लाल महालावर छापा : शाहिस्तेखानास शास्त

लेखांक : 9

विवेक मराठी    21-Dec-2023   
Total Views |

pune
छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली हा शौर्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच. पण त्यासाठी महाराजांनी राजगडावरून या अकस्मात हल्ल्याची सुसूत्र योजना आखली, तिचा इतिहासही अभिमान वाटावा असा आहे. शाहिस्तेखानावरील या एका छाप्याने प्रत्यक्ष युद्ध न करताही राजांनी प्रचंड मोठ्या मुघल फौजेला आपल्या मुलखातून चालते केले होते. हा शाहिस्तेखानावरचा छापा अपेक्षित विजय मिळवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध करण्याऐवजी केलेला यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राइक’च होता.
अबू तालिब म्हणजेच मिर्झा मुराद हा मुघल बादशहा जहांगीर व शहाजहान यांचा वजीर असलेल्या असफखान याचा मुलगा. जहांगीर बादशहाने त्याला शाहिस्तेखान हा किताब दिला. असफखानच्या मृत्यूनंतर शहाजहानने त्याला वजिरी दिली.
 
 
 
शाहिस्तेखान हा शहाजहानची लाडकी बेगम मुमताजमहलचा भाऊ होता. परंतु शहाजहानच्या अखेरच्या काळात शाहिस्तेखानाने औरंगजेबाची बाजू धरली आणि तो तख्तावर येण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शहाजहानने त्याला कैदेतही टाकले होते. औरंगजेब गादीवर आल्यावर शाहिस्तेखान त्याच्या मर्जीतला प्रमुख उमराव बनला.
 
 
तख्तावरील बादशाहांशी शाहिस्तेखानाचे दोन पिढ्यांचे नातेसंबंध होते. मुघली दरबारातील अनेक वजनदार सरदारही त्याच्या नात्यात होते. औरंगजेबाचा तर तो सख्खा मामा होता. शाहिस्तेखानाकडे मुघली राजकारणाचा आणि युद्ध-लढायांचा प्रदीर्घ अनुभव होता. गुजराथ, माळवा आणि दख्खन अशा अनेक प्रांतांची सुभेदारी त्याने पार पाडली होती. तख्तावर आल्यानंतर 1660च्या सुरुवातीलाच औरंगजेबाने शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि आदिलशाही संपवून दख्खन ताब्यात घेण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली.
 
 
शाहिस्तेखानाने पाऊण लाखाहून अधिक घोडदळ आणि तीस हजार पायदळ एवढी प्रचंड सेना तयार केली. चारशे हत्ती, शंभर उंट, तोफा, तंबू, राहुट्या आणि भरमसाठ खजिना, सामान अशी तयारी केली. नामदारखान, तुरुकताजखान, शम्सखान, कारतलबखान, गाजीखान, गयासुद्दीम असे एकाहून एक नामचीन मुघली सरदार खानाच्या फौजेत होते. राजा प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, गोवर्धन, बीरमदेव सिसोदिया, रामसिंह, रायसिंह सिसोदिया असे अनेक राजपूत, बुंदेले हिंदू सरदारही खानासोबत होते. वर्‍हाडातील रायबागन होती, शिवाय राजांचे नातेवाईक असलेले द्वारकाजी, जिवाजी, परसोजी, बाळाजी, त्र्यंबकजी असे भोसले आणि दत्ताजीराव, रुस्तुमराव, कृष्णराव, प्रचंडराव अशी जिजाऊसाहेबांच्या माहेरची, जाधवांची मंडळीही शाहिस्तेखानाला साथ द्यायला सामील झाली. एवढ्या प्रचंड लवाजम्यासोबत शिवाजीला संपवणारच या आत्मविश्वासाने शाहिस्तेखान 28 जानेवारी 1660 रोजी औरंगाबादहून निघाला. नगरला आला. सुपे ताब्यात घेऊन बारामतीला आला. इंदापूर-सासवड-पाटस-यवत अशा मार्गाने 9 मे 1660 रोजी पुण्यात पोहोचला. पुण्याचा संपूर्ण परिसर शाहिस्तेखानाच्या विशाल छावणीने भरून गेला. स्वत: शाहिस्तेखानाने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम केला.
 
 
शिवाजीराजे या वेळी सिद्दी जौहरच्या वेढ्यात, पन्हाळ्यावर अडकून पडले होते. खानाने स्वराज्याच्या दळणवळणाची ठाणी ताब्यात घ्यायचे ठरवले. इंदापूर, बारामती, शिरवळ अशी ठाणी घेऊन शाहिस्तेखानाने चाकणच्या संग्रामदुर्गाला वेढा घातला. पावसाळा, पूर अशा परिस्थितीतही खानाने वेढा ढिला होऊ दिला नाही. 13 जुलै 1660 रोजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपली सुटका करून खेळणा गाठला. कमी संख्याबळ असतानाही फिरंगोजी नरसाळा हा चाकणचा किल्लेदार खानाच्या फौजेला चिवट प्रतिकार देत होता. पंचावन्न दिवस उलटले, तरी संग्रामदुर्ग खानाच्या हाती येत नव्हता. शेवटी सुरुंग लावून खानाने बुरूज उडवून दिला. अनेक मराठे मृत्युमुखी पडले, तरी खिंडाराच्या तोंडावर सर्व मराठ्यांनी खानाच्या सेनेला रोखून धरले. नाइलाजाने दुसर्‍या दिवशी फिरंगोजीने गड खानाच्या ताब्यात दिला. हजारो संख्येने उभ्या ठाकलेल्या खानाच्या प्रचंड सैन्यासमोर न डगमगता सुमारे सातशे मावळ्यांनी पंचावन्न दिवस संग्रामदुर्ग लढवला. खानाला कळून चुकले, चाकणच्या लहानशा भुईकोटाने जर पंचावन्न दिवस भांडवले, तर एकेक किल्ला घेण्यास किती वर्षे जातील. त्यामुळे किल्ल्यांच्या वाट्याला जाण्याऐवजी स्वराज्याचा मुलूख जाळपोळ करत नेस्तनाबूत करण्याचे त्याने ठरवले. शिवराय काय करतील याची पक्की खात्री असल्यामुळे तो सावध होताच. सर्वत्र चौक्या, गस्तीपथके लावून त्याने पुणे परिसर बंदिस्त करून टाकला. त्यानंतर कोकणात शिरून मुलूख काबीज करण्यासाठी शाहिस्तेखानाने कारतलबखानाला पाठवले. पण शिवरायांनी उंबरखिंडीत त्याची कोंडी करून नेसत्या वस्त्रानिशी खानाला माघार घेण्यास भाग पाडले. शाहिस्तेखानावर मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. खानाने मुलखात लुटालूट चालवली होती. अनेक आमिषे-धमक्यांनी राजांकडील मराठी सरदार फोडण्याचे तंत्रही अवलंबले होते. कृष्णाजी काळभोर, बाबाजी होनप, नारोजी पंडित अशी अनेक माणसे खानाकडे गेली. अफझलखानाचे मुंडके कापणारा राजांचा अंगरक्षक संभाजी कावजीही खानाकडे गेला.
 
 
1660 ते 1662 अशी दोन वर्षे महाराज शांत राहिले. पन्हाळ्यावरून सुटल्यावर कोकणात स्वार्‍या केल्या. राजापूरची इंग्रजी वखार फोडली. महाराजांनी आदिलशहाबरोबर तह केला, त्यामुळे तूर्त त्या बाजूलाही शांतता होती. स्वराज्याच्या सर्व मुलखात शाहिस्तेखानाचे सरदार पसरले होते. भरपूर काळ मोहीम चालवायला शाहिस्तेखानाकडे मनुष्यबळ, पैसा यांची रेलचेल होती. किंबहुना बादशहाने कंदहारच्या मोहिमांवर पाठवू नये, म्हणून तो दख्खनमध्ये ऐशआरामात वेळ काढत होता. रयत त्रासली होती. स्वराज्यवृद्धी होत नव्हती. सैन्यगळती सुरू होती. राजांच्या जाणत्या लोकांनीसुद्धा शाहिस्तेखानाबरोबर तह करण्याचा सल्ला दिला. परंतु महाराजांनी प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करायचे ठरवले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही शत्रूवर असे जाणे आत्मघातकी होते, पण राजांनी हे साहस करायचे ठरवले. राजगडावरून त्यांनी या अकस्मात हल्ल्याची सुसूत्र योजना आखली.
शाहिस्तेखानाचे सैन्य लाखभर असले, तरी ते सर्व पुण्यात नसून चोल, रहिमतपूर, सिंहगड असे विखुरले होते. सिंहगडला जसवंतसिंहांचा वेढा होता. राजांनी त्याला भरपूर नजराणा पाठवून वेढा ढीला करण्यासाठी त्याचे मन वळवले. आपलाच एक सरदार खानाला फितूर करून, त्याच्याकडून मुलखाची थोडी लुटालूट करवून खानाची मर्जी संपादन करायला लावली. त्याची नेमणूकही पुण्याच्या दक्षिणेस झाली. लाल महालातील बागकाम करणार्‍या माळ्याशी संधान बांधले नि महालातील सर्व भागाची विस्तृत माहिती मिळवली. शाहिस्तेखानाच्या आवतीभोवती संपूर्ण पुण्यात राजांचे हेर फिरू लागले.
 
 
खान साधारण तीन वर्षे पुण्यात मुक्कामाला होता. त्याची फौजही एव्हाना कंटाळली होती आणि त्यामुळे शिथिलही झाली होती. खानाच्या छावणीच्या दोन-तीन मैलभर छबिन्याचे पहारेकरी होते. दिवसरात्र या तुकड्या गस्त घालून परत येत. त्यामुळे हल्ला करायचा झाल्यास नेमकी वेळ साधावी लागणार होती.
 
 
छापा घालून पळायचे, तर जवळपासच्या किल्ल्यावर तातडीने जायला हवे. असा एकच किल्ला पुण्याजवळ होता - सिंहगड! सिंहगडावर जाणार्‍या मराठ्यांकडे जसवंतसिंहाच्या वेढ्याचे दुर्लक्ष होईल अशी शिवरायांनी आधीच तजवीज केली होती. राजे आदल्या दिवशी राजगडावरून सिंहगडावर पोहोचले. नेतोजी पालकर, मोरोपंत पिंगळे, बाजी जेधे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोयाजी बांदल असे निष्ठावंत सवंगडी बरोबर होते. लाल महालाची बारीकसारीक माहिती असलेल्या बाबाजी आणि चिमणाजी मुद्गल देशपांडे या बंधूंना स्वत:बरोबर ठेवले. या वेळेस कुणासही न पाठवता लाल महालात स्वत: घुसायचे महाराजांनी नक्की केले होते.
 
 
पुण्याच्या कोतवालाकडून काही लोकांनी एका लग्नाचे वर्‍हाड वरात घेऊन संध्याकाळी उशिरा येऊ देण्याची परवानगी मिळवली. ही लग्नाची वरात वाजतगाजत आली आणि पुण्याच्या अंधारात गडप झाली. राजांचे सैन्य वरातीमधून सर्व पुण्यात पसरले.
 
 
शके 1585 चैत्र शुद्ध अष्टमीची रात्र, रविवार दि. 5 एप्रिल 1663. दुसर्‍या दिवशी रामनवमी. रमाझानचा महिना असल्यामुळे मुसलमानांचे रोजे चालू होते. रात्री पोटभर खाऊन सैन्य डाराडूर झाले. आता सूर्योदयापूर्वीच्या खाण्यासाठी महालातील आचारी लवकर उठून पहाटे पहाटे स्वयंपाक करू लागले होते.
 
 
पंचवीस-तीस जणांना घेऊन शिवाजी महाराजांनी मध्यरात्रीनंतर सिंहगड सोडला आणि पुण्याच्या रोखाने निघाले. वाटेत सिंहगडापासून डोणजे, खडकवासला, मुठा, पुण्यापर्यंत मार्गामार्गावर मावळ्यांच्या तुकड्या तैनात होत्या. मुठा नदी लाल महालाच्या पश्चिमेकडे होती. नदीच्या काठावर पहारे नव्हते. एप्रिल महिना असल्यामुळे नदीला पाणीही जास्त नव्हते. राजांनी नदी पार केली. घोडा बाजी जेध्याकडे देऊन नेतोजीला सव्वाशे लोकांची तुकडी घेऊन सज्ज ठेवले. महालाच्या दक्षिण बाजूने कोयाजी आणि चांदजी बांदलांना काही माणसे घेऊन पाठवले आणि स्वत: बाबाजी, चिमणाजी आणि इतर आठ-दहा मावळे घेऊन महालापर्यंत लपतछपत पोहोचले. वाटेत चौकीवरच्या लोकांनी विचारल्यावर आधी खानाला फितूर असलेल्या सरदाराने ’पहार्‍यावरची माणसे’ म्हणत सोडायला लावले. ही सारी माणसे महालापासून थोड्याच अंतरावर दबा धरून होती. महाराज महालाच्या मागच्या बाजूला सरकले. तिथल्या पहार्‍याला काही कळायच्या आत गारद करून वाट पाहत असलेल्या माळ्यापाशी आले. त्याने मुदपाकखान्याच्या उघड्या खिडकीतून आत जाण्याचा मार्ग दाखवला. राजांबरोबरच्या मावळ्यांनी आत येत पहाटेच्या जेवणाची तयारी करत असलेल्या सार्‍या आचार्‍यांना यमसदनास धाडले. आधी मुदपाकखाना आणि शेजघरात एक दरवाजा होता. शाहिस्तेखानाच्या लोकांनी मातीने तो बुजवून टाकला होता. नेहमीप्रमाणे तीन वाजता नगारा वाजू लागला. त्याच्या आवाजाचा फायदा घेत मावळ्यांनी कुदळीच्या घावांनी तो दरवाजा मोकळा केला. याच इशारतीने शहरात पांगून लपलेले मावळे लाल महालाच्या दिशेने धावत निघाले. मुदपाकखान्याच्या मोकळ्या झालेल्या त्या दरवाजातून धडाधड मावळे आत शिरले. समोर होता तो शाहिस्तेखानाचा जनानखाना. चाहूल लागताच तिथल्या स्त्रियांनी आरडाओरड चालू केली. दिवे-शामदाने फुंकुन सर्वत्र अंधार केला. मराठ्यांना काही दिसत नसल्यामुळे अंधारातील हल्ल्यात त्यातल्या काही स्त्रियाही जखमी झाल्या. मराठे तसेच पुढे सरकले. तेवढ्यात शाहिस्तेखानाचा मुलगा फत्तेखान राजांच्या सामोरी आला. महाराजांनी शाहिस्तेखान समजून चढाई केली आणि तो राजांच्या तलवारीच्या भक्ष्यस्थानी पडला. राजांना वाटले, खानच मेला.
 
 
पण समोर उभ्या असलेल्या फत्तेखानाच्या बायकोने घाबरून शाहिस्तेखानाच्या खोलीकडे इशारा केला. राजे तत्काळ शाहिस्तेखानाच्या दिशेने धावले. खान सावध होऊन समशेर सावरणार, त्याआधीच राजांनी घाव घातला. घाव हातावर पडला. उजव्या हाताची तीन बोटे तुटली. अंधारात खान गटांगळ्या खात पलीकडे गेला. राजांना वाटले, खान मारला गेला. वेळ कमी होता. शहरातील सार्‍या सैन्याला कळायच्या आत लाल महालातून निघायचे होते. राजांनी आणि सर्व मावळ्यांनी महालाच्या सार्‍या चौक्या कापून काढल्या आणि वाड्यातून क्षणार्धात पोबारा केला. गनीम आया, गनीम आया अशा आरोळ्या ठोकत मराठे सर्वत्र धावत सुटले. बाहेरचे पेंगलेले खानाचे सैन्य खडबडून जागे झाले आणि किंकाळ्या-आक्रोशाने भरलेल्या लाल महालाकडे धावले.
एव्हाना राजांसवे मराठ्यांनी परतीचा मार्ग धरला होता. झपाझप पावले टाकत सारे नदीपार गेले. बाजी जेधे राजांचा घोडा धरून तयार होताच. राजे स्वार होऊन आले तसेच सिंहगडाकडे निघून गेले. वाटेत ठिकठिकाणी मराठ्यांच्या तुकड्या राजांचे रक्षण करण्यासाठी तयार होत्या. कात्रजच्या घाटात दिशाभूल करण्यासाठी बैलाच्या शिंगांना मशाली बांधून ठेवले होते. नंतर उशिरा पाठलाग करणार्‍या काही मुघली सैनिकांनाही कात्रजहून हात हलवत परत जावे लागले. उजाडण्यापूर्वी शिवाजी महाराज सिंहगडावर सुरक्षित पोहोचले होते, आणि मागोमाग राजांच्या सार्‍या तुकड्याही.
 
 
श्रीरामनवमीचा सूर्योदय झाला. राजांच्या पराक्रमाची किरणे पुण्यात सर्वदूर पसरली होती. सर्व मुघल छावणीच गर्भगळित झाली. मुघल साम्राज्याला चपराक बसली होती. शाहिस्तेखान जिवानिशी वाचला होता. प्राणांवर आले ते बोटांवर निभावले.
 
 
लाल महालावरील हा हल्ला छापा तंत्राचा अद्भुत प्रकार होता. खानाचा मुलगा, जावई, सेनापती, बायका आणि इतर माणसे अशी साधारण शंभर माणसे मेली. राजांची साधारण पाचसहा माणसे मेली, कोयाजी, चांदजी बांदल यांच्यासह चाळीस-एक जखमी झाले. 6 एप्रिल 1663 दिवसभर पुण्यात हलकल्लोळ चालला होता. अफवांना ऊत आला होता. मराठे आले कुठून, गेले कुठून त्याचीच चर्चा रंगत होती. शाहिस्तेखान अपमानाने, वेदनेने, भयाने तडफडत होता. इतका प्रचंड सेनासागर आणि कडेकोट बंदोबस्त असतानाही शिवाजी आपल्या अंगावर आला आणि आपण काहीच करू शकलो नाही, ही विटंबना नशिबी आली. दोन दिवसांत जसवंतसिंहावर मोहिमेची जबाबदारी टाकून शाहिस्तेखान औरंगाबादला निघाला.
 
 
मामाच्या या फजितीची बातमी औरंगजेबाला काश्मीरच्या वाटेवर कळली. मुघलशाहीचा हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याने रागाने शाहिस्तेखानाला आसाम-बंगालच्या सुभ्यावर नेमले आणि दरबारात न येता थेट जाण्यासाठी फर्मावले.
 
 
अफजलखानाच्या वधाने शिवाजीराजांची कीर्ती दख्खनभर पसरली होती. पण शाहिस्तेखानाच्या छाप्याने शिवरायांचा पराक्रम हा हिंदुस्थानभर चर्चेचा विषय झाला. मुघली मुलखात शिवरायांबाबत काल्पनिक कथा रंगू लागल्या.. शिवाजीला पंख आहेत, त्याला उडता येते, त्याला सैतानाची सिद्धी प्राप्त आहे, तो गायब होऊ शकतो, हवेवर चालू शकतो अशा वावड्या उठल्या. खरे तर शाहिस्तेखान स्वराज्याच्या मुलखाची नासधूस करत होत. दोन वर्षे महाराजांना काही करता आले नव्हते. खान तहाला झिडकारत होता, त्यामुळे युद्धाशिवाय कोणताच पर्याय महाराजांपाशी शिल्लक नव्हता. राजांचे बळ शाहिस्तेखानाच्या तुलनेत नगण्य होते. खानाचे कसलेले सरदार, लाखाहून अधिक लष्कर आणि भरमसाठ शस्त्रास्त्रे पाहता खानाशी रणांत युद्ध करणे अशक्य होते. तरीही खानाला धूळ चारायची होती आणि म्हणूनच काटेकोर नियोजनाद्वारे अकस्मात टाकलेला छापा हे विशिष्ट प्रकारे धडक युद्धतंत्रच होते. शाहिस्तेखान युद्धकुशल आणि अनुभवी होता. सावध होता. कडेकोट बंदोबस्तात होता. अशा अवस्थेत त्या कसलेल्या सेनापतीच्या छावणीवर प्रत्यक्ष छापा टाकणे हे महान धाडस होते.
 
 
केवळ या एका छाप्याने प्रत्यक्ष युद्ध न करताही राजांनी प्रचंड मोठ्या मुघल फौजेला आपल्या मुलखातून चालते केले होते. जर या युद्धनीतीच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर रणक्षेत्र राजांचे होते म्हणजे त्याची सर्व माहिती त्यांच्याकडे होतीच, पण आपल्या रणांत मुक्काम ठोकलेल्या शत्रूचीही खडानखडा माहिती राजांकडे होती. या हालचालींबाबत राजांच्या लोकांची कमालीची गोपनीयताही इथे दिसते. त्यामुळे हा छापा पूर्णत: यशस्वी झाला. हे संपूर्ण श्रेय शिवरायांच्या हेरखात्याचे. हल्ल्यापूर्वी पुण्यात पेरलेली माणसे, खानाची फितवलेली माणसे, प्रत्यक्ष वाड्यात घुसवलेली माणसे, नियोजित ठिकाणी ठेवलेल्या तुकड्या, वाड्यात अत्यंत कमी वेळात हल्ला चढवून निघून जाणे ही सारी योजनाबद्ध कृती होती. महत्त्वाचे म्हणजे स्वत: शिवरायांनी ह्या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. प्रसंगी प्राण जाण्याचा धोका होता, पण राजांनी कुशल सेनापतीसारखे हे आव्हान पेलले. शाहिस्तेखानाला शास्त दिली. या छाप्यातील राजांचे अंगीभूत साहस आणि धाडसी वृत्ती पाहून त्यांच्या सहकार्‍यांच्या निष्ठा दुणावल्या. राजांनी या एकाच कृतीने मुघलांच्या मनांत दरारा आणि मराठ्यांच्या मनात विश्वास वाढवला होता. शाहिस्तेखानावरचा छापा हा अपेक्षित विजय मिळवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध करण्याऐवजी केलेला यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राइक’च होता.
 

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.