शतायुषी गीता प्रेस - संस्था नव्हे.. भारतीयांची श्रद्धा

विवेक मराठी    04-Nov-2023   
Total Views |
geeta Press
भारत सरकारचा ‘गांधी शांती पुरस्कार’ मिळल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेली ‘गीता प्रेस, गोरखपूर’ ही विश्वविख्यात प्रकाशन संस्था असून आजवर सुमारे 92 कोटी गीता व धार्मिक ग्रंथ प्रकाशन करण्याचा विश्वविक्रम या संस्थेने केलेला आहे. गीता व वैदिक साहित्य छापून अत्यंत स्वस्तात घरोघर पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून 1923 साली गोरखपूर येथे गीता प्रेसचा श्रीगणेशा झाला. या संस्थेने नुकतीच शताब्दी साजरी केली असून संस्थापक त्रिमूर्ती श्रद्धेय जयदयालजी गोयंका, हनुमानप्रसाद पोद्दार ‘भाईजी’ आणि घनश्यामदास जालान यांच्या सेवासमर्पित कार्याने, जगातील सर्वात मोठ्या धार्मिक ग्रंथ प्रकाशन संस्थेचा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. आता गांधी शांती पुरस्काराने झालेला संस्थेचा गौरव हा प्रत्येक सनातन, राष्ट्रप्रेमीचा गौरव आहे. ‘गीता प्रेस ही संस्था नसून कोटी कोटी कोटी भारतीयांची श्रद्धा आहे’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काढलेले गौरवोद्गार अत्यंत सार्थ व समर्पक आहेत. अशा विश्वविख्यात संस्थेच्या सेवा कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. संतसाहित्याचे उपासक विद्याधर ताठे यांनी विवेक परिवाराद्वारे वाहिलेली गौरव शब्दांजली!
‘गीता प्रेस’ गोरखपूर पावन मंगल धाम है।
 
जहाँ कर्म से भाग्य बदलते, श्रमनिष्ठा कल्याणी है।
 
त्याग और तप की गाथाएँ गाती कवि कि वाणी है।
 
ज्ञान जहा गंगा जलसा निर्मल है अविराम है।
 
 
‘भगवद्गीता’, तुलसीजींचे ‘रामचरितमानस’ आणि ‘हनुमान चालिसा’ कोट्यवधी भारतीयांच्या घराघरांत पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य अत्यंत भक्तिभावाने व समर्पित मनाने गेली शंभर वर्षे करणारी, जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था - ‘गीता प्रेस, गोरखपूर’! समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी सेवासंस्था. सनातन धर्माच्या व संस्कृतीच्या प्रचार-प्रसारार्थ कार्यरत विश्वविख्यात अशा गीता प्रेस (2022)ने शताब्दी पूर्ण केली असून या शताब्दी वर्षात या संस्थेला ‘म. गांधी शांती पुरस्कार’ (2021चा) घोषित करून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने गीता प्रेसच्या अपूर्व, ऐतिहासिक कार्याचा यथोचित गौरव केला आहे. आपल्या शताब्दी वर्षाच्या सेवाभावी वाटचालीत आजवर गीता प्रेसने कोणताही पुरस्कार स्वीकारलेला नाही, तसेच कोणाकडून कोणत्याही प्रकारची देणगी-दान घेतलेले नाही, हे गीता प्रेस संस्थेचे आदर्श व अनुकरणीय वैशिष्ट्य आहे.
 
 
‘गांधी शांती पुरस्कार’ मिळाल्याने, मुळातच विक्रमवीर असलेला ‘गीता प्रेस’ सर्वत्र चर्चेचा व कुतूहलाचा विषय झालेला आहे. काँग्रेसने गीता प्रेसला पुरस्कार देण्यावर आक्षेप घेऊन हा विषय वादग्रस्तही केला. आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे व हिंदूविरोधी मानसिकतेचे क्षुद्र दर्शन घडवले आहे. या पार्श्वभूमीवर गीता प्रेस विश्वस्त मंडळ गांधी शांती पुरस्कार स्वीकारणार का? असाही प्रश्न उद्भवला. अखेर गीता प्रेस विश्वस्तांनी पुरस्कार स्वीकारण्याचा व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाचा सन्मान राखण्याची घोषणा केली, पण पुरस्कारार्थ मिळणारी एक कोटी रुपयांची रक्कम सविनय नाकारून, कोणतेही देणगी-दान न स्वीकारण्याची आपली शंभर वर्षांची परंपरा कटाक्षाने जतन केली. या कृतीचे देशभर स्वागत झाले व ‘गीता प्रेस’वर देश-विदेशातून अभिनंदनाचा अमृतवर्षाव झाला - ‘जीवेत शरद: सहस्रम्।’, ‘तुम जीयो हजारो साल।’, ‘चिरंजीव रहे कार्य आपका।’
‘गीता प्रेस’सारख्या एकमेवाद्वितीय प्रकाशन संस्थेचा हा गौरव समस्त हिंदू समाजाचा, सकल सनातन धर्मप्रेमींचा व कल्याणकार्याचा गौरव आहे. हा गौरव संस्थेचा नसून आत्मविलोपी, ध्येयवादी, सेवासमर्पित वृत्ती प्रवृत्ती प्रसृत सर्जनकार्याचा गौरव आहे.
 
 
 
गीता, रामायण, उपनिषदे आदी ग्रंथांच्या विविध 14 भाषांमध्ये विक्रमी 42 कोटी प्रती मुद्रित-प्रकाशित आणि वितरित करणारी ‘गीता प्रेस’ ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे. तसेच ‘कल्याण’ (हिंदी) या भारतातील सर्वाधिक खपाच्या धार्मिक मासिकाचे गेली 97 वर्षे अवितरपणे प्रकाशन करणारी संस्था म्हणूनही ‘गीता प्रेस गोरखपूर’चे नाव सर्वश्रुत आहे. हिंदीप्रमाणेच इंग्लिशमध्ये ‘कल्याण कल्पतरू’ (Kalyan Kalpataru) नावाचे मासिक गेली 90 वर्षे गीता प्रेसद्वारे प्रकाशित होत आहे. महात्मा गांधी ते गुरुदेव रानडे, राष्ट्रसंत विनोबा भावे अशा हजारो मान्यवर चिंतक, उपासक, तत्त्वज्ञ, निरूपणकार, संत, महंत यांच्या अमृतविचारांचे दीपस्तंभवत व्यासपीठ म्हणून ‘कल्याण’ मासिकाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी संस्था ही ‘गीता प्रेस’ सकल सनातन धर्मप्रेमींच्या जीवीचा जिव्हाळा झालेली आहे. गीता प्रेसचे कार्य हे सामान्य कार्य नसून दिव्य ईश्वरी कार्य आहे. ‘गीता प्रेस’चे संस्थापक, संचालक आणि संपादक हे केवळ निमित्तमात्र आहेत, अशीच गीता प्रेसच्या विश्वस्तांची भावना आहे. गीता प्रेसची स्थापना, गीता प्रेस संस्थापकांची दिव्य, साक्षात्कारी, समर्पित जीवनचरित्रे, त्यांचे विचार, त्यांचे संकल्प, सचोटी-सदाचाराच्या मार्गाने, उपासनेच्या, साधनेच्या बळावर अविरत प्रयत्न व परिश्रमाने त्यांनी प्राप्त केलेली सिद्धी, पादाक्रांत केलेली यशाची अनेक शिखरे अशी समग्र व साद्यंत माहिती आपण जाणून घेतली की आपणही नकळत ‘हे सामान्य मानवी नव्हे तर ईश्वरी कार्य आहे’ याच निष्कर्षाप्रत येतो.
 
 
geeta Press
 
 1) ब्रह्मलीन जयदयालजी गोयंका उपाख्य श्रद्धेय ‘सेठजी’, 2) हरिलीलालीन हनुमानप्रसाद पोद्दार  3) गीताप्रेमी धर्मपरायण कै.घनश्यामदासजी जालान
 
 
‘गीता प्रेस’ची संस्थापक त्रयी
 
 
उत्तर प्रदेशातील नाथसंप्रदायाचे नामवंत पीठ असलेल्या गोरखपूरमध्ये इ.स. 1923 साली स्थापन झालेल्या ‘गीता प्रेस’च्या उभारणीत व संचालनात अनेकांचे मंगल योगदान आहे, पण ‘संस्थापक त्रिमूर्ती’ म्हणून 1) ब्रह्मलीन जयदयालजी गोयंका उपाख्य श्रद्धेय ‘सेठजी’, 2) हरिलीलालीन हनुमानप्रसाद पोद्दार - सर्वांचे जिवलग ‘भाईजी’ आणि 3) गीताप्रेमी धर्मपरायण कै.घनश्यामदासजी जालान यांना ओळखले जाते. ‘भगवद्गीता’ हा तिघांना एका भक्तिसूत्राने बांधणारा धर्मबंध होता. या तिघांनाही आपण गीताव्रती, गीताप्रेमी, गीता प्रचारक म्हणू शकतो. तीच त्यांची खरी ओळख होय. हे तिघेही राजस्थानच्या धर्मपरायण मारवाडी समाजाचे भूषण होते. त्या तिघांपैकी जयदयालजी गोयंका व हनुमानप्रसाद पोद्दार हे दोघे मावस भाऊ होते. गोयंका परिवार हा कलकत्त्यामधील एक नामवंत व्यापारी परिवार होता. बाकुडा, कलकत्ता व मुंबई अशा ठिकाणी त्यांची व्यापारी प्रतिष्ठाने होती. जयदयालजी गोयंका व हनुमानप्रसाद पोद्दार हे व्यापारामुळे, बाकुडा व कलकत्त्यामध्यचे राहत होते आणि घनश्यामदास जालान हे गोयंकांचे जीवश्चकंठश्च मित्र होते, तसेच गीता सत्संगी होते.
 
 
‘गीता प्रेस, स्थापनेस कारण - वाद प्रसंग
 
संवादातून-विचारविमर्शातून अनेक संस्थांचा जन्म, स्थापना होते. पण एका अभावितपणे झालेल्या अगदी क्षुल्लक वादातून ‘गीता प्रेस’सारखी महान संस्था जन्माला आली.
 
 
हा प्रसंग, वाद इ.स. 1922 सालची घटना आहे. गीता उपासक व प्रवचनकार असलेले ‘सेठ’ जयदयालजी गोयंका आपल्या उद्योग व्यापाराबरोबरच नित्यनेमाने धर्मपरायण व्यापारी मित्रांची सत्संग बैठक घेत असत. त्यामध्ये काही उपासना-धर्मग्रंथ वाचन झाल्यावर, गीतेवर बोलत असत. या मित्रमंडळींच्या सत्संग बैठकीत असा विचार पुढे आला की, आपण ‘भगवद्गीता’ छापून सर्वांना स्वस्तात सहजपणे उपलब्ध करून द्यावी आणि त्यायोगे गीतेचा प्रचार-प्रसार करावा. त्यानुसार जयदयालजींनी ‘वणिक’ छापखान्याच्या मालकास बोलवून गीता छपाईचे काम दिले. सेठजींच्या परिचित अशा व्यक्तीचाच प्रेस होता. त्याने सेठजींचे काम, गीता छापण्याची सेवा म्हणून आनंदाने स्वीकारले आणि वेळेमध्ये पूर्ण केले. भगवद्गीतेच्या मुद्रित प्रती सेठ गोयंकाच्या गोविंद कार्यालयमध्ये आल्या. स्वत: ‘सेठजीं’नी एक प्रत काढून मस्तकास लावली व मोठ्या श्रद्धेने उघडून वाचली आणि ते संतुष्ट होण्याऐवजी नाराज झाले. कारण छपाईत अनेक दोष होते. र्‍हस्व-दीर्घ, जोडाक्षरे यामध्ये अनेक चुका झाल्या होत्या. थोडक्यात मुद्रितशोधनाचे काम पुरेसे काळजीने न करताच गीता छापली गेली होती. सेठजींनी वणिक प्रिंटिंग प्रेसच्या मालकाला बोलवून आपली नाराजी व्यक्त केली, तेव्हा दुरुस्त्या करून शुद्ध स्वरूपात दुसरी आवृत्ती छापण्याचे ठरले. पण त्या दुसर्‍या आवृत्तीच्या छपाईतही मुद्रणदोष पाहून ‘सेठजी’ कधी नव्हे ते क्रोधित झाले. त्यांनी प्रेसच्या मालकाला बोलवून अत्यंत तीव्र शब्दात राग व्यक्त केला. सेठजींना असे संतापलेले सारे जण प्रथमच पहात होते, पण तो क्रोध नव्हता, तर शुद्ध-बिनचूक कामाच्या आग्रहातून आलेला सात्त्विक संताप होता. यावर प्रेस मालकांनी दिलगिरी व्यक्त केली, पण तो प्रूफरीडिंग कितीही केले तर संस्कृत छपाईत दोष राहतातच, आदी शब्दात समर्थन करू लागला. आणि अखेर सेठजींना म्हणाला, “तुमच्याप्रमाणे शुद्ध, विनादोष छपाई होण्यासाठी तुम्हाला स्वत:चाच प्रेस टाकावा लागेल. मग तुम्हाला दोष का राहतात ते अनुभवास येईल. तुम्ही प्रेस टाकून पाहा.”
 
geeta Press 
 
प्रेसवाला गोविंद कार्यालयातून निघून गेल्यानंतर सेठ जयदयालजी गोयंका त्यांच्या ‘मग तुम्हीच प्रेस टाकून पहा’ या वाक्याचाच विचार करीत राहिले आणि अखेर त्यांनी भगवद्गीता शुद्ध, निर्दोष छापून वितरण करण्यासाठी स्वत:चा प्रेस टाकायचा निर्णय मनोमन करून टाकला. मित्रमंडळींच्या साप्ताहिक सत्संग बैठकीत त्यांनी गीता छपाईसाठी स्वत:चा प्रेस टाकण्याचा विचार बोलून दाखवला. सर्वांना ती कल्पना आवडली व मान्यही झाली. प्रिंटिंग प्रेस काढण्याच्या दृष्टीने सर्वत्र चौकशी-माहिती घेणे सुरू झाले. तेव्हा प्रथम कलकत्ता, नंतर मुंबई या शहरांचा विचार पुढे आला. पण दोन्हीीकडे ब्रिटिश सरकारच्या काही शर्तींची अडचण होती. अशाच एका विचारविनिमय बैठकीत सेठ जयदयालजींचे गीताप्रेमी ‘सत्संगी’ घनिष्ठ मित्र घनश्यामदास जालान यांनी सेठजींना, “उत्तर प्रदेशमधील ‘गोरखपूर’ येथे आपला प्रिंटिंग प्रेस काढावा, माझा तेथे व्यवसाय-व्यापार आहे, तो पाहत मी प्रेसची सारी व्यवस्था पाहतो. तुम्ही निश्चिंत रहा” असा प्रस्ताव दिला. सेठीजी, भाईजी आदींनी साधकबाधक विचारांनी तो मान्य केला. अशा प्रकारे गोरखपूर येथे प्रिंटिंग प्रेस सुरू करण्याचा निर्णय पक्का झाला.
 
 
सर्वानुमते नियोजित प्रेसचे नाव ‘गीता प्रेस’ असे ठरविण्यात आले आणि गोरखपूर येथे प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यासाठी घनश्यामदास जालान यांनी प्रेससाठी एक सोईची दरमहा 10 रुपये भाड्याची जागा पाहून ठेवली. इकडे कलकत्त्यामध्ये सेठ दयालजी व भाई हनुमानप्रसाद पोद्दारजी यांनी प्रिंटिंग प्रेसच्या अधिकृत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. ब्रिटिश सरकारच्या 1860च्या व्यापारी संस्था, प्रतिष्ठान नोंदणी कायद्याअंतर्गत ‘गीता प्रेस, गोरखपूर’ची अधिकृत नोंदणी करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगाल सरकारच्या नव्या नोंदणी कायद्यानुसार ‘गीता प्रेस’च्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यात आले. अशा प्रकारे सारे सोपस्कार पूर्ण होताच ‘शुभस्य शीघ्रम्’ विचाराने दि. 29 एप्रिल 1923 रोजी 600 रुपयांची एक जुनी हँड प्रिंटिंग मशीन घेऊन गोरखपूर येथे ‘गीता प्रेस’चा शुभारंभ करण्यात आला.
 
 
‘गीता प्रेस’चे उदात्त व्यापक उद्दिष्ट
 
 
‘गीता प्रेस, गोरखपूर’चा मुख्य उद्देश भगवान श्रीकृष्णाची युगवाणी ‘भगवद्गीता’ शुद्ध, मूळ स्वरूपात छापून जनसामान्य भारतीयांच्या घराघरात अत्यंत स्वस्तामध्ये पोहोचवणे. गीतार्थाने सार्‍या विश्वाला आनंदाने भरून टाकणे. सनातन हिंदू धर्माचे अनेक ग्रंथ असताना गीताच का? तर गीता हे सर्व उपनिषदे व शास्त्रे यांचे नवनीत आहे. आध्यात्मिक, तात्त्विक, पारमार्थिक श्रेष्ठत्वापेक्षाही, निद्रिस्त-निस्तेज झालेल्या आत्मबलविस्मृत समाजाला जाग्रत करण्यासाठी ‘गीता’ ही संजीवन मंत्रासारखी आहे. गीता ही अन्य कोणत्याही धर्मपंथाचा-धर्ममताचा ना द्वेष शिकवते, ना विरोध. ‘गीता’ हा समस्त मानव जातीच्या अभ्युदयाचा व शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. गीता प्रेस हा केवळ एक सुसज्ज छापखाना वा केवळ एक पुस्तक प्रकाशन करणारी व्यावसायिक संस्था नाही, तर गीता प्रेस हा व्यापक कल्याण कार्याचा, बहुविध उपक्रम-आयामांनी संपन्न अशी लोककल्याणकारी जनजागृती चळवळ आहे.
 
 
उद्दिष्टे
सनातन धर्मविचारांचे सम्यक दर्शन
 
सनातन हिंदू चिंतनाला पाच हजार वर्षांपेक्षा अधिक काळांची प्रदीर्घ विचारपरंपरा लाभलेली आहे. वेद वाङ्मय, उपनिषद, शास्त्रे, स्मृतिग्रंथ, रामायण, महाभारत, गीता अशा अनेक चिंतनपरिपुष्ट ग्रंथांनी सनातन धर्मचिंतन सतत नित्यनूतन राहिलेले आहे. वेदवाङ्मय हे आम्हा भारतीयांचे सर्वश्रेष्ठ निजधन आहे, अमृत ठेवा आहे. स्वामी विवेकानंदांनी वेदांत वाङ्मयाचे मोठेपण देशी-विदेशी विद्वानांना समजून सांगितले आहे. स्वामीजी म्हणतात, “पूर्वेचा (भारत)वेदान्त विचार ही भारताची एकमेवाद्वितीय अशी संपदा आहे की भारताला अन्य राष्ट्रांकडून विचारधन आयात करण्याची मुळीच गरज नाही.” हे समजून न घेताच ब्रिटिश सरकाराश्रित मिशनर्‍यांनी व पाश्चात्त्य विद्वानांनी घाणेरडे, बालिश आरोप करीत पारतंत्र्याने गांजलेल्या हतबल हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा कुटिल प्रयत्न केला. अशा आत्मवंचनेच्या काळात सार्‍या खोट्या आरोपांना सनातन धर्म विचाराचे वैज्ञानिक सत्य स्वरूप व सम्यक दर्शन घडविण्यासाठी, भगवद्गीतेबरोबरच अन्य अनेक वेदान्त दर्शनपर ग्रंथ प्रकाशित करण्याचे उद्दिष्ट गीता प्रेस संस्थापकांनी डोळ्यापुढे ठेवले होते.
 
geeta Press 
 
अत्यंत स्वस्तात ग्रंथविक्री
 
 
धार्मिक-पारमार्थिक ग्रंथ छापणे हे ‘गीता प्रेस’चे पहिले उद्दिष्ट आहे. ती पुस्तके अत्यंत स्वस्तात लोकांना उपलब्ध करून देणे हाही त्यांच्या उद्दिष्टाचाच एक भाग आहे, म्हणूनच वेदान्त विचारांचे प्रतिपादन व पुरस्कार करणारे अनेक विद्वानांचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले आणि अत्यंत माफक दरात, स्वस्तात स्वस्त मूल्यात घरोघर पोहोचवले. इथे गीता प्रेस संस्थापकांच्या अनुभवनिष्ठ व्यापारी दृष्टीचाही आपणास परिचय घडतो. श्रद्धाभावाने स्वकष्टार्जित कमाईतून धार्मिक ग्रंथ खरेदी करा व वाचा, अशी सवय समाजाला लावण्याची गीता प्रेस संस्थापकांची योजना या ‘स्वस्त पुस्तक विक्री’ उद्दिष्टामागे जाणवते.
 
गीता प्रेस संस्थेचा वटवृक्ष - संस्था समूह
 
गीता प्रेस सेवा समर्पित संस्थेने 29 एप्रिल 2022मध्ये आपल्या ऐतिहासिक वाटचालीची शताब्दी पूर्ण केली असून तत्कालीन मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंगल सान्निध्यात शताब्दी सोहळा शुभारंभ झाला. या दहा दशकांच्या ध्येयवादी, नियोजनबद्ध वाटचालीत या संस्थेने अनेक विक्रम स्थापित करीत जागतिक संस्थेची प्रतिष्ठा व लौकिक प्राप्त केलेला आहे. ‘गीता प्रेस गोरखपूर’ हे हिंदू सनातन वेदान्तपर ग्रंथ प्रकाशन करणारे ‘बॅ्रंड नेम’ म्हणून विश्वविख्यात झालेले आहे.
 
गीता प्रेसच्या मातृसंस्था व संलग्न संस्था, आयाम-उपक्रमांपैकी काही प्रमुख पुढीलप्रमाणे -
 
1) गोविंद भवन कार्यालय
 
हे ब्रह्मलीन, गीताप्रचारक, गीताचिंतक सेठ जयदयालजी गोयंका यांचे कलकत्तास्थित प्रतिष्ठान आहे. ही गीता प्रेसची मातृसंस्था आहे. या ‘गोविंद भवन’मध्येच गीता सत्संग होत असे. या सत्संग मित्रमंडळींमध्येच गीता प्रचाराचा संकल्प झाला आणि पुढे गीता प्रेस स्थापन करण्याचा निर्णय झाला.
 
कलकत्त्यामध्ये अनेक भागात गोविंद भवन कार्यालयाच्या अनेक शाखा आहेत व तेथे गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके विक्री करणारी सुसज्ज भव्य शोरूम आहेत. पुस्तकाचे दुकान, त्याची प्रसन्नता, देखणी मांडणी आणि वाचकांना सहज पुस्तकाकडे आकर्षित करेल अशी प्रदर्शनीय आकर्षक व्यवस्था हे सार्‍या पुस्तक विक्री दुकानांचे वैशिष्ट्य आहे. इथे केवळ गीता प्रेस प्रकाशित पुस्तकेच मिळतात.
 
2) गीता प्रेस गोरखपूर
 
शंभर वर्षांपूर्वी एका छोट्याशा भाड्याच्या जागेत सुरू झालेला प्रिंटिंग प्रेस व प्रकाशन व्यवसाय आता अनेक एकरांच्या परिसरात सुसज्ज अशा अनेक इमारतींतून व कार्यालयांतून विस्तारलेला आहे. गोरखपूर हे नाथपंथीय गोरक्षनाथांचे पीठ म्हणून प्रसिद्ध होतेच, आता गीता प्रेसने गोरखपूरला जगाच्या नकाशावर झळकावले व गीता प्रेससमवेतच गोरखपूर हे नावही विश्वविख्यात झाले. सुसज्ज प्रिंटिंग विभाग, गीता वाटिका, कार्यालय, लीलाचित्र मंदिर, अनेक मंदिरे-भवने अशा विविध विभागांनी संपन्न ‘गीता प्रेस’ दोन लाख चौ.मीटर एवढ्या विस्तीर्ण जागेत विस्तारलेला आहे.
 
विक्रमी पुस्तक विक्री
 
गीता प्रेसने उत्तमोत्तम वैदिक साहित्य ग्रंथ व साहित्य छापण्याबरोबरच त्यांची नियोजनबद्ध विक्री व्यवस्था निर्माण केली आणि वाचकांना ते सर्वत्र सहज विकत घेता येईल याची सोय केली. त्यासाठी देशभरामध्ये 20 ठोक विक्री केंद्रे आणि सर्व प्रमुख रेल्वे स्टेशनवर स्वत:चे ‘गीता प्रेस गोरखपूर बुक स्टॉल’ सुरू केले. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पुस्तक विक्रीची योजना केली व ती सक्षमपणे कार्यवाहीत आणली. त्यामुळेच पुस्तक विक्रीचे, खपाचे अनेक विक्रम गीता प्रेसने स्थापित केलेले आहेत.
 
 
आजवर गेल्या दहा दशकांत गीता प्रेसने विविध पुस्तकांच्या 42 कोटी प्रती विकलेल्या आहेत. त्यामध्ये ‘श्रीमद् भागवत’ ग्रंथाच्या आजवर 16 कोटी प्रती खपल्या आहेत, तसेच संत तुलसीदास यांच्या ‘रामचरितमानस’, ‘हनुमानचालिसा’, ‘विनय पत्रिका’ आदी साहित्याच्या सुमारे 12 कोटी प्रती लोकांनी खरेदी केलेल्या आहेत; बाल संस्कार साहित्याची 11 कोटी 9 लाख पुस्तके बालक-पालकांनी विकत घेतलेली आहेत. पुराणे आणि उपनिषद ग्रंथांच्या 3 कोटी प्रती भाविकांनी व अभ्यासकांनी घेतल्या अहोत. गीता प्रेस गोरखपूरने आजवर 42 कोटी पुस्तक प्रती छापल्या, त्या संस्कृत, हिंदी, इंग्लिशसह प्रमुख 15 भारतीय भाषांमध्ये छापलेल्या अहोत. त्यामध्ये मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ, बंगाली, उडिया, असमिया, पंजाबी, मल्याळी.. एवढेच नव्हे, तर उर्दू अशा विविध प्रांतांतील भाषांतील साहित्य प्रकाशनांचा समावेश आहे. मराठी वाचकांसाठी ज्ञानेश्वरी, दासबोध, संत तुकाराम गाथा, संत नामदेव गाथा यांसह अनेक धार्मिक ग्रंथ गीता प्रेसने अत्यंत स्वस्तात, अत्यंत शुद्ध आणि उत्तम छपाई-बाइंडिंगसह उपलब्ध करून दिलेले आहे. ही मराठी भाषिकांना गीता प्रेसची अक्षर भेट आहे.
 
 
काही वर्षांपूर्वी नेपाळ हे अधिकृत हिंदू राष्ट्रच होते. नेपाळमधील सनातन हिंदू धर्मप्रेमींसाठी गीता प्रेसने खास नेपाळी भाषेत वैदिक साहित्य प्रकाशित करून तेथील समस्त हिंदूंची धर्मभावना सतेज ठेवण्यात मोठे योगदान दिलेले आहे. गीता प्रेस शताब्दीच्या समारोप समारंभात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नेपाळी भाषेत अनुवादित ‘शिवपुराण’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
 
 
या पुस्तकांबरोबरच गीता प्रेसचे मुखपत्र ‘कल्याण’ मासिकाचे सुमारे अडीच लाख वाचक वार्षिक वर्गणीदार आहेत. कल्याण मासिकांच्या आजवरच्या खपाची एकूण संख्या, पुस्तक विक्रीस जोडली, तर गीता प्रेसच्या नावावर 100 कोटी प्रती खपवल्याचा - विक्री केल्याचा विश्वविक्रम नोंद झालेला आहे.
 
geeta Press 
 
कल्याण (हिंदी) मासिक
 
कल्याण मासिक हे गीता प्रेसचे मुखपत्र आहे. 1926 साली मुंबईतून सुरू झालेले कल्याण मासिक 1927पासून गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित होऊ लागले, त्याला आता 97 वर्षे झाली आहेत. ‘कल्याण’ मासिकातील विषय आणि कल्याण मासिकात लेखन करणारे मान्यवर लेखक हा स्वतंत्र अभ्यासाचा व ग्रंथाचाच विषय आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे, गुरुदेव रानडे, मदन मोहन मालवीय अशा थोर पुरुषांचे-चिंतकांचे अक्षर विचारधन ‘कल्याण’द्वारे सर्वसामान्य, सनातन धर्मप्रेमींना पाथेय म्हणून वाचावयास मिळालेले आहे. थोडक्यात, ‘कल्याण’ हे सनातन धर्मप्रेमी लेखक व सश्रद्ध भाविक वाचकांना व्यासपीठ आहे. 1934पासून इंग्लिशमध्ये ‘कल्याण कल्पतरू’ मासिक प्रकाशन सुरू झाले. ते देश-विदेशात प्रसिद्ध झाले.
 
 
गोरखपूरला जाऊन गीता प्रेस पाहणे एक अनोखी, थक्क करणारी अनुभूती आहे. शहरातील गीता प्रेस रोडवर एखाद्या भव्यदिव्य मंदिराच्या गोपुरासारखे उंच, अत्यंत देखणे व आकर्षक महाद्वार पाहूनच दर्शक संतुष्ट व प्रसन्न होतात. मा. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे हस्ते या महाद्वाराचे उद्घाटन झाले होते. येथील लीलाचित्र मंदिर आणि संदर्भ ग्रंथालय या दोन गोष्टी विशेष पाहण्यासारख्या आहेत.
 
 
लीलाचित्र मंदिर
 
 
हे एक प्रचंड मोठे प्रदर्शनीय दालन आहे. तेथे सुविख्यात चित्रकारांनी प्रथम संपादक भाईजी हनुमानप्रसाद पोद्दार आदींच्या संकल्पनेनुसार काढलेली देवदेवतांची रंगीत चित्रे फ्रेम करून जतन केलेली दिसतात. त्यामध्ये कल्याण मासिकाच्या मुखपृष्ठासाठी व आतमध्ये विविध पौराणिक प्रसंंग आदीची प्रकाशित झालेली चित्रे पाहणे हा चित्रकलेचा एक मनोहर अनुभव आहे. 700पेक्षा अधिक चित्रांतून रामायण-महाभारतातील व पौराणिक ग्रंथांतील प्रसंगांचे उत्कट चित्रण येथे पाहावयास मिळते. भगवान विष्णूंचे अवतार, रामलीला, कृष्णलीला, शिवपुराण यांचे चित्ररूप दर्शन अत्यंत चित्ताकर्षक आहे. त्याशिवाय श्रीमद्भगवद्गीतेतील सर्व 700 संस्कृत श्लोक आणि संतांचे दोहे, चौपाया सुवाच्य अक्षरांमध्ये पांढर्‍या शुभ्र संगमरवरी फरशांवर कोरले असून त्यांची सुंदर मांडणी केलेली आहे.
 
 
दुर्मीळ हस्तलिखित संग्रह व ग्रंथालय
 
 
गीता प्रेस संग्रहालयात अत्यंत दुर्मीळ अशी 3500 हस्तलिखिते आहेत. केवळ भगवद्गीतेच्या 100पेक्षा अधिक भाष्यांचा, टीकेचा संग्रह आहे. तसेच गीता प्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘कल्याण’ मासिकाचे प्रारंभापासूनचे अंक अभ्यासकांना, जिज्ञासूंना उपलब्ध आहेत. ‘कल्याण’ मासिकाच्या लेखकांची नुसती नावे वाचली तरी केवढ्या थोर-थोर चिंतकांसह संत-महंत, मंडलेश्वर, शंकराचार्य यांचे विचारधन आपणास येथे पाहता, अभ्यासता येते. अभ्यासकांची विशेष दक्षतेने दखल घेऊन माहिती पुरवली जाते. कल्याण हिंदी मासिकाप्रमाणेच कल्याण कल्पतरू (Kalyan Kalptaru) या इंग्लिश मासिकाचे प्रारंभापासूनचे अंकही आपण येथे पाहू शकतो. अत्यंत दुर्मीळ हस्तलिखिते हा भारतीय वैदिक वाङ्मयाचा अमृतठेवा आहे. तो जतन, संरक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य गीता प्रेस कर्तव्यभावाने व सेवाभावाने करीत आहे.
 
वैदिक गुरुकुल विद्यालय
 
गीता प्रेसच्या संस्थापक त्रिमूर्तींचे मूळ राजस्थानमधील असल्याने आपल्या गृहराज्यात भागात, आपल्या गावातही काही सामाजिक-धार्मिक सेवा कार्य करण्याचा ब्रह्मलीन जयदयालजी यांचा विचार होता. गीता प्रेसद्वारे वैदिक सनातन साहित्याचा प्रचार होईल, पण वैदिक गुरुकुल शिक्षण पद्धतीचे जतन करण्यास काहीतरी ठोस कार्य करावे, या हेतूने ब्रह्मलीन जयदयालजी यांनी ‘चुरू’ येथे गुरुकुल पद्धतीने वैदिक शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. थोर आध्यात्मिक चिंतक रामसुखदासजी यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याच हस्ते प्रारंभ झालेल्या या गुरुकुलास ‘ऋषिकुल ब्रह्मचर्य आश्रम’ असे नाव देण्यात आले. इ.स. 1923मध्येच स्थापन झालेल्या या गुरुकुलास यंदा शंभर वर्षे झाली आहे. येथे सुमारे 250-300 मुलांची निवास, भोजन, शिक्षणाची मोफत व्यवस्था गेली 100 वर्षे केली जात आहे. प्राचीन भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धतीचे आपणास यथारूप दर्शन घ्यायचे असेल, तर आपण राजस्थानातील अन्य पर्यटनासमवेतच चुरू येथील गुरुकुल पाहावे. रम्य परिसर, प्रसन्न वातावरण, पावन यज्ञशाळा, भारतीय वेशभूषा हे सारे पाहून आपण प्रसन्न होतो.
 
 
गीता भवन/आयुर्वेद संस्थान, ऋषिकेश
 
 
शरीरस्वास्थ्यासाठी आयुर्वेद ही भारतीय ऋषिमुनींची देणगी आहे. गीता प्रेसने भारतीय आयुर्वेद चिकित्सा व औषध पद्धतीचे संरक्षण, संवर्धन करण्यात योगदान दिलेले आहे. गीता प्रेस संस्थेद्वारे देशात गोरखपूर, कोलकाता, सुरत आणि चुरू या चार ठिकाणी मोफत आयुर्वेद चिकित्सा केली जाते. इ.स. 1950 साली ‘आयुर्वेद संस्थान’ नावाने सुरू झालेले हे कार्य गेली 70-72 वर्षे अत्यंत सेवाभावाने सुरू आहे. ऋषिकेश, स्वर्गाश्रम भागात संस्थेचा आयुर्वेद औषधनिर्मिती कारखाना आहे. मोफत चिकित्सा व औषधांचा सर्व खर्च गीता प्रेसच्या उत्पन्नातून केला जातो. ‘गीता भवन आयुर्वेद संस्थान’ लोकांचा आधार म्हणून हे जनसामान्यांमध्ये गरजू-गरिबांमध्ये विशेष परिचित आहे, लोकप्रिय आहे.
 
 
गीता प्रेस सेवा दल (स्वयंसेवक आपत्तिनिवारण विभाग)
 
 
इ.स. 1936ची घटना आहे. गोरखपूर शहरात व जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापुराचे संकट कोसळले आणि सर्वत्र हाहाकार माजला. ब्रिटिश राज होते. जनता हवालदिल, असाहाय्य झाली होती. अशा संकटकाळात गरजू-गरीब-आपद्ग्रस्त, निराधार लोकांना मदत करण्यासाठी जयदयाल गोयंका व भाई हनुमानप्रसादजी यांनी ‘गीता सेवा दल’ तयार केले व गोरखपूर व जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. अशा प्रकारे गीता प्रेस ही संस्था लोकमानसात परोपकारी, संस्था म्हणून लोकप्रिय झाली. पुढे गीता प्रेसने हे सेवा दल कायमस्वरूपी संघटना म्हणून नैसर्गिक आपत्तीसाठी सदैव सज्ज ठेवले. गोरखपूर परिसरात कोणत्याही संकटात गीता प्रेस सेवा दल धावून जाते.
 
 
1936 सालच्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यास व पूरग्रस्तांना मदत करण्यास काँग्रेसचे तत्कालीन नेते पंडित जवाहरलाल नेहरू गोरखपूरला आले होते. त्यांनी गोरखपूरला जाणे ब्रिटिश अधिकार्‍यांना मान्य नव्हते, त्यांनी नेहरूंना विरोध केला. अशा बिकट स्थितीत पंडित नेहरूंना कोणीही मदत करण्यास पुढे आले नाही, पण ब्रिटिश अधिकार्‍यांच्या रोषाची पर्वा न करता पोद्दार- भाईजींनी गीता प्रेसची मोटार दौर्‍यासाठी पं. नेहरूंना दिली. ही गोष्ट गीता प्रेसच्या राष्ट्रीय बाण्याचे व पक्षभेदातीत परोपकारी वृत्ती-प्रवृत्तीचे निकोप दर्शन घडवते.

vivek 
 
 
आताही आपत्तीमध्ये, संकटकाळी गीता प्रेस सेवा दल धावून जाते व स्वजन, स्वदेश याविषयी असलेली आपली बांधिलकी दाखवून देते. या सेवाभावामागे सनातन धर्माचे गीता प्रतिपादित एक तत्त्व आहे, ते म्हणजे ‘अद्वैत’. ‘सार्‍या समाजात, व्यक्ती-व्यक्तीत परमात्म्याचा वास आहे, हे सारे जग कृष्णमय आहे; आपल्याच मातृदेशाची, भारतमातेची सारी लेकरे आहेत, त्यांची सेवा ही भारतमातेची, राष्ट्राचीच सेवा आहे’ या व्यापक बंधुभावामुळे, राष्ट्रभक्तीमुळेच गीता प्रेस संस्थेतील, सेवा दलातील सर्व जण अत्यंत निष्कामभावाने व प्रसिद्धीपासून दूर राहून, सेवा हीच उपासना, सेवा हेच व्रत, सेवा हीच आराधना म्हणून आनंदाने सतत सेवारत राहतात.
 
 
गीता प्रेस संस्थेची अनोखी वैशिष्ट्ये
 
 
1) ‘गीता प्रेस’ ही विशुद्ध आध्यात्मिक संस्था आहे. सनातन धर्मसाहित्य प्रचार, गीता उपदेश ही या ईश्वरी कार्यामागची प्रेरणा आहे.
 
 
2) गीता प्रेस एक स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी संस्था आहे. ही संस्था कोणत्याही प्रकारची देणगी व दान स्वीकारत नाही, हे तिचे व्रत आहे. गेली 100 वर्षे कोणत्याही देणगीविना ही संस्था उत्तमपणे, प्रभावीपणे कार्यरत आहे. या तत्त्वनिष्ठेमुळेच गीता प्रेसने गांधी शांती पुरस्कार स्वीकारला, पण पुरस्काराची तब्बल 1 कोटीची रक्कम नम्रपणे नाकारली.
 
 
गीता प्रेसद्वारे 2016मध्ये 39 कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली, तर 2017मध्ये 47 कोटी रुपयांची, 2018मध्ये 66 कोटी रुपयांची आणि 2021-22मध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची पुस्तक विक्री करण्याचा विश्वविक्रम गीता प्रेसने केलेला आहे. कोरोनाच्या जागतिक संकटकाळात अनेक उद्योगधंदे व प्रकाशन संस्था बंद पडल्या, आजारी पडल्या, पण गीता प्रेसने या काळात 78 कोटी रुपयांची धार्मिक पुस्तके विक्री केली.
 
 
3) कोणत्याही व्यक्तीकडून व संस्थेकडून गीता प्रेस जसे दान-देणगी घेत नाही, तशीच आजवर कोणत्याही सरकारकडून जमीन-प्लॉट आदी कोणत्याही प्रकारची मदत घेतलेली नाही.
 
 
4) गीता प्रेस ग्रंथनिर्मितीसाठी लागणारा हजारो टन कागद, स्वत: खुल्या बाजारातून खरेदी करते. कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान मागत नाही वा सबसिडीच्या कागदाची मागणी करीत नाही.
 
5) कोणत्याही प्रकारच्या करांमध्ये सरकारकडून सवलत घेत नाही.
 
 
6) गीता प्रेस प्रकाशनाच्या ‘कल्याण’ मासिकात व अन्य ग्रंथात कोणत्याही प्रकारची व्यापारी, उद्योगधंदाची व शुभचिंतकांची जाहिरात छापली जात नाही.
 
 
7) गीता प्रेसच्या ‘कल्याण’ मासिकात जिवंत व्यक्ती, महाराज, संत, महंत वा पदाधिकारी यांचे फोटो छापले जात नाहीत.
8) गीता प्रेस संस्था कोणत्याही एकाच पंथ-संप्रदायाचा वा धर्ममताचा पुरस्कार करीत नाही, ना कोणा बाबा-बुवाची वा पीठाची-मठाची भलतीच तरफदारी करीत नाही. सर्व धर्मांचा, सर्व पंथ-संप्रदायांचा, सर्व उपासनापद्धतींचा आदर, सर्वांचा यथोचित सन्मान हेच गीता प्रेसचे संस्थात्मक व्यापक धोरण आहे. वैष्णव-शैव, राम-कृष्ण, सगुण-निर्गुण अशा सर्वांनाच येथे उचित स्थान आहे.
 
 
9) गीता प्रेस प्रकाशित ग्रंथातील व मासिकातील दोष-त्रुटी दाखवा आणि बक्षिस मिळवा असे आवाहन करणारी गीता प्रेस एकमेव प्रकाशन संस्था आहे. हीच त्यांच्या शुद्धतेची स्वयंखात्री आहे.
 
 
गीता प्रेसच्या बदनामीचा प्रयत्न
सूर्यावर थुंकण्याचा हास्यास्पद प्रकार
 
गीता पे्रस गोरखपूर संस्थेला शताब्दी वर्षात भारत सरकारने इ.स.1921चा ‘म. गांधी शांती पुरस्कार’ घोषित केला आणि सकल सनातनप्रेमी त्या वृत्ताचा जगभर जल्लोश साजरा करीत असतानाच, तथाकथित सेक्युलर काँग्रेसचा हिंदुद्वेषाचा पोटशूळ उठला. राहुल व गांधी परिवाराला खूश करण्यासाठी व आपली परिवारनिष्ठा दाखवण्यासाठी काँग्रेस नेते, प्रवक्ते जयराम रमेश यांनी समाजमाध्यमांवर एक ट्वीट करून गरळ ओकले - ‘गीता प्रेस व गांधीजींचे तीव्र मतभेद होते, अक्षर मुकुल यांच्या पुस्तकात यावर सविस्तर माहिती दिलेली आहे. एवढेच नव्हे, तर गीता प्रेसला गांधी पुरस्कार म्हणजे सावरकर-गोडसे यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करणे आहे’ अशी हास्यास्पद विधाने करीत जयराम यांनी काँग्रेसचा पूर्वापार हिंदुद्वेष प्रकट केला. अर्थात जयराम रमेश यांच्या या विधानाने राहुल-सोनिया खूश झाले, तरी आचार्य प्रमोद कृष्णमसारखे अनेक काँग्रेस नेते नाराज झाले. यातून काँग्रेस पक्षांतर्गत वैचारिक अनागोंदी चव्हाट्यावर आली. याबाबत खरी वस्तुस्थिती काय? पत्रकार मुकुल अक्षयने 1915 साली लिहिलेल्या पुस्तकात नेमके काय आहे? ते कितीपत खरे व साधार आहे? हे पाहिले की गीता प्रेसच्या विश्वव्यापी आध्यात्मिक कार्याला मुद्दाम बदनाम करून वादग्रस्त, संशयाच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा एक अजेंडा हेतुपुरस्सर चालवण्यात आला, हे स्पष्ट होते.
 
 
काँग्रेस काळात ज्या तथाकथित पुरोगामी, सेक्युलर, मार्क्सवादी, समाजवादी पत्रकार-लेखक-विचारवंतांनी विविध संस्थांच्या प्रमुख पदावर कब्जा करून प्रचंड मानधन, भत्ते व सुखसोई भोगल्या, त्यांना 2014नंतर झालेले राजकीय परिवर्तन सहन न होणारे आहे आणि ते स्वाभाविक आहे. स्वत:चे हितसंबंध दुखावताच हे सारे पुरोगामी हिंदूविरोधी, मोदीविरोधी म्हणून सरसावले. त्यापैकी अक्षर मुकुल हे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते इतके मोदीविरोधी आहेत की त्यांनी 2016मध्ये त्यांना मिळालेला ‘रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते घेण्यास आणि नरेंद्र मोदींसमवेत मंचावर एकत्र येण्यास नकार दिला होता. अशा अजेंडाधारी पत्रकाराने गीता प्रेसला कम्युनल (हिंदू जातीयवादी) ठरवण्याचा प्रयत्न आपल्या पुस्तकात केला आहे. ‘गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ असे त्या पुस्तकाचे नाव असून ते लेखकाचा हेतू स्पष्ट सांगणारे आहे.
 
 
म. गांधी व गीता प्रेसचे संस्थापक जयदयालजी गोयंका व आद्य संपादक भाईजी - हनुमानप्रसाद पोद्दार यांचे सामाजिक, धार्मिक, राजकीय असे मतभेद होते, अशी माहिती पुस्तकात तपशीलवार दिलेली आहे. पण माहितीचे आधार असलेले पुरावे चुकीचे आहेत. म. गांधी आणि भाईजी हनुमानप्रसाद पोद्दार यांच्या संबंधाची वस्तुस्थिती अशी आहे - म. गांधी 1915 साली आफ्रिकेतून भारतात परतले, तेव्हा कलकत्त्याच्या अल्फ्रेड थिएटरमध्ये त्यांचा भव्य स्वागत समारंभ झाला. त्यामध्ये भाईजी पोद्दार यांचा सहभाग होता. गांधींचे निकटवर्ती जमनालाल बजाज यांनी भाईजींची गांधींशी ओळख करून दिली. भाईजी पोद्दार हे लोकमान्य टिळकांच्या पूर्वीच संपर्कात होते व काँग्रेस लढ्यामध्ये राष्ट्रप्रेमी युवक म्हणून सहभागी होते. म. गांधी हे सनातन धर्माभिमानी, गीता अभ्यासक होते. त्यामुळे गांधी-पोद्दार यांचे संबंध घनिष्ठ होत गेले, पण विशेषत: अस्पृश्यता, वर्णाश्रमधर्म हे म. गांधी व भाईजी-गोयंका यांच्यातील मतभिन्नतेचे मुद्दे होते आणि तरीही गांधीजींना भाईजी, गोयंका आदींच्या गीता प्रेस उपक्रमाबद्दल आस्था होती. 1926 साली कल्याण मासिकाचा पहिला शुभारंभी अंक निघाला होता. त्यात पहिला लेख महात्मा गांधींचा होता. काही मतभिन्नतेचे मुद्दे सोडून म. गांधींचे भाईजींशी 1940पर्यंत अत्यंत जिव्हाळ्याचे आत्मीय संबंध होते. खरे तर काँग्रेस धोरणांशी मतभेद होऊन भाईजी हनुमानप्रसाद यांनी 1921मध्येच काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता आणि क्रांतिकारक अरविंद घोष, हिंदु महासभाचे महंत अवैद्यनाथ (गोरक्षपीठ महंत गोरखपूर) यांच्याशी भाईजींचा राष्ट्रवादी कल व संबंध जुळलेले होते. पण त्याविषयी म. गांधींना कोणतीही नाराजी नव्हती. गांधीशिष्य उद्योगपती जमनालाल बजाज यांनी गांधीजींची इच्छा व मार्गदर्शनानुसार 1940 साली ‘गोसेवा संघ’ संस्थेची स्थापना केली होती. तेव्हा या गोसेवा संघात गीता प्रेसच्या हनुमानप्रसाद पोद्दारांना पदाधिकारी म्हणून घ्यावे, अशी सूचना खुद्द महात्मा गांधींनी जमनालालजींना केली होती. याविषयीचे अधिकृत पत्र उपलब्ध आहे. 1940 साली म. गांधींच्या मनात भाईजी पोद्दार यांच्याबद्दल कशा भावना होत्या, त्याचा ते पत्र पुरावा आहे. या सार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पत्रकार मुकुल यांनी म. गांधी-भाईजींच्या मतभेदाला अवास्तव महत्त्व देऊन संशय निर्माण केला आणि हिंदुद्वेषी काँग्रेसला तेच एक कोलीत मिळाले. म. गांधींचा एक मुलगा गोरखपूर तुरुंगवासात असताना भाईजी हनुमानप्रसादजींनी त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतली होती. त्यामुळे म. गांधींच्या मनात भाईंबद्दल सदैव एक कौटुंबिक आत्मीयता होती. गांधींनी भाईजींना त्याबद्दल धन्यवादही दिले होते.
 
 
म. गांधींच्या हत्येप्रकरणी सरकारने संशयावरून 25000 जणांना अटक केली होती. त्यात सावरकर, गोळवलकर गुरुजी यांच्यासमवेतच गीता प्रेसचे जयदयालजी गोयंका व भाईजी हनुमानप्रसाद पोद्दार यांनाही अटक झाली होती. त्या वेळी जमनालाल बजाज यांनी जयदयाल गोयंका व भाईजी पोद्दार यांना कोणतीही मदत केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण पत्रकार मुकुल अक्षयने जमनालाल बजाज यांच्या तोंडी एक भलतेच विधान घातले व गीता प्रेस, गोयंका, पोद्दार यांच्या धवल कार्यावर नसती चिखलफेक केली.
 
 
मुकुलने आणि त्यापेक्षीही काँग्रेसने गांधीहत्येबाबत पोद्दार व गांधी यांच्यामधील मतभेदांचा नसता बाऊ केला, हेच विविध माहिती घेतल्यावर स्पष्ट होते. ‘म. गांधी मतभेदोंका भी बडा आदर करते थे।’ ही त्यांच्या चरित्रातील ओळ गांधी-पोद्दार मतभेदाबद्दलही सार्थ व समर्पक होती, अन्यथा 1940 साली म. गांधींनी गोसेवा संघावर भाईजी पोद्दारांचे नाव सुचवलेच नसते.
 
 
म. गांधी 1926पासून ‘कल्याण’ मासिकाचे लेखक होते. गांधीहत्येनंतर 1950मध्ये कल्याणचा ‘हिंदू संस्कृती’ अंक प्रकाशित झाला. त्यात पूर्ण एक अध्याय म. गांधींवर आहे. (गांधीहत्येनंतर गीता प्रेसचे भाईजी, गोयंका यांना अटक केल्याने, मार्च, एप्रिल 1948च्या कल्याणमध्ये गांधींबद्दल लिहिणार कोण?) सारे वातावरण शांत झाल्यावर 1950मध्ये व पुढे एका ‘संत विशेषांकात’ गांधींवर सविस्तर लिहिलेले आहे. गीता प्रेसला बदनाम करण्यास काँग्रेसला मुकुल अक्षयच्या पुस्तकाचा उपयोग झाला. पण सूर्यावर थुंकणार्‍यांची जशी फजिती होते, तशीच या हिंदूविरोधींची, मोदीविरोधींची, गीता प्रेस विरोधींची फजिती झाली आहे.
 
 
समारोप
 
एक सदाचारनिष्ठ आदर्श संस्था शंभर वर्षे पुरुषार्थी कार्य करते, हे वाचून सनातन मूल्यांवरची श्रद्धा-निष्ठा वृद्धिंगत होते. कोणत्याही सरकारी सवलती वा धनिकांच्या देणग्या न घेता, तसेच कोणत्याही भलत्याच तडजोडी न करता सचोटीच्या, सदाचाराच्या मार्गाने, सेवाभावाने ध्येयवादी वृत्तीने परिश्रमाची पराकाष्ठा करीत, ईश्वरार्पण समर्पित बुद्धीने संस्था चालवता येते व ती शताब्दी साजरी करते, याचा सुंदर वस्तुपाठ म्हणजे ‘गीता प्रेस गोरखपूर’ होय. या संस्थेची वाटचाल पाहून प्रत्येक भारतीयास, प्रत्येक सनातनप्रेमीस या संस्थेचा अभिमान वाटू लागतो, ही गीता प्रेसच्या दिव्य कार्याची फलश्रुती आहे. 2023मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, राज्यपाल मा. आनंदीबेन पटेल यांच्या मंगल उपस्थितीत शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा पार पडला. शताब्दी वर्षानिमित्त ‘शिवपुराण’च्या खास आवृत्तीचे मा. पंतप्रधानांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. “गीता प्रेस गोरखपूर, एक संस्थाच नव्हे, तर कोटी कोटी भारतीयांची श्रद्धा आहे” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गीता प्रेसचा गौरव केला आणि तो गौरव सार्थ व समर्पक आहे.
 

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.