वणी-दिंडोरीची लढाई - दाऊदखानाचा पराभव

लेखांक : 10

विवेक मराठी    30-Dec-2023   
Total Views |
vivek
फोटो सौजन्य : google
वणी-दिंडोरी प्रांतातली कांचनबारीची लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्धनीतीतला मैदानी युद्धाचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना. स्वराज्याच्या मुलखात, डोंगर-दर्‍याखोर्‍यांत, घनदाट जंगलातील लढायांत शिवरायांनी सर्वात अधिक वापरलेली युद्धनीती म्हणजे गनिमी कावा. परंतु वणी-दिंडोरीची लढाई ही सातमाळच्या डोंगररांगेखालील उघड्या पठारी मैदानावर महाराजांनी साकारलेली रणनीती होती. दहा-दहा हजार फौजांनी एकमेकांसमोर कांचन-मंचनपासून वणीच्या दिशेपर्यंत 25-30 किलोमीटरच्या परिसरांतील रणमैदानात केलेले हे युद्ध. पण अशाही युद्धात राजांनी जी व्यूहरचना केली, ती अजोड होती.
औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून घेत आग्र्याहून परत आल्यावर महाराजांनी स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवता यावी यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पुरंदरच्या तहात स्वराज्याचे सामर्थ्य बरेच कमकुवत झाले होते. पुढील चढायांना थोडी उसंत हवी, म्हणून महाराजांनी मोगलांशी तह केला. इराणचा बादशहा आक्रमण करण्याची शक्यता होती, अशा वेळी दख्खनकडे पुढे नंतर पाहता येईल, म्हणून औरंगजेबाने हा तह स्वीकारला. शिवरायांना ‘राजा’ ही पदवीही दिली. 1667दरम्यान राजांनी आदिलशहाशीही तह केला. या शांततापर्वात राजांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी नीट बसवली. 1670पासून मात्र महाराजांनी मुघली मुलखात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. तानाजीच्या बलिदानाने सिंहगड स्वराज्यात परत आला. कल्याण, भिवंडी पुन्हा घेतली. वर्‍हाड लुटले. पुरंदरच्या तहात दिलेले तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, राजमाची, रोहिडा, कर्नाळा किल्ले महाराजांनी परत मिळवले.
 
स्वराज्याचा खजिना आटला होता. राज्याची कित्येक कामे पैशाअभावी खोळंबली होती. गरज होती भरपूर संपत्तीची. म्हणूनच महाराजांनी मुघलांची श्रीमंत बाजारपेठ असलेल्या सुरत शहरावर पुन्हा छापा घालायचे ठरवले. मराठे सुरतेत येणार अशा अफवा वारंवार उठत. सप्टेंबर 1670च्या अखेरीस शिवरायांनी कल्याणहून सुरतेला प्रयाण केले.
 
2 ऑक्टोबर 1670 रोजी महाराजांनी सुरतेपासून वीस मैलावर तळ ठोकला. खरे तर मुंबईच्या इंग्रजांनी शिवरायांच्या या हल्ल्याची कल्पना सुरतेच्या सुभेदाराला आधीच दिली होती, पण ती अफवाच असेल असे समजून तो स्वस्थ राहिला. राजांनी सुरतेच्या सुभेदाराला एकूण महसुलाच्या एकचतुर्थांश खंडणी द्या असा निरोप धाडला. सुभेदाराने तो धुडकावला. दुसर्‍याच दिवशी राजांनी सुरतेवर हल्ला चढवला. बादशहाचा खजिना भरणार्‍या स्वार्थी धनाढ्य व्यापारी-उमरावांकडून दोन दिवस खंडणी गोळा केली. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा सण. सुरतेचे दिवाळे काढून राजांनी स्वराज्यासाठी लक्ष्मी संपादन केली. 3 आणि 4 ऑक्टोबर 1670च्या या सुरतेवरील छाप्यात महाराजांनी अंदाजे एक कोटीची संपदा मिळवली. 5ला दुपारी घोडे, खेचरे, बैलांवर ही भरमसाठ लूट लादून 15 हजार सैन्यासह महाराजांनी सुरत सोडली.
 
मराठे सावध होते. आल्यासारखे कल्याणमार्गे परतायचे तर मुघल, पोर्तुगीज आणि इंग्रज या तिघांचाही मुलूख जवळ असल्यामुळे सोबतच्या खाजिन्याला अधिक धोका होता, म्हणून राजांनी सुरतेच्या पूर्वेला असलेल्या सह्याद्री रांगेला ओलांडून साल्हेर, मुल्हेर, ताहराबाद, सटाणा, कळवण, वणी, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, अकोला, जुन्नर, खेड, पुणे, राजगड असा लांब पल्ल्याचा मार्ग निवडला.
 
राजांचे हेर सर्व मार्गात आधीच पसरले होते. मुलूख मुघलांचा होता. हल्ला कुठूनही होऊ शकत होता. औरंगजेबाचा मुलगा शाहजादा मुअज्जम दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगाबादला मुक्काम ठोकून होता. त्याला सुरतेवरील हल्ल्याची वार्ता गेली. त्याने बर्‍हाणपूरला असलेल्या दाऊदखान कुरेशी या मुघली सरदाराला मराठ्यांना रोखण्यासाठी बोलावले. दाऊदखानाच्या नेतृत्वाखाली भरपूर फौज दिली, घोडदळ दिले, भलामोठा तोफखाना, उंट, हत्ती, खजिना दिला. तसेच भाऊसिंग हांडा, इख्लासखान, गालीबखान, मीर अब्दुल मबूद, शेख सफी, राय मकरंद, बसवंतराय, भान पुरोहित, नारोजी, संग्रामखान असे एकापेक्षा एक धुरंधर सरदार दिले. तारिख इ दिल्कुशाचा लेखक भीमसेन सक्सेनाही या युद्धात सहभागी झाला होता. सर्व सैन्य घेऊन दाऊदखान तातडीने वैजापूरला पोहोचला.
 
नाशिकच्या उत्तरेकडे सुरगण्यापासून नांदगावपर्यंत पूर्व-पश्चिम अशी सातमाळ नावाची प्रसिद्ध डोंगररांग आडवी पसरली आहे. पश्चिमेकडून चालत गेल्यास या रांगेत अनेक प्राचीन डोंगरी किल्ले लागतात. हातगड, रवळा-जवळा, घोडप, इखारा-हंडा शिखरे, कांचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई, रासलिंग, चांदवळ, अणकाई-टणकाई असे एकाहून एक उंच, अभेद्य किल्ले. या डोंगरांतील वणीजवळचा सप्तशृंगीचा डोंगर म्हणजे तर जगदंबेचे जागृत शक्तिपीठ. निसर्गत:च सातमाळ दुर्गम बनली आहे. या अनेक डोंगरातून उत्तर-दक्षिण जोडणारे छोटे छोटे घाट, कांचनबारी, भाऊडबारी अशा खिंडी आहेत. पावसाळ्यांत डोंगरांवरून आलेल्या जलप्रवाहांनी समोर काही खडबडीत मैदानी पठारे तयार केली आहेत. वर्षभर शुष्क अशा या रणमैदानांत हलकी घोडदळेच लढायांसाठी जास्त उपयोगी ठरू शकत होती.
 
शिवाजी महाराज मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी आले. तिथल्या पेठेवर हल्ला चढवून त्यांनी आणखी लूट मिळवली. दाऊदखानाला याची खबर लागली. महाराजांना हे समजताच त्यांनी मुल्हेर सोडले. दाऊदखान अंदाज घेत होता की नेमकी कुठली घाट-खिंड मराठे ओलांडणार. तो वैजापूरहून तातडीने चांदवडला निघाला. जवळजवळ पंचेचाळीस मैलाचे अंतर पार करून तो रात्रीच चांदवडला आला.
 
16 ऑक्टोबर 1670ची रात्र. महाराजांना कळून चुकले की आता कोणत्याही क्षणी मुघलांच्या मुलखातच आमनेसामने लढावे लागणार. दाऊदखानाचे सैन्य जवळ होते. महाराजांना पुढील रणनीतीचा निर्णय तत्काळ घ्यायचा होता. खानाचा सामना करण्यासाठी फौज पुरेशी होती, पण एवढा खजिना घेऊन मुघलांशी लढाई करण्यात धोका जास्त होता. शत्रूने खजिन्यावरच हल्ला केला, तर बिकट प्रसंग ओढवणार होता. जलद युद्धगती ठेवायची, तर घोडदळही मोठ्या प्रमाणावर लागणार होते. म्हणजे खजिना वेगळा राखायचा झाला तर पायदळावरच भार पडणार होता. महाराजांनी मुख्य सैन्याच्या मागे ठेवलेल्या खजिन्याला निष्ठावंत विश्वासू सरदारांच्या साथीने वेगळे केले. अत्यंत गुप्तता ठेवून पायदळाच्या काही तुकड्यांबरोबर खजिना सप्तशृंगीच्या बाजूने डोंगरमार्गाने वणीला पाठवण्याचे ठरवले. खजिन्याची ही फळी पुढे जाऊन त्र्यंबक घाटाकडे थांबणार आणि युद्ध संपल्यावर राजांच्या फौजेबरोबर राजगडाकडे निघणार, असे ठरले. रातोरात महाराजांनी ही व्यवस्था केली. खजिन्याच्या हालचालीची गुप्तता इतकी होती की मुघलांच्याच नव्हे, तर राजांच्या मुख्य सैन्यालाही कळले नाही. राजांबरोबर घोडदळाचे प्रमुख प्रतापराव गुजर आणि पायदळाचे प्रमुख मोरोपंत पिंगळे होते. सुमारे दहा हजाराचे घोडदळ हाती घेऊन राजांनी कांचना-मंचन आणि हांड्या शिखरांमधली कांचनबारीची खिंड ओलांडायचे ठरवले.
 
मराठी सैन्याची हालचाल कळल्याबरोबर दाऊदखानाने रात्रीच घोडदळाची एक तुकडी इख्लासखानाबरोबर देऊन कांचनबारीच्या दक्षिणेला पाठवले. त्याच्याबरोबर काही मुघली तोफखानाही दिला.
 
17 ऑक्टोबर 1670ला पहाटेच दोन्ही बाजूंचे सैन्य युद्धासाठी तयार झाले.
 
इख्लासखानाने कांचना किल्ल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याखालच्या पठारावर तोफखाना उभा केला. मराठ्यांना आपल्या उजव्या बाजूची ही खेळी लक्षात येताच सर्वप्रथम त्या तोफखान्यावर त्यांनी जोरकस हल्ला मारून खानाचा तोफखानाच उधळून लावला. तोफखान्याअभावी इख्लासखानाची बाजू लंगडी झाली.
 
राजांनी सैन्याच्या चार तुकड्या केल्या. एक तुकडी डोंगररांगेच्या पश्चिमेला वळसा घालून मुघलांवर मागून हल्ला करण्यासाठी पाठवली. स्वत: खिंडीच्या तोंडाशी उभे राहून उरलेल्या दोन तुकड्या डाव्या व उजव्या बाजूंनी हल्ला करण्यासाठी ठेवल्या.
 
 
इख्लासखान कांचनबारीच्या समोर दक्षिणेकडील मैदानात उभा होता. त्याने वेळ न दवडता समोरून खिंडीच्या तोंडाशी उभे असलेल्या सैन्यावर चढाई केली. घनघोर युद्ध सुरू झाले. मराठ्यांचा त्वेष इतका होता की पाहता पाहता मुघल धराशायी होऊ लागले. स्वत: इख्लासखान जखमी होऊन पडला. इतक्यात दाऊदखान पायथ्याशी पोहोचला. राय मकरंदाला आघाडीवर सोडले. तो स्वत:, शेख सफी, संग्रामखान आणि पुरोहित भानाबरोबर मध्ये राहिला. पिछाडीवर गालिबखान, नारोजी आणि बसवंतराव अशा सर्वांनी मराठ्यांवर हल्ला चढवला. त्यांनी जखमी इख्लासखानाला बाहेर काढले. पण मुघली फौजांना पाठीमागून दोन्ही बाजूंनी आलेल्या मराठ्यांचा अंदाज आला नाही. मराठ्यांनी दाऊदखानाच्या सैन्याला सर्व बाजूंनी वेढले. प्रतापराव, व्यंकोजी दत्तो, आनंदराव यांच्या पराक्रमापुढे मुघल सरदार नांगी टाकू लागले. एकेक फळी चहूबाजूंनी कापत मराठ्यांनी मुघलांची दाणादाण उडवली. मुघलांचे सरदार एकामागून एक रणांत कोसळू लागले. संग्रामखान जखमी होऊन पडला.
दाऊदखानाच्या मुघली तोफखान्याचा प्रमुख मीर अब्दुल मबूद हाही एकाकी पडला. त्याचा आणि मुघली सैन्याचा संपर्कच तुटला. त्याचे अनेक तोफची कापले गेले. मबूद आणि त्याचा मुलगा जखमी होऊन कोसळले. निशाणाची फौज आणि तोफखाना मराठ्यांनी काबीज केल्यामुळे मुघली सैन्याचा धीर खचला. जखमी सरदारांना कसेबसे वाचवत मुघली सैन्याने पळ काढला. दोन प्रहर चाललेल्या या लढाईत दाऊदखानाचा पूर्ण पराभव झाला. रणमैदान सोडून तो जीव वाचवत जेमतेम हजारभर सैन्यासह दूर असलेल्या भाऊडबारीच्या तळापर्यंत पोहोचला. मराठ्यांनी संध्याकाळी तिथेही हल्ला करून लूट केली. ही लढाई जिंकून शिवाजी महाराज लगेच वणीच्या दिशेने चाललेल्या खजिन्यापाशी पोहोचले आणि सुरक्षा बाळगत दुसर्‍याच दिवशी त्यांनी राजगडाकडे प्रस्थान ठेवले. नगर प्रांतातील कुंजरगडमार्गे मराठे कोकणच्या दिशेने निघाले. दाऊदखानही दुसर्‍या दिवशी जखमींना औरंगाबादकडे पाठवून स्वत: खालच्या मानेने नाशिककडे चालता झाला.
 
मुघली दरबारी लेखक भीमसेन सक्सेना त्याच्या ‘तारिख इ दिल्कुशा’ या ग्रंथात या युद्धाची माहिती देतो. तसेच कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बखरीत या युद्धाचे संक्षिप्त वर्णन करतो. राजांच्या आवेशाबद्दल तो लिहितो - ‘राजा खासा घोड्यावर बसून बख्तर घुगी चालून हाती पटे चढवून, मालमत्ता, घोडी, पाईचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हजार स्वारानिशी सडेसडे राऊत उभे राहिले.’
 
वणी-दिंडोरी प्रांतातली कांचनबारीची लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्धनीतीतला मैदानी युद्धाचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना. स्वराज्याच्या मुलखात, डोंगर-दर्‍याखोर्‍यांत, घनदाट जंगलातील शिवरायांनी सर्वात अधिक वापरलेली युद्धनीती म्हणजे गनिमी कावा. परंतु वणी-दिंडोरीची लढाई ही सातमाळच्या डोंगररांगेखालील उघड्या पठारी मैदानावर महाराजांनी साकारलेली रणनीती होती. दहा-दहा हजार फौजांनी एकमेकांसमोर कांचन-मंचनपासून वणीच्या दिशेपर्यंत 25-30 किलोमीटरच्या परिसरांतील रणमैदानात केलेले हे युद्ध. पण अशाही युद्धात राजांनी जी व्यूहरचना केली, ती अजोड होती. राजांचा शत्रूच्या मुलखातील भूगोलाचाही अभ्यास किती दांडगा होता, त्याची ही लढाई प्रचिती होती. गतिमान अशा मराठी घोडदळाने डोंगराला वळसा घालून आणि समोरून तिन्ही बाजूंनी गनिमाच्या नकळत त्याला वेढून टाकले. मुघली सैन्याचे यशस्वी तुकडे करत, वेगवेगळे पाडत, तोफखाना-बंदुकची नामशेष करत मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला. मुख्य म्हणजे ही लढाई स्वराज्याच्या सीमेबाहेर दूर मुघली मुलखात लढली गेली. शिवाजी महाराजांनी आपले असामान्य रणकौशल्य दाखवत स्वत: या युद्धाचे नेतृत्व केले होते. दाऊदखान हा मुघलांचा अनुभवी सेनापती होता. पण शिवरायांच्या रणांतील अभेद्य व्यूहरचनेसमोर तो लीलया पराभूत झाला. त्याचे सुमारे तीन हजार पायदळ ठार झाले. तेवढेच घोडदळ नेस्तनाबूत झाले. अनेक मुघली सरदार धराशायी झाले. मराठी सैन्यही थोड्या प्रमाणात कामी आले.
या लढाईने दाखवून दिले की गेल्या पंचवीस वर्षांत मराठी सैन्याची ताकद आणि लढाईचा अनुभव दसपटीने वाढला होता. शिवाजी महाराजांनी अद्ययावत शस्त्रास्त्रे आणि योग्य युद्धप्रशिक्षणाद्वारे सैन्याचा आत्मविश्वास तयार केला होता. या लढाईमुळे उघड्या मैदानी युद्धातही मराठे प्रबळ आहेत याची सर्व शत्रूंना जाणीव झाली. या प्रसंगी राजांनी केलेली खजिन्याची गुप्त हालचाल हा युद्धतंत्राचा एक महत्त्वपूर्ण भाग होता.
युद्धातील विजय साजरा करत वेळ काढणे शिवरायांच्या स्वभावाविरुद्ध होते. जशी प्रतापगडच्या युद्धानंतर महाराजांनी आदिलशाही मुलखात विजापूरच्या सीमेपर्यंत चढाई केली होती, तशीच वणी-दिंडोरीच्या लढाईनंतरही वेळ न दवडता राजांनी मुघलांच्या या प्रांतातील त्र्यंबकगडासह सातमाळेतील सर्व किल्ले घेतले. थेट बुर्‍हाणपूरपर्यंत हल्ला चढवला. करंजाची पेठ लुटली. वणी-दिंडोरीच्या लढाईने दख्खनमधील मुघली सैन्याला मराठ्यांच्या तलवारीचे पाणी कळून चुकले. औरंगजेबाला पुरते उमगले की मराठ्यांना थांबवणे आता कठीण कर्म झाले आहे.

रविराज पराडकर

 
रविराज पराडकर हे  इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.