पाच दशकांची साथसोबत

विवेक मराठी    12-Dec-2023   
Total Views |
vivek 
यंदाचे वर्ष हे सा. विवेकचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. 1948 साली आलेल्या संघबंदीनंतर संघविचारांच्या प्रसारासाठी ‘सा. विवेक’ सुरू झाले. हिंदुत्वाचा गाभा आणि वैचारिकतेचे अधिष्ठान असलेली पत्रकारिता हे विवेकचे आजवर जपले गेलेले वैशिष्ट्य. प्रसारमाध्यमांच्या जगात केवळ पाऊणशे वर्षे वाटचाल केली नाही, तर इथवरच्या प्रवासात मूळ साप्ताहिकाला अनेक कालसुसंगत आयाम जोडले गेले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत असलेल्या प्रतिनिधींच्या जाळ्यामुळे हे शक्य झाले. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम करणारे हे प्रतिनिधी म्हणजे समर्पित कार्यकर्ते आहेत. हे प्रतिनिधी सा. विवेकचे सगळ्यात मोठे बळ आहे. सा. विवेकचे प्रतिनिधी वर्गणीदारवाढीबरोबर, सा. विवेक आर्थिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठीही योगदान देत असतात. सा. विवेकचा प्रत्येक उपक्रम यशस्वी होतो तो प्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच.
  
विवेकचे प्रतिनिधी वेगवेगळ्या वयोगटांतले आहेत. काही जण पन्नास वर्षांहून अधिक काळ विवेकसोबत आहेत. विवेकच्या इथवरच्या वाटचालीचे ते साक्षीदार आहेत. अशा बुजुर्गांपैकी एक म्हणजे नालासोपारा येथील विलास मेस्त्री. विवेकच्या अमृतमहोत्सवी वर्षातच विलास मेस्त्रींचीही पंचाहत्तरी साजरी होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. 1970 सालापासून विवेकशी जोडले गेलेले विलासजी विवेकच्या बृहद् परिवारातील एक सदस्य आहेत.
 
 
15 डिसेंबर 1948 रोजी परंपरागत लोहारीचा व्यवसाय असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. आठ जणांचे कुटुंब आणि बेताची आर्थिक परिस्थिती, यामुळे शिक्षणात चांगली गती असूनदेखील आर्थिक स्वावलंबनासाठी लवकरात लवकर नोकरी शोधणे गरजेचे होते. एक भल्या गृहस्थांनी विलासजींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती, पण शिकत असतानाच मुंबई महानगरपालिकेतील नोकरी चालून आली आणि ती कुटुंबासाठी गरजेची असल्याने विलासजी कामवर रुजू झाले. विलासजी बालपणापासून संघस्वयंसेवक होते. मात्र तरुण वयात बाहेरच्या जगात वावरताना वेगवेगळ्या विचारांच्या लोकांशी संपर्क येऊ लागला. समाजवादी विचारसरणी आणि रा.स्व. संघाची राष्ट्रीय विचारसरणी असा प्रश्नही तरुण वयात समोर उभा राहिला. पण याच वेळी त्यांना श्रीगुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या बौद्धिकाला जाण्याचे भाग्य लाभले. या बौद्धिकांनी डोळ्यात अंजन घातल्यासारखी विलासजींची दृष्टी स्वच्छ केली. मनातले द्वंद्व संपले. त्यानंतर विलासजींनी संघकामात लक्ष केंद्रित केले आणि आपल्या परीने त्यासाठी सर्वशक्तीनिशी योगदान दिले.
 

vivek 
 
मुख्य शिक्षक ते कार्यवाह, अशा संघात सोपवल्या गेलेल्या जबाबदार्‍या त्यांनी समर्पित वृत्तीने पार पाडल्या. छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशतक महोत्सवानिमित्त विस्तारक म्हणूनही ते पंधरा दिवस गेले होते. पुढे अनेक संस्थांच्या जबाबदार्‍याही त्यांनी सांभाळल्या. संस्थेचे काम करत असताना ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणीबाणीच्या कालखंडात अनेक संघस्वयंसेवकांना मिसाबंदीखाली अटक झाली होती. घरातील कर्ता तुरुंगात असताना घर चालवणे कठीण होते, याची जाण असलेल्या विलासजींनी राष्ट्रविचारी दात्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून या संघस्वयंसेवकांच्या घरातली चूल बंद होणार नाही याची काळजी घेतली. महापालिकेतील सेवानिवृत्तीनंतर जनकल्याण समितीचे वसई जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. आपल्या कार्यकाळात समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला. कोरोना काळातही समितीच्या माध्यमातून अनेकांना धान्य व औषधे वाटप केली. वनवासी कल्याण आश्रम, त्या वेळचा जनसंघ यांनाही आर्थिकदृदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विलासजींनी आपला खारीचा वाटा उचलला आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संपूर्ण समाज आपला मानतो. हेच संघसंस्कार संघातील प्रत्येक स्वयंसेवकांवर होत असतात. विलासजींनीही संघकामाबरोबर अन्य सामजिक कामे आपली मानून केली आहेत. हिंदुत्वाची अभिव्यक्ती ज्यातून प्रकट होते, अशा उपक्रमांत सहभागी होऊन त्यांना सर्व सहकार्य करण्याचे धोरण विलासजींनी अवलंबिले. त्यापैकी एक नालासोपारा येथील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा. ज्या शाळेत विलासजींचे शिक्षण झाले, त्या शाळेची कालांतराने जीर्ण अवस्था विलासजींना व्याकूळ करीत होती. त्यांच्याकडे जेव्हा शाळेच्या नूतनीकरण समिती सदस्याची जबाबदारी आली, तेव्हा त्यांनी सर्वशक्तीनिशी आर्थिक स्रोतांची उभारणी करून शाळेची नवी इमारत दिमाखात उभी करायला मदत केली. विलासजी पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळाचे ग्रामस्तरावर कार्यवाह म्हणून काम करीत होते. कालांतराने मंडळाच्या शाखाविस्तारातही विलासजींचा सहभाग राहिला. आज या मंडळाच्या 28 शाखा आहेत. या माध्यमातूनच उभारलेल्या सामाजिक संवर्धन निधीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याची कल्पना त्यांनी अमलात आणली. संघसमर्पित कार्यकर्ता संपूर्ण समाज आपला मानतो आणि त्या दृष्टीने व्यवहार करतो. तेच संस्कार त्यांच्या घरातील सदस्यांवर होत असतात. विलासजींच्या सौभाग्यवतींनीही संघपरिवार हा आपला परिवार आहे असे मानले. याच संघसंस्कारात त्यांचे कुटुंबही घडले. कुटुंबसंस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. विलासजींनी त्यांचे कुटुंब एकत्र राहण्यासाठी सदैव प्रयत्न केले. घरातील भावडांची लग्नकार्ये, सण-समारंभ, नातेवाइकांचा गोतावळा यातून मिळणारी ऊर्जा समाजासाठी काम करण्याचे बळ देते, असे त्यांना वाटते.
 
 
सा. विवेकदेखील माझा एक परिवार आहे. अशा परिवाराचा घटक असल्यामुळेच आज पंचाहत्तरीतही मला जीवन जगण्याचे बळ मिळत आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
 
वयाच्या पंचाहत्तरीतही युवकाच्या उमेदीने काम करत असलेल्या विलासजींनी निरोगी आणि कार्यरत दीर्घायुष्यासाठी सा. विवेक परिवाराकडून अनेक शुभेच्छा! विवेकबरोबरची पाच दशकांची साथसोबत यापुढेही चालू राहावी, त्यातून नव्या दमाचे कार्यकर्ते विवेकशी जोडले जावेत ही अपेक्षा.
 

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.