मध्य प्रदेशातील दणदणीत विजय म्हणजे हिंदुत्वाची पुनर्जागृती

विवेक मराठी    08-Dec-2023   
Total Views |
  
vivek
ऑगस्टमध्ये पक्षाने केलेले सर्वेक्षणही ‘भाजपा परत सत्तेत येत नाही’ असेच सांगत होते, म्हणून भाजपाने ही निवडणूक फार गांभीर्याने घेतली आणि या निवडणुकीची सूत्रे प्रादेशिक नेत्यांकडे न देता अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव यासारख्या केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली. राज्यातील पराभूत होत राहणार्‍या 39 जागांसाठीचे उमेदवार तीन महिन्यांपूर्वीच घोषित केले. भाजपाच्या मरगळेल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले. त्यांच्यामार्फत केंद्राच्या आणि राज्याच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या. ‘सनातन नष्ट करायला निघालेल्या लोकांबरोबर उभ्या असलेल्या काँग्रेसच्या विरोधात’ मध्य प्रदेशातले संत, महंत, साध्वी यांची एकजूट झाली. दुसरीकडे कॉँग्रेसला या बदलत्या हवेचा अंदाज लागलाच नाही. ते गाफील राहिले आणि पराभवात याची परिणती झाली. मध्य प्रदेशातील भाजपाच्या विजयाचे अगदी अचूक विश्लेषण करणारा लेख.
 
काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशाच्या पर्यटन विभागाने जाहिरातींची एक सुरेख अशी मालिका चालवली होती. ’हिंदुस्थान का दिल देखो..’ यासारख्या त्यांच्या जिंगल्स चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. लोकांच्या ओठांवर रुळल्या होत्या. या सर्व जिंगल्सची मध्यवर्ती संकल्पना होती, ’हिंदुस्थान के दिल मे एमपी’. अगदी याच धर्तीवर, मध्य प्रदेशात या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराची मध्यवर्ती संकल्पना होती ’एमपी के मन मे मोदी’!
 
 
 
या संकल्पनेने चमत्कार केला. इतके घवघवीत यश भाजपाच्या पदरात टाकले की भाजपाच्या नेत्यांनीही याची कल्पना केली नव्हती. ज्याला बहुतांश प्रसारमाध्यमे ‘कांटे की टक्कर’ म्हणत होते, सत्तापरिवर्तन होईल असे सांगत होते किंवा भाजपाच्या जागा जास्तीत जास्त 120पर्यंत पोहोचतील असे म्हणत होते, त्या सर्वांचे अंदाज सपशेल चुकले. 230 आमदारांच्या विधानसभेत भाजपाला चक्क 163 जागा मिळाल्या आणि प्रचंड अपेक्षा ठेवून असलेल्या काँग्रेसचे फक्त 66 आमदार निवडून आले.. म्हणजे भाजपा आणि काँग्रेस यांच्या जागांमधील अंतरच 97 जागांचे आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाचे 109 आमदार निवडून आलेले होते.
 
 
vivek
 
भाजपाने मोदींचा चेहरा समोर ठेवून ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका आणि रणनीती अगदी स्पष्ट होती. त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार निश्चित होते - कमलनाथ. भाजपाकडे मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता - म्हणजे मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान हे भाजपाचे मुख्यमंत्री होते/आहेत. सन 2005पासून आतापर्यंत, मधला कमलनाथांचा पंधरा महिन्यांचा कालखंड सोडला, तर सलग साडेसोळा वर्षांचा त्यांचा अनुभव. मात्र भाजपाने यंदा मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा चेहरा समोर केलेला नव्हता. किंबहुना मुख्यमंत्रिपदासाठी योग्य असे अनेक चेहरे रिंगणात उतरवून त्यांनी जनतेला तसा स्पष्ट संदेश दिला होता आणि म्हणूनच भाजपाची टॅग लाइन होती ‘एमपी के मन मे मोदी’!
 
 भाजपाने यंदा मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचा चेहरा समोर केलेला नव्हता. किंबहुना मुख्यमंत्रिपदासाठी योग्य असे अनेक चेहरे रिंगणात उतरवून त्यांनी जनतेला तसा स्पष्ट संदेश दिला होता..
 
साधारण सहा महिन्यांपूर्वीपर्यंत मध्य प्रदेशात भाजपाची स्थिती अत्यंत वाईट होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविषयी लोकांच्या मनातली नाराजी पराकोटीला गेली होती. मध्य प्रदेशात ‘माइलस्टोन प्रोजेक्ट्स’ असे कुठलेच नव्हते. बेरोजगारी वाढत होती. प्रशासनाचा बोजवारा उडाला होता. थोडक्यात, येणार्‍या निवडणुकीत भाजपाच्या विजयाची शक्यता अगदी तळापर्यंत जाऊन पोहोचली होती.
 

vivek 
 
मग अशी परिस्थिती असताना भाजपाच्या दणदणीत विजयाचा हा चमत्कार घडला कसा?
 
 ऑगस्टमध्ये पक्षाने केलेले सर्वेक्षणही ‘भाजपा परत सत्तेत येत नाही’ असेच सांगत होते, म्हणून भाजपाने ही निवडणूक फार गांभीर्याने घेतली आणि या निवडणुकीची सूत्रे प्रादेशिक नेत्यांकडे न देता अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव यासारख्या केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली.
साधारण मार्चच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी ‘लाडली बहना योजना’ सुरू केली. मध्य प्रदेशातील गरीब वर्गातील महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्याची ही योजना होती. प्रारंभी या योजनेचे थंडे स्वागत झाले. अनेकांना ही योजना कळलीच नाही, तर अनेकांना ती निवडणुकीतली घोषणा वाटली. मात्र या योजनेची नोंदणी सुरू झाली. तिला महिलांचा प्रतिसाद वाढला. आतापर्यंत सुमारे एक कोटी तीस लाख महिलांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. ऑगस्टपासून त्यांच्या खात्यात दरमहा 1,000 रुपये जमा होत आहेत. ऑक्टोबरपासून ही रक्कम बाराशे पन्नास रुपये झाली आहे. टप्प्याटप्प्याने ती दरमहा 3,000 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.
 
या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हळूहळू सरकारविषयी सकारात्मकता वाढू लागली. अर्थात, तरीही ‘या एका योजनेमुळे मध्य प्रदेशात चमत्कार घडला’ असे जे सांगण्यात येतेय, ते पूर्ण सत्य नाही.ऑगस्टमध्ये पक्षाने केलेले सर्वेक्षणही ‘भाजपा परत सत्तेत येत नाही’ असेच सांगत होते, म्हणून भाजपाने ही निवडणूक फार गांभीर्याने घेतली आणि या निवडणुकीची सूत्रे प्रादेशिक नेत्यांकडे न देता अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव यासारख्या केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली. भाजपाच्या इतिहासात कधीही झालेली नाही अशी गोष्ट या निवडणुकीत भाजपाने केली. राज्यातील पराभूत होत राहणार्‍या 39 जागांसाठीचे उमेदवार तीन महिन्यांपूर्वीच, अर्थात सतरा ऑगस्टला घोषित केले. भाजपात असे आजवर कधीच घडले नव्हते. नंतर आलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांचा आणि चार इतर खासदारांचा समावेश केला. केंद्रीय मंत्र्यांना प्रदेशातील वेगवेगळ्या भागांची जबाबदारी दिली. यामुळे मध्य प्रदेशात भाजपाच्या बाजूने वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांमधली मरगळही काही प्रमाणात दूर होऊ लागली.
 

vivek 
 
पण या सर्व गोष्टींमुळे भाजपाला असा जबरदस्त विजय मिळाला, असेही म्हणता येणार नाही.
 
 
मग प्रश्न उरतोच, हे सर्व झाले कसे? इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून भाजपाने अशा दणदणीत विजयाकडे वाटचाल कशी केली?
याचे मुख्य कारण आहे ‘हिंदुत्वाची पुनर्जागृती’. काही पत्रकारांनी भाजपाच्या विजयाची कारणे देताना आडून आडून या विषयाला स्पर्श केला आहे. पण स्पष्टपणे तसे कोणीही म्हटलेले नाही.
 हमासच्या त्या विकृत हल्ल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमात फिरत होते. त्यातच काँग्रेसने हमासचा निषेध करण्याऐवजी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ केलेल्या ठरावाची चर्चा व्हायरल झाली होती. शिवाय अनेक ठिकाणच्या मौलवींनी काँग्रेसला मतदान करण्यासंबंधी फतवा काढला होता.
 
शेवटच्या दहा-बारा दिवसांत तर ‘सनातन विरुद्ध सनातन नष्ट करायला निघालेले’ या मुद्द्यावर ही निवडणूक येऊन ठेपली. कदाचित मध्य प्रदेशाबाहेरील कोणाचा यावर विश्वास बसणार नाही, पण या निवडणुकीत हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याने बरीच मोठी भूमिका निभावली आहे. हमासच्या त्या विकृत हल्ल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमात फिरत होते. त्यातच काँग्रेसने हमासचा निषेध करण्याऐवजी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ केलेल्या ठरावाची चर्चा व्हायरल झाली होती. शिवाय अनेक ठिकाणच्या मौलवींनी काँग्रेसला मतदान करण्यासंबंधी फतवा काढला होता. आणि हे सर्व चालू असतानाच, ‘सनातन नष्ट करायला निघालेल्या लोकांबरोबर उभ्या असलेल्या काँग्रेसच्या विरोधात’ मध्य प्रदेशातले संत, महंत, साध्वी यांची एकजूट झाली.
 
 
मुळात मध्य प्रदेश हे हिंदुत्वाला पोषक असे राज्य. अगदी रामराज्य परिषद, हिंदू महासभा, जनसंघापासून या सर्व पक्षांचे आमदार/खासदार निवडून देणारे राज्य. साहजिकच सनातनवर होणार्‍या आक्रमणामुळे भाजपाचे कार्यकर्ते खवळले. सन 2018च्या विधानसभा निवडणुकीत निष्क्रिय असलेला भाजपाचा कार्यकर्ता या निवडणुकीत फक्त सक्रियच नव्हता, तर झटझटून, जोमाने कामाला लागलेला होता.
 
 

congress
 
 ‘मध्य प्रदेशात यंदा सत्तापरिवर्तन होणार, काँग्रेसच्या हाती सत्ता येणार’ हे जवळपास सर्वच प्रसारमाध्यमे ठासून सांगत होती.कॉँग्रेसला मात्र या बदलत्या हवेचा काहीसा अंदाज येऊ लागला होता, म्हणूनच कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात भोपाळ येथे होऊ घातलेली I.N.D.I.A. आघाडीची सभा रद्द करायला लावली.
 
या सगळ्या घटकांचा निवडणुकीवर परिणाम होणार, हे निश्चित होते. फक्त काही मतदारसंघांत, वरवर एक चक्कर मारून आलेल्या पत्रकारांना या ‘अंडरकरंट’चे आकलन होणे शक्य नव्हते आणि म्हणूनच ‘मध्य प्रदेशात यंदा सत्तापरिवर्तन होणार, काँग्रेसच्या हाती सत्ता येणार’ हे जवळपास सर्वच प्रसारमाध्यमे ठासून सांगत होती.कॉँग्रेसला मात्र या बदलत्या हवेचा काहीसा अंदाज येऊ लागला होता, म्हणूनच कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात भोपाळ येथे होऊ घातलेली I.N.D.I.A. आघाडीची सभा रद्द करायला लावली. या सभेच्या निमित्ताने डीएमकेचे स्टॅलिनसारखे नेते मंचावर येतील आणि ‘कॉँग्रेस ही सनातनविरोधी आहे’ असा प्रचार करायला भाजपाला संधी मिळेल, असा कमलनाथ यांनी विचार केला. कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांना स्थानिक मंदिरांमध्ये जाण्यासाठी कमलनाथ यांनी खास निर्देश दिले होते. मात्र मतदानाच्या दिवशी लागलेल्या लांबलचक रांगा पाहून अनेक पत्रकारांना कळतच नव्हते की हे नेमके काय होतेय ते! मतदानाची टक्केवारी वाढली की ते सत्तारूढ पक्षाच्या विरोधात असते, असा अनेकांनी ढोबळ अंदाज बांधला.
 
 
मध्य प्रदेशात यंदा ऐतिहासिक मतदान झाले. मतदानाची टक्केवारी होती 77.15%. मतदानाच्या दिवशी ज्यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा, त्यांचा उत्साह आणि ‘जय श्रीराम’चे नारे बघितले, त्यांनी मात्र सांगितले, ‘ही भाजपाची लाट आहे!’
 

 
 
भाजपाला या निवडणुकीत 48.62% मते मिळाली, जी 2018च्या निवडणुकीच्या तुलनेत सात दशांश सहा टक्के जास्त आहेत. काँग्रेसला 40.45% मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीपेक्षा ती 0.44%ने कमी आहेत. मध्य प्रदेशात तिसरी शक्ती नाही. यंदा गाजावाजा करून केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मध्य प्रदेशात ‘आम आदमी पक्षा’साठी मोठमोठ्या रॅली (सभा, रोड शो) केल्या. अनेक उमेदवार उभे केले. पण ‘आप’च्या सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने काही ठिकाणी आपले अस्तित्व दाखवले, पण ते तितकेच. निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्येच मुख्य मुकाबला होता.
 
 भाजपाने विद्यमान आमदारांपैकी 99 आमदारांना तिकीट दिले होते. भाजपाची लाट असूनही त्यातले 27 उमेदवार पराभूत झाले.
 
भाजपाने विद्यमान आमदारांपैकी 99 आमदारांना तिकीट दिले होते. भाजपाची लाट असूनही त्यातले 27 उमेदवार पराभूत झाले. भाजपाच्या 31 मंत्र्यांपैकी बारा मंत्री पराभूत झाले. यात गृहमंत्रिपदावर असलेले आणि अनेकदा प्रसारमाध्यमात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकणारे नरोत्तम मिश्र, कृषी मंत्री कमल पटेल, अरविंद भदौरिया यासारख्यांचा समावेश आहे.
 
 
भाजपाने तीन केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीत उतरवले होते. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मोरेना जिल्ह्यातील दिमनी या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. हा काँग्रेसचा मतदारसंघ मानला जात होता. येथे बलवीर सिंह दंडोतिया हे बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. दंडोतिया म्हणजे ब्राह्मण. या मतदारसंघात ब्राह्मण विरुद्ध ठाकूर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र नरेंद्र तोमर 24,461 मतांनी निवडून आले. काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर गेली. नरसिंहपूरमधून केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल हे सहज जिंकून आले. मात्र गेली अनेक वर्षे केंद्रीय राज्यमंत्री असलेले फग्गनसिंह कुलस्ते हे निवास या वनवासीबहुल क्षेत्रात 9,000 मतांनी पराभूत झाले.
 
 सतना विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अपवाद सोडले, तर भाजपाचे इतर सहा खासदार आणि राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय हे सर्व चांगल्या मतांनी निवडून आले.
 
भाजपाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद राकेश सिंह हे जबलपूर पश्चिममधून 30134 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे दोनदा आमदार आणि कमलनाथ शासनात अर्थमंत्री असलेल्या तरुण भानोट यांना पराभूत केले. मात्र सतनाचे खासदार गणेश सिंह ही निवडणूक जिंकू शकले नाहीत. सतना विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अपवाद सोडले, तर भाजपाचे इतर सहा खासदार आणि राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय हे सर्व चांगल्या मतांनी निवडून आले. हा अंक वाचकांच्या हाती जाईपर्यंत मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांची निवड झालेली असेल.
 
 
नवीन येणार्‍या मुख्यमंत्र्यांसमोर बरीच आव्हाने आहेत आणि लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या, यात नवीन मुख्यमंत्र्यांची कसोटी लागणार आहे. मात्र या निवडणुकीने हे दाखवून दिलेय की हिंदू जागा होतोय. स्वत:च्या अस्मितेबद्दल आणि धर्माबद्दल स्पष्टपणे बोलू लागला आहे आणि सर्व राजकीय पक्षांना स्पष्ट संदेश देतोय की हिंदूंच्या हिताविरुद्ध काही केले, तर पराजय निश्चित आहे!