मराठवाडा मुक्तिसंग्राम जोखडातून मुक्त होण्याचा संग्राम

विवेक मराठी    05-Dec-2023   
Total Views |

vivek
 
मराठवाडा मुक्त झाल्यानंतर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम एक मागोवा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाची सुधारित दुसरी आवृत्ती मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समितीने नुकतीच प्रकाशित केली आहे. ‘जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याचा भविष्यकाळ अंधकारमय होतो’ ही एक उक्ती आहे. म्हणून आपला इतिहास आपण जाणून घ्यायला पाहिजे, तो दुसर्‍या पिढीकडे जसाच्या तसा हस्तांतरित केला पाहिजे. या पुस्तकात आपण हा सर्व इतिहास वाचू शकतो.
•
नोंदणीसाठी संपर्क
पुस्तकाचे नाव - मराठवाडा मुक्तिसंग्राम एक मागोवा
• संपादक - सुधीर देशपांडे
• प्रकाशक - मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समिती
• पृष्ठे - 80
• मूल्य - 150/- रु.
• नोंदणीसाठी संपर्क - 7588644972
मराठवाडा मुक्तिसंग्राम हा भारतमातेला मुस्लीम जोखडातून मुक्त करण्याचा संग्राम आहे. मराठवाड्यावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. निजाम कट्टर मुस्लीम शासक होता. 85 टक्के प्रजा हिंदू होती. परंतु हिंदूंना प्रशासनात काहीही स्थान नव्हते. उर्दू भाषा सक्तीची करण्यात आली होती. निजामाकडे रेग्युलर सैन्याशिवाय एक लाख रझाकारांची फौज होती. हे रझाकार म्हणजे आजच्या काळातील इस्लामी दहशतवादी होते. हिंदू प्रजेवर ते भयानक अत्याचार करीत. खून, बलात्कार, लूटमार निर्धोकपणे चाले. निजामाचे त्यांना समर्थन असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नसे. अशा भयानक राजवटीच्या जोखडातून 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्त करण्यात आला.
मराठवाडा मुक्तीचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांना द्यावे लागते. निजामाच्या राज्यात चारी दिशांनी भारतीय सैन्य घुसले आणि निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. काश्मीर आणि हैदराबाद संस्थानांचा विषय पं. नेहरू यांनी आपल्याकडे ठेवला होता. काश्मीरचा कसा विचका झाला, याचा अनुभव देशाने जवळजवळ सत्तर वर्षे घेतला. हैदराबाद संस्थानाचीदेखील तीच गत झाली असती. परंतु आपले सुदैव असे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन निजामाची इस्लामी राजवट संपवून टाकली. ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम एक मागोवा’ या सुधीर देशपांडे संपादित पुस्तकात आपण हा सर्व इतिहास वाचू शकतो.
मराठवाडा मुक्त झाल्यानंतर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकाची सुधारित दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. ‘जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याचा भविष्यकाळ अंधकारमय होतो’ ही एक उक्ती आहे. म्हणून आपला इतिहास आपण जाणून घ्यायला पाहिजे, तो दुसर्‍या पिढीकडे जसाच्या तसा हस्तांतरित केला पाहिजे.
या पुस्तकाला पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांची प्रस्तावना आहे. अतिशय छोट्या प्रस्तावनेत त्यांनी तीन गोष्टी मांडल्या - 1. भारताच्या या संघर्षाचे यथार्थ चित्रण सर्व अंगांनी झाले आहे, असे म्हणता येत नाही. 2. या संघर्षाला उपेक्षित ठेवले गेले, त्याची मोडतोड करून मांडणी केली गेली. 3. ही उणीव काही प्रमाणात या पुस्तकाने भरून निघेल. पुस्तक सर्वांनी का वाचले पाहिजे, ते डॉ. अशोकराव कुकडे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत मांडले आहे.
मराठवाडा हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान न मोजता येणारे आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर व भागानगरचे नि:शस्त्र प्रतिकार आंदोलन’ या किरण गोटीमुकुल यांच्या लेखात ते उत्तम प्रकारे आलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 11 ऑक्टोबर 1938ला भागानगर नि:शस्त्र प्रतिकार मंडळाच्या बातमीची घोषणा केली. यानंतर जानेवारी 1939पासून भागानगर सत्याग्रह सुरू झाला. या सत्याग्रहात हजारो लोकांनी भाग घेतला. निजामी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हैदराबाद संस्थानातील हिंदूंच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात महिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा राहिला. तो कालखंड महिलांनी सार्वजनिक चळवळीत सक्रिय भाग घेण्याचा नव्हता. या पुस्तकात ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांचा सहभाग - एक उपेक्षित पैलू’ हा प्रा. शुभदा भालेराव यांचा लेख आहे. या लेखात आर्य समाजातील काही महिलांची नावे दिलेली आहेत, त्याचप्रमाणे समाजातील सर्व स्तरांतील महिला या लढ्यात कशा उतरल्या, त्यांची नावे आहेत - उदा. आशाताई वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, दानकुंवर कोटेचा, माई अंबडकर यांच्या सहभागाचा बोध होतो. मेजर गं.के. घुगे यांचा ‘109 तासात हैदराबाद संस्थान पादाक्रांत’ हा लेख आहे. या लेखात सैन्याची मोहीम कशी झाली आणि ती कशी फत्ते झाली, याचा रोमहर्षक इतिहास आहे. सैन्यदलाने देवगिरी किल्ला ताब्यात घेतला. यादव राजवटीतदेखील देवीचे भव्य मंदिर होते. ते मुस्लीम सुलतानांनी उद्ध्वस्त केले. मंदिराचा परिसर भव्य आहे. गाभार्‍यात सैनिकांनी भारतमातेची मूर्ती बसविली. सैनिकांनी उभे केलेले भारतमातेचे भारतातील हे पहिले मंदिर आहे. या मुक्तिसंग्रामात मराठवाड्यातील नांदेड, बीड, छ. संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशीव, जालना या जिल्ह्यांच्या सहभागाचे लेख आहेत. संपादक सुनील देशपांडे यांनी कष्ट करून हे पुस्तक सिद्ध केले आहे. स्व. प्रल्हादजी अभ्यंकर यांचे मार्गदर्शन आणि सहभाग याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. रंगीत चित्रांनी पुस्तकाचे मूल्य वाढले आहे आणि मुखपृष्ठ अत्यंत बोलके झाले आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.