हिमालयाच्या जन्मकथेचानव्याने उलगडा

विवेक मराठी    21-Nov-2023   
Total Views |
डॉ. श्रीकांत कार्लेकर
 99764769791
 
Himalayas
ऑगस्ट 2023च्या सुरुवातीला, प्रख्यात भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रितेश आर्य यांनी लदाखमध्ये समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर सागरी प्राण्यांचे चांगले जतन झालेले जीवाश्म शोधून काढले होते. सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी टेथिस समुद्रातून बाहेर पडलेल्या सागरी गाळातून हिमालयाचा जन्म झाला असावा, या संकल्पनेची पुष्टी झाली. यानिमित्त इओसीन काळातील पृथ्वीच्या इतिहासातील रहस्ये आणखी उलगडण्यासाठी या संशोधनाचा मोठा उपयोग होईल.
 
प्रख्यात भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रितेश आर्य यांनी पूर्व लदाख हिमालयात बुर्तसे/बुर्त्से येथे समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर प्रवाळ खडकांचे (Coral Reef) जीवाश्म (Fossils) नुकतेच (18 ऑक्टोबर 2023 रोजी) शोधून काढले आहेत. भूजल संशोधन करत असताना त्यांनी हा महत्त्वपूर्ण शोध लावला.
 
 
लेहच्या उत्तरेला 135 कि.मी. अंतरावर देपसांग मैदान हा प्रदेश आहे. देपसांग किंवा बुर्तसे/बुर्त्से उंचवटा (Burtse Bulge) हे क्षेत्र देपसांग मैदानाच्या दक्षिणेस आहे आणि त्या मैदानांत बुर्त्सा नाल्याचे खोरे आहे. हा नाला अक्साई चीन प्रदेशात उगम पावतो आणि पश्चिमेकडे वाहत देपसांग नाल्यात विलीन होतो. लदाखमधील हा बुर्त्सा नाला अखेरीस श्योक नदीला जाऊन मिळतो. लदाखमधील बुर्त्सेचा भूभाग, काराकोरम पर्वतरांगेतील जुन्या रेशीम मार्गाजवळील (Silk route) एक प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे या स्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. बुर्त्सा 4800 मीटर उंचीवर आहे. बुर्त्सा नाल्याचा उगम 5300 मीटर उंचीवर आहे आणि आजूबाजूच्या टेकड्या 5500 ते 5600 मीटर उंचीच्या आहेत. देपसांग मैदान हे भूरूपशास्त्रदृष्ट्या एक आंतरपर्वतीय मैदान असावे, असे दिसून येते. याच भागात डॉ. आर्य यांना हे जीवाश्म सापडले.
 
 
ऑगस्ट 2023च्या सुरुवातीला, डॉ. रितेश आर्य यांनी लदाखमध्ये समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर सागरी प्राण्यांचे चांगले जतन झालेले जीवाश्म शोधून काढले होते. सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी टेथिस समुद्रातून बाहेर पडलेल्या सागरी गाळातून हिमालयाचा जन्म झाला असावा, या संकल्पनेची पुष्टी झाली.
 
 
नेहमीच उष्णकटिबंधीय, उथळ पाण्याशी संबंधित असणारे प्रवाळ खडक, लदाखच्या खडबडीत (Rugged) आणि उच्च-उंचीच्या हिमालयीन प्रदेशात आढळणे ही अगदीच अनपेक्षित घटना आहे. बुर्त्से येथील प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांचा हा शोध हिमालय निर्मितीच्या सगळ्या संकल्पनांना छेद देणारा आणि हिमालयाच्या भूशास्त्रीय इतिहासाचे पुनरावलोकन करण्यास भाग पाडणारा आहे, असे डॉ. आर्य यांचे मत आहे.
 
Himalayas 
 भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रितेश आर्य जीवाश्म दाखवताना
 
 
प्रवाळ खडक ही कॅल्शियम कार्बोनेटद्वारे एकत्र धरून ठेवलेल्या प्रवाळांच्या वसाहतींचा समावेश असलेली समुद्राच्या पाण्याखालची परिसंस्था आहे. ह्या खडकांचे अस्तित्व निरोगी सागरी पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पृथ्वीवरील दुर्मीळ आणि उत्कृष्ट परिसंस्थांपैकी एक असलेली ही परिसंस्था सगळ्या समुद्री प्रजातींपैकी सुमारे 25 टक्के प्रजातींसाठी अन्न आणि निवारा यांचा स्रोतही आहे.
 
 
डॉ. रितेश आर्य यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सापडलेल्या जीवाश्मांत प्रवाळ वसाहतींच्या गुंतागुंतीच्या रचनांचा समावेश असल्याचे दिसून येते. या रचनांमुळे प्राचीन काळात टेथिस समुद्राच्या पाण्याखाली कसे जीवन असावे, त्याची आपल्याला ओझरती कल्पना येऊ शकते. हे जीवाश्म म्हणजे प्राचीन काळात या भागातील समुद्रतळावर असलेल्या अविश्वसनीय अशा जीवविविधतेचा ज्वलंत पुरावाच आहेत. हा शोध म्हणजे केवळ भूवैज्ञानिक आश्चर्य नाही, तर पृथ्वीच्या आणि विशेषत: हिमालयाच्या भूतकाळात डोकावण्याची संधी त्यामुळे मिळते. समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर या जीवाश्मांची उपस्थिती हिमालयाच्या भूवैज्ञानिक इतिहासाच्या सर्व प्रस्थापित पूर्वकल्पनांना आव्हान देणारी आहे. एकेकाळी भारतीय प्लेटची युरेशियन भूतबकाशी टक्कर झाल्यामुळे हिमालय निर्माण झाला, असे मानले जाते. प्रवाळ खडकांचा शोध या प्रदेशासाठी पूर्णपणे वेगळा असा भूतकाळ सूचित करतो, जेव्हा इथे एकेकाळी सागरी जीवनाची भरभराट झाली होती. हिमालयाची सगळी जन्मकथाच त्यामुळे पुन्हा तपासून पाहावी लागणार आहे.
 
Himalayas 
 
समुद्रातील प्रवाळ खडक हे केवळ भूवैज्ञानिक रूपच नाहीत, तर पृथ्वीच्या हवामानाच्या रहस्यांचे ते भांडारदेखील आहेत. लेह-लदाखचा प्रदेश कदाचित एकेकाळी संपन्न सागरी जीवनाने समृद्ध असेल. हिमालयाच्या निर्मितीच्या काळात असलेले समुद्रपृष्ठाचे तापमान आणि त्या वेळी झालेले समुद्रपातळीतील चढउतार या गोष्टींची कल्पनाही प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांच्या अस्तित्वामुळे येऊ शकते. या जीवाश्मांचा अभ्यास पृथ्वीवरील हवामानाच्या इतिहासातील आणि आत्तापर्यंत झालेले हवामान बदल याविषयीच्या आपल्या ज्ञानात नक्कीच मोलाची भर टाकू शकेल, यात शंका नाही.
 
 
या निष्कर्षांमध्ये हिमालयाच्या निर्मितीबद्दलची आपली समज बदलण्याची क्षमता आहे. लदाख हे एकेकाळी आजच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न भूवैज्ञानिक भूदृश्य (Landscape) असले पाहिजे. समृद्ध सागरी जीवन, प्रवाळ खडक आणि समुद्रकिनारे यांनी ते संपन्न असावे. डॉ. आर्य यांच्या म्हणण्याप्रमाणे बुर्त्सेचा भूगर्भशास्त्रीय इतिहास दक्षिणेकडील रामेश्वरम किंवा अंदमान-निकोबार बेटांच्या समुद्रकिनार्‍यांसारखाच असावा.
 
 
 
डॉ. आर्य यांच्या या संशोधनाचे महत्त्व कळण्यासाठी प्रवाळ आणि प्रवाळ खडक ज्या प्रकारच्या पर्यावरणात वाढतात, ते समजून घेणे गरजेचे आहे. सध्याच्या युगातील प्रवाळ हे खंडीय मंचावर - समुद्रबूड जमिनीवर (Continental shelfवर) आणि खोल समुद्रातील बेटांच्या आवतीभोवती वाढताना आढळतात. समुद्राच्या पाण्याचे 16 अंश ते 36 अंश सेल्सिअस इतके तापमान, दर हजारी 25 ते 40 इतकी क्षारता, घट्ट व गुळगुळीत सागरतळ, पाण्याची सहज हालचाल आणि जोरदार भरती प्रवाह अशी परिस्थिती असणारे अपतट (Offshore) प्रदेश प्रवाळवाढीला आदर्श प्रदेश असतात. गाळयुक्त प्रवाह किंवा गाळाचे संचयन प्रवाळांच्या वाढीला प्रतिकूल असते.
 
 
समुद्रात 20 मीटर खोलीपर्यंत सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात पोहोचू शकतो. त्यामुळे या खोलीपर्यंत प्रवाळांची चांगली वाढ होऊ शकते. जगात अनेक ठिकाणी 60 ते 70 मीटर खोलीवरही प्रवाळ आढळतात, मात्र त्यातील काही मृत असतात. मृत प्रवाळांच्या वसाहतीतच नवीन प्रवाळ जन्म घेतात आणि त्यामुळे प्रवाळ मंचांचा विस्तारही वाढतो.
 
 
Himalayas
 
प्रवाळ आणि प्रवाळ खडक हा समुद्रातील जीवविविधतेचा एक अतिशय सुंदर असा आविष्कार आहे. यात आढळणारी विविधता इतकी विलक्षण असते की फक्त सदाहरित वर्षावनातील वैविध्याशीच तिची तुलना होऊ शकते. प्रवाळ जीव समुद्राच्या ज्या पर्यावरणात वाढतात, त्या बाबतीत ते फारच संवेदनशील असतात. पर्यावरणात झालेला किंचितसा बदलही त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणू शकतो. प्रवाळ मंच (Coral Reef) तयार करणारे प्रवाळ (Corals) हे एकत्रितपणे चुन्याचे संचयन करून विस्तृत वसाहती करणारे सागरी जीव आहेत.
 
 
लदाखमध्ये सापडलेल्या या प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांची हिमालय निर्मितीशी सांगड घालण्यापूर्वी हिमालयाची माहीत असलेली जन्मकथा समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. हिमालयाच्या निर्मितीत, साडेसोळा कोटी वर्षांपूर्वी पॅन्जिआ (Pangea) या विशाल भूखंडातून (Supercontinent) सुटून उत्तरेकडे प्रवास करू लागलेले भारतीय भूतबक (Tectonic plate) आणि युरेशियन भूतबक यांची 4.5 कोटी वर्षांपूर्वी झालेली टक्कर, दोन्ही भूतबकांच्या दरम्यान असलेल्या टेथिस या अरुंद, चिंचोळ्या आणि लांबट समुद्राचे आक्रसणे आणि त्यातील भूकवचाचे खडक व गाळ दाबला जाणे या सर्व घटनांचा समावेश होतो. दाबलेल्या गाळाची उंची वाढत जात असतानाच त्याचे उत्थापन (Uplifting) झाले आणि हिमालयाची निर्मिती झाली. ही प्रक्रिया दर वर्षी एक सें.मी. या वेगाने या भागात आजही चालू आहे.
 
 
सुमारे दहा हजार मीटर जाडीचे खडक या हालचालीत भरडले गेले. एक कोटी ते दहा लाख वर्षांपूर्वी टेथिसचा पूर्ण लोप झाला असावा. हिमालय निर्मितीच्या हालचालींमुळे हिमालयाच्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या शिवालिक किंवा बाह्य हिमालय (Outer Himalay), मुख्य किंवा मध्य हिमालय किंवा हिमाचल (Lessar Himalay) आणि हिमाद्री म्हणजे बृहत् हिमालय (Grater Himalay) अशा पर्वतरांगा तयार झाल्या. हिमालयाची ही निर्मिती सुमारे 70 लाख वर्षे चालू असावी.
 
 
हिमालयातल्या सगळ्यांत उंच आणि आतल्या भागाला टेथिस हिमालय असे म्हटले जाते. इथल्या गाळात लक्षावधी समुद्री जीव आणि वनस्पती निर्मितीच्या वेळी गाडल्या गेल्या होत्या, मात्र आजपर्यंत टेथिस समुद्रात प्रवाळनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट क्षारता, गाळसंचयन यासारख्या उथळ सागरी पर्यावरणाचे अस्तित्व दाखवणारा एकही पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती लागला नव्हता.
लदाखचा, तसेच हिमालयाचा भूशास्त्रीय इतिहास समजून घेण्यासाठी आणि हिमालयातील जीवविविधतेवर प्रकाश टाकण्यासाठी हा शोध नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. रितेश आर्य यांचे मत आहे.
 
डॉ. रितेश आर्य यांनी जे प्रवाळ शोधले आहेत, ते अशा काळातील आहेत, ज्या काळात भारताची तिबेटशी टक्कर झाली नव्हती - म्हणजे हे प्रवाळ 4 कोटी वर्षांच्याही आधीचे आहेत. गोगलगायीसारखे मॉलस्क, शेलफिश आणि फोरामिनिफेरा (बहुतेक सूक्ष्म जीव, परंतु या भागात 2 से.मी. आकाराचे) यांचे अपवादात्मकरित्या चांगले जतन झालेले जीवाश्म इथे आढळले. ज्या काळात त्यांचे इथे संचयन झाले, तो काळ त्यासाठी अनुकूल सागरी पर्यावरणाचा असावा.
 
 
प्रवाळ खडकांचे समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर आढळलेले हे जीवाश्म आजपर्यंत नोंदले गेलेले त्यांच्या अस्तित्वाचे पहिले प्रमाण आहे. अशा उंचीवर त्यांची उपस्थिती अवाढव्य अशा भू-हालचालींच्या शक्तींवर प्रकाश टाकते, ज्यांनी सागरी गाळाला जवळच्या किनारपट्टीच्या सागरी वातावरणातून इतक्या असाधारण उंचीवर उचलले!
हिमालयाच्या या प्रदेशात गुंतागुंतीच्या ज्या वलीकरण आणि प्रस्तरभंग प्रक्रिया घडल्या, त्या किती शक्तिशाली होत्या, त्याची या जीवाश्म संशोधनानंतर कल्पना करता येते. या शक्तींनीच प्रवाळ असलेला सागरी भाग इतक्या उंचीवर उंचावला गेला.
जिथे हे जीवाश्म सापडले, तो श्योक नदीच्या उत्तरेला असलेला चुनखडीयुक्त प्रदेश एक विलक्षण जीवाश्मसमृद्ध प्रदेश आहे, असे दिसून येते.
 
 
मिळालेल्या जीवाश्मांच्या प्राथमिक तपासणीत असे लक्षात आले की हे जीवाश्म आकारशास्त्रीयदृष्ट्या गॅस्ट्रोपॉड आणि फोरामिनिफेरा यांच्यासारखे आहेत. हिमाचल प्रदेशातील कोटी या ठिकाणी असे जीवाश्म यापूर्वी सापडले आहेत. हे अंदाजे 5.6 ते 3.4 कोटी वर्षांपूर्वी इओसीन कालखंडातील आहेत. हे प्राचीन अवशेषदेखील त्या वेळच्या टेथिस समुद्राच्या अस्तित्वाचा स्पष्ट पुरावा देतात. भारत आणि तिबेट टेथिसद्वारे एकमेकाला जोडले गेले होते, हेही यातून स्पष्ट होते. भारत आणि तिबेटच्या टकरीच्या वेळेपूर्वी जेव्हा दोघांमध्ये टेथिस समुद्र होता आणि हिमालयाचा जन्म झाला होता, त्या वेळच्या - म्हणजे 5.6 ते 3.4 कोटी वर्षांपूर्वीच्या इओसीन काळातील पृथ्वीच्या इतिहासातील रहस्ये आणखी उलगडण्यासाठी या संशोधनाचा मोठाच उपयोग होईल. जगभरातील विद्वान, जीवाश्मशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ या जीवाश्मांच्या पुढील अभ्यासाची आणि सखोल विश्लेषणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर

प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर हे मराठी लेखक आहेत. ते विज्ञान, भूगोल, पर्यावरण आदी विषयांसह ललित लेखनही करतात.