सेवा क्षेत्राचे वैभव

विवेक मराठी    03-Nov-2023   
Total Views |
@रवींद्र गोळे
 
हिंदू सभा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक असणारे डॉ. वैभव र. देवगिरकर यांनी मागील काही वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक जीवनात रचनात्मक बदल घडवून आणले आहेत. डॉ. वैभव हे आरोग्य, शिक्षण, सामाजिक उपक्रम करणार्‍या देवदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाचा घेतलेला हा आढावा.

vaibhav
 
मुंबई महानगर... इथे येणारा प्रत्येक जण काही स्वप्न उराशी बाळगून येतो. देशाच्या कानाकोपर्‍यातून मुंबईकडे येणारी व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येताना कधी आपला भूतकाळ विसरते, आपले गाव, गणगोत विसरते आणि मुंबईत विरघळून जाते. अगदी पाण्यात खडीसाखर विरघळून जावी तशी. सन 1999. विदर्भातील एक तरुण असेच स्वप्न घेऊन मुंबईकडे निघाला. वर्ध्याला विदर्भ एक्स्प्रेस पकडली. बीएएमएसची पदवी आणि आईने दिलेल्या 50 रुपयांच्या शंभर नोटा इतक्या पुंजीवर या प्रवासाला प्रारंभ झाला. ट्रेन निघाली. ट्रेनच्या गतीबरोबरच त्या तरुणाच्या विचारचक्रालाही गती आली होती. आपण आपला गाव, परिवार सोडून महामाया मुंबई नगरीकडे चाललो आहे, कोणताही आधार नाही, ओळख नाही अशा परिस्थितीमध्ये आपण आपले जीवन घालवण्यासाठी गाव सोडून मुंबईकडे निघालो आहोत. कसा निभाव लागणार आपला? कुठे होईल आपली व्यवस्था? अशा अनेक प्रश्नांचा गुंता त्या तरुणाच्या डोक्यात सुरू झाला. मात्र मुंबईला जायचे हे नक्की होते. आपण मुंबईला गेलो तरच आपली परिस्थिती बदलू शकेल, याची त्या तरुणाला खात्री होती. आपल्या क्षमतेवर, मेहनतीवर विश्वास असणारा तरुण म्हणूनच मुंबईकडे निघाला होता. ट्रेन वेगाने मुंबईच्या दिशेने धावत होती.
 

vivek
 हिंदू सभा हॉस्पिटल
 
आली.. आली.. मुंबई आली.. कल्याण गेले, ठाणे गेले आणि काही अंतर कापून विदर्भ एक्स्प्रेस थांबली, पण फलाटावर नाही, मध्येच कुठेतरी. त्या तरुणाने खिडकीतून पाहिले. समोर बोर्ड दिसत होता - ‘हिंदू सभा हॉस्पिटल’. क्षणाचाही विलंब न लावता तो तरुण आपली बॅग घेऊन ट्रेनमधून उतरला आणि रेल्वे रूळ ओलांडून हिंदू सभा हॉस्पिटलध्ये पोहोचला. सकाळची वेळ. फारशी वर्दळ नव्हती. तो तरुण रुग्णालयाच्या कार्यालयात पोहोचला. “काय पाहिजे?” कार्यालयातील शिपाई त्या तरुणाला न्याहाळत म्हणाला. तरुणाच्या देहावरील गावखुणा त्याने स्पष्टपणे ओळखल्या. “मला नोकरी हवी.” तरुण बोलला. “ठीक, इथे बसा. डॉक्टर अकरा वाजता येतील. त्यांच्याशी बोला.” कार्यालयाच्या बाकावर तो तरुण बसला.
 
 
 
अकरा वाजता डॉ. उपासनी रुग्णालयात दाखल झाले. त्यापूर्वी शिपायाकडून कोरा कागद घेऊन त्या तरुणाने अर्ज तयार केला. डॉ. उपासनींसमोर मुलाखत झाली. “किती वेळ काम कराल?” “चोवीस तास.” त्या तरुणाने उत्तर दिले. “राहणार कुठे?” “इथेच या बाकाएवढी जागा द्या. मी तिथे राहीन आणि चोवीस तास इथे काम करीन.” तरुण आत्मविश्वासाने बोलला. डॉक्टर उपासनींनी सर्व प्रमाणपत्रे तपासून पाहिली आणि हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या तरुणाला रुजू करून घेतले. तो दिवस होता 5 मार्च 1999. डॉ. वैभव देवगिरकर हे त्या तरुणाचे नाव. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे वैभव यांचा जन्म झाला. बालपणही तिथेच गेले. इयत्ता नववीत असताना पितृछत्र हरपले. मग पुढचे शिक्षण आत्याकडे नागपूरला झाले. बारावी झल्यानंतर पुसद येथून त्यांनी बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण केले. घरी श्रीमंती नसली, तरी थोडीफार चणचण जाणवण्याइतकी परिस्थिती होती आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी मोठ्या शहरात जाऊन स्वत:ला सर्वार्थाने सिद्ध करावे लागणार होते, म्हणूनच आपले शिक्षण पूर्ण होताच डॉ. वैभव मुंबईत येऊन दाखल झाले होते. मुंबईत आले, त्याच दिवशी त्यांनी नोकरीही मिळवली आणि राहायला ओसरीही मिळाली.
 
 
vaibhav
 
1999पासून हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉ. वैभव 2014 साली वैद्यकीय संचालक झाले. या काळात त्यांनी रुग्णालयासाठी विविध उपक्रम राबवले. हिंदू सभा हॉस्पिटल हे धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून चालणारे आणि गोरगरिबांसाठी तत्पर सेवा देणारे म्हणून प्रसिद्ध. या रुग्णालयात काम करताना वेगवेगळ्या जबाबदार्‍या स्वीकारून त्या यशस्वीपणे पार पाडणार्‍या डॉ. वैभव देवगिरकरांनी आता एक मोठे स्वप्न पाहिले आहे. हिंदू सभा हॉस्पिटल आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नुकतीच जुनी इमारत पाडून नव्या इमारतीसाठी जागा स्वच्छ करण्याचे काम सुरू झाले आहे. 1999 साली मुंबईत दाखल होऊन रुग्णालयाला आपले घर मानून तेथेच राहणार्‍या डॉ. वैभव यांनी 2004 साली लग्न केले आणि घाटकोपर परिसरात संसार सुरू केला. डॉ. शीतल ही त्यांची सहधर्मचारिणी. दोघेही एकाच क्षेत्रात काम करणारे आणि दोघांचे ध्येयही एकच. त्यामुळे संसाराची गाडी चालत राहिली. संसारवेलीवर फुले उमलली. स्वराज व मुद्रा ही डॉ. वैभव व डॉ. शीतल यांची अपत्ये.
 
 
vaibhav
 
पंचवीस वर्षांहून अधिक काळ डॉ. वैभव हिंदू सभा हॉस्पिटलशी जोडलेले आहेत. विविध आजारांनी, व्याधींनी ग्रस्त झालेले रुग्ण या रुग्णालयात येत. या दु:खी चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटवण्याची किमया डॉ. वैभव यांनी साध्य केली. पंचतारांकित सोसायटीपासून ते झोपडपट्टीपर्यंतच्या सर्व पातळीवरच्या रुग्णाला त्याच सेवाभावाने डॉ. वैभव उपचार करत राहिले. आपण प्राप्त केलेले वैद्यकीय ज्ञान हे समाजाच्या सेवेसाठी आहे, समाजनारायणाची सेवा करण्यासाठी आपण या क्षेत्रात आलो आहोत याचे भान डॉ. वैभव यांनी कायम जपले आणि समाजाला त्याची अनुभूती दिली. रमाबाई नगरसारख्या परिसरातील बांधवांशी स्नेहधागा जुळला तो याच अनुभूतीमुळे. आर्थिक स्थिती नाही पण उपचार हवेत, व्याधिमुक्त व्हायचे आहे अशा परिस्थितीतील एकमात्र उत्तर म्हणजे डॉ. वैभव. केवळ व्यवसाय म्हणून रुग्णसेवा करायची नाही, तर ‘सेवा’ म्हणजे काम हे आपल्या व्यवहारातून सिद्ध करणार्‍या डॉ. वैभव यांनी हिंदू सभा हॉस्पिटल एका उंचीवर नेऊन ठेवले.
 
 
vaibhav
 
डॉ. वैभव हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये काम करू लागले. पण तेवढ्यापुरते त्यांनी आपले विश्व मर्यादित केले नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ ही योजना तयार करून ग्रामीण भागातील उपेक्षित, वंचित तरुणांना प्रगतीचा मार्ग दाखवला. डॉ. वैभव त्याच मार्गाने पुढे गेले. हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये नोकरी करून ते आर्थिक आघाडीवर यशस्वी झाले होते. पण आपणाकडे असलेले ज्ञान अजूनही अपूर्ण आहे, त्याला अधिक सक्षम केले पाहिजे या भूमिकेतून डॉ. वैभव यांनी मानवाधिकार, मास मीडिया कम्युनिकेशन व लाइफस्टाइल डिसिझेसवर विशेष अभ्यास केला. हा सर्व खटाटोप स्वयंप्रेरणेचा होता. परिणामी डॉ. वैभव यांच्या कामाच्या कक्षा रुंदावल्या.
 
 
डॉ. वैभव यांना वरील विषयातील ज्ञान संपादन करताना खूप मोठ्या प्रमाणात जनसंपर्क करावा लागला होता. वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील व्यक्तींशी संवाद आणि संपर्क करताना डॉ. वैभव यांच्या लक्षात आले की, इथे उपचारादरम्यान सुचवली जाणारी सर्वच औषधे रुग्णांच्या आवाक्यातील नाहीत. घरातील आर्थिक आवक आणि औषधावर खर्च होणारे पैसे यांची विषम स्थिती निर्माण होेते आणि मग रुग्ण औषधांकडे दुर्लक्ष करतो किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात औषधे घेतो. विशेषत: दीर्घकाळ औषधे घ्यावी लागणार्‍या आजारामध्ये मधुमेह, हृदयविकार यांचा समावेश असतो. मात्र या आजाराची औषधे चुकीच्या प्रमाणात घेतल्यामुळे आजार बरा होण्यापेक्षा त्याचे अन्य दुष्परिणामच दिसू लागतात. आजार गंभीर स्वरूप धारण करतात.
 
 
 
इथल्या प्रत्येक माणसाला निरामय जीवन जगण्याचा अधिकार आहे. पण आर्थिक परिस्थितीमुळे निरामय जीवन जगता येत नाही. यावर काहीतरी उपाय शोधायला हवा, असे डॉ. वैभव यांना मनोमन वाटू लागले आणि त्यातूनच मग एका चळवळीचा जन्म झाला. ‘जेनेरिक औषधांचा प्रचार’ असे ढोबळमानाने या चळवळीचे नामकरण करता येईल. सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा अल्पदरात त्याला औषधे उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. वैभव यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी औषधनिर्माते, विक्रेते यांच्याशी संवाद साधताना ज्यांच्यासाठी ही औषधे उपलब्ध करून द्यायची आहेत, त्यांचे प्रबोधनही सुरू केले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉ. वैभव ‘देव देश प्रतिष्ठान’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधाविषयी जनजागृती करीत आहेत. रुग्णांना शंका होत्या, त्याचप्रमाणे इतक्या स्वस्तात तुम्ही औषधे का उपलब्ध करून देता? असा प्रश्नही होता. शंका आणि प्रश्नांची मालिका भेदत डॉ. वैभव पुढे पुढे जात राहिले. साधारणपणे 2015पासून ते या विषयात आग्रहाने काम करत आहेत.
 
 
vivek
स्वस्त दरात जेनेरिक औषधे

गोरगरीब समाजबांधवांना स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी डॉ. वैभव यांनी ‘मेडिकल स्टोअर्स’ सुरू केले. जेनेरिक आणि नैसर्गिक औषधे या मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होऊ लागली. या गोष्टीचे दोन फायदे झाले. एक म्हणजे औषधे खूप महाग आहेत म्हणून ती न घेण्याचे प्रमाण घटले आणि स्वस्त पण प्रभावशाली औषधे घेतल्यामुळे अनेक व्याधी नियंत्रणात आल्या. डॉ. वैभव यांनी हे कार्य स्वत:पुरते मर्यादित ठेवले नाही, तर आपल्यासारख्या सहव्यवसायी डॉक्टरांशी संवाद आणि संपर्क करून त्यांनी जेनेरिक औषधाचा आग्रह धरला. एका चळवळीचा तो आग्रह होता आणि डॉ. वैभव त्या चळवळीचे नेतृत्व करत होते व आहेत.
 
 
डॉ. वैभव यांचा प्रबोधनावर कायम भर राहिला आहे - मग ते जेनेरिक औषधाविषयी असो की एकूणच आरोग्याविषयी सजगता निर्माण करायचा असो. मानवी आरोग्याविषयी कोणताही विषय असो, डॉ. वैभव यांना तो वर्ज्य नसतो. प्रत्येक भारतीय नागरिकाला ‘बेसिक लाइफ सपोर्ट’संबंधी माहिती असावी, आणीबाणीच्या काळात या बेसिक लाइफ सपोर्टच्या मदतीने प्राथमिक उपचार व्हावेत, ही काळाची गरज लक्षात घेऊन डॉ. वैभव आग्रहाने बेसिक लाइफ सपोर्टसंबंधी प्रबोधन करत आहेत. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना हा विषय योग्य प्रकारे शिकवण्यासाठी तो अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, यासाठी डॉ. वैभव शासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहेत. ‘बेसिक लाइफ सपोर्ट’ हा विषय घेऊन डॉ. वैभव यांनी मुंबईच्या डबेवाले बांधवांना प्रशिक्षण दिले असून त्याचा उत्तम परिणाम दिसून येत आहे. असे प्रशिक्षण वर्ग मोठ्या प्रमाणात करण्याचा डॉ. वैभव देव देश प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.
 
 
 
डॉ. वैभव हे ध्यासपंथी आहेत. एखादी गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्यातून सामाजिक परिणाम लक्षात आले की डॉ. वैभव हात धुऊन त्या गोष्टीच्या माागे लागतात. ‘घाईने पण सावकाश’ म्हणजे पूर्व आणि पूर्ण नियोजन करून डॉ. वैभव तो विषय हाती घेतात आणि शांतपणे त्याला कृतीतून प्रकट करत राहतात. ‘डॉक्टर’ ही सामाजिक व्यक्ती असते. समाजापासून ती अलिप्त राहून काम करू शकत नाही. केवळ वैद्यकीय उपचार एवढ्यापुरते तिचे कार्यक्षेत्र मर्यादित राहत नाही. ज्या ठिकाणी ती व्यक्ती काम करते, तेथे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रावर प्रभाव निर्माण करत असते. डॉ. वैभव त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे घाटकोपर आणि आसपासच्या परिसरावर डॉ. वैभव यांचा प्रभाव निर्माण झालेला असून वैद्यकीय सेवेबरोबरच मार्गदर्शन आणि समुपदेशन या दोन्ही गोष्टी डॉ. वैभव सहर्ष मनाने करत असतात. ‘सबको साथ लेके चले हम साथ साथ’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून डॉ. वैभव यांचा प्रवास चालू आहे आणि तो आनंददायक, यशदायक आहे.
 


vaibhav 
 
कोविड 19.. जगावर आलेले अरिष्ट. वैद्यकशास्त्र आणि सेवााभाव यांची परीक्षा पाहणारा हा कालखंड. असंख्य निर्बंध आणि असुरक्षितता यामुळे सर्वसामान्य माणूस गडबडून गेला होता. कोरोना आला म्हणजे आता सारेच संपले अशी भीतिदायक परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा डॉ. वैभव यांनी हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये आपला मुक्काम ठोकला. तब्बल सहा महिने त्यांनी रुग्णालयात राहून कोविडपीडित व्यक्तींवर उपचार केले. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविडपीडितांवर उपचार करताना पीडितांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य अबाधित राहण्यासाठीही प्रयत्न केले. सलग सहा महिने रुग्णालयाला ‘घर’ करून डॉ. वैभव ही सेवा करीत राहिले. याच काळात ‘भंते संघकीर्ती महाथेरो’ हिंदू सभा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांची प्रकृती गंभीर होती. जणू ते शेवटच्या घटका मोजत होते. अशा स्थितीत डॉ. वैभव यांनी भंते संघकीर्ती महाथेरो यांची मनोभावे सेवा केली आणि कोविडच्या कराल दाढेतून त्यांना परत आणले. रमाबाई नगरमध्ये डॉ. वैभव यांचा संपर्क खूप जुना. साधारणपणे 2004पासून रमाबाई नगरातील विविध बुद्धविहारांत डॉ. वैभव यांचे जाणे-येणे होते. भंते संघकीर्ती महाथेरो यांच्यावर उपचारानंतर डॉ. वैभव यांना एक प्रश्न पडला. आपले आयुष्य तथागतांच्या विचारांना अर्पण करून समाजात शील, करुणा, प्रेम यांची रुजवणूक करणार्‍या भिक्खूंच्या आरोग्याची काळजी कोण घेत असेल? आयुष्य अर्पण करणार्‍या या मंडळींचे आयुष्य व्याधिमुक्त व्हावे यासाठी कोण प्रयत्न करणार? डॉ. वैभव यांना हे प्रश्न पडले आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी स्वत:च पुढाकार घेतला.
 
 
vaibhav
 
कोविडचे संकट टळले आणि डॉ. वैभव यांनी प्रयत्नपूर्वक बौद्ध भिक्खूंच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेतली. एक एक करत पहिल्या टप्प्यात 100 बौद्ध भिक्खूंची तपासणी केली आणि आता सुमारे दोनशेपेक्षा जास्त बौद्ध भिक्खू डॉ. वैभव यांच्या संपर्कात आहेत. या सर्व भिक्खूंची वैद्यकीय तपासणी व उपचार, आवश्यक असेल तर शस्त्रक्रिया डॉ. वैभव देव देश प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतात. धम्माचा प्रचार करण्यासाठी भ्रमण करणार्‍या या भिक्खूंच्या आरोग्याची काळजी करण्याचे काम डॉ. वैभव व त्यांची टीम यांनी आपल्या शिरावर घेतले आहे. भिक्खूंची नियमित तपासणी करून, त्यांना आवश्यक असणारी औषधे डॉ. वैभव उपलब्ध करून देतात. डॉ. वैभव यांच्या ओपीडीच्या दर्शनी भागात तथागतांचे एक सुंदर वाक्य लिहिले आहे - ‘जो माझी सेवा करू इच्छित असेल, त्याने रुग्णाची (दु:खग्रस्तांची) सेवा करावी’. डॉ. वैभव हा आनंद पुरेपूर उपभोगत आहेत. सेवेने मिळणारा आनंद मोजता येत नाही, पण त्याची अनुभूती घेता येते. डॉ. वैभव यांच्या सहवासात काही काळ व्यतीत केला, तरी सहजपणे ही अनुभूती येत असते.
 


vaibhav
 
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंनी सहभागी व्हावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनोगत ऐकावे, यासाठी डॉ. वैभव यांनी रमाबाई नगर येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात मंगलप्रभात लोढा यांच्यासह दोनशेपेक्षा अधिक बौद्ध भिक्खू सहभागी झाले. देव देश प्रतिष्ठान आणि भारतीय बौद्ध भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. रमाबाई नगरात असा कार्यक्रम, तोही पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम आयोजित करणे राजकीय पक्षांनाही अवघड होते. पण डॉ. वैभव यांचे बौद्ध भिक्खूंशी असलेले स्नेहपूर्ण संबंध आणि रमाबाई नगरातील नागरिकांशी असणारा आत्मीय व्यवहार यामुळे हे शक्य झाले.
 
 
बौद्ध भिक्खूंच्या आरोग्याची काळजी घेताना, त्यांच्यावर उपचार करताना डॉ. वैभव यांनी सेवाभावाचा अंगीकार केला. रमाबाई नगर परिसरात भारतीय भिक्खू संघाची प्रशस्त वास्तू उभी राहत आहे. या वास्तूचे व्यवस्थापन आणि सर्व प्रकारच्या नियोजनाची जबाबदारी भिक्खू संघाने डॉ. वैभव यांच्याकडे दिली आहे. देव देश प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त भिक्खूंचा विमा काढण्याचा डॉ. वैभव यांचा मानस आहे. लवकरच या विषयावर कार्यवाही होईल.
 
 
तथागतांच्या धम्मपदाचे वाचन करणारे अनेक जण भेटतात, मात्र धम्मपद जगण्याचा भाग करणारे खूप थोडे लोक असतात. डॉ. वैभव यांचा या थोड्या लोकांत समावेश होतो. तथागतांनी मानवी जीवनात करुणेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. करुणा म्हणजे केवळ दयाभाव नाही किंवा दुसर्‍याची दु:खे पाहून दु:खी होणे नाही, तर दुसर्‍यांच्या दु:खाच्या वेदनांची सहअनुभूती घेऊन ते दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करताना ‘मी तसाच तो’ हा समतेचा मंत्र जपणे होय. डॉ. वैभव हा मंत्र आपल्या जगण्याचा भाग करतात, म्हणून केवळ भिक्खूच नाही, तर कोणत्याही जातिधर्माचा रुग्ण सहजपणे डॉ. वैभव यांच्यासमोर आपल्या वेदना व्यक्त करू शकतो आणि आपल्या वेदनांवर डॉ. वैभव यांच्याकडून उपचार करून घेतो. सहज उपलब्धता आणि सहज संवाद ही डॉ. वैभव यांची बलस्थाने आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करताना होणारी धावपळ विविध कार्यक्रमातील उपस्थिती या गोष्टी करताना ओपीडीची वेळ चुकत नाही, हे डॉ. वैभव यांचे वैशिष्ट्य आहे.
 

vaibhav 
 
डॉ. वैभव जवळजवळ 25 वर्षे मुंबईतील वैद्यकीय जगताशी संबंधित आहेत. हिंदू सभा हॉस्पिटलसारख्या मान्यताप्राप्त रुग्णालयाचे नेतृत्व करताना ते केवळ व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारत नाहीत, तर व्यवसायाबरोबर सेवा आणि प्रबोधन या गोष्टींवरही त्यांचा भर असतो. कारण या गोष्टीची अनुभूती जिथे मिळेल, तिथे उत्तम व्यवहार होत असतो.
 
 
मुंबई म्हटले की सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणारे शहर अशी देशभर मुंबईची ख्याती आहे. विशेषत: वैद्यकीय उपचारासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून लोक मुंबईत येतात. टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय परिसरात सहज फेरफटका मारला की याचा अनुभव येतो. विशेषत: कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. अगदी पूर्वांचलपासून ते थेट दक्षिणेतील छोट्या खेड्यातील रुग्ण पाहिले की लक्षात येते कॅन्सरचा शेवटचा टप्पा गाठल्यावर, विकार अधिक बळावल्यावर ही मंडळी उपचारासाठी येतात आणि बर्‍याच वेळा मोठ्या शस्त्रक्रिया होऊनही रुग्ण बचावत नाही. याचे कारण स्थानिक ठिकाणी योग्य तपासणी होत नाही किंवा कॅन्सरविषयी पूर्ण माहिती नसते. या विषयात जागृती झाली, तर कॅन्सरचे बळी कमी होतील हे लक्षात घेऊन आपण या क्षेत्रात काही काम करावे, असे डॉ. वैभव यांना वाटले आणि त्यांनी देव देश प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम सुरूही केले. अर्थात हे काम एक व्यक्ती किंवा एक संस्था करू शकत नाही. डॉ. वैभव यांनी पूर्वांचलात काम करणार्‍या छबी सहयोग फाउंडेशन नवी मुंबई यांच्यासोबत कांगलीपाक, कानबा लूप, न्यू जनरेशन, मणिपूर इत्यादी संस्थांची मदत घेऊन उपक्रम सुरू केला.
 
 
vivek
 
महाराष्ट्र, मुंबई इथे डॉ. वैभव अशा प्रकारचे काम करत होतेच, त्याचबरोबर त्यांनी मणिपूरसारख्या दुर्गम प्रदेशात कॅन्सर जनजागृती आणि तपासणी करण्याचा यशस्वी खटाटोप केला. सात दिवस मणिपूर आणि उत्तराखंडमधील विविध ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आले. विशेषत: महिलांसाठी स्तन कर्करोग जागरूकता आणि तपासणी यावर भर देण्यात आला होता. हा अनुभव गाठीशी बांधून पुढील काळात नागालँड, मिझोराम, आसाम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, प. बंगाल या राज्यांतही अशी शिबिरे आयोजित करण्याचा डॉ. वैभव यांचा मानस आहे. त्यासाठी देव देश प्रतिष्ठान, छबी सहयोग फाउंडेशन व मन इंडीजिनस कल्चर अँड वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून योजना तयार करीत आहेत.
 

vivek 
 
वैद्यकीय सेवा देणे हे डॉ. वैभव यांचे निहित कर्तव्य आहेच, त्याचबरोबर समाज सक्षम आणि बलशाली व्हावा यासाठीही ते वेगवेगळे उपक्रम सातत्याने करत असतात. आजच्या धकाधकीच्या काळात येणारे अनुभव आणि त्यातून येणारे नैराश्य अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करू शकते. स्पर्धेच्या युगात टिकून राहताना स्वत:ला सिद्ध करावे यासाठी मानसिक आधाराची आवश्यकता असते. डॉ. वैभव असा आधार देण्यासाठी सदैव तत्पर असतात. निराश झालेल्या, खचलेल्या तरुणांच्या पाठीशी उभे राहून त्यांना जगण्याची लढाई जिंकण्याची प्रेरणा डॉ. वैभव यांनी दिली असून दिशाहीन झालेले तरुण आता उद्योजक झाले आहेत आणि डॉ. वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पातळ्यांवरचे यश प्राप्त करत आहेत.
 
 वैद्यकीय क्षेत्र, सेवा क्षेत्र यामध्ये सक्रिय कार्य करणारे डॉ. वैभव उत्तम लेखक असून त्यांनी भारतीय विचारवंत व पाश्चात्त्य विचारवंत यांच्या विचारांवर आधारित दोन पुस्तकांचे लेखन केले असून ती लवकरच प्रकाशित होतील.
 
डॉ. वैभव उत्तम वाचक आहेत. त्यांनी उत्तम ग्रंथांचा, पुस्तकांचा संग्रह केला असून जे जे उत्तम ते ते आत्मसात करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे जगभरातील ‘बेस्ट सेलर’ पुस्तकांविषयी डॉ. वैभव यांना इत्थंभूत ज्ञान आहे. त्याचप्रमाणे भारतीय परंपरा, भारतीय महापुरुष यांचाही त्यांचा अभ्यास आहे. वैद्यकीय क्षेत्र, सेवा क्षेत्र यामध्ये सक्रिय कार्य करणारे डॉ. वैभव उत्तम लेखक असून त्यांनी भारतीय विचारवंत व पाश्चात्त्य विचारवंत यांच्या विचारांवर आधारित दोन पुस्तकांचे लेखन केले असून ती लवकरच प्रकाशित होतील. वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणारे लेखन ते करत असतातच, त्याचबरोबर वैचारिक आणि प्रेरणादायक लेखनही करत असतात.
 
 
डॉ. वैभव गेली 25 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. वैद्यकीय सेवेसाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक संस्थांनी, संघटनांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. आरोग्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून डॉ. वैभव देव देश प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवा कार्य करत असतात. वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही ते सातत्याने सक्रिय असतात. यामागचे कारण काय असावे? डॉ. वैभव यांच्या सहवासात काही वेळ घालवला की याचे सहजपणे उत्तर मिळते. भारतीय परंपरेत ‘सर्वे सुखिन: सन्तु’ अशी प्रार्थना आहे. ही प्रार्थना केवळ म्हणायची नाही, तर कृतीतून साकार करायची आहे, याची जाणीव डॉ. वैभव यांच्या सहवासात लाभते. हीच जाणीव डॉ. वैभव यांना दीपस्तंभासारखी उभी करते आणि डॉ. वैभव यांच्याकडे पाहून अनेक तरुण सेवा क्षेत्रात येतात, हीच डॉ. वैभव यांची 25 वर्षांची कमाई.
 
 
 
प्राथमिक चिकित्सा प्रणाली किंवा आरोग्य सेवा यासाठी काम करण्याचा आणि प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचा त्यांचा मानस आहे, कारण शासकीय प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम असेल, तर द्वितीय आरोग्य सेवेवर ताण पडणार नाही, तसेच सुदृढ आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर अधिक भर द्यायला पाहिजे, असे डॉ. वैभव यांचे ठाम मत आहे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001