संमेलनात तरुणाईचा सहभाग वाढण्यासाठी

विवेक मराठी    01-Feb-2023   
Total Views |
मराठी साहित्यक्षेत्रातदेखील कोणत्याही संमेलनाचे मंडप काढल्यानंतर पुरस्कारांचा मोह, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, उत्सवप्रियता, लागेबांधे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जागल्याचं काम करणारे साहित्यिक आणि रसिकांचं निखळ साहित्यप्रेम तळाशी उरायला हवं. जागतिक बदलांचे वारे इथवर पोहोचायला हवेत, तरच तरुणांना साहित्य संमेलनं हवीशी वाटतील आणि आणि ती त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील. वर्धा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींशी संवाद साधला.
 
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023 and youth
 
वर्धा येथे होत असलेल्या 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नसंच तयार करून मी काही स्थानिक, काही परिचयातील, काही समाजमाध्यमातून ओळख झालेल्या तरुण-तरुणींशी संवाद साधला.
 
 
कला-वाणिज्य पदवी, एलएलबी, अभियांत्रिकी इ. शाखांचे हे विद्यार्थी आहेत. काही स्पर्धा परीक्षा देणारे, काही नोकरी करणारे आहेत. काही जणांना कसलं तरी संमेलन वर्ध्याला होत आहे हे माहीत होतं, तर काहींना याचा पत्ता नव्हता. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आहेत हे माहीत होतं, तसंच त्यांच्याविषयी माहिती होती. एकदोघांना वर्धा संमेलनात पुस्तकांच्या स्टॉल्सना भेट द्यायची होती. एका यूट्यूबरने ’तिथे व्हिडिओ करू दिला तर मी जाईन’ असं उत्तर दिलं.
 
 
एकीने सांगितलं, “मला एकदा कविकट्ट्यावर संधी मिळाली होती. त्यात कवींची इतकी गर्दी होती की माझा नंबर कधी येईल या गडबडीत मी इतर कार्यक्रम पाहू शकले नाही.”
 
 
एकाने त्याच्या गावातील संमेलनात एक कार्यशाळा केल्याची आठवण सांगितली. परिसंवादांबाबत बहुतेकांना फारशी माहिती किंवा रस नव्हता.
 
 
यंदाचं संमेलन अगोदरच झालं असून त्याचे अध्यक्ष नागराज मंजुळे होते व त्यात त्यांनी भाषेच्या शुद्धतेविषयी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचं एक जण म्हणाला. “मंजुळ्यांचं ते वक्तव्य संमेलनातलं नसून ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’मधलं होतं” असं मी सांगितलं.
 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023 and youth 
 
एकीने विचारलं, “गेल्या महिन्यात मुंबईला झालं, ते काय होतं मग?” ‘’ते राज्य सरकारने आयोजित केलेलं ’विश्व मराठी संमेलन’ होतं” असं मी सांगितलं. “मग वर्ध्याचे आयोजक कोण आहेत?” यावर मी ‘’अखिल भारतीय साहित्य महामंडळ” असं सांगितलं.
यावर काही जणांनी ‘’अशी एकूण किती संमेलनं असतात?” असं विचारलं.
 
 
‘’विद्रोही संमेलनं असतात. जाति-धर्मनिहाय असतात. बाल, कुमार, युवा, शिक्षक, कामगार आणि स्त्रियांचीही असतात. बोलीभाषांची असतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या स्तरावर अशी संमेलनं आयोजित करत असतात. अ.भा. साहित्य महामंडळ ही महाराष्ट्रातील चार प्रादेशिक संस्थांची शिखरसंस्था आहे, म्हणून या संस्थेच्या संमेलनाची अधिक चर्चा असते” असं मी सांगितलं.
 
 
प्रश्नसंच त्यांनी तयार केला असून उत्तरं मी देते आहे असं या संवादाचं स्वरूप उलट झालं होतं.
 
 
हे तरुण समस्त मराठी युवा पिढीचं प्रतिनिधित्व करतात असा माझा दावा नाही, पण त्यांच्या प्रतिक्रिया चिंतनीय आहेत. प्रस्थापित साहित्य संमेलनांविषयी युवा पिढीला अनास्था वाटते, हे सत्य त्यांच्या संमेलनातील जेमतेम उपस्थितीवरून सहज लक्षात येईल. ‘संमेलने बहु झाली’ या स्थितीमुळे ते गोंधळले आहेत. या वेगळ्या चुली नसून हे साहित्याचेच उपप्रवाह आहेत, हे त्यांना समजावून सांगण्याचं आव्हान आणि जबाबदारी त्या त्या आयोजकांची आहे.
 
 
तरुणांचा वरचा वर्ग इंग्लिश बेस्ट सेलर्स, गॉसिप मासिकं वाचतो. तीही किंडलवर. संमेलन वगैरे त्यांच्या गावीही नाही. मध्यमवर्गीय तरुण समाजमाध्यमावर काय ते वाचतात, बघतात. वेब मालिका पाहतात. करियरचं दडपण त्यांना वाचनाकडे गांभीर्याने पाहू देत नाही. निमशहरी भागात किंवा खेडेगावात पदवी घेत असलेल्यांना दर्जेदार शिक्षणाअभावी किंवा आर्थिक तणावामुळे सकस साहित्याची गोडी लागत नाही. लागली, तरी पदरमोड करून संमेलनास जाणं त्यांना परवडत नाही.
 

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023 and youth 
 
मग साहित्य संमेलनाला जाणारे लोक नेमके कोण असतात?
 
 
पन्नाशीला पोहोचल्यावर स्थैर्य आलेले किंवा निवृत्त मध्यमवर्गीय पुस्तकप्रेमी, भाषाविषयाचे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, समाजमाध्यमावर लाइक मिळू लागल्याने आपल्या कवितेवर, लेखनावर संमेलनाच्या मान्यतेची मोहोर लागावी अशी आकांक्षा असलेली मंडळी, उपस्थिती अनिवार्य असलेले आयोजक संस्थेशी संबंधित लोक, स्वागताध्यक्षांचे निकटवर्तीय आणि प्रतिकूल स्थितीतही साहित्यविश्वाच्या संपर्कात असलेले मूठभर तरुण.
 
 
तरुणांशी बोलल्यावर जाणवलं की साहित्य संमेलनं युवकांना आपली वाटावी व सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रस्थापितांच्या विचारपद्धतीत बदल होणं आवश्यक आहे.
 
 
पहिला बदल म्हणजे कागदावर छापून येतं तेच साहित्य नसतं, हे स्वीकारायला हवं. साहित्य म्हणजे भोवताल टिपणं. त्याचं स्वरूप छापील पुस्तकांव्यतिरिक्त स्किट्स, विविध सादरीकरणांची संहिता, समाजमाध्यमावरील लेखन, ब्लॉग्ज, व्ही-लॉग्ज, मुलाखती किंवा मिम असंही असू शकतं.
 
 
 
चांगल्या साहित्यनिर्मितीसाठी संमेलनाअंतर्गत आयोजित पटकथा, गीत-गजल-ब्लॉग लेखन, डिजिटल पब्लिकेशन यासारख्या कार्यशाळांना अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रचारावर भर द्यावा. संमेलनातील निरर्थक वादांपेक्षा वृत्तपत्रातून याविषयीच्या बातम्या प्राधान्याने याव्यात.
 
 
अगम्य विषयावरील परिसंवादात, हितसंबंध जपण्यासाठी अनेक वक्त्यांची वर्णी लावून श्रोत्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातो. अपवाद वगळता निवडीला गुणवत्तेचा निकष आहे की नाही अशी शंका यावी, असे सुमार वक्ते, रटाळ कवी रसिकांच्या वेळेचा अपव्यय करताना दिसतात. यावर अंकुश यावा.
 
 
संमेलनपूर्व राजकीय कलगीतुरे हेदेखील तरुणांनी संमेलनांकडे पाठ फिरवण्याचं महत्त्वाचं कारण आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता मागे घेतला असला, तरी त्यांनी राजकीय हस्तक्षेपाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. संमेलनासाठी निर्धारित सरकारी निधी वाढावा, म्हणजे संमेलनाला राजकीय नेत्यांच्या अधीन राहावं लागणार नाही. राजकीय सहकार्य अवश्य असावं, पण राजकीय विश्लेषक नसलेल्या साहित्यिकांनी आपल्या राजकीय भूमिकेच्या प्रदर्शनासाठी व्यासपीठाचा वापर करू नये. राजकीय हेव्यादाव्यांचा वीट आलेल्या तरुणाईला इथेही फक्त तेच ऐकवायचं असेल, तर त्यांनी संमेलनाला का यावं!
 
 
या तरुणांशी बोलताना लक्षात आलं की त्यांच्या विरोधातील आधीच निष्कर्ष ठरवलेले तथ्यहीन विषय संमेलनातील परिसंवादासाठी घेतले, तर त्यांना ते आवडणार नाहीत. उदा., समाजमाध्यमांचे नकारात्मक परिणाम वगैरे. त्यांचं म्हणणं - आम्हाला मोबाइलच्या अतिवापरावरून उपदेश करणारी मधली पिढी स्वत:च व्हॉट्सअ‍ॅपच्या आहारी गेली आहे, तेव्हा त्यांनी दुटप्पी वागू नये. आमची पिढी ऐकणारी आणि (व्हिडिओ, रील्स) बघणारी पिढी आहे. वाचन म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचणं एवढंच नव्हे. जग पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स आणि चॅट-जीपीटीपर्यंत पोहोचलं असताना बहुसंख्य संमेलनांचे आयोजक एक तर ’स्वामी-मृत्युंजय’, पुलं-वपुमध्ये किंवा दुसरीकडे नकारात्मकतेत व अभिजन-बहुजन वादात अडकून पडलेले दिसतात.
 
 
याचं प्रतिबिंब समाजमाध्यमावरही पडत असलं, तरी लोकल ते ग्लोबल असा त्याचा प्रचंड आवाका आहे. माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रीकरण करण्यात समाजमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे. तिथे लेखनविषयक अनेक स्पर्धा होत असतात. तरुणांचे साहित्य कट्टे फेसबुकवर, व्हॉट्सअ‍ॅपवर आहेत. कला प्रदर्शनाचे कट्टे इन्स्टाग्रामवर व यूट्यूबवर आहेत. अधिक गंभीर चर्चा रेडिटवर व कोरावर घडत आहेत. इथे सुमार लिहिणारे अनेक असतील, पण बोलीभाषेत उत्तम लिहिणारे निमशहरी लेखक इथे आहेत, तसेच प्रमाण भाषेत सकस लिहिणारे शहरी तरुणही. त्यांची ताकद, त्यांची प्रतिमा त्यांना आलेल्या संमेलनाच्या आमंत्रणावर ठरत नसून त्यांची लेखणी ठरवते. इथे थेट प्रतिसाद मिळतो, तशी टीकाही झेलावी लागते. संमेलनांनी आपल्या कक्षा रुंदावून या सार्‍याला सामावून घेतलं, तर तरुणांचाही संमेलनांकडे ओढा वाढेल.
 
 
 
लोकशाही व्यवस्था बदलण्याचं आणि विचाराची पोच अमर्यादित स्तरावर नेण्याचं सामर्थ्य या माध्यमात असल्याने यावरील चांगल्या लेखनाला साहित्याचा दर्जा दिला जावा, अन्यथा नुकत्याच लोकप्रिय होऊ लागलेल्या ताज्या टवटवीत सोशल मीडिया संमेलनांनाच काय ते भवितव्य उरेल व जुन्या पठडीतली संमेलनं कालबाह्य ठरतील.
 
 
 
वर्धा संमेलनातील कार्यक्रम पत्रिका बघता यातील बहुतेक अपेक्षांना न्याय देण्याचा आयोजक मनापासून प्रयत्न करतील असं कार्यक्रम पत्रिकेवरून वाटतंय. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर संमेलनात पहिल्यांदा चर्चा घडणार आहे. मुद्रित माध्यमांच्या संपादकांनी समाजमाध्यमाबद्दल बोलणं, लेखकांनी थेट व्यक्त होणं, मुक्तसंवाद, परिसंवादात वंचित समाजाच्या साहित्यापासून ललितेतर साहित्यापर्यंत व प्रबोधन परंपरेपासून अनुवाद व स्त्री-पुरुष तुलनेपर्यंतचं वैविध्य ही या संमेलनाची वैशिष्ट्यं असतील. चांगल्या साहित्यविषयक चळवळी हे समाजाच्या जिवंतपणाचंच नव्हे, तर सक्रियतेचं लक्षण असतं. अशा उपक्रमांमधून समाजातलं साचलेपण दूर होतं. वैचारिक जळमटं दूर होऊन नव्या विचारांची वाट मोकळी होते. दक्षिण भारतीय, हिंदी व बंगाली साहित्यवर्तुळात हे घडताना दिसतं आहे. मराठी साहित्यक्षेत्रातदेखील कोणत्याही संमेलनाचे मंडप काढल्यानंतर पुरस्कारांचा मोह, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, उत्सवप्रियता, लागेबांधे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जागल्याचं काम करणारे साहित्यिक आणि रसिकांचं निखळ साहित्यप्रेम तळाशी उरायला हवं. जागतिक बदलांचे वारे इथवर पोहोचायला हवेत, तरच तरुणांना साहित्य संमेलनं हवीशी वाटतील आणि आणि ती त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील.
 

मोहिनी महेश मोडक

 वेब सर्व्हिसेस पुरवणाऱ्या अकोलास्थित कंपनीच्या संचालिका आहेत. नेटवर्क इंजीनिअरिंग कोर्सेसची प्रशिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. सध्या त्या ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग यासारखे विविध कोर्सेस ऑनलाइन पद्धतीने शिकवतात.
त्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात द्विपदवीधर
असून त्यांनी वृत्तपत्रातून स्तंभलेखन, प्रासंगिक लेखन व दिवाळी अंकांसाठी लेखन केले आहे.
त्या समाजमाध्यमांच्या अभ्यासक व ब्लॉगर आहेत, तसेच
विविध सामाजिक, साहित्यिक व व्यावसायिक संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत.