राममय अयोध्या

विवेक मराठी    25-Nov-2023   
Total Views |
 अयोध्येतील भव्य राम मंदिर निर्मिती आणि तेथील भक्तिमय वातावरण हे समस्त भारतभूचा आत्मा एक असण्याची ग्वाही. ह्यासाठी तीर्थाटने करायला हवीत. हीच एक जोड आहे, जी प्रचंड वैविध्यात आपल्याला बांधून ठेवते. इथल्या राम-कृष्णाच्या हातात त्याचे सूक्ष्म धागे आहेत. सृष्टीतील कणाकणाला देव मानण्याची आपली पद्धत आहे. पण अयोध्या हे एक असे ठिकाण आहे, जिथे राम जितका पूजनीय देव, तितकेच हे जन्मभूमी शहर पूज्य आणि आता निर्माण होत असलेली मंदिराची वास्तूही रामासारखी स्वत:च एक दैवत ठरली आहे.
 
vivek
अयोध्येत नवे राम मंदिर साकारत आहे आणि लवकरच प्रभू रामाची प्रतिष्ठापना होत आहे. सर्व जण प्रदीर्घकाळ वाट बघत असलेल्या रामजन्मभूमीच्या विजयाने आता भव्य राम मंदिराच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. 2019मध्ये निकालासंदर्भात खूप काही लेखन केल्यानंतर आणि अनेक वेळा व्याख्याने दिल्यानंतर योद्धा रामलल्ला, ज्याच्याद्वारे ही न्यायालयीन लढाई लढली गेली आणि जिंकली, त्याच्या दर्शनाची आस न लागली तरच नवल होते. आणि त्याबरोबरच मंदिर निर्माणाची एखादी झलक बघता यावी अशीही तीव्र इच्छा होती. त्यानेच ती त्याने घडवून आणली आणि सोबत काशी विश्वनाथ आणि गंगामैय्या दर्शनही झाले, ही केवळ श्रीरामकृपा!
 
 
मागची काही वर्षे दिवाळीमध्ये अयोध्येत लाखो पणत्या लावून शरयू तिरावर केल्या जाणार्‍या दीपोत्सवासाठी दिवाळीदरम्यान भाविक आणि पर्यटक ह्यांची प्रचंड गर्दी होते. घाटाकडे आणि मंदिराकडे जाणारे रस्ते गाड्यांसाठी बंद होतात. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. अर्थात आम्ही त्याच्या दुसर्‍या दिवशी पोहोचलो. पण अयोध्येच्या उत्साहात कुठेही कमतरता नव्हती. तिथली प्रत्येक गल्ली, प्रत्येक रस्ता आज मंदिर निर्माणाच्या कामाने भारला गेलाय. सर्वत्र उत्साहात रामनामाचा जयघोष चालू आहे. सर्वत्र राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, भरत.. किंबहुना सर्वांच्याच खुणा अयोध्येत पसरल्या आहेत. रस्त्यावर असे थोडेही अंतर नसेल, जिथे छोटे का असेना पण मंदिर नाही, रामाचा जप नाही, आरती नाही! इथला प्रत्येक कोपरा त्या इतिहासाची साक्ष आहे.
 

vivek 
 
महामार्गावरून अयोध्येकडे वळलो की फुलांच्या अनेक कमानी भाविकांचे स्वागत करायला सज्ज होत्या. वातावरण भारावून टाकायला ते पहिले दृश्यच पुरेसे होते. प्राचीन शहर, त्यामुळे छोटे गल्लीबोळ. मात्र जुनी दुकाने, घरे ताब्यात घेऊन रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे, हे लगेचच कळून येत होते. प्रतिष्ठापनेआधीच सर्व भाविकांसाठी दर्शन देण्याची सुविधा असणारे अयोध्या हे एकमेव तीर्थक्षेत्र असावे. इथे सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वप्रथम रामाच्या दर्शनापूर्वी हनुमान गढीमध्ये हनुमानाचे दर्शन घेतले. इथल्या भाविकांचा ओघ आणि श्रद्धा अनन्यसाधारण होती. तिथून चालतच रामजन्मभूमी येथे पोहोचलो. प्रचंड सुरक्षेमुळे अनेक देवस्थानांप्रमाणे येथेही मोबाइल व इतर सामान सद्य मंदिरातही नेण्यास परवानगी नाही.
 
 
vivek 
 
सकाळी लवकर गेल्यामुळे प्रभू रामाच्या दुपारी 12 वाजता होणार्‍या आरतीला हजर राहायचे भाग्य लाभले. अगदी निवडक लोकांसाठी पासची व्यवस्था त्यासाठी उपलब्ध होती. क्वचित कुठेतरी बघितलेले रामाचे जुन्या तंबूतील फोटो बघून गहिवरून यायचे. पण आजही अजूनही तिथेच असलेल्या रामाच्या दर्शनाला जाताना बाजूलाच चालू असलेले भव्य निर्माणकार्य पाहून मात्र धन्य वाटले. सुरक्षेच्या कारणामुळे हे बांधकाम जवळून बघणे शक्य नव्हते, मात्र समोरूनच त्याची भव्यता आणि कामाच्या वेगाची जाणीव होत होती. काम जवळपास पूर्ण व्हायला आले आहे. कदाचित पूर्ण कॉरिडॉर व्हायला मात्र वेळ लागेल. रामाची दुपारची आरती हा एक विलक्षण अनुभव होता. नीतिनियमांच्या पाठपुराव्यासाठी वेचलेले रामाचे विलक्षण आयुष्य.. त्याचा संयम, सहनशीलता, त्याचे मर्यादापुरुषोत्तम असणे, वचनबद्धतेसाठी सर्वोच्च त्याग करणे, त्याची चिकाटी, संघर्ष करण्याची ताकद हे सर्व तर त्याचे आयुष्य झाले. पण नंतरही हजारो वर्षांचा जन्मभूमीसाठीचा लढा आणि विजय.. कदाचित हा सर्व मानवी भावभावनांचा खेळही असेल. तो तर चराचरात भरून राहिलेला. पण सत्याचा विजय मात्र गरजेचाच. दर्शनाने आणि आरतीतील घंटानादाने इतके विचार मनात न आले, तरच नवल!
 


vivek 
 
ज्या ज्या गोष्टींबद्दल मी पूर्वी लेखांमध्ये लिहिले होते, त्या बघण्याची मला बरीच उत्सुकता होती. सापडलेले शिलालेख, मूर्ती, खांब हे कुठे बघता येतील ह्याबद्दल नीटसे कळले नाही. बहुधा संग्रहालयातही लवकरच हे बघायला मिळू शकेल. एक शिलालेख फैजाबादच्या संग्रहालयात आहे. जुन्या काळातली ‘सीता की रसोई’सारख्या संरचना आता व्यापक मंदिर कॉरिडॉरचा एक भाग होतील. पण इथल्या अनेक लहान-मोठ्या मंदिरांच्या त्यांच्या त्यांच्या अशा आख्यायिका आहेत.
 
 
राणी कैकेयीने सीतेला लग्नानंतर दिलेला कनक महाल ही आणखी एक प्रेक्षणीय वास्तू आहे. तिथेही सुंदर मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. रामकोट, भरत कुंड, दशरथ महाल, वाल्मिकी भवन हीसुद्धा स्थळे महत्त्वाची. भरताने रामाच्या अनुपस्थितीत नंदीग्राम येथून केलेला राज्यकारभार म्हणून नंदीग्रामलाही पर्यटक भेटी देतात. अयोध्येपासून जवळच 20 कि.मी. अंतरावर ते आहे. रामाने जिथे अश्वमेध यज्ञ केला, त्या ठिकाणी सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे कुलू, हिमाचल प्रदेशाच्या राजाने बांधलेले ‘त्रेता के ठाकूर’ हे मंदिर आहे. महाराणी अहल्याबाई होळकर ह्यांनी त्याचा पुढे जीर्णोद्धार केला. मंदिरातील मूर्ती राजा विक्रमादित्यच्या काळातील आहेत असे सांगितले जाते - म्हणजे ज्या विक्रमादित्यने ह्यापूर्वीचे जन्मभूमी मंदिर बांधले होते, किंबहुना त्याचा जीर्णोद्धार केला असणार, तोच हा राजा. अयोध्येमध्ये प्रत्येक कोपरा रामाचा इतिहास सांगतो. राज घाट, राम घाट, लक्ष्मण घाट, जानकी घाट, विभीषण कुंड, सीता कुंड, लक्ष्मण किल्ला, लवकुश मंदिर अशा अनेक वास्तू, अनेक प्रतीके आपल्याला इतिहासाचे साक्षीपुरावे देतात आणि समस्त भारतीयांना रामजन्मभूमीप्रति किती श्रद्धा होती, ते दर्शवतात.
 


vivek 
 
राम की पैडी घाटावर समस्त भाविक स्नान करण्यासाठी येतात. पर्यटकांच्या आणि भाविकांच्या गजबजाटातही राम की पैडीवरील अर्थात नया घाटावरील अत्यंत सुरेख लाइट अँड साउंड शो बघणे ही आणखी एक आकर्षक गोष्ट होती. मंदिरापासून काही अंतरावर, पार्श्वभूमीवर काही मंदिरे, घरे आणि रामायणासाठी एक स्क्रीन लावून हा लेझर शो दाखवला जातो. कितीही वेळा, कुठेही, कसेही रामायण आपल्याला ओढून घेते. शरयूच्या ह्या बाजूला जणू एक जत्राच भरलेली असते. चणे-फुटाणे, भेळ, विविध चहा, लहान मुलांची खेळणी ह्यांचे फेरीवाले, सेल्फीजचा क्लिकक्लिकाट, आवाजांचा जल्लोश ह्या सर्वातही स्क्रीनवरील रामायण तत्काळ आपल्याला गुंतवून टाकते. अखेरीस पुन्हा एकदा फक्त एकच जाणीव होते - रामायण इथल्या नसानसांत आहे. कितीही वेळा ऐकले, वाचले, बघितले तरी त्याची गोडी काही कमी होत नाही. ते मूळ स्वरूपात वाचले, गाण्यांमधून ऐकले, दूरदर्शनवर बघितले, त्याचे अ‍ॅनिमेटेड स्वरूप बघितले, मंदिरांमधल्या शिल्पांमधून बघितले किंवा रामराज्याचा अभ्यास केला, चिकित्सा केली तरी ते पुन्हा पुन्हा जाणून घ्यावेसे वाटते आणि प्रत्येक वेळी एक नवा पदर आपल्याला गवसतो.
 
पुनि पुनि कितनेहू सुनत सुनाये।
 
हिय की प्यास बुझत न बुझाए॥
 
सीता राम चरित अति पावन।
 
मधुर सरस अरु अति मनभावन॥
 
 
संध्याकाळी सूर्यास्तादरम्यान घाटावर शरयू नदीच्या आरतीला उपस्थित राहणे आणि तेथील भाविकांच्या आणि पर्यटकांच्या ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या जयघोषाच्या आवाजात आपला आवाज मिसळून जाणे हीसुद्धा एक अनुभूतीच. आपण सूर्य, चंद्र, तारे, वारे, नद्या, समुद्र, झाडे सर्वांना देव मानले, त्यांची पूजा, त्यांची आरती ही निसर्गाशी, एका व्यापक भवतालाशी एकरूप होण्याची संधी. गरीब आणि श्रीमंत, पर्यटक आणि श्रद्धाळू, म्हातारे आणि तरुण, दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील असे सर्व एकाच पायर्‍यांवर, सर्वांचा एकच एक आवाज आणि समोर नदीचे विशाल पात्र, त्यामध्ये सोडलेले दिवे.. हे सर्व म्हणजे आपल्यामध्ये एकच चिरंतन शाश्वत सत्य असण्याची, समस्त भारतभूचा आत्मा एक असण्याची ग्वाही. ह्यासाठी तीर्थाटने करायला हवीत. हीच एक जोड आहे, जी प्रचंड वैविध्यात आपल्याला बांधून ठेवते. इथल्या राम-कृष्णाच्या हातात त्याचे सूक्ष्म धागे आहेत.
मंदिरापासून थोडा दूरवर असणारा गुप्तार घाट म्हणजे राम-लक्ष्मणांनी जिथे समाधी घेतली आणि विष्णूचा अवतार संपवला, तो नदीचा भाग. ह्या घाटावर राम मंदिर, तसेच नरसिंह मंदिरही आहे. लांबच लांब सुरेख घाट शहराच्या धामधुमीपासून दूर नेतो आणि मोक्षदायिनी शरयूचे दर्शन घडवतो.
 

vivek 
 
इथे स्थानिक लोक योगी आणि मोदी ह्यांच्याविषयी भरभरून बोलताना थकत नाहीत. अयोध्येचा कायापालट होत असलेला दिसत आहे. आणखी बर्‍याच सोयीसुविधा निर्माण होण्याच्या मार्गावर आहेत. इतक्या पर्यटकांचा भार वाहून नदी आणि शहर तुलनेने स्वच्छ आहे. प्रचंड सुरक्षेचे वातावरण असले, तरी उत्साहावर त्याचा परिणाम होत नाहीये.
 
 
सृष्टीतील कणाकणाला देव मानण्याची आपली पद्धत. पण अयोध्या हे एक असे ठिकाण आहे, जिथे राम जितका पूजनीय देव, तितकेच हे जन्मभूमी शहर पूज्य आणि आता निर्माण होत असलेली मंदिराची वास्तूही रामासारखी स्वत:च एक दैवत ठरली आहे.

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.