उंबरखिंडीची लढाई - कारतलबखानाची कोंडी

लेखांक : 8

विवेक मराठी    21-Nov-2023   
Total Views |
शिवरायांना युद्धामध्ये सर्वसामान्य सैनिकांचा रक्तपात नको होता. युद्धामध्ये साधायचे असते ते राजकारण. प्राप्त परिस्थितीत त्यांना मुघलांशी तहाची बोलणी यशस्वी करायची होती, पण आपला वचकही निर्माण करायचा होता. कारतलबखानाचा अहंकार ठेचणे, त्याच्यामार्फत शाहिस्तेखानाच्या फाजील आत्मविश्वासाला लगाम घालणे, बलाढ्य मुघलांच्या फौजेत भय निर्माण करणे, स्वराज्यासाठी भरपूर खजिना, अश्वबळ आणि शस्त्रास्त्रे प्राप्त करणे हे सारेच शिवरायांनी उंबरखिंडीच्या लढाईत साध्य केले. उंबरखिंडीतली कारतलबखानाची कोंडी हे शिवरायांच्या युद्धनीतीचे एक अद्वितीय सुवर्णपान ठरले!
shivaji maharaj
 
अफजलखानवधानंतर तत्काळ शिवरायांनी कोल्हापूरपर्यंतचा मुलूख काबीज गेला. पन्हाळ्यावरचा मुक्काम लांबला गेला. आदिलशाहीच्या सिद्दी जौहरचा वेढा पडला. दुसर्‍या बाजूस औरंगजेबाने मुघल तख्त काबीज केल्यावर दख्खनकडे आपला मोर्चा वळवला. आपला मामा शाहिस्तेखान याची शिवरायांवर नेमणूक केली. प्रचंड सेनासमुदाय आणि खजिना घेऊन शाहिस्तेखान महाराजांचा मुलूख बेचिराख करत पुण्याच्या दिशेने सरकू लागला. पन्हाळ्यावरून निघून जाणे हा एकच पर्याय होता. शेवटी त्या वेढ्यातून निसटून महाराज बांदलाच्या शिबंदीसह पन्हाळ्यावरून विशाळगडावर गेले, ते घोडखिंडीत दोनशे बांदलांनी केलेल्या शौर्यमय समर्पणातून आणि बाजीप्रभू देशपांड्यांसारख्या वीराच्या बलिदानाचे अर्घ्य देऊन.
 
 
उत्तरेकडून मुघल आणि दख्खनमध्ये आदिलशाही असे महाराजांचे दोन प्रमुख शत्रू सामोरी उभे होते. उपलब्ध सैन्यबळ, साधनसामग्री आणि समोर ठाकलेली संकटे पाहून महाराजांनी सावध पवित्रा घेण्याचे ठरवले. त्यांनी रुस्तुमेजमानला मध्यस्थी करायला लावून आदिलशहाशी मैत्रीचा तह केला. किल्लेदार त्र्यंबकपंतांना सांगून पन्हाळा सिद्दी जौहरला दिला. मुघली आक्रमणाचा धैर्याने सामना करणे हेच महाराजांचे या प्रसंगी प्रमुख ध्येय होते. शाहिस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग नेस्तनाबूत केला आणि ऑक्टोबर 1660मध्ये खान पुण्यात परतला. महाराजांचे त्याच्याशी तहाचे प्रयत्न सुरू होते, पण खानाने काहीही न मानता स्वराज्याचा मुलूख जाळणे सुरूच ठेवले.
 
 
दरम्यान शाहिस्तेखानाने आदिलशहाविरुद्धही आघाडी उघडली. आपल्या विश्वासातल्या कारतलबखानाला परिंडा किल्ला घ्यायला त्याने पाठवले. घाबरून किल्लेदाराने किल्ला न लढवताच कारतलबखानाला देऊन टाकला. शाहिस्तेखानाने कारतलबखानाचा भव्य सत्कार केला आणि महाराजांच्या ताब्यातील कल्याण-भिवंडीपासून नागोठण्यापर्यंतचा उत्तर कोकण प्रांत घेण्यासाठी कारतलबखानाची नेमणूक केली.
 
 
कारतलबखान शाहिस्तेखानाचा अत्यंत विश्वासू सरदार होता. मुघल दरबारी त्याचे वजन होते. त्याच्या वडिलांना जहांगीर बादशहाने ‘कारतलब’ ही पदवी देऊन गौरवले होते. औरंगजेब आणि दारा शुकोहमध्ये तख्तासाठी झालेल्या युद्धात त्याने औरंगजेबाच्या बाजूने पराक्रम गाजवला होता. कारतलब याच पदवीने औरंगजेबाने त्याचाही सन्मान केला होता. असा पराक्रमी कारतलबखान आता महाराजांचे कोकण काबीज करायला निघाला.
 
 
खानासोबत होती रायबागन. ही वर्‍हाडातील माहूरच्या उदाराम देशमुख या मुघली सरदाराची पत्नी, सावित्रीबाई. पतीनंतर तिने कारभार हाती घेतला होता. औरंगजेबाच्या हुकमानुसार तिने वर्‍हाडातील मोगल सरदार हरचंदराय याचे बंड मोडून काढले होते, तेही रणांगणात स्वत: उतरून. औरंगजेबाने तिचा सन्मान करून पंडिता, रायबागन हे किताब दिले. अशी वाघीण कारतलबखानाबरोबर होती. शिवाय जसवंतराव कोकाटे, जाधवराव, सर्जेराव गाढे असे अन्य मराठी सरदारही होते. अमरसिंह, मित्रसेन, कछप, चौहान असे राजपूत सरदार होते. सुमारे वीस हजार सैन्य, भरपूर घोडे, बैल, खजिना आणि नामवंत अनुभवी सरदार घेऊन कारतलबखान पुण्याहून लोणावळ्याकडे आला. मराठ्यांच्या फौजांना चुकवून कुठल्या घाटाने कोकणात उतरायचे, याचा खान विचार करत होता.
 
 
लोणावळ्यातून कोकणात उतरायला दोन घाट होते. खंडाळा-बोरघाट-खोपोली किंवा कुरवंडा-उंबरे-पेण हे घाट.
 
मुळशी किंवा पवनेच्या खोर्‍यातून उतरणे लांबचे आणि अवघड होते. एवढा लवाजमा घाटातून उतरवायचा, तर तुलनेने कमी अंतराचा आणि सोपा घाट घेणे खानाला गरजेचे होते.
 
 
कारतलबखानाच्या प्रत्येक हालचालीची बातमी राजगडावर शिवरायांना मिळत होती. राजांचे हेरखाते खानाच्या चहूबाजूंस पसरले होते. महाराजांनी सर्व सैन्यांच्या तुकड्यांना एकत्र येण्यासाठी फर्मावले. या फौजांची जमवाजमव पेण येथे चाललीय अशी खानाच्या कानापर्यंत बातमी जाईल, याचीही सोय केली. महाराजांचे दोन प्रमुख हेतू होते - एका बाजूने खानाच्या मनात भीती निर्माण करणे आणि दुसर्‍या बाजूस त्याच्या अतिआत्मविश्वासपूर्ण अहंकाराला फुंकर घालून जाळ्यात ओढणे. नेमके तेच झाले. मराठे आपल्यावर हल्ला करणार, त्यांना हूल द्यायची, त्यांच्यापर्यंत खोट्या हालचालींची बातमी पोहोचेल याची व्यवस्था करायची आणि ऐन वेळी प्रत्यक्ष आपला गुप्त मार्ग आचरून दिशाभूल करायची. खानाने पूर्ण योजना सिद्ध केली.
 
 
बोरघाटातून फौज जाणार अशी हालचाल केली, पण लोणावळ्याआधी लगेच मार्ग बदलून कुरवंड्याकडे कूच केले.
 
 
कुरवंड्याचे पठार सोडले की घाटमाथा लागतो. तिथून खाली उतरले की चावनीचे टेप. कुरवंडा घाटमाथ्यापासून चावनीचे अंतर सुमारे पंधराशे फूट. तेही सरळसोट उताराचे. म्हणजे खाली आल्यावर पुन्हा घाटावर परतून जाणे सोपे नाही. पराकाष्ठेचे कठीण कर्म. त्यातून अंबानदी कोकणातल्या इतर नद्यांसारखी पावसाळ्यात सुसाट खळाळत वाहते, तर जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कोरडीठक्क! माथ्यावर कडक ऊन, उष्मा - दमट वातावरणात घामाघूम होणे आणि प्यायला पाणीच नाही, अशी बिकट अवस्था.
चावनीपासून पुढे उतार कमी. अंबानदीच्या काठाने जाणारी वाट. दोन्ही बाजूंस उंच डोंगर, गच्च झाडी आणि बाजूला अंबानदीची दरी. ह्या दरीच्या खालच्या भागातली चिंचोळी जागा म्हणजेच उंबरखिंड. शेवटची चढ चढली की खाली उंबरे गाव. ह्या चढावरच्या टेकाडावरून दरीवर सहज लक्ष ठेवता येते. सह्याद्रीनेच जणू उंबरखिंडीचे रणक्षेत्र शिवरायांसाठी खास सजवून ठेवले होते.
 
 
दोन दिवस आधीच शिवाजी महाराज नेतोजी पालकर, तान्हाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे ह्यांच्यासवे राजगडावरून निघून उंबरखिंडीच्या खालच्या भागात पोहोचले. जवळजवळ हजारभर सैन्य. राजांनी कारतलबखानाच्या क्षणोक्षणाच्या हालचालीवर लक्ष ठेवत सैन्याला उंबरखिंडीच्या चहूबाजूंनी तैनात केले. स्वत: राजे नेतोजीसह उंबरखिंडीच्या खाली असलेल्या टेकाडावर राहिले. अंबानदीच्या चहूबाजूंना डोंगरझाडीत तुकड्या ठेवल्या. एक तुकडी घाट न उतरता कुरवंड्याच्या पठाराशेजारी जंगलात दडवली होती. कारतलबखानाची फौज पठार सोडून उतरली की लगेच कुरवंड्याचा वरचा मार्ग रोखायचा, म्हणजे खानाने उलट माघारी परतायचे ठरवले तरी शक्य होणार नाही. आदल्या दिवशी सर्व यंत्रणा जागोजागी सुसज्ज झाली. खानाला वाटत होते, आपण बोरघाटाने चालतो आहोत असे भासवून मराठ्यांना फसवले आहे. राजांनीही खानाला वाटते तसेच होते आहे, हा गुप्त देखावा निर्माण केला होता. पण खानाला कल्पनाही नव्हती की राजांचा प्रत्येक हेर त्याच्या प्रत्येक पावलावर डोळे ठेवून होता. उंबरखिंडीतून राजांना फसवून कोकणात उतरू जाणार्‍या खानाला माहीत नव्हते की तो स्वत:होऊन उंबरखिंडीच्या पिंजर्‍यात अडकणार होता.
 
 
मंगळवार उजाडला. कुरवंड्याच्या पठारावरून कारतलबखानाचा भलामोठा लवाजमा घाटाच्या उतरणीला लागला. सैन्याचे ठीक होते, पण डेरेदार, बाजारबुणगे, व्यापारी, खजिना, जनाना अशा भरमसाठ पसार्‍याला उतरणे अवघड जात होते. सुरुवातीला घाटमाथ्यावर थंडावा होता, शिवाय उलट दिशेमुळे उतरताना ऊन लागत नव्हते, म्हणून मुघलांना तेवढा त्रास झाला नाही. पण चावनीवरच्या विश्रांतीनंतर जेव्हा फौज निघाली, तेव्हा त्यांच्या नाकी नऊ येऊ लागले. अंबानदीच्या चिंचोळ्या दरीमधून हा पसारा धिम्या गतीने कसाबसा उतरू लागला. दुपारचे टळटळीत ऊन. तापलेले कातळ. नदीचे कोरे पात्र. पिण्यासाठी पाण्याचे एक डबकेही दृष्टीस पडत नाही. कोकणाच्या दमटपणाची सवय नसलेली मुघल फौज घामाघूम झाली. कधी एकदा उंबर्‍यातला पोहोचतो, ही अवस्था. कशीबशी पुढची तुकडी वाकणपर्यंत पोहोचली. कारतलबखान आणि रायबागन पिछाडीला चावनीपाशी होते. खानाच्या दमलेल्या, घामाने चिंब झालेल्या फौजेने अंबानदीची दरी आणि खिंड गच्च भरलेली. सूर्य अंग जाळत होता.
आणि अचानक रणवाद्ये वाजू लागली. घोडदळ, पायदळ, सर्व लवाजमा आपापल्या जागीच थबकला. काय होते आहे कळत नव्हते. आवाजाचा रोख उमगत नव्हता. डोळ्यास काहीच दिसत नव्हते. क्षणार्धात चहूबाजूंनी दगड, बाण, बंदूकगोळ्या यांचा मारा येऊ लागला. वाकणपुढच्या टेकडीवरून राजांबरोबर असलेल्या सवंगड्यांनी अद्भुत मारा करत खानाची आघाडीची तुकडी जायबंदी केली. समोर कोणीच दिसत नव्हते. चढाई कुणावर करायची? मार खात राहणे एवढेच मुघलांच्या हाती राहिले. खानापर्यंत बातमी पोहोचली. खरे तर तो गोंधळला, पण उसने अवसान आणत त्याने फौजेला लढण्याचा हुकूम सोडला.
 
अमरसिंह, मित्रसिंह या राजपूतांनी प्रयत्न करून पाहिला, पण चहूबाजूंनी मारा होत होता. मराठे दिसतच नव्हते. मागच्या फौजेने कुरवंड्याच्या दिशेने परतायचे ठरवले. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की वरचा मार्गही मराठ्यांनी रोखला आहे. खानाची माणसे हतबल होऊन मरू लागली. नुकसानच नुकसान! दुपारपर्यंत फौज जागच्या जागी बसून फक्त मार खात राहिली. रायबागनेला फौजेची ही अवस्था पाहवत नव्हती. सामना करण्यासाठी समोर कुणीही दिसत नाही, आपण मात्र संपूर्ण नजरेच्या नि बाणांच्या टप्प्यात आहोत, चहूबाजूंनी कोंडले गेलो आहोत, हे तिला कळून चुकले होते. तिने कारतलबखानाला शरण जाण्याचा सल्ला दिला. पण अहंकाराने पछाडलेल्या खानाला शरण जाणे पसंत नव्हते. तो सैन्याला लढा लढा म्हणून सांगत होता, पण त्याचे सैन्य मात्र हातात काहीच उरले नाही हे जाणून हलत नव्हते. मराठ्यांनी हल्ला तीव्र केला.
 
 
शेवटी खानाने शरणागती स्वीकारत आपला दूत महाराजांकडे पाठवला. महाराज उंबर्‍याच्या मैदानात आले. शुभ्र घोड्यावर चिलखत शिरस्त्राण चढवलेले, सोन्याचा कमरपट्टा, लटकलेली तलवार, पाठीवर ढाल, गंभीर मुद्रेच्या रणवेशातील शिवाजी महाराज कारतलबखानाच्या दूतासमोर उभे ठाकले. कळकळीला येऊन दूताने शहाजीराजांच्या दोस्तान्याची आठवण देत, शाहिस्तेखानाच्या आग्रहाने कोकणात उतरण्याची चूक मान्य केली. अभय देत खानाला व फौजेला जीवदान द्यावे ही याचना केली.
शाहिस्तेखानाने गेल्या वर्षभर स्वराज्याचा बराच मुलूख बेचिराख केला होता. कोणतीही दयामाया न दाखवता रयतेला त्रस्त केले होते. सूड म्हणून कोंडीत सापडलेल्या सर्व मुघली फौजेला कापणे किंवा बंदी बनवणे राजांना सहज शक्य होते. पण शिवाजी महाराज भावनेच्या आहारी जाऊन व्यवहार विसरणारे नव्हते. व्यवहारचातुर्य हा त्यांचा अंगभूत गुण होता. राजांना हवा होता कारतलबखानाचा भलामोठा खाजिना आणि शस्त्रास्त्रे. शाहिस्तेखानाचे सामर्थ्य मोठे होते. लढा चालू राहिला, तर आर्थिक बळाची अधिक गरज होती. शिवाय सोनोपंतांमार्फत महाराजांची शाहिस्तेखानाकडे तहाची बोलणी चालू होती. कारतलबखानाच्या सैन्याची केलेली कत्तल तहाला खीळ बसवून मुघली सत्तेच्या रोषाचे कारण बनू शकले असते. जर एवढी मोठी फौज बंदी बनवायची, तर त्यांचा अतिरिक्त भार अंगावर पडला असता. गरज होती शांत आणि गंभीर विचार करून घेतलेल्या निर्णयाची. शौर्य, क्रौर्य रणात हवेच, पण औदार्य आणि चातुर्य या क्षणी महत्वाचे होते.
 
 
शिवाजी महाराज कठोर न्यायप्रिय होते, पण क्रूरतेच्या विरोधात होते.
 
 
राजांनी कारतलबखानाला अभय द्यायचे ठरवले. अट एकच - सर्व सरंजाम, शस्त्रास्त्रे टाकून नेसत्या वस्त्रानिशी माघारी जायचे. खानाच्या वतीने दूताने सर्व अटी मान्य केल्या.. पर्यायच नव्हता.राजांकडून सैन्याला युद्धबंदीचा हुकूम गेला. संदेश थेट घाटमाथ्यावर कुरवंड्यापर्यंत पोहोचला. कुरवंड्याच्या बाजूचा अडसर दूर झाला. क्रमाक्रमाने खानाचे सैन्य वर चढत कुरवंड्यापाशी एकत्र झाले. मराठ्यांनी प्रत्येकाची झडती घेत सोडले. सर्वप्रथम असलेल्या खाली मान घालून चालणार्‍या कारतलबखानाचीही. जीव वाचला म्हणून सुस्कारा टाकण्यामध्ये सर्वात पुढे तोच होता. लढताच न आल्याचे शल्य, शरणागतीचा अपमान, हातचे सर्व काही देऊन टाकण्याची हतबलता आणि तरीही जीवदान मिळाल्याचे समाधान असे सारे भाव खानाच्या ठायी एकवटले होते. सर्व सैन्य एकत्र जमल्यावर सपशेल पराभूत होऊन खान आला तसा माघारी गेला.
 
 
दुपार टळून गेली होती. आता कुरवंड्याच्या घाटापासून उंबरखिंडीपर्यंत मराठे पसरले होते. कापडचोपड, दागदागिने, तंबू, डेरे, बंदुका, इतर लहानमोठी शस्त्रास्त्रे, धनधान्य, घोडे, खानाचे सारे ऐश्वर्य गोळा केले आणि बैल-घोड्यांच्या पाठीवर टाकून राजगडाकडे रवाना झाले. काही घडलेच नाही अशी शांतता संध्याकाळी उंबरखिंडीत रेंगाळली होती.
 
 
या लढाईचे विस्तृत वर्णन येते ते परमानंदांच्या शिवभारतात. जेधे शकावली, शिवापूरकर देशपांडे शकावली, शिवापूर शकावली उंबरखिंडीच्या लढाईच्या वेगवेगळ्या तारखा नोंदवतात. शके 1582 माघ शुद्ध चतुर्दशी म्हणजे 2 फेब्रुवारी 1661. पण तिथी-वार यांचा ताळमेळ पाहता तो दिवस पौष वद्य चतुर्दशी 15 जानेवारी 1661 असावा.
 
 
उंबरखिंडीचे युद्ध इतिहासात प्रसिद्ध झाले ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमुळे. शिवरायांच्या सुमारे एक हजार फौजेने कारतलबखानाच्या वीस हजार फौजेला धूळ चारली होती. इतक्या कमी सैन्याने आपल्यापेक्षा वीस पटीने मोठ्या फौजेवर विजय मिळवल्याचे दुसरे उदाहरण जगाच्या इतिहासात नाही. खरे तर युद्ध म्हणजे रणांत दोन्ही सैन्यांनी आमनेसामने लढणे. पण उंबरखिंडीची लढाई म्हणजे अदृश्य शत्रूसमोर लढता न आल्यामुळे, काहीही न करता अडकून पडल्यामुळे स्वीकारलेला पराभव. हा लढाईचा प्रकार म्हणजे रणक्षेत्रात केलेली शत्रूची कोंडीच. प्रतापगडच्या युद्धात आपल्याला हवे असलेले रणक्षेत्र शिवरायांनी निवडून अफजलखानाचा पराभव केला. इथे कारतलबखानाने निवडलेल्या मार्गाला राजांनी आपले रणक्षेत्र बनवले. कुरवंडा-उंबरखिंडीच्या दगडादगडाचा नि झाडाझाडाचा केलेला सूक्ष्म भौगोलिक अभ्यास शिवरायांच्या सखोल भूगोलाच्या ज्ञानाचा द्योतक होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजांना फसवू पाहणार्‍या कारतलबखानाच्या प्रत्येक हालचालींचे आणि क्षणाक्षणाचे निरीक्षण करणारे प्रबळ हेरखाते. शिवरायांची सक्षम गुप्तहेर यंत्रणा किती ताकदवान होती हे कागदपत्रे सांगत नाहीत, पण युद्धाच्या योजनाबद्ध कृतीतून त्याचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. शत्रू शरण आल्यावर काय करायचे, मारायचे की सोडायचे? हा निर्णय त्या त्या परिस्थितीवर अवलंबून. पण शिवरायांना युद्धामध्ये सर्वसामान्य सैनिकांचा रक्तपात नको होता. युद्धामध्ये साधायचे असते ते राजकारण. प्राप्त परिस्थितीत त्यांना मुघलांशी तहाची बोलणी यशस्वी करायची होती, पण आपला वचकही निर्माण करायचा होता. कारतलबखानाचा अहंकार ठेचणे, त्याच्यामार्फत शाहिस्तेखानाच्या फाजील आत्मविश्वासाला लगाम घालणे, बलाढ्य मुघलांच्या फौजेत भय निर्माण करणे, स्वराज्यासाठी भरपूर खजिना, अश्वबळ आणि शस्त्रास्त्रे प्राप्त करणे हे सारेच शिवरायांनी उंबरखिंडीच्या लढाईत साध्य केले. जगाच्या इतिहासातील विषम सैन्यसंख्या असताना, भौगोलिक परिस्थितीचा फायदा, कोंडी करून, शत्रूला लढू न देता संपूर्ण शरण यायला कसे लावायचे ह्याचे सर्वोत्तम युद्ध उदाहरण म्हणजे ’उंबरखिंडीची लढाई’. प्राचीन काळी हन्नीबलने ट्रासिमन सरोवराच्या लढाईत रोमन सैन्याची अशीच कोंडी केली होती. उंबरखिंडीतली कारतलबखानाची कोंडी हे शिवरायांच्या युद्धनीतीचे एक अद्वितीय सुवर्णपान ठरले!

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.