माध्यमातून पपेट सादरीकरण स्पर्धा दरवर्षी जाहीर होतात. या स्पर्धेला विविध शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळतो. दरवर्षी विषय जाहीर झाल्यापासून ते स्पर्धा पार पडेपर्यंत मुल-पालक-शिक्षक या स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेत असतात. या स्पर्धेचा उद्देश मुलांच्या मन-मेंदू-मनगट यातला समन्वय साधणे आणि पालक-मुलांमधला संवाद वाढण्यासाठी केलेले प्रयत्न या निमित्ताने दिसून येतात. हेच शिक्षण क्षेत्रातलं आणि पर्यायाने समाजातील सकारात्मक चित्र आहे.
2016-2017 च्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विवेकमध्ये पहिल्यांदा पपेट सादरीकरणाची स्पर्धा जाहीर केली. पहिल्याच वर्षी फारशी अपेक्षा नसताना, या स्पर्धेला विविध शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी पहिल्या वर्षी आपण ‘पाऊस आणि निसर्ग’ हा विषय दिला आणि त्यातून अनेक शाळांच्या गटांनी अत्यंत नेटकी आणि सुरेख सादरीकरणं केली. तीन मुलांच्या गटाने सादरीकरण करायचं आणि त्याच बरोबरीने पपेटच्या हालचालीतून आपण गोष्ट उलगडत न्यायची असं स्पर्धेचं स्वरूप असतं.
 
 
या स्पर्धेत वय वर्षे 4 पासून 16 वयापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतात. त्यांच्या शिक्षक आणि पालकांचे वेगळे गटही या स्पर्धेत सहभागी होतात. स्पर्धा सुरू केली, तेव्हा मुलांच्या मन-मेंदू-मनगट यातला समन्वय जसा गृहीत धरला होता, तसाच त्यांचं पाठांतरही तितकंच महत्त्वाचं मानलं होतं, पण त्याहीपेक्षा तीन पालकांनी एकत्र येऊन दिलेल्या विषयावर विचार करणं, त्यासाठी त्यांनी लेखन करणं, मुलांनी सराव करावा यादृष्टीने त्यांनी वारंवार भेटणं, स्वत:च्या मुलांशी पालकांचा संवाद घडावा, तसंच त्याच्या मित्रमैत्रिणींशी संवाद घडावा, त्यातूनच मैत्रीचं एक नातं निर्माण व्हावं असा उद्देश होता. एकीकडे अनेकांचं इतरांशी असणारं सलोख्याचं नातं कमी झालेलं असण्याच्या काळात, ‘संवाद साधण्याची, त्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी पपेट सादरीकरणामुळे आम्हाला मिळते आहे’, अशी पालकांची मिळणारी प्रतिक्रिया स्पर्धा ज्या हेतूने घेतली तो हेतू सफल करताना दिसते.
 
 
गेल्या अनेक वर्षांत ही स्पर्धा बहरते आहे. दरवर्षी आपल्याला सामाजिक सौख्य जपणार्‍या विषयांचा परामर्श या स्पर्धेच्या निमित्ताने घेता आला. मुलांच्या भावविश्वाचा धांडोळा तर घ्यायचा, सामाजिक जाणीवा तर त्यांच्या मनात रुजवायच्या; त्याचवेळी त्यांना आकलन होणार नाही असे विषय टाळायचे, अशी तारेवरची कसरत दरवर्षी करावी लागते. म्हणूनच मग ‘पाऊस, निसर्ग, आपलं कुटुंब, शाळा, जंगल, जीवन कौशल्याच्या गोष्टी, कार्टूनच्या गोष्टी’ अशा विषयांमधूनही पालकांच्या साहाय्याने मुलांनी विषय सोपे करून इतरांना समजेल अशी गोष्ट सादर करणे आणि समोर कुणीही दिसत नसताना, पडद्याच्या मागून हातांमध्ये पपेट घालून, आवाजाच्या चढउतारांमधून गोष्ट सांगण्याचं आवाहन मुलं लीलया पेलतात. पपेट तर आईबाबांच्या मदतीने स्वत: तयार करतात. दरवर्षी विषय जाहीर केला, की पालकांचं विषय समजून घेणं आणि त्यासाठी विविध गोष्टींचा विचार करत गटात सहभागी असणार्‍या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी समन्वय साधत स्पर्धेसाठी येणं आणि सादरीकरण करणं एकूणच महत्त्वाचं ठरतं. विषयांनुसार गोष्ट निवडणं, ती लिहिणं आणि लिहून झाल्यावर त्यासाठी पपेट तयार करणं अशी दीर्घ प्रक्रिया एका स्पर्धेसाठी पालक-मूल जोडी करते. पालक-मुलांमधला संवाद वाढला पाहिजे, अशी भावना सगळ्यांच्याच मनात असते, ती भावना अशी सकारात्मक पद्धतीने समोर येताना दिसणं हेच शिक्षण क्षेत्रातलं आणि पर्यायाने समाजातील सकारात्मक चित्र आहे.
 

shikshan vivek 
 
गेल्या सहा वर्षांत ही स्पर्धा गुणात्मक आणि संघटनात्मकही वाढत गेली. कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात तर या स्पर्धेने मुलांना 15 दिवसांचा विरंगुळा दिला. महाराष्ट्रातून 350 हून अधिक व्हिडिओ या स्पर्धेसाठी आले होते. त्या वेळी ‘जंगल, जंगलातले भावविश्व, प्राण्यांचे भावविश्व’ शब्दश: मुलांनी आपल्या सादरीकरणातून उभं केलं. तेच दृश्य या वर्षीच्या स्पर्धेतही दिसलं. ‘कार्टूनच्या गोष्टी’ हा विषय दिल्यावर थोडी उत्सुकता होती, की नेमकं काय येईल समोर? पण स्पर्धा सुरू झाली आणि ही उत्सुकता आनंदाने भारून गेली. स्पर्धा जाहीर करताना वाटलं होतं, की पालक कदाचित कार्टूनच्या गोष्टी अनुवादित करून सादर करतील; पण असं घडलं नाही, पालकांनी-शिक्षकांनी नव्याने गोष्टी रचून सामाजिक आशय, तोही मुलांच्या भावविश्वाला रिलेट होणारा सामाजिक, पर्यावरणीय आशय सादरीकरणातून मांडला. त्यासाठी पपेट तयार केले. चांद्रयान यशस्वी झाल्याबद्दल शिनचॅन, डोरेमॉन यांना इसरोच्या शास्त्रज्ञांना भेटायची इच्छा होणं आणि त्यांनी भारताला भेट देणं ही संकल्पना अभिनव भारताची आहे किंवा शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना कार्टूनने भेटण्यासाठी धडपडणं, गणपतीच्या मिरवणुकीत कार्टूनने ढोल ताशा वाजवणं आणि प्रबोधन करणं, आमच्यासाठी आमचं कुटुंब महत्त्वाचं आहे, अशा विविध विषयांवरच्या गोष्टी पपेट सादरीकरणात होत्या. या वर्षी साधारण 200 गटांनी सादरीकरणं केली. या वर्षीच्या पपेट स्पर्धेमध्ये एक आणखी आनंददायी बाब घडली, ती म्हणजे ‘बाबा पालकांचा उत्स्फूर्त सहभाग.’ स्पर्धेसाठी आई पालकांनीच पुढाकार घ्यायचा असतो, असा प्रघात असण्याच्या पार्श्वभूमीवर बाबा पालकांचा सक्रीय सहभाग हा पुढील काळातील बदलाचं सुचिन्ह घेऊन आलेला आहे.
 
 
स्पर्धेच्या काळात, स्पर्धेमध्ये नंबर येण्याचं महत्त्व असूनही आपले सगळे स्पर्धक स्वतःच्या क्षमता आजमावयाला येतात. खरं तर शिक्षण विवेकच्या दृष्टीने हा उपक्रम आहे. कोणतेही रोख रकमेचे पारितोषिक द्यायचे नाही, असा नियम घालूनही 200 च्या आसपास गट सहभागी होतात, त्यासाठी मेहनत घेतात, आपल्या क्षमता आजमावतात, हेच स्पर्धा या शब्दाला लाभलेलं चांगलं, विधायक वळण आहे, असं म्हणावसं वाटतंय.
 



shikshan vivek 
 
राष्ट्रीय शिक्षण धोरणात मनोरंजनात्मक कला, अभिनव स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. स्पर्धा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची जाणीव रुजवावी याचे उल्लेख आवर्जून आलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण विवेकच्या काव्य अभिवाचन, नाट्यछटा, प्रश्नमंजुषा, गोष्ट सांगणे स्पर्धा, लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला पूरक असल्यानेच शाळांना साहाय्यभूत ठरणार्‍या आहेत.
मुलांच्या घडणीत शिक्षण विवेकचा सहभाग मोलाचा
 
शिक्षण विवेक आयोजित करत असलेल्या पपेट सादरीकरणाच्या स्पर्धेत माझी मुलगी नभा गेल्या 5 वर्षांपासून सहभागी होत आहे. या स्पर्धेमुळे तिच्या जडणघडणीत खूपच सकारात्मक बदल झालेले मला जाणवले. दरवर्षी मुलांच्या भावविश्वाला साजेसे असे विषय असल्याने मुलं आनंदाने सहभागी होताना दिसली. विषयानुरूप गोष्ट लिहिणे, आपापल्या कल्पकतेने पपेट्स तयार करणे, पाठांतर करणे, एखाद्याचं चुकलं तरी गटातील सर्व मुलांनी एकमेकांना सांभाळून घेणे या गोष्टी आपोआप आणि सहज घडत गेल्या. यातून नभाचा रंगमंचावरील धीटपणा वाढत गेला. व्यक्तिमत्त्व विकास होण्याची संस्कारांची बीजं यासारख्या स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षण विवेक अविरतपणे रुजवत आहे असे एक पालक म्हणून माझे प्रांजळ मत आहे. माझी मुलगी नभा शाळेसोबतच ’शिक्षण विवेक’मध्ये घडताना दिसत आहे याचा मला खूप आनंद आहे.
 
- वलय मुळगुंद (पालक - नवीन मराठी शाळा, पुणे)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धा नाही तर निखळ आनंदाचा ठेवा
 
समजा तुम्ही एखाद्या बागेत किंवा प्राणी संग्रहालयात गेलात आणि तिथली फुले किंवा प्राणी पक्षी तुमच्याशी बोलू लागले तर? तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? अर्थात जर असे काही झालेच तर ते सगळे काय बोलतील आपल्याशी? किंवा आपल्याला काय सांगतील?
हाच प्रश्न किंवा हीच परिस्थिती माझीही झाली होती, निमित्त होते शिक्षण विवेक आयजित ’आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धेचे’.. अगदी छोट्या बालगटापासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला ही मोठी आनंदाची गोष्ट होती. आजूबाजूचा निरागस वावर, कार्टूनच्या जगातल्या डोरेमोन, नोबिता, भीम ,कालिया, चुटकी पासून लिटिल कृष्णा, शिवाजी महाराज ते चंद्र, पृथ्वी, झाडे, फुले अशा सगळ्यांची भेट, पालकांचा उत्साह आणि त्यावरची कडी म्हणजे त्यांचा उत्स्फूर्त सहभाग सुखावून गेला. आत्ताचे पालक मुलांना स्वप्न द्यायला कमी पडतात हे मात्र जाणवले. मुले जेवढी स्वप्न बघतील तेवढी ती आपल्या ध्येयाकडे सजगतेने बघतील असे मला वाटते. अर्थात स्पर्धेतील यशापेक्षा पपेट तयार करताना आणि त्यांच्यासोबत सादरीकरण करतानाचा मुलांनी अनुभवलेला निखळ आनंद देखील तेवढाच मोठा होता. स्पर्धा छान खेळीमेळीत पार पडली.
 
मानसी चिटणीस स्पर्धा परीक्षक
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुलांची विचारशृंखला अखंड
सुरू राहण्यास मदत
विद्यार्थी-पालक-शिक्षक या त्रयींसाठी लेखन, वाचन व विविध स्पर्धा-उपक्रमांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याचे व प्रसिद्ध होण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे शिक्षण विवेक. बालकांपासून पालकांपर्यंत सर्वांचीच आवडती स्पर्धा म्हणजे पपेट सादरीकरण स्पर्धा. या स्पर्धेत सर्व वयोगटातील विद्यार्थी तसेच पालक परकाया प्रवेश करून निर्भीडपणे सादरीकरण करताना दिसतात. आमच्या महिलाश्रम हायस्कूलमधील विद्यार्थिनी पपेट सादरीकरणासाठी संहिता स्वतः लिहितात, त्यामुळे लेखनातील त्यांचा आत्मविश्वास निश्चितच दुणावत आहे. दिलेल्या विषयानुसार विद्यार्थिनी स्वतः पपेटस तयार करत असल्यामुळे त्यांच्यातील कलागुणांनाही वाव मिळत आहे. शिक्षण विवेकच्या स्पर्धा-उपक्रमांच्या शृंखलांमुळे विद्यार्थिनींची विचारशृंखला अखंड सुरू राहण्यास मदत होत आहे. शिक्षण विवेकरुपी मराठी भाषिक चळवळीत माय मराठीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त होत आहे हे माझे भाग्यच आहे.
शिक्षिका - प्रेमला अरुण बराटे
महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर ,पुणे-52
मुलांची विचारशृंखला अखंड
सुरू राहण्यास मदत
विद्यार्थी-पालक-शिक्षक या त्रयींसाठी लेखन, वाचन व विविध स्पर्धा-उपक्रमांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याचे व प्रसिद्ध होण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे शिक्षण विवेक. बालकांपासून पालकांपर्यंत सर्वांचीच आवडती स्पर्धा म्हणजे पपेट सादरीकरण स्पर्धा. या स्पर्धेत सर्व वयोगटातील विद्यार्थी तसेच पालक परकाया प्रवेश करून निर्भीडपणे सादरीकरण करताना दिसतात. आमच्या महिलाश्रम हायस्कूलमधील विद्यार्थिनी पपेट सादरीकरणासाठी संहिता स्वतः लिहितात, त्यामुळे लेखनातील त्यांचा आत्मविश्वास निश्चितच दुणावत आहे. दिलेल्या विषयानुसार विद्यार्थिनी स्वतः पपेटस तयार करत असल्यामुळे त्यांच्यातील कलागुणांनाही वाव मिळत आहे. शिक्षण विवेकच्या स्पर्धा-उपक्रमांच्या शृंखलांमुळे विद्यार्थिनींची विचारशृंखला अखंड सुरू राहण्यास मदत होत आहे. शिक्षण विवेकरुपी मराठी भाषिक चळवळीत माय मराठीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त होत आहे हे माझे भाग्यच आहे.
शिक्षिका - प्रेमला अरुण बराटे
महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर ,पुणे-52