संघस्वयंसेवक ते जनसेवक - मंगलप्रभात लोढा

विवेक मराठी    18-Dec-2023   
Total Views |
मुंबईसाठी, हिंदुत्वासाठी, राष्ट्रासाठी...!
राजस्थानातील एका सुस्थापित-सन्मानित कुटुंबातून आलेल्या युवा संघस्वयंसेवकाने वकिलीचे शिक्षण घेऊन मुंबईत येणे, मुंबईत बांधकाम व्यवसायात उतरून यशस्वी होणे, त्याचसोबत राजकारण-समाजकारणातही स्वतःला झोकून देणे, संघटनेने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्पणाने निभावत 6 वेळा आमदार म्हणून निवडून येणे, पुढे कॅबिनेट मंत्रीही बनणे.. अशी विविधांगी व खर्‍या अर्थाने ‘डायनॅमिक’ कारकीर्द घडवलेले व्यक्तिमत्व म्हणजे मंगलप्रभात लोढा. त्यांच्या याच कारकिर्दीविषयी साप्ताहिक विवेकचे कार्यकारी संपादक (डिजिटल) निमेश वहाळकर यांनी मंगलप्रभात लोढा यांची घेतलेली ही विस्तृत मुलाखत..
 
vivek
चर्चेच्या सुरुवातीला आपल्या प्रारंभीच्या जीवनाविषयी, बालपण - कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पार्श्वभूमी याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..
 
हे माझं भाग्य आहे की माझा जन्म एका देशभक्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या कुटुंबात झाला. त्यामुळे राष्ट्रीय भावनेचे, हिंदुत्वाचे संस्कार मला लहानपणापासूनच लाभले. माझे वडीलदेखील संघ स्वयंसेवक होते. स्वातंत्र्य चळवळीतदेखील सक्रिय होते. संघाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचंही आमच्या घरी येणं-जाणं होत होतं. परमपूजनीय गोळवलकर गुरुजी स्वतः जोधपूर-राजस्थान येथील आमच्या घरी दोनवेळा निवासासाठी आले होते. बाल स्वयंसेवक म्हणून मीही नियमित शाखेत जात होतो, तेव्हाचे आमचे तेथील विभाग प्रचारक मा. किशनभैय्याजी आणि तत्कालीन अनेक वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या संपर्क-सहवासात होतो. लहानपणी जेव्हा माझ्या वयाची इतर मुलं खेळात, भटकंतीत वेळ घालवायची तेव्हा मला संघकार्यात जास्त रस असायचा. माझं प्राथमिक शिक्षण सर्वोदय विद्यालयात झालं आणि श्रमाचा व श्रम करणार्‍यांचा सन्मान करण्याचं मूल्यही तेव्हापासून माझ्या मनात रुजलं. टिपकागद बनवणं, साबण-शॅम्पू बनवणं, फोटोफ्रेम्स बनवणं, काच कापणं अशा अनेक गोष्टी आम्ही शाळेत त्यावेळी करायचो. सर्वांच्या सोबत मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार तेव्हापासून मिळत होता. आठवड्यातून एक दिवस आम्ही संपूर्ण शाळा झाडून स्वच्छ करायचो. बालपणी शाळेत आणि संघशाखेत लाभलेल्या या संस्कारांच्या भक्कम पायावर माझी जीवनातील पुढील वाटचाल झाली आहे. नेतृत्वाची भावना कधी निर्माण झाली आठवत नाही पण पुढे सरदार स्कूलमध्ये शिकत असताना निवडणूक लढलो, त्यानंतर विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं, विद्यापीठाचा जनरल सेक्रेटरी झालो, विद्यार्थी निवडणुकांत लढलो. त्याकाळी राजस्थानातील विद्यार्थी निवडणुका या अतिशय हिंसक होत असत. याच दरम्यान जयप्रकाश नारायणजींच्या आंदोलनात मी जोडला गेलो. नवनिर्माण समितीमध्ये ‘चिमण चोर’चा गाजलेला नारा देत आम्ही सार्‍या जोधपूरमध्ये मोठी आंदोलने केली. जयप्रकाश नारायणजी जोधपूरमध्ये आले असतानाही मी दोन दिवस त्यांच्यासोबत राहिलो होतो. माझे वडील 1967 पासून निवडणूक लढवत होते. 1967 च्या विधानसभा निवडणुकीत पुढे राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले काँग्रेसचे बरकतुल्ला खान यांच्या विरोधात माझ्या वडिलांनी निवडणूक लढवली ज्यात खान हे केवळ 300 मतांनी विजयी होऊ शकले. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत मात्र त्यांनी येथून पळ काढला आणि आपल्याऐवजी आपल्या पुतण्याला उभं केलं. त्यावेळी माझे वडील या निवडणुकीत विजयी झाले. त्याकाळातही काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत जातीय तणाव निर्माण करत असे. परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून हिंदूही समोर हिमतीने उभा राहत असे. हे सगळं पाहत असतानाच लक्षात आलं की आपल्याकडे धर्माच्या नावावर चालणारी दादागिरी का निर्माण होते, कोण त्याचं पोषण करतं आणि त्याचा सामना कशाप्रकारे केला पाहिजे. माझे वडील 1972 ची विधानसभा निवडणूक जिंकले, विरोधी पक्षनेतेही झाले. पुढे जनसंघाचे प्रदेशाध्यक्षही बनले. या सर्व संघर्षाच्या काळात मी अनुभवलेला जातीय हिंसाचार, अत्याचार यातून माझ्यातील संघविचार-संस्कार आणखी मजबूत होत गेला. पुढे कायद्याच्या शिक्षणासाठी मी जयपूरला गेलो. चार्टर्ड अकाऊंटन्सीचाही कोर्स केला. दरम्यान माझं लग्नही झालं. आणीबाणीच्या काळात आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड संघर्ष केला. आम्हीही तरुण कार्यकर्ते यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत होतो. 1977 साली आणीबाणी हटल्यानंतर पुढे माझे वडील उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. तोपर्यंत मीही कायद्याचे शिक्षण पूर्ण करून उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करू लागलो होतो. माझ्या मनात सतत प्रश्न येई की मी ज्या न्यायाधीशांसमोर उच्च न्यायालयात युक्तिवाद करतो ते अनेकदा आमच्या घरी येत-जात, कधी आम्ही त्यांच्या घरी जात असू. नंतर माझे वडीलच न्यायाधीश झाले. त्यामुळे अशा न्यायालयात आपण वकिली करणं मला योग्य वाटत नव्हतं आणि ही बाब मनाला सतत बोचत होती. शेवटी न राहवून मी एके दिवशी वडीलांना सांगितलं की मी काहीतरी वेगळं करू इच्छितो. त्यातून मी जोधपूर सोडून मुंबईत येणं नक्की केलं. आज मी जो काही आहे त्याची पायाभरणी बालपणी लाभलेला हा संघसंस्कार, हिंदुत्वविचार, वडिलांच्या निवडणुकीत आम्ही अनुभवलेला जातीय हिंसाचार-दादागिरी, सर्वोदय शाळेतून मिळालेला श्रमाप्रतीचा आदर, समाजाला एकत्र आणण्याची भावना, पुढे विद्यार्थी परिषदेच्या संघटनेत काम करण्याची मिळालेली संधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात केलेला संघर्ष या सार्‍या आरंभीच्या प्रक्रियेतून झाली आहे, असं मला वाटतं.
 
आपला परिवार जोधपूर-राजस्थानातील एक सन्मानित परिवार आहे. अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असताना राजस्थान सोडून
मुंबईतच येण्याचा निर्णय का घेतला गेला? मुंबईत आल्यानंतरची सुरुवातीची वाटचाल कशी होती?
  
जोधपूरमधून बाहेर पडून मुंबईत येण्यामागचं किंवा मुंबई निवडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यावेळी माझ्या वडिलांचे एक मित्र इथे होते आणि त्यांची एक कंपनी होती. त्यांची मुख्य कंपनी उदयपूरला व त्याची शाखा मुंबईत होती. मी जोधपूरमधून बाहेर पडतोय, हे त्यांना समजताच त्यांनी मला विचारलं की पुढे कुठे जाण्याचं आणि काय करण्याचं तू ठरवलं आहेस? त्यावर मी प्रांजळपणे सांगितलं की मी अजून काहीच विचार केलेला नाही! परंतु जिथे चांगलं काम मिळेल, तिथे मी जाईन. त्यांनी ऑफर दिली की मुंबईत आमचं नवीन कार्यालय उघडतं आहे, तिथे तू रुजू होशील का? विशेष म्हणजे माझी सासुरवाडीही मुंबईतच होती. परंतु माझ्याकडे मुंबईत राहायला स्वत:ची जागा नव्हती. माझ्या वडिलांनीही सावध केलं होतं की मुंबईत घरांच्या किंमती पाहता तुझा सारा पगार केवळ घरभाड्यातच निघून जाईल! त्यामुळे अखेर मी माझ्या सासरच्या मंडळींशी विचारणा केली की तुमच्या ओळखीत एखादे घर आहे का जिथे मला भाड्याने राहता येईल.. अखेर भायखळ्यात वनरूम किचन जागा राहायला मिळाली, मी तिथे राहायला आलो आणि नोकरीची सुरुवात केली. या सर्व काळात माझ्या मनात एकच गोष्ट होती की जिथे माझे वडील न्यायाधीश आहेत, अशा न्यायालयात मी वकिली करता कामा नये. हा विचार, संस्कार कुठून निर्माण झाला माहिती नाही परंतु आजही मला या निर्णयाबाबत कोणताही खेद-खंत वाटत नाही. बहुधा चांगल्या भावनेतून घेतलेल्या निर्णयांचा परिणाम चांगलाच होतो, तसा तो माझ्या बाबतीतही झाला. म्हणूनच मुंबईसारखं अनोळखी शहर जिथे मला कुणीच ओळखत नव्हतं, अशा शहरात येऊन मी इथपर्यंत पोहोचू शकलो.
 
 

lodha
मुंबईत स्थायिक झाल्यानंतर व्यावसायिक म्हणून झालेली वाटचाल, त्यामध्ये आलेल्या अडीअडचणी, त्यातून मार्ग काढत एक यशस्वी व्यावसायिक म्हणून सुस्थापित होणं, या वाटचालीबाबत काय सांगाल?
 
मुंबईत नोकरीची सुरुवात झाली त्यावेळी मला महिन्याला जेमतेम अठराशे रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पुढे माझ्या दोन मुलांचा जन्म झाला. माझ्याकडे गाडी नव्हती, दुचाकी वाहनही नव्हते. आमचा सर्व प्रवास बसने होत होता. मुलांसाठी घराजवळचीच शाळा शोधली होती. पत्नी दोन्ही मुलांना कडेवर घेऊन शाळेत सोडायला-आणायला जात असे. जोधपूरमध्ये आमची चार घरं होती, त्यातही ज्या घरात आम्ही राहायचो तिथे 11 खोल्या होत्या आणि हे सर्व सोडून आम्ही मुंबईत वनरुम किचनमध्ये राहायला आलो होतो! पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय असल्याने याबाबत पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच नव्हता. तो काळ आठवल्यावर पुन्हापुन्हा वाटतं की संघर्ष माझ्या जीवनाचा जणू एक हिस्साच आहे! या नोकरीनंतर काही दिवसांनी पुन्हा नोकरी बदलली. माझ्या वडिलांच्याच ओळखीत एक बांधकाम व्यावसायिक होते, त्यांच्याकडे नोकरी सुरू केली. पुढे तीही नोकरी काही कारणांनी सोडली आणि तिसरी नोकरी सुरू केली. या सार्‍यात एक लक्षात आलं ते म्हणजे अशी नोकरी करणं आपल्या स्वभावात बसणारं नाही. मी यासाठी बनलेला नाही. त्याकाळी माझ्या एका मित्राला भेटायला मी कुलाब्यातल्या गॉडवीन हॉटेलला जायचो. तिथे हॉटेलच्या सप्लायसाठी एक माणूस नालासोपार्‍यातून येत असे. त्याने एकदा मला सांगितले की नालासोपार्‍यात स्टेट बँक काही जागा शोधत आहेत, तुम्हालाही बांधकाम क्षेत्रात आधीच्या नोकरीचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही यात उतरण्याचा विचार करा. मी त्याच्यासोबत नालासोपार्‍यात जाऊन आलो. तेव्हा माझ्याकडे बांधकामासाठी पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच माणसाने गावातल्या लोकांशी माझी भेट घालून दिली. त्या लोकांनी भूमिका घेतली की आम्ही जमीन विकणार नाही, तुमचा स्टेट बँकेशी व्यवहार होतो आहे तर आम्हाला त्यात पार्टनरशीप हवी आहे. मग मी स्टेट बँकेच्या लोकांना, युनियनच्या लोकांना भेटलो. बँकेला साधारण 216 फ्लॅट्स बनवायचे होते. जमीन वेगळ्याची, खरेदी करणारा वेगळा आणि या सगळ्याच्या मध्ये मी, अशी परिस्थिती होती. अखेर मी वडिलांनाच म्हटलं की मला सुरुवातीला 18 ते 20 हजार रुपयांची गरज आहे त्यानुसार वडिलांनी 20 हजार रुपये पाठवले. यातून माझ्या बांधकाम कंपनीची सुरुवात झाली. खरंतर त्यापूर्वी मी बांधकाम क्षेत्रात येण्याचे दोन प्रयत्न करून पाहिले होते. पैकी एक होता रिअल इस्टेट ब्रोकरेजच्या व्यवसायात. माझ्या एका मित्राचा मुंबई सेंट्रलला फ्लॅट होता व त्याला तो विकायचा होता. मी त्याला म्हटलं की मी तुला फ्लॅट विकून देतो आणि चार-पाच लोकांशी बोलणंही केलं. तो फ्लॅट विकला गेला आणि 9 हजार रुपये त्यावेळी मला ब्रोकरेज म्हणून मिळाले होते! प्लम्बिंग मेटल सप्लायचा व्यवसायही मी करून पाहिला होता. परंतु प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्राचं काम माझ्याकडे आल्यानंतर मी आधीची कामं बंद केली. बांधकामात उतरलो असलो तरी माझ्याकडे माझं ऑफिस नव्हतं. त्यावेळी माझ्या सासर्‍यांचे एक मित्र होते, श्रीकिशोरजी आणि त्यांचं वर्धमान चेंबरमध्ये ऑफिस होतं. वास्तविक त्यांचा मिठाईचा व्यवसाय होता आणि गुंतवणूक म्हणून त्यांनी त्या ऑफिसची जागा घेतली होती. एक शिपाई महिन्यातून एकदोनदा त्या जागेची साफसफाई करत असे, बाकी तिथे काहीच होत नव्हतं. श्रीकिशोरजी मला म्हणाले की त्या जागेत तू तुझ्या व्यवसायासाठी एक टेबल-खुर्ची घेऊन बसू शकतोस. असं करत करत माझा व्यवसाय सुरू झाला. नालासोपार्‍यात माझा पहिला प्रकल्प पूर्ण झाला ज्यात मी 118 रु. प्रति स्क्वेअर फूट या दराने फ्लॅट्स विकले. पुढे व्यवसाय अधिकाधिक वाढत राहिला. एअर इंडिया, रिझर्व्ह बँक अशा अनेक संस्था-कंपन्यांसोबत प्रकल्प झाले. या सगळ्यात नफा कमी होता परंतु माझा उत्साह मात्र सातत्याने द्विगुणित होत होता. माझ्या स्वतंत्र बाण्यानुसार पुढे जायचं होतं, कुणाच्या हाताखाली कर्मचारी म्हणून काम करणं मला जमणारं नव्हतं त्यामुळेच जसजसं यश मिळत होतं तसा मी आणखी मेहनतीने, नव्या उत्साहाने कामाला लागत होतो. अनेकदा मटेरिअल खरेदीसाठी मी स्वतःच जात होतो, स्वतः ट्रक भरून आणत होतो. पहिल्या पाच-सहा वर्षांत तर आठवड्यातले किमान 4 दिवस रोज सकाळी 8.40 च्या लोकलने निघून रात्रीची सर्वांत शेवटची लोकल पकडून घरी येणे, असाच माझा दिनक्रम होता. मात्र याचसोबत मी माझ्या मुलांना घेऊन शनिवार-रविवार फिरायलाही जात असे, वर्षातून दोनवेळा बाहेर फिरायलाही घेऊन जात असे. हे मान्य करावंच लागेल की मी त्यांच्यासाठी म्हणावा तेवढा वेळ देऊ शकलो नाही. माझ्या पत्नीवरच ही जबाबदारी अधिक होती. समाजकारणातील सहभाग, आमची कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे घरी पाहुणेही भरपूर येत असत. त्यामुळे माझी पत्नी अनेकदा रात्री 12-1 वाजेपर्यंतही स्वयंपाक करत असे, पुन्हा सकाळी लवकर उठून मुलांची तयारी, त्यांना शाळेत सोडणं हेही करत असे. जीवन संघर्षाचं होतं परंतु या सर्व प्रवासात एकदाही मी थांबलो नाही वा कोसळलो नाही. दरवेळी नव्या उत्साहाने पुढे जात राहिलो.
 
 
lodha
एक व्यावसायिक म्हणून यशस्वी होत असतानाच मुंबईत आल्यावर पुन्हा सामाजिक-राजकीय जीवनात कसे परत आलात? संघटनात्मक कामातील मुंबईतील सुरुवातीची वाटचाल कशी होती व भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय राजकारणात आपला प्रवेश कसा झाला?
 
लहानपणापासून संघस्वयंसेवक, पुढे विद्यार्थी आंदोलनात सहभाग या सार्‍यामुळे समाजकारण, हिंदुत्व विचार, राष्ट्रभावना हे संस्कार पहिल्यापासून होतेच. परंतु हेही खरं आहे की मुंबईत आल्यानंतर पहिल्या 4-5 वर्षांत मला समाजकारणासाठी म्हणावा तितका वेळ देता आला नाही. माझा बराच वेळ नोकरी, पुढे व्यवसाय उभा करणे यासाठी जात होता. खरंतर हा माझा स्वभावच आहे. तो चांगला आहे की वाईट, हे मला माहिती नाही परंतु मी एखादी गोष्ट करायला घेतली तर पूर्ण तन-मन लावून, झोकून देऊन करतो. ते काम पूर्ण होईपर्यंत थांबत नाही आणि दुसरं काही करतदेखील नाही. जेव्हा व्यवसाय सुरु केला तेव्हा पूर्णपणे त्यात झोकून दिलं आणि व्यवसायात यशस्वी झालो. मग कालांतराने येथील ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडियाजी यांनी स्वयंसेवक मिलन आयोजित केले होते. तेव्हा त्यांनी मलाही तिथे निमंत्रित केलं होतं आणि त्यावेळी माझा येथील संघ कार्यकर्त्यांशी अधिक चांगला परिचय झाला. मात्र समाजकारणातील कामाला खर्‍या अर्थाने पुन्हा सुरुवात झाली ती रामजन्मभूमी आंदोलनाच्या दरम्यान. शेषाद्री चारीजींनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या समितीचा मलबार हिल भागाचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली. शिलापूजनाचे मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते. माझा बांधकाम व्यवसायदेखील तोपर्यंत सुस्थापित होऊ लागला होता. माझ्या वडिलांकडून एक जुनी गाडीही मी राजस्थानातून आणली होती. त्या गाडीवर मी चक्क माझ्या कार्यालयातच तयार केलेले भव्य राममंदिराचे मॉडेल लावले होते. दोन-तीन महिने मी त्याच गाडीतून सर्वत्र फिरत होतो. आणि तो जोश-उत्साह इतक्या वेगळ्याच स्तरावरील होता की असे मंदिराचे मॉडेल लावलेली जुनी गाडी घेऊन सर्वत्र फिरताना, अगदी माझ्या कुटुंबासह फिरतानाही मला कधीच कमीपणा वाटला नाही, उलट आनंद-अभिमानच वाटला. शिलापूजनाच्या कार्यक्रमांदरम्यान अनेकवेळा मोठी आंदोलने झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कक्षात घुसून त्यांच्या टेबलवर आम्ही शिलापूजन केले होते. त्याबाबत खटलेही दाखल झाले. ग्रांट रोड स्थानकावर आम्ही रेल रोको आंदोलन केलं त्याचा खटला आजही सुरु आहे!
 

lodha 
 
रामजन्मभूमी आंदोलनात दोन्ही कारसेवांना मी अयोध्येला गेलो, दोन्ही वेळा मला अटक झाली. पुढे जेव्हा ढाचा तुटला तेव्हा रात्रीच आम्ही सर्वजण तेथून निघालो. मला अजूनही आठवतं ते म्हणजे, या आंदोलनाची आठवण म्हणून मी तेव्हा तेथील एक दगड उचलून आणला होता. बजरंग दलातही मी भरपूर काम अतिशय आनंदाने केलं. वेळ-काळ न बघता मी या सर्व गोष्टींमध्ये उतरलो होतो, व्यक्तिगत-व्यावसायिक नुकसानाची मी पर्वा करत नव्हतो. कारण लहानपणापासून झालेले संघसंस्कार पुन्हा ताजेतवाने होत होते! पुढे 1993 मध्ये मला भारतीय जनता पक्षामध्ये जबाबदारी देण्यात आली. तोपर्यंत मी नेपियन सी रोड भागात राहायला गेलो होतो. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मला मलबार हिल येथून पक्षाने उमेदवारी दिली. वास्तविक या मतदारसंघातून आधी आमचा उमेदवार कधीच विजयी होऊ शकला नव्हता ना आम्हाला कधी 15-17 हजारांहून अधिक मते मिळाली होती. शिवाय, आमचे उमेदवारही स्थानिक नव्हते, दरवेळी बाहेरचे उमेदवार द्यावे लागले होते. माझ्या उमेदवारीच्या वेळेसही अनेकांना वाटलं की या अवघड मतदारसंघातून हा जिंकू शकणार नाही. अनेक राजकीय विरोधकांनी हाही विचार केला की याला अशा अवघड ठिकाणाहून तिकीट मिळाल्यास पहिल्याच निवडणुकीत पराभूत होऊन हा कायमचा घरी जाईल आणि आपल्यासमोर आव्हान उभे राहणार नाही! या सर्व स्थितीत मला उमेदवारी मिळाली. अतिशय अटीतटीच्या लढ्यात मी 700 मतांनी विजयी झालो. माझ्या वडिलांनी त्यापूर्वी मला सावध केलं होतं की तू खूप भावुक होणारा आहेस, जर पराभूत झालास तर खचून जाशील, हे सर्व तुला सहन होणार नाही.. परंतु प्रत्यक्षात माझे आई-वडील, पत्नी, सर्व परिवार, स्नेही माझ्यामागे भक्कमपणे उभे राहिले. त्यावेळी एकेका खेपेत 40-50 इमारतींत प्रत्येक दारोदारी जाऊन मी प्रचार केला होता. राजस्थानातूनही माझे अनेक मित्र माझ्या मदतीला आले होते. अनेक कार्यकर्ते-मित्र साथीला होते. त्यावेळी बॅलेट पेपरवर मतदान होत असे आणि अर्थातच त्या काळात मोबाईलही नव्हते. त्यावेळचे मंत्री बी. ए. देसाई यांच्याविरोधात मी निवडणूक लढवली होती. रात्री 9-9.30 वाजता निकाल आला आणि मी विजयी घोषित झालो.. इथून माझ्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ झाला. पहिली निवडणूक 700 मतांनी, दुसरी निवडणूक 4000 मतांनी जिंकली. तिसर्‍या निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ हे माझ्याविरोधात उभे होते. या निवडणुकीत अनेक हिंसक गोष्टी घडल्या, तीन वेळा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अटक झाली, वारंवार हल्ले करण्यात आले. अशा संघर्षातून हळूहळू प्रत्येक विजयात मतांचा फरक / मताधिक्य वाढत होतं आणि लोकांचा विश्वासदेखील. 2009 च्या निवडणुकीत राजकुमार बाफना हे काँग्रेसचे उमेदवार होते. मी सुरुवातीला ज्यांच्याकडे नोकरी करत होतो त्या बाफनांचे हे चिरंजीव! अशा एकामागोमाग एक निवडणुका होत गेल्या. असं करत करत मी 2019 साली झालेली निवडणूक मी जवळपास 71 हजारांहून अधिक मतांनी जिंकलो. राजकारणात मी कधीच कुठली गोष्ट ठरवून केली नाही परंतु माझे कार्यकर्ते, मतदार आणि पक्ष संघटना यांनी मला आजवर खूप काही दिलं आहे.
 
 

lodha
विधानसभा सदस्य म्हणून पाच टर्म यशस्वीपणे काम केल्यानंतर आपल्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. मुंबई अध्यक्षपदाच्या या कार्यकाळाबद्दल काय सांगाल?
  
2019 ची गोष्ट, विधानसभा निवडणुकीला जेमतेम तीन महिने उरले होते, अशावेळी मला मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली. हाती कोणतंही काम येवो, ते पूर्ण झोकून देऊन करायचं, हा माझा स्वभाव आणि त्या स्वभावाला साजेसं काम मी याही काळात केलं. पहिल्या दिवसापासून मी नव्या लोकांना पक्षाशी जोडण्यावर भर दिला. 5000 नव्या लोकांना जोडण्याचं उद्दिष्ट मी निर्धारित केलं होतं. पक्षात आहेत परंतु कोणत्याच जबाबदारीवर नाहीत अशा लोकांना वेगवेगळ्या सेल्स, संघटनांच्या माध्यमातून काही ना काही जबाबदारी देत सोबत जोडलं. मी सर्व 36 मंडल अध्यक्षांच्या, जिल्हा अध्यक्षांच्या घरी गेलो. सर्व कार्यालयांना भेटी दिल्या. कोणतंही संघटन व्यक्तिगत संबंध दृढ करूनच मजबूत होत असतं, ते केवळ भाषण देऊन-पत्रकं काढून मजबूत करता येत नाही, हे मी लहानपणापासून शिकलो होतो. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना भेटून, त्यांच्या वैयक्तिक सुख-दुःखात साथ देऊन, मदत करून संघटन मजबूत करण्यावर मी भर दिला. प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता असला पाहिजे, हे उद्दिष्ट समोर ठेवून काम केलं. एक कार्यक्रम असाही केला की शीव (सायन) येथे सोमैया मैदानावर खुर्चीवर बूथ नंबर टाकून बूथ प्रमुखांना बोलावलं आणि विशेष म्हणजे एकही खुर्ची त्यावेळी रिकामी राहिली नव्हती! या दोन-तीन वर्षांच्या कार्यकाळात असे अनेक युवा, उत्साही कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले आणि बूथस्तरापर्यंत पक्षाला बळकटी मिळाली, याचा मला मनापासून आनंद व अभिमान वाटतो.
 
 
lodha
आजवरच्या तीन-चार दशकांच्या सामाजिक-राजकीय जीवनातील असे निवडक प्रसंग वा क्षण कोणते जे तुमच्या आजही लक्षात राहिले आहेत?
 
मुंबईतील तीस-पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सामाजिक-राजकीय जीवनात मागे वळून पाहताना ते संघर्षाचे अनेक प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. रामजन्मभूमी आंदोलनात, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातून केलेलं काम, संघर्ष हे सारं आजही जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं. लहानपण स्वयंसेवक म्हणून गेलं, तरुणपण विद्यार्थी-कार्यकर्ता म्हणून गेलं आणि आता भाजपचा समर्पित कार्यकर्ता म्हणून मागील तीन-चार दशकं मी काम करतो आहे. मला ओळखणारे अनेकजण सांगतील की एकदा पक्षसंघटना आणि विचारधारा म्हणून एखादा विषय आला की मी पूर्ण निष्ठा-समर्पणासह त्याकरिता लढतो. माझ्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध माझा एखादा चांगला मित्र जरी उभा असला तरी त्याच्या विरोधात मी पूर्ण ताकद लावून प्रचार करेन. त्यामुळे माझ्या निष्ठा व समर्पणाविषयी कुणीही आरोप करण्याची हिंमत करणार नाही. मला आजही आठवतं, 1992 च्या दंगलीत आमच्या येथे लक्ष्मी जाधव नावाच्या एक नगरसेविका होत्या. त्यांच्या डोक्यात गोळी घालून तुलसीवाडीत त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी दोन वेगवेगळ्या समुदायांचे लोक या भागात राहत होते आणि या घटनेनंतर तेथील वातावरण अतिशय संवेदनशील-तणावपूर्ण झालं होतं. त्यावेळी मी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन तिथे गेलो, त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालो, अंत्यविधी आटोपून मग पुन्हा तुलसीवाडीत आपल्या बांधवांच्या संरक्षणासाठी आम्ही उभे ठाकलो. कधी काय प्रसंग घडेल, याची जराही पर्वा बाळगली नाही. त्यानंतर तेव्हापासून आजतागायत आपल्या समाजबांधवांना त्रास देण्याची हिंमत या भागातील कुणाही समाजकंटकाने केलेली नाही. व्हीटी स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यासाठी आम्ही केलेले मोठे आंदोलन आजही लक्षात आहे. काही वर्षांपूर्वी मालाड-मालवणीत हिंदू बांधवांवर दबाव-दडपण आणून त्यांना तेथून बाहेर पडण्यास प्रवृत्त केले जात होते. मुंबई अध्यक्ष या नात्याने मी तिथे जाऊन या सर्व प्रकाराविरोधात आवाज उठवला होता. आंदोलन केलं होतं. त्यानंतर विधानसभेत काही लोकांनी आमचा विरोध केला, तेव्हा त्यावर आक्रमक होऊन बोलताना माझ्या तोंडून शब्द निघाले की, ‘हम जो कहेंगे व तुम्हे सुनना पडेगा और जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा!’ आणि विशेष म्हणजे बरोबर एका वर्षाने हिंदुत्व मानणारं - हिंदू हितासाठी काम करणारं सरकार राज्यात स्थापन झालं आणि त्यात मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली!
  

vivek
खूपच कमी लोकांना ठाऊक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले जवळपास 20-25 वर्षांपासून उत्तम संबंध आहेत. याबाबत काय सांगाल? या काळात नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तित्वाचे तुम्हाला भावलेले पैलू कोणते?
  
मी आधी सांगितल्याप्रमाणे माझे वडील राजस्थानात जनसंघ-भाजपमध्ये सक्रिय होते. उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर ते तीन वेळा लोकसभेवर निवडून आले होते. त्या काळात माझ्या वडिलांचे आदरणीय नरेंद्रभाई मोदींशी चांगले संबंध होते. दरम्यान माझ्या एका लहान भावाचे अकस्मात निधन झाले. त्याचे कुटुंब अहमदाबादमध्ये होते. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांस आधार देण्यासाठी माझे वडील राजस्थानातून काही काळ अहमदाबादला येऊन राहिले होते. त्या काळात माझे अहमदाबादला सातत्याने जाणं झालं आणि त्यावेळी दोन-तीन वेळा माझ्या वडिलांच्या सोबत मी मोदीजींना भेटलो. तेव्हापासून माझा त्यांच्याशी चांगला परिचय झाला. तेव्हापासून गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराच्या नियोजनासाठी वापी ते सुरतच्या दरम्यानच्या भागाची जबाबदारी ते माझ्याकडे सोपवत असत. मी मग आमच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एक-दोन महिने तिथे जाऊन काम करत असे. ते मुख्यमंत्री असताना काही वेळा त्यांच्या घरीही त्यांनी मला बोलावलं होतं. इतका मोठा माणूस आपल्या सहकार्‍यांप्रती इतकी आपलेपणाची भावना, दुसर्‍याच्या सुख-दुःखात सहभाग, स्नेहभाव प्रकट करतो, याचा मला खूपच आनंद झाला होता. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं तेव्हा चक्क मला माझ्या आवडीचे पदार्थ न्याहारीसाठी बनवण्यात आले होते! माझ्या मनात कोणतंही दुमत नाही की नरेंद्रभाई मोदी हे एक अध्यात्मिक शक्ती लाभलेले देवदुर्लभ व्यक्ती आहेत. जेव्हा जेव्हा भारतावर आक्रमण होतं, तेव्हा देशाला आणि देशवासियांना मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येकवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, डॉ. हेडगेवार अशी थोर माणसं जन्म घेतात. नरेंद्रभाई हे याच पंक्तीतील एक नाव आहे, असं मी ठामपणे व विश्वासाने म्हणेन. ही माणसं ईश्वराने पाठवलेली आहेत. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील ही गोष्टच नाही! 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मला मोदीजींच्या मार्गदर्शनात पक्षासाठी महत्वपूर्ण काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली तेव्हाही मला सूचना प्राप्त झाली की तुम्हाला वाराणसीत काम करायचं आहे. त्यानुसार मी वाराणसीत गेलो आणि एका विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी मला देण्यात आली होती, मी दीड-दोन महिने तिथे राहिलोही होतो. 2019 मध्येही मला वाराणसीत बोलावण्यात आलं होतं. लोकांची योग्य व सूक्ष्म पारख करण्याची शक्ती लाभलेल्या मोदीजींनी वेळोवेळी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्या आयुष्यातील एक खूप मोठी संपत्ती आहे, असं मी मानतो. जेव्हा मी मंत्री झालो तेव्हाही माझा मुलगा मोदीजींना भेटायला गेला असता त्यांनी आवर्जून त्याच्याजवळ निरोप दिला की, तुझ्या वडिलांना सांग, त्यांना मिळालेली खाती - कौशल्य विकास व उद्योजकता हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि भारताच्या भविष्यासाठी खूप सार्‍या अपेक्षा असलेले खाते आहे. त्यामुळे मन लावून या क्षेत्रात भरपूर काम करा!
 
 
lodha
आपलं सामाजिक-राजकीय जीवन व व्यावसायिक जीवन, आपण सांभाळलेल्या जबाबदार्‍या याचसोबत आपल्या आजवरच्या कारकिर्दीत ‘लोढा फाऊंडेशन’ व त्यामाध्यमातून होत असलेलं काम, हादेखील महत्वाचा भाग आहे. या ‘लोढा फाऊंडेशन’ची स्थापना व आजवरच्या कामाबद्दल काय सांगाल?
  
1995 साली मी जेव्हा पहिली निवडणूक लढलो तेव्हा मी एक बिल्डर - बांधकाम व्यावसायिक होतो. राजकारणात बिल्डर त्यातही राजस्थानातून आलेला बिल्डर म्हणून माझ्याविरुद्ध भरपूर अपप्रचार करण्यात आला. मी तेव्हाच सर्वांना सांगितलं होतं की दोन प्रकारचे राजकारणी असतात. एक ज्यांचा कोणताही अधिकृत उत्पन्नाचा स्रोत नसतो तरीही ते मोठमोठ्या गाड्यांतून फिरतात, प्रचंड आर्थिक संपत्ती जमवतात. दुसरे असे लोक ज्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत सर्वांना माहिती असतो, त्यांच्या उद्योग-व्यवसायात ते यशस्वी ठरलेले असतात. त्यामुळे राजकारण हा काही त्यांच्यासाठी संपत्ती जमवण्याचा मार्ग नसतो. जगात प्रत्येक लोकशाहीत आपल्याला अशी दोन्ही प्रकारची उदाहरणं दिसून येतात. अमेरिकेसारख्या देशाचे काही राष्ट्राध्यक्षदेखील स्वतः मोठे उद्योगपती होते. भारतात मात्र उद्योजक-व्यवसायिकाने राजकारणात येणं नकारात्मक मानलं जातं. तरीही राजकारणात मी ही बाब कधीच कुठे लपवली नाही. पुढे माझा व्यवसाय वाढू लागला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो वाढण्यामागे माझी इतक्या वर्षांची मेहनत, सचोटी आहेच परंतु त्याचसोबत कदाचित मी आमदार आहे म्हणूनही तो वाढतो आहे. कारण माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या, मला शुभेच्छा-आशीर्वाद देणार्‍या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे यामध्ये योगदान आहे. या उत्तरदायित्वातून मी ‘लोढा फाऊंडेशन’ची स्थापना केली. या माध्यमातून आम्ही असंख्य समाजघटकांना शिक्षण, वैद्यकीय उपचार, तीर्थयात्रा अशा असंख्य गोष्टींसाठी साहाय्य करत आहोत. लोढा फाऊंडेशनला 27 वर्षं झाली आहेत. आजदेखील आमच्यातील कुणीच असं म्हणणार नाही की आम्ही लोकांवर काही उपकार केले आहेत. कारण त्यांच्याचमुळे आम्ही इथवर पोहोचलो आहोत. त्यांचे हे ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केला आहे, इतकंच मी म्हणेन.
 
 
मंत्री म्हणून आपल्या एक वर्षांहून अधिक कार्यकाळात आपल्याला सर्वांत भावलेला व आपल्या व्हिजनमधील महत्वाचा असा निर्णय अथवा प्रकल्प अथवा योजना कोणती, जी आज प्रत्यक्षात येताना दिसत आहे?
 
 
याचे उत्तर देताना मी कौशल्य विकास विभागाचा सर्वप्रथम उल्लेख करेन. मा. मोदीजींनी 2014-15 मध्ये कौशल्य विकास विभागाची स्थापना केली. या व्हिजनला अनुसरून महाराष्ट्रातही माझे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विभागाची स्थापना केली होती. या सार्‍या प्रक्रियेतील मुख्य हेतू हा होता की गावांतील युवकांना गावातच उत्तम प्रशिक्षण व रोजगार मिळेल, त्यांना त्याकरिता शहरांत यावं लागणार नाही. याच हेतूने आम्ही 500 कौशल्य विकास केंद्र राज्यातील गावांमध्ये सुरु केली. आपल्याकडे 28 हजार ग्रामपंचायती आहेत परंतु हे आपलं दुर्भाग्य आहे की एकाही गावात आजवर असे केंद्र नव्हते. आम्ही अशा 500 केंद्रांचे नियोजन केले, निविदा काढल्या, लोक याकरिता पुढे आले, निविदा मान्य झाल्या व आता मोठ्या गतीने या केंद्रांचे काम सुरु आहे. ही संख्या आणखी वाढवण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. यामध्ये ग्रामीण अर्थकारणाशी संबंधित, रोजगाराभिमुख असे असंख्य विषय आहेत. जसे की ट्रॅक्टर दुरुस्ती, मल्टी-मेकॅनिक, पंप दुरुस्ती, ड्रोन चालवणं, असे अनेक विषय आपण यामध्ये समाविष्ट केले आहेत.
 
 
पर्यटन असो, कौशल्य विकास असो वा अन्य कोणताही विभाग, आपल्या धोरणांत, निर्णयांत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रासाठी योगदान दिलेले अनेक महापुरुष यांचा वारसा जपण्याची तळमळ सातत्याने जाणवते. याचसोबत हिंदुत्व विचारांप्रती असलेली बांधिलकीही सातत्याने जाणवते. याची प्रेरणा कुठून येते, यामागील वैचारिक दृष्टिकोन काय आहे?
 
 
मुळात आपण आपल्या देशाचा 1947 पासूनचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. आतापर्यंत बहुतांश काळ सत्तेत असलेल्या पक्षाकडून, घराण्याकडून सातत्याने विशिष्ट समाजाचं झालेलं लांगुलचालन, अनेक वर्षे या देशाच्या असुरक्षित राहिलेल्या सीमा, देशांत अनेक ठिकाणी झालेला जातीय हिंसाचार, असंख्य शहरांत घुसखोरी केलेले बांगलादेशी व रोहिंग्या.. हे सगळं का घडलं, याचाही विचार केला पाहिजे. या सर्व संकटांशी लढण्यासाठी आपल्या संस्कृती आणि राष्ट्राप्रती निष्ठा असलेली पिढी घडवणे, हाच एकमेव मार्ग आहे, असे मी मानतो. ही विचारधारा मानणार्‍या व तिच्याशी पहिल्यापासून प्रामाणिक राहिलेल्या माझ्या संघटनेने माझ्याकडे जी जबाबदारी दिली, त्या प्रत्येक माध्यमातून मी हाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेच समाजाची, या राष्ट्राची प्रेरणा जागृत करण्यासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व जीवनकार्य सर्वसामान्य नागरिकांत, युवकांत अधिकाधिक प्रमाणात पोहोचवणं नितांत आवश्यक ठरतं. म्हणूनच पर्यटन विभागाच्या माध्यमातून वा मला मिळालेल्या कोणत्याही जबाबदारीच्या माध्यमातून छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मातृभूमीसाठी लढलेल्या प्रत्येक महापुरुषाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास माझं प्राधान्य असतं. आज शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 350 वं वर्ष आपण साजरं करत आहोत. यानिमित्ताने शिवरायांचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याकरिता 5 संग्रहालये आपण निर्माण करत आहोत. शिवनेरी किल्ल्यावर भव्य महोत्सव साजरा करण्यात आला, ज्याला सुमारे 1 लाख शिवभक्त उपस्थित होते. स्वा. सावरकरांचे जन्मस्थान भगूरमध्ये त्यांचे स्मारक व थीमपार्क निर्माण करण्याचा आम्ही संकल्प केला, ‘वीरभूमी परिक्रमा’ या नावाने सावरकर टुरिझम सर्किट घोषित केलं. विवेक व्यासपीठाच्या संयुक्त विद्यमाने आपण सावरकर विचारांची प्रेरणा देणारे अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम घेतले. गोराईमध्ये अतिक्रमण हटवून तिथे छत्रपती शिवरायांचे युद्ध संग्रहालय उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आम्ही नौदलाशीही चर्चा केली असून नौदलाच्या जुन्या जहाजांना शिवकालीन आरमाराच्या जहाजामध्ये रूपांतरित करून शिवकालीन आरमाराची नीती समजून घेण्यासाठी तेथे ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय, शिवकालीन मर्दानी खेळ, घोडेस्वारी अशा अनेक बाबतींत तिथे प्रशिक्षण व माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने शिवरायांचे कार्य आणि विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठं कार्य या माध्यमातून होत आहे.
 
 
एका बाजूला शांत-अबोल स्वभावाचे वाटणारे मंगलप्रभात लोढा जेव्हा विचारधारेचा प्रश्न येतो, हिंदुत्वाचा प्रश्न येतो तेव्हा आक्रमक होतात. प्रत्येक जबाबदारीला पूर्ण अभ्यास करून न्याय देण्याचा प्रयत्न करतात. एकाच व्यक्तिमत्वाला असलेल्या या अनेक पैलूंचं कारण काय? आणि आपल्या प्रदीर्घ सामाजिक-राजकीय कारकिर्दीच्या पुढच्या टप्प्यात आपल्या योजना काय आहेत?
 
 
कोणतीही व्यक्ती आपणहून, आपोआप निर्माण होत नाही. आसपासची परिस्थिती, घटना व संस्कार यातून ती घडत असते. मी ज्या कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीत घडलो व जे संस्कार मला लहानपणापासून लाभले, विद्यार्थीदशेत व तरुणपणी सामाजिक जीवनात व व्यक्तिगत जीवनात जो संघर्ष करावा लागला, त्या सार्‍यातून मी घडलो आहे. मी कधीही, कोणत्याही बाबतीत माझ्या मनाचा आवाज ऐकतो व त्याचप्रमाणे कृती करतो. त्यामुळे मनाचा आवाज ऐकून मी घेतलेला कोणताही निर्णय आजवर चुकीचा ठरलेला नाही. चढ-उतार भरपूर आले आहेत परंतु त्याशिवाय कुणाचंच जीवन कधीच पूर्ण होत नाही. परंतु आज मी जिथे पोहोचलो आहे, त्यावर मी संतुष्ट आणि कृतज्ञ आहे. मुंबईने मला सहा वेळा आमदार बनवलं. येत्या काळात मुंबईमध्ये लोकांना रोजगार मिळत राहील, येथील नागरिकांना चांगलं जीवन-राहणीमान प्राप्त होईल, इथलं पर्यावरण उत्तम राहील, याकरिता मी विशेषरूपाने व अधिक जोमाने काम करू इच्छितो.

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.