ललित शैलीत सामाजिक इतिहास लिहिणारा लेखक

विवेक मराठी    01-Feb-2023   
Total Views |
श्रीकांत उमरीकर। 9422878575
 
सामाजिक, राजकीय क्षेत्र, पत्रकारिता, संगीत, साहित्य, न्यायव्यवस्था अशा विविध विषयांत चपळगावकरकाकांना उत्तम गती आहे याचा पुरावा त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसून येतो. खरं तर त्यांनी संगीतावर स्वतंत्रपणे लिहिलं असतं, रसिकांनी त्याचंही स्वागत केलं असतं. तसंच साहित्यावरही. विशेषत: व्यक्तिचित्रं, आत्मचरित्र, चरित्रं हा त्यांचा आवडीचा प्रांत. यावर त्यांनी स्वतंत्रपणे लिहायला हवं, असं आजही वाटतं.
 
vivek
चपळगावकरकाकांची माझी पहिलीच ओळख अशा काही ऊबदार कौटुंबिक वातावरणात झाली की तेव्हापासून आजपर्यंत एक मोठा प्रतिभावंत लेखक म्हणून, समाजातील महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणून असलेलं दडपण माझ्यावर कधीच आलं नाही.
 
 
 
परभणीला बाबांच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या वकील मित्रांचं एक कोंडाळं होतं. त्याचे नायक म्हणजे अ‍ॅड. वसंतराव पाटीलकाका. काकांच्या घरी असणार्‍या गाण्याच्या मैफिली, घरगुती समारंभ, मित्रांची एकत्रित जेवणावळीची पार्टी असं काही असलं की आम्ही मुलंही हौसेने तिथे बागडायचो.
 
 
एकदा केव्हातरी चपळगावकर काका-काकू परभणीला आले असताना घरगुती गाण्याचा असाच एक कार्यक्रम होता. मला जास्तीचा उत्साह असल्याने पाटीलकाकूंना मदत करायला मी आधीच तिथे होतो. मला पाहताच पाटीलकाकांनी चपळगावकरकाकांना सांगितलं, “अरे नाना, हा श्रीकांत, बाबूचा पोरगा. याने सुरेश भटांवर फार छान निबंध मराठीच्या पेपरात लिहिला. त्याला भटांच्या खूप कविता पाठ आहेत.”
 
 
चपळगावकरकाकांना जवळचे लोक ‘नाना’ या नावाने संबोधतात. काकांनी मला जवळ बसवून घेतलं. माझ्या पाठीवर हात फिरवत माझी चौकशी केली. मला कविता पाठ आहेत याचं त्यांना फारच अप्रूप वाटलं. माझे वडील अ‍ॅड. अनंत उमरीकर यांना त्यांचे जवळचे मित्र-नातेवाईक बाबू याच नावाने संबोधतात. चपळगावकरकाकांनी काकूंना बोलावून कौतुकाने “अगं, हा बघ बाबूरावांचा मुलगा किती छान कविता पाठ करतो.” असं काहीतरी सांगितलं. पुढे एकदा औरंगाबादला काकांनी शांताबाई शेळके यांची एक मुलाखत घेतली, त्याही कार्यक्रमाला मी हजर होतो. औरंगाबादला शिकायला आलो, तेव्हा अगदी सुरुवातीला एकदा मसापमध्ये सी.ग. मनाठकर यांच्या ‘शूर्पणखा’ या खंडकाव्याच्या प्रकाशन समारंभात त्यांना बोलताना मी ऐकलं होतं. तसंच त्याच काळात पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांनी 1987मध्ये सरस्वती भुवनमध्ये बोरकरांच्या कवितांचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, त्याचे आयोजक म्हणून भूमिका वठवतानाही बघितलं होतं. साहित्याशी काकांशी असलेली जवळीक मी आधीपासून पाहत आलो होतो.
 
 
 
मराठवाड्यातील पुरोगामी डाव्या समाजवादी चळवळीचं मुखपत्र म्हणजे दै. मराठवाडा. त्या परिवारात काकांना वावरतानाही मी काकांना पहात आलो होतो.
 
 
vivek
 
पुढे जेव्हा काका नियमित लेखन करायला लागले, त्यांची पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली, विविध दिवाळी अंकांतून, मासिकांमधून, दैनिकांतून त्यांचे लेख प्रकाशित व्हायला लागले, त्या लिखाणात हे दोन धागे जुळलेले मला फार स्पष्टपणे आढळून आले. माझे वडील, काका, आजी (आईची आई) हे सगळेच सामाजिक, राजकीय क्षेत्रात अतिशय सक्रिय असलेले मी माझ्या अगदी लहानपणापासून अनुभवत होतोच. शिवाय यांना एक सांस्कृतिक साहित्यिक अंगही होतं. तेव्हा काकांचे हे दोन भिन्न वाटणारे पैलू समजून घ्यायला मला फार अवघड गेलं नाही.
 
 
 
काकांच्या लिखाणाकडे पाहताना सहजच लक्षात येतं की त्यांनी 1860 ते 1960 असा साधारणत: 100 वर्षांचा भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्राचा समाजजीवनाचा कालखंड निवडलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते. ‘कर्मयोगी संन्यासी’ हे त्यांचं सविस्तर चरित्र हे काकांचं पहिलं महत्त्वाचं, दखल घेतलं गेलेलं पुस्तक. मौज प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हा मराठवाड्याबाहेर असलेल्या मराठी वाचकांना पहिल्यांदाच स्वामीजींचा असा सविस्तर परिचय लिखित स्वरूपात वाचायला मिळाला.
 
 
 
काकांचे वडील पुरुषोत्तमराव चपळगावकर हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक. त्यांचं छोटंसं आत्मचरित्र (घडून गेलेली गोष्ट) प्रसिद्ध आहे. त्यावरून काकांची घडण कोणत्या वातावरणात झाली ते सहजच लक्षात येतं. पुढे त्यांनी स्वत: आत्मचरित्रात्मक आठवणी लिहिल्या. ‘मनातली माणसं’, ‘संस्थानी माणसं’ ही पुस्तकं लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर तो काळ आणि आजूबाजूची माणसंच आहेत, हे सहजच लक्षात येतं.
 
 
‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ अशी पुस्तकं लिहिताना काकांमधील ललित लेखक आणि सामाजिक अभ्यासक यांची छानशी जुगलबंदी चाललेली लक्षात येते. जुगलबंदी या अर्थाने की हे लिखाण कोरडं होऊ नये आणि संदर्भ सुटून नुसताच शब्दफुलोरा बनू नये, यासाठी केलेली मेहनत.
 
 
sahity
 
‘दीपमाळ’ नावाने काकांनी दै. लोकसत्तात एक सदर चालवलं होतं. पुढे मी आमच्या प्रकाशनाच्या वतीने त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलं. आपल्या परिसरांतील संत, त्यांचं वाङ्मय याबद्दल काकांना असलेला जिव्हाळा या पुस्तकांतून सतत दिसून येतो. उदा., मध्वमुनीश्वरांवर लिहिताना त्यांची रचना ‘पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर’ कशी आजही गोड आवाजात खेडोपाडी गायली जाते, असा एक मनोवेधक उल्लेख ते लिहिता लिहिता सहज करून जातात.
 
 
 
काकांची शैली जरी ललित असली, तरी तिची जातकुळी अस्सल सामाजिकच आहे. आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय संदर्भाचा तिला विसर पडत नाही. ‘दीपमाळ’मध्ये मराठवाड्यातील मध्ययुगीन कालखंडातील लिखाण करणारे किंवा प्रकाशित झालेली पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्रं या सर्वांवर लिहिताना, ‘.. या काळात हैदराबाद संस्थानात प्रसिद्ध झालेल्या सर्वच पुस्तकांचे वाङ्मयीन मूल्य फार श्रेष्ठ आहे असे नाही. परंतु मराठी भाषा जिवंत राहावी म्हणून संस्थानातल्या जनतेने जी धडपड केली, तिच्या या खुणा आहेत. या दृष्टीने त्यांचे महत्त्व आहे.’ असं त्यांनी स्पष्टपणे नोंदवलं आहे.
 
 
 
त्यांच्या या शैलीमुळे त्यांचं लिखाण बोजड होत नाही, म्हणूनच मी ‘तीन न्यायमूर्ती’ या पुस्तकाचा संदर्भ दिला. हा विषय अतिशय क्लिष्ट बनू शकला असता, कोरडा झाला असता, पण काकांनी ते टाळलं. ही एक तारेवरची कसरत त्यांनी सतत सांभाळली.
काकांचा एकूणच पिंड नेहरूंच्या समाजवादी विचारांवर पोसलेला. तो काळच त्या विचारांनी भारलेला होता. त्या पिढीवर त्याचा प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं. पण काकांनी आपल्या लिखाणावर याचा परिणाम नाही होऊ दिला. सी. राजगोपालाचारींवर लिहिताना त्यांच्या स्वातंत्र्यवादी विचारसरणीवर काकांनी फार छान समतोल लिहिलं, हे त्याचं एक स्पष्ट उदाहरण. शंकरराव देवांसारख्या गांधीवाद्यावर लिहिताना काका त्यावर नेहरूंच्या समाजवादाची छाप पडू देत नाहीत.
 
 
अनंत भालेराव हे त्यांना पितृतुल्य वाटणारं व्यक्तिमत्त्व. अण्णा (अनंतरावांचं घरगुती नाव) त्यांच्या मनात कायमस्वरूपी घर करून बसलेले आहेत, असं अण्णांवरचं लिखाण वाचलं की लक्षात येतं. पण याही ठिकाणी कुठेही शब्दबंबाळ होत ते वाहत जात नाहीत. फार काटेकोरपणे अण्णांचं मूल्यमापन करण्याचं अवघड काम काकांनी केलंय.
 
 
काही विषय जे विद्वांनाना क्लिष्ट वाटतात, तेही काकांनी सुलभ पद्धतीने सूत्रबद्ध असे मांडले आहेत. ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी नेतृत्वाची सांधेजोड’ या पुस्तकात त्यांच्या या प्रतिभेची साक्ष पटते. अन्यथा टिळक विरुद्ध गांधी अशीच एक सरधोपट मांडणी आपल्याकडे केली जाते. केवळ टिळक-गांधीच नव्हे, तर त्या काळातील महत्त्वाची थोर व्यक्तिमत्त्वं संदर्भासह समजून घ्यावीत, हे त्यांनी सोदाहरण मांडलं आहे. ‘त्यांना समजून घेताना’ या पुस्तकात याचा ठायी ठायी प्रत्यय येतो.
 
 
 
काही वेगळ्या विषयांकडे काकांनी मराठी वाचकांचं लक्ष वेधलं. ‘नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’ या पुस्तकांतील विषय उपेक्षित असा आहे. गोखल्यांच्या या महत्त्वाच्या कामाकडे नंतरच्या अभ्यासकांचं फारसं लक्ष गेलं नाही. महात्मा गांधींनी भारत सेवक समाजाची शिकवण कशी अंगीकारली आणि पुढे स्वातंत्र्याची चळवळ गतिमान करण्यासाठी तिचा वापर कसा करून घेतला, हा पैलू फारसा नोंदवला जात नाही.
 
 
‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ यातील न्या. तेलंग आणि न्या. चंदावरकर यांच्यावर फारसं लिहिलं गेलं नाही. न्या. रानडेंवर त्या मानाने भरपूर मजकूर उपलब्ध आहे.
 
 
‘दीपमाळ’ पुस्तकातील एक संदर्भही या दृष्टीने पाहायला हवा. मराठवाड्यात जी मठ मंदिरं संस्थानं आपण धार्मिक दृष्टीने जोखतो, तसं न करता त्यांनी समाजजीवनात जे महत्त्वाचं योगदान दिलं हे लक्षात घेतलं पाहिजे. काकांचा हा मुद्दा अतिशय वेगळा असा आहे. इथे त्यांचे पितृतुल्य आप्त पत्रमहर्षी अनंत भालेराव यांच्याशी त्यांची नाळ जुळते. वारकरी संप्रदायाबद्दल लिहिताना अण्णांच्या लिखाणात हे वेगळे समाज जोडण्याचे संदर्भ फार उत्कटपणे आले आहेत.
 
 
काकांच्या लिखाणात आणखी एक पैलू येतो. त्याच अंगाने त्यांचं आणखी विस्तृत असं लिखाण पुढे यायला हवं होतं. मध्ययुगीन कालखंडांतील संतांच्या लिखाणाचं एक फार मोठं आकर्षण त्यांना आहे. मध्वमुनीश्वर, अमृतराय, भागानगरचे केशवस्वामी, कल्याणीचे शिवरामस्वामी, संत चरित्रकार उद्धव चिद्घन, पैठणचे शिवदिन केसरी, माजगावचे जगन्नाथ, माहूरचे विष्णुकवी, दासगणू यांच्यावर त्यांनी आवर्जून लिहिलं. खरं तर याच कालखंडातील रचनाकारांवर त्यांनी आणखी लिहायला हवं होतं. त्याचं कारण म्हणजे एकाच वेळी त्यांचं वाङ्मयीन मूल्य आणि त्याच वेळी सामाजिक संदर्भ असं सगळंच एकत्रितपणे विचार करून त्यांचं लिखाण समोर येतं. त्यामुळे त्याला विविध पैलू प्राप्त होतात.
 
 
 
सामाजिक, राजकीय क्षेत्र, पत्रकारिता, संगीत, साहित्य, न्यायव्यवस्था अशा विविध विषयांत काकांना उत्तम गती आहे याचा पुरावा त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे दिसून येतो. खरं तर त्यांनी संगीतावर स्वतंत्रपणे लिहिलं असतं, रसिकांनी त्याचंही स्वागत केलं असतं. तसंच साहित्यावरही. विशेषत: व्यक्तिचित्रं, आत्मचरित्र, चरित्रं हा त्यांचा आवडीचा प्रांत. यावर त्यांनी स्वतंत्रपणे लिहायला हवं, असं आजही वाटतं.
 
 
 
काका आता वयाने खूप थकले आहेत. ऐकू येणं कमी झालं आहे. फिरण्यावर बंधनं आली आहेत. कोरोनाने सर्वांवरच काही एक आघात केले, तसे ते काकांवरही झाले. पण त्यांचा उत्साह मात्र अजूनही कमी झाला नाही.
 
 
vivek
 
काकांनी बहुतांश लिखाण केलं ते त्यांच्या निवृत्तीच्या काळात. ते सक्रिय होते, त्या न्यायदानाच्या आणि आधी वकिलीच्या काळात त्यांनी फारसं लिखाण केलं नाही. कदाचित यामुळेच असेल, त्यांच्या लिखाणात पिकल्या फळाचा एक गोडवा कायम आढळून येतो. कुठलंच वाक्य, परिच्छेद उगाच भरतीसाठी जास्तीचे शब्द पाहिजेत मजकूर पाहिजे म्हणून येत नाही. ते भरपूर संदर्भ गोळा करतात. त्यांचा आवश्यक तेवढाच वापर करून बाकी फापटपसारा बाजूला ठेवतात. त्यामुळे त्यांचं लिखाण कोरडं न बनता वाचनीय बनत जातं.
 
 
त्यांचा-माझा परिचय पहिल्यांदा कसा झाला, ते मी आवर्जून सांगितलं, कारण त्यामुळेच मला त्यांचं लिखाण समजून घेणं सहज शक्य झालं. आजही कधी त्यांच्या घरी गेलं की एखाददुसरं औपचारिक वाक्य झालं की बोलता बोलता ते त्यांच्या हाताशी असलेल्या पुस्तकातील संदर्भावर येतात, आपण एखाददुसरा पूरक विषय काढायचा की लगेच त्यांची तल्लख स्मरणशक्ती जागी होते. शांतपणे ते बोलत जातात.. जसा नदीचा शांत वाहता प्रवाह.
 
 
 
बाबांचे मित्र म्हणून काकांशी जवळीक साधता आली, तेव्हा मी अगदी लहान होतो. पण पुढे शिकायला औरंगाबादला आलो, त्यांच्या घरी हक्काने जायला लागलो, सायली तर आमच्या बरोबरचीच. काकूंशी गप्पा मारताना त्यांच्या हातचे चविष्ट पदार्थ खाताना, मोकळेपणाने वावरताना वाटतं - आपण किती भाग्यवान. इतका मोठा लेखक, सामाजिक इतिहासाचा अभ्यासक आपल्या अगदी जवळचा आहे. इतर लोक त्यांच्याशी भेटायला जाताना हजारदा विचार करतात. मी मात्र सरळ घरी जाऊ शकतो. काका झोपले असतील/कामात असतील, तर आत जाऊन काकूंशी गप्पा मारू शकतो. ते कार्यक्रमांना येऊ शकत नाहीत हे माहीत असूनही नवीन नवीन कार्यक्रमांची निमंत्रणं त्यांना देत राहतो.
 
 
माझा मुलगा नॅशनल लॉ स्कूलमध्ये शिकतोय हे कळल्यावर त्यांच्या डोळ्यात विलक्षण आनंद चमकून गेला. बाबांना ते उत्साहात म्हणाले, “अरे व्वा, फारच छान! फार चांगलं क्षेत्र आहे. तो खूप मोठा होईल.” खरं तर हे माझ्या मुलासाठी असण्यापेक्षा त्यांना आपल्या वकिलीच्या क्षेत्राचा सार्थ अभिमान वाटतो, म्हणूनच असणार.
 
 
 
काकांसारख्या लेखकाचं मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात अतिशय सक्रिय होते. त्याची एक प्रसन्न छटा त्यांच्या लिखाणात दिसून येते. केवळ हस्तिदंती मनोर्‍यातील लेखक अशी त्यांची प्रतिमा नाही, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड ही अतिशय सार्थ अशी आहे. ते या व्यासपीठाचा किती उपयोग करून घेतात हे महत्त्वाचं नाही, तर मराठी माणसांनीच त्यांच्यासारख्यांचा योग्य तो सन्मान करून या व्यासपीठाची उंची वाढवावी.
 
 
 
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद